दशरथ राजाचा मृतदेह रसायनात ठेवण्यात आला. तातडीने वसिष्ठ ऋषींना बोलावण्यात आले. वसिष्ठ ऋषींनी भरत व शत्रुघ्न ला आणण्यासाठी त्यांच्या आजोळी म्हणजे नंदीग्रामी दूत पाठवले. प्रवासात भरतास दशरथ राजाच्या मृत्यूची तसेच श्रीरामाच्या वनवासाची माहिती सांगू नये असे दूतास बजावण्यात आले होते त्यामुळे भरतास वाटले की नक्की श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि म्हणूनच आपल्याला घाईघाईने आयोध्येस नेण्यात येत आहे. प्रवासात भरत व शत्रुघ्न ह्याच समजात असतात त्यामुळे आनंदी असतात परंतु जसे ते अयोध्येत पोंचतात तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात कारण अयोध्येला शोककळा आलेली असते. कुठेच दिवे लागले नसतात. कुठेच अग्नी प्रज्वलित झालेला नसतो.
दूतास पृच्छा केली असता दूत काही न सांगता मौन राहतो त्यावरून काहीतरी विपरीत घडले आहे हे भरत ताडतो. भरत राजप्रासादात जाताच जेव्हा सर्वप्रथम आपल्या कक्षात जातो तेव्हा तिथे कैकयी आधीच उपस्थित असते. ती भरतास म्हणते,
"बरं झालं आला तू पुत्रा! तुझे तात निजधामी गेले आहेत त्यांचा अंतिम संस्कार करून तुला राज्यपदी बसावयाचे आहे."
कैकयी चे असे बोलणे ऐकून भरतास जब्बर धक्का बसतो. तो मंचकाचा आधार घेऊन त्यावर बसत कैकयी ला म्हणतो,
"तात गेले! केव्हा गेले? असे अचानक कसे काय झाले? आणि माझ्या राज्यपदी बसण्याचा प्रश्न येतोच कुठे? भ्राता श्रीराम कुठे आहे?"
हे ऐकल्यावर कैकयी भरतास सगळा घटनाक्रम इतंभूत सांगते,
"तू आजोळी गेला असता महाराजांनी श्रीरामाला राज्यपदी बसवण्याचा घाट घातला होता त्यात त्यांचा वाईट हेतू मला कळला. राम राजा झाला असता तर तू मी त्याचे दास बनून राहिलो असतो. कौसल्या राजमाता झाली असती व मी काय नुसते बघत बसली असती काय? म्हणून मी भूतकाळात एकदा स्वामींनी मला दिलेले दोन वर ह्यावेळेस मागून घेतले. एका वरात मी तुझे सिंहासन मागितले तर दुसऱ्या वरात श्रीरामाचे चौदा वर्षाचे वनवासात राहणे मागितले जेणेकरून त्याने तुझ्या कार्यात अडथळे आणू नये म्हणून.
श्रीरामसह त्याची पत्नी सीता व लक्ष्मण सुद्धा गेले. ह्या धक्क्याने तुझे तात परलोकवासी झाले. ह्यावरून तुझ्या पिताश्रींचे श्रीरामावर केवढे प्रेम होते हे तुला कळून येईल. एवढे प्रेम कधी त्यांनी तुझ्यावर केले? त्यांचे सदैव झुकते माप श्रीरामा कडेच होते. पण तुझी माता खंबीर आहे. हे सगळं मी तुझ्यासाठी केले पुत्रा!"
कैकयी चे हे बोलणे ऐकून भरताच्या पायाखालची जमीनच सरकते. भरतकुमार च्या मनाला धक्क्यावर धक्के बसतात.आधी पिताश्री गेल्याचा धक्का, मग श्रीराम सीता, लक्ष्मण वनवासात गेल्याचा धक्का आणि सगळ्यात कहर म्हणजे हे सगळं घडवून आणणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून आपली माता आहे हा तीव्र धक्का. धक्क्याने शून्यात गेलेल्या भरताच्या डोळ्यात हळूहळू संतापाची ठिणगी पेटते. बघता बघता त्याचे डोळे व वाणी आग ओकू लागतात. एका अन्याया विरोधाची आग, धिक्काराची आग, निषेधाची आग, तिरस्काराची आग.
"तू माता आहेस की वैरीण? कैदाशीणे तू त्या धर्मात्म्या अश्वपतीची कन्या शोभत नाहीस आणि त्या प्रजेचे हित पाहणाऱ्या दशरथाची भार्या ही शोभत नाहीस! कोणीतरी पतिव्रता स्त्री आपल्या पतीचा वध करेल काय? आपल्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल काय? मूर्ख स्रीये! तू फक्त कलंकिनी अवलक्षणी आहेस!
फांदीसकट तू वृक्ष तोडला आणि फळाची मात्र वाढ व्हावी अशी तू अपेक्षा करतेसच कशी? त्यावरील फळ सुद्धा कोमेजून जाणार नाही का?
तुझ्या ह्या कृत्याचे समर्थन खूषमस्करे कदाचित करतील पण तुझे ऐकून जर मी राज्यपदी बसलो तर माझ्या नावाला काळिमा लागेल.
