मंत्री सुमंत दशरथ राजास श्रीरामांचा संदेश कथन करतात. दशरथ राजा तो संदेश ऐकून भावनातिरेकाने आक्रन्दू लागतात. त्यांच्या डोळ्याला अश्रूंची धार लागते.
"पहा सुमंता! माझा श्रीराम किती गुणी आहे. स्वतः वनवासात असून त्याला त्याच्या माता पित्याची काळजी वाटते. आपले आईवडील शोकाकुल राहू नये म्हणून त्याच्या मनाची होणारी धडपड त्याच्या संदेशातून प्रतीत होतेय. माझ्या कैकयी ला वर देण्यामुळे आज तो जानकी व लक्ष्मण वनवासात फकिराप्रमाणे जगत आहेत पण त्याबद्दल त्याचा कोणावरही राग नाही. पहा कसा दैवदुर्विलास आहे. श्रीरामासारखा मोठ्यामनाचा गुणी पुत्र मला लाभला म्हणून मी भाग्यवान ही आहे आणि अश्या पुत्राला माझ्यामुळे वनात जावे लागले म्हणून मी कमनशिबी सुद्धा आहे. इथे राजप्रासादात मृदू शय्येवर लोळत असताना तिथे माझा सुकुमार पुत्र काट्या कुट्यातून अनवाणी पायाने वाटचाल करतो आहे. माझी जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. मी अत्यंत करंटा आहे. ज्या वृद्धपकाळात पुत्राचा सहवास लाभावयास हवा त्याकाळात मी पुत्रवियोगाचे दुःख भोगतो आहे. माझ्या डोळ्यापुढे अंधार दाटून आला आहे.",दशरथ राजांनी असे म्हणताच मंत्री सुमंत त्यांना आधार देण्यासाठी पुढे येतात. व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा दशरथ राजा त्यांना म्हणतात,
" सुमंता आता मला कितीही आधार दिला तरी माझ्या मनाला उभारी येणार नाही. माझा देह इतका क्षीण झाला आहे की आता तो प्राणांचा भार फार काळ सहन करू शकणार नाही. ",दशरथ राजाने असे म्हणताच मंत्री सुमंत सेवकांकरवी संदेश पाठवून कौसल्या देवी, सुमित्रा देवी, उर्मिला देवी व इतर आप्तांना दशरथ राजांच्या कक्षात येण्यास सांगतात. सगळेजण घाईघाईत कक्षात प्रवेशतात.
दशरथ राजा आपल्याच तंद्रीत बोलू लागतात,
"मला तो दिवस चांगलाच आठवतो. ज्या दिवशी शिकारी साठी मी एका वृक्षावर बसलो होतो व आवाजाच्या दिशेने मी एक बाण सोडला होता. माझ्या शब्दवेधी बाण मारण्याच्या कौशल्याचा मला फार अभिमान होता जो त्यादिवशी गळून पडला. वाघ समजून मी ज्यावर बाण सोडला होता तो वाघ नसून एक निर्दोष ब्राम्हण श्रावणकुमार होता. माझ्या बाणाने त्या निष्पाप जीवाचे हृदय वेधले होते. मरताना त्याने आपल्या माता पित्यांना पाणी नेऊन द्यायची त्याची अंतिम इच्छा वदली होती. त्याच्या माता पित्याला जेव्हा मी पाणी द्यायला गेलो व सत्य कथन केले तेव्हा त्याच्या अंध पित्याचा आक्रोश आजही माझ्या कानात गर्जतो आहे. त्याचे अपार दुःख आज मला कळते आहे. त्याने कंपित स्वरात दिलेली ती श्राप वाणी सत्य होणार आहे. त्याची ती वाणी माझ्या कानात यमदूताच्या शंख ध्वनिप्रमाणे माझ्या कानठाळ्या बसवते आहे. त्याच्या प्रमाणेच मी पुत्रवियोगाने तृषार्थ होऊन तडफडत मरून जाणार आहे. तसंही श्रीरामाच्या सहवासाविना माझे जळके जीवन काय कामाचे? न तो आता दिसू शकत न त्याच्याशी संभाषण करता येत! असे आयुष्य काय फायद्याचे? माझ्यामुळेच तो वनवासी झाला आहे. मीच दोषी आहे.,दशरथ राजाचा हा विलाप ऐकून देवी कौसल्या व देवी सुमित्रेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
देवी कौसल्या त्यांच्या जवळ जाऊन त्यांना समजवतात,"महाराज आपण शांत राहावे! असे वागून कसे चालेल? आपण घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहात! आपण असा धीर खचवला तर कसे होईल? जरा त्या उर्मिलेकडे पहा! आपल्या भरवश्यावर लक्ष्मण त्याच्या प्राणप्रिय भार्येला ठेवून गेला आहे. आपण असे धीर सोडून बसलो तर ती पोर कोणाकडे आधाराच्या आशेने बघेल? जे झालं तो एक दैवयोग म्हणून आपण सोडून द्या. स्वतः ला दोष देत बसू नका. मला व सुमित्रेला आता ह्या राजप्रासादात तुमच्या शिवाय आहेच कोण?"
पुढे दशरथ राजे बोलू लागतात,
"कौसल्ये मला सगळं कळतेय पण आता माझे प्राण ह्या देहात राहण्यास तयार नाहीत त्याला मी काय करू? मी हतबल आहे. मला श्रीरामाचा विरह काही केल्या सहन होत नाहीये. मरताना सुद्धा मला रामाचे दर्शन न व्हावे हे माझे किती दुर्भाग्य! त्याच्या दर्शनासाठी माझा प्राण देहात तडफडतो आहे. मेल्यावर माझ्यासारख्या पाप्याला स्वर्गाचे दार उघडेल का? माझ्या रामाचा तो कानी कुंडल असलेला मनोहर चेहरा मरताना तरी मला दिसेल का? ह्या माझ्या अंधारलेल्या आयुष्यात एक प्रकाशाचा किरण उगवेल का?
मी सुद्धा किती मूर्ख आशा ठेवतो आहे. असे अकल्पित घडेलच कसे? माझ्या हाताने स्वर्ग सुख मी दूर लोटल्यावर आता एकही आशेचा किरण माझ्या आयुष्यात येईलच कसा? हे मला कळायला हवे.",एवढे बोलून त्यांच्या कक्षात आलेल्या व चोरासारखे बाजूला उभे असलेल्या कैकयी ला ते उद्देशून म्हणतात,
"दुष्टे कुटिले! तुझ्या हट्टाने भाग्य तर तू गमावून बसलीच आहे पण आता माझ्या मरणानंतर सौभाग्य सुद्धा गमावून बसणार आहेस. तुझ्या सत्तालोलुप स्वार्थी स्वभावामुळे संपूर्ण घराची घडी विस्कटवली तू! अनेकांचे आयुष्य खराब केले स्वतःच्या अप्पलपोटी स्वभावामुळे. लवकरच तुझ्या स्वार्थीपणाचे फळ तुला भोगावे लागेलच. तू रामाला वनवासात पाठवलं पण तो तिथेही स्वर्ग निर्माण करेल. राम जानकी जिथंही जातील ज्यांनाही त्यांचे दर्शन लाभेल त्यांचा सहवास लाभेल ते लोकं किती भाग्यवान असतील. त्या दृष्टीस न पडणाऱ्या परमेश्वराला च ठाऊक मला केव्हा रामाचा सहवास लाभणार? ",एवढे बोलून ते पुढे कौसल्या देवी,सुमित्रा देवी, उर्मिला देवी व त्यांच्या दर्शनासाठी आलेले जे प्रजाजन होते त्यांना व संपूर्ण अयोध्येतील प्रजेला उद्देशून म्हणतात,
"हे कौसल्ये सर्व प्रथम मी तुझा अपराधी आहे त्यामुळे सर्व प्रथम मी तुझी क्षमा मागतो. त्यानंतर पुत्रावर प्रेम करणारी सुमित्रे मी तुझी क्षमा मागतो. देवी प्रमाणे निष्कपट पती आज्ञेचे पालन करणारी सती उर्मिले मी तुझी सुद्धा क्षमा मागतो. प्रजाजनहो मी तुम्हा सगळ्यांची क्षमा मागतो. आता मी अश्या ठिकाणी चाललो आहे जिथे सुख दुःख अश्या भावनाच नाहीत. सुख दुःखाच्या पार मी चाललो आहे.",श्रीराम जानकी देवी व लक्ष्मणाला उद्देशून ते पुढे म्हणतात,
"हे श्रीरामा, मेघश्यामा मला क्षमा कर,जानकी मला क्षमा कर, लक्ष्मणा मला क्षमा कर. अंतिम समयी माझ्या मुखात गंगाजल घालण्यास कोणीही पुत्र उपस्थित नाही पण हे रामा तुझे नाव गंगाजला प्रमाणे पवित्र आहे तेच मी अंतकाळी घेत घेत पुढच्या प्रवासाला निघतो आहे. श्रीरामा, जानकी देवी, लक्ष्मणा तुमचा जयजयकार असो. जय श्रीराम जय श्रीराम.", श्रीरामांचे नाव घेतघेतच दशरथ राजाची प्राणज्योत मालवते. देवी कौसल्या, देवी सुमित्रा, उर्मिला देवी, मंत्री सुमंत तसेच प्रजाजन धाय मोकलून रडतात.
(रामायणात पुढे काय होईल ते बघू उद्याच्या भागात. तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील बावीसावे गीत :-
दाटला चोहिकडे अंधार
देउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार
आज आठवे मजसी श्रावण
शब्दवेध, ती मृगया भीषण
पारधीत मी वधिला ब्राह्मण
त्या विप्राच्या अंध पित्याचे उमगे दुःख अपार
त्या अंधाची कंपित वाणी
आज गर्जते माझ्या कानी
यमदूतांचे शंख होउनी
त्याच्यासम मी पुत्रवियोगे तृषार्तसा मरणार
श्रीरामाच्या स्पर्शावाचुन
अतृप्तच हे जळके जीवन
नाही दर्शन, नच संभाषण
मीच धाडिला वनात माझा त्राता राजकुमार
मरणसमयि मज राम दिसेना
जन्म कशाचा? आत्मवंचना
अजुन न तोडी जीव बंधना
धजेल संचित केवी उघडू मज मोक्षाचे द्वार?
कुंडलमंडित नयनमनोहर
श्रीरामाचा वदनसुधाकर
फुलेल का या गाढ तमावर?
जाता जाता या पाप्यावर फेकित रश्मीतुषार
अघटित आता घडेल कुठले?
स्वर्गसौख्य मी दूर लोटले
ऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,
भाग्यासम तू सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार
पाहतील जे राम जानकी
देवच होतिल मानवलोकी
स्वर्गसौख्य ते काय आणखी?
अदृष्टा, तुज ठावे केव्हा रामागम होणार?
क्षमा करी तू मज कौसल्ये
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले
क्षमा देवते सती ऊर्मिले
क्षमा प्रजाजन करा, चाललों सुखदु:खांच्या पार
क्षमा पित्याला करि श्रीरामा
पतितपावना मेघ:श्यामा
राम लक्ष्मणा सीतारामा
गंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार
श्री राम श्री राम
★■★■★■★■★■★■★■★■★■★■★■★■★■★■★■★■★■★