माझ्या भावाला तू वनवासात पाठवलं, माझ्या पित्याला तू यमसदनी पाठवलं आणि अशी अपेक्षा करते की मी आनंदाने सिंहासन स्वीकारावं? श्रीरामाला वनवासी वस्त्र परिधान करण्यास देताना तुझे हात कसे जळले नाही? एक क्षणही मी तुला माझ्या डोळ्यासमोर बघू शकत नाही? जा चालती हो इथून! तू ही वनवासात जा! तुझे तोंड काळे कर!",भरताचे असे कटू शब्द ऐकून कैकयी ला रडू कोसळते. ती रडत रडत म्हणते,
"अरे बाळा पण हे मी तुझ्यासाठी केले आणि तू मलाच बोल लावतोय?",ह्यावर भरतकुमार गर्जत म्हणतात,
"तुझ्या ह्या कृत्यामुळे मी निराधार पोरका झालो आहे. पिताश्री तर गेलेलेच आहेत पण तू सुद्धा माझ्यासाठी मेलेली आहेस. मला कोणाचाच आधार नाही. तू माझी माता नाहीस की मी तुझा पुत्र नाही. आता तुला पुत्रही नाही आणि पतीही नाही. आता खुशाल विधवापण, वैधव्याचा आनंद करत, मिरवत फिर. तू अशी कुलक्षणी आहेस की तुझी सावली सुद्धा ह्या सदनात, सिंहासनावर पडू नये."
पुढे तिरस्काराने भरत म्हणतो,"तुला बघताच तुझ्या प्राणांचा घोट घ्यायला माझी तलवार शिवशिवते. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो कारण श्रीराम तुला माता मानतो. तुला जर मी मारले तर माता कौसल्या व माता सुमित्रा मला कुपुत्र म्हणतील जे मला सहन होणार नाही त्यामुळे इच्छा असूनही मी तुझा वध करू शकत नाही. तुझ्या ह्या कलुषित कृत्यामुळे मी माता कौसल्या, माता सुमित्रा व अयोध्येतील जनता कोणालाही तोंड दाखवू शकत नाही. कोणत्या शब्दाने मी कौसल्या मातेचे सांत्वन करू? कशाप्रकारे मी माता सुमित्रेचे दुःख निवारू? नगरातील लोकांना कोणत्या शब्दाने समजावू?
अरण्यापेक्षाही हा राजवाडा राम नसल्याने उदास भकास झाला आहे. वनात हिंडून फिरून मी रामाला शोधून काढेन. ह्या माझ्या निर्णयामध्ये कोणीही आडवे येऊन विघ्न आणू नये.",असे म्हणून भरत मंत्री सुमंतांना बोलावतात व त्यांना आज्ञा देतात,
"चला सुमंत! आपल्या सेनेला तयार करा. वनात जाऊन आपल्याला रामाला शोधायचे आहे त्यासाठी जेवढे सैनिक असतील तेवढे चांगले. कोणाला तरी तो कुठेतरी दिसेलच! जिथंही तो दिसेल तिथेच त्याचा राज्यभिषेक करून घेऊ त्यासाठी जाणकार ऋषीगणांना ही आपल्या सोबत घेऊन चला. रामाला त्याचा राजमुकुट अर्पण करणे हा एकच मला आता ध्यास आहे.",एवढे सुमंताला सांगून कैकयी ला भरत म्हणतो,
"तू इथेच काळरात्री सारखी आक्रन्दन करीत आक्रोश करीत ह्या अरण्यासम तुझ्या कक्षात राहा. मी रामाच्या शोधात हा पहा निघालो."
त्यानंतर वसिष्ठ ऋषींच्या उपस्थितीत भरत राजा दशरथाचा अंतिम संस्कार करतो. व श्रीरामाच्या शोधात निघतो.
क्रमशः
( रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील तेविसावे गीत:-
माता न तू, वैरिणी
अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय
धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे, नांदे काय?
वध नाथाचा करील मूढे, पतिव्रता का कुणी?
शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळा इच्छिसी वाढ
आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड
स्वीकारिन मी राज्य तुझ्यास्तव, कीर्ती होईल दुणी
वनांत भ्रात्या धाडिलेस तू, स्वर्गि धाडिले तात
श्रीरामाते वल्कल देता का नच जळले हात?
उभी न राही पळभर येथे, काळे कर जा वनी
निराधार हा भरत पोरका, कुठे आसरा आज?
निपुत्रिके, तू मिरव लेवुनी वैधव्याचा साज
पडो न छाया तुझी पापिणी, सदनी, सिहासनी
तुला पाहता तृषार्त होते या खड्गाची धार
श्रीरामांची माय परि तू, कसा करू मी वार?
कुपुत्र म्हणतिल मला कैकयी, माता दोघीजणी
कसा शांतवू शब्दाने मी कौसल्येचा शोक
सुमित्रेस त्या उदासवाणे गमतिल तिन्ही लोक
कुठल्या वचने नगरजनांची करु मी समजावणी?
वनाहुनीही उजाड झाले रामाविण हे धाम
वनात हिंडुन धुंडुन आणिन परत प्रभु श्रीराम
नका आडवे येउ आता कुणी माझिया पणी
चला सुमंता, द्या सेनेला एक आपुल्या हाक
श्रीरामाला शोधण्यास्तव निघोत नजरा लाख
अभिषेकास्तव घ्या सांगाती वेदजाणते मुनी
असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास
हाच एकला ध्यास, येथुनी हीच एकली आस
काळरात्रसी रहा इथे तू आक्रंदत विजनी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★