निषाद राजा ने श्रीराम,जानकीदेवी व लक्ष्मण यांना गंगा पार करून पैलतीरी पोचवले. नावेतून खाली उतरल्यावर श्रीरामांना निषाद राजाला काहीतरी भेट द्यावी असे वाटले पण त्यांच्या गळ्यात जानव्या शिवाय काहीच नव्हते. सगळे आभूषणे त्यांनी राजवाडा सोडतानाच दान केले होते. एक अंगठी सुद्धा त्यांच्या बोटात नव्हती. लक्ष्मणाची सुद्धा हीच अवस्था होती त्यामुळे श्रीरामांना संकोचल्या सारखे झाले. श्रीरामांची ही अवस्था जानकी देवींनी अचूक ओळखली त्यांनी त्यांच्या बोटातील एकमेव अंगठी काढून श्रीरामांना निषाद राजाला देण्यास दिली.
श्रीरामांनी निषाद राजाला ती अंगठी देत म्हंटल," निषादराज आपल्या आदरातिथ्याने तसेच आपल्या इथवर केलेल्या मदतीमुळे आम्ही गंगा नदी पार करू शकलो त्या बद्दल माझ्या कडून आपल्याला ही छोटी भेट आहे ती स्वीकार करा."
"प्रभू मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं. आभार तर मी आपले जेवढे मानेन तेवढे कमीच आहे. आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो आहे. ही मुद्रिका मला नको. आपण आपला वनवास संपवून पुन्हा जेव्हा गंगा किनारी याल तेव्हा मात्र मी आपल्याकडून अवश्य भेट स्वीकार करेन.",असे म्हणून निषाद राज श्रीरामांना चरण स्पर्श करतो.
निषाद राजाचा निरोप घेऊन श्रीराम आपल्या बंधू व भार्ये सोबत पायी प्रवास सुरु करतात. थोडं चालणे, मग काही काळ विश्राम करणे, झाडांवरील कंदमुळे खाणे, प्रवासात लागणाऱ्या जलाशयातील पाणी पिणे, पुन्हा पायी चालणे, रात्र झाली की एखाद्या वृक्षाखाली सावध राहून विश्राम करणे असा त्या त्रयींचा प्रवास सुरु होता. असा बराच मोठा पल्ला गाठून ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पोचतात. तेथे ऋषींना अभिवादन करून त्यांच्याकडे फलाहार करून श्रीराम त्यांना पुढच्या वाट चाली बद्दल विचारतात.
" हे मुनिवर! आपणाला सर्व ज्ञात आहेच तेव्हा कृपया सांगा की कुठल्या जागी राहून आम्ही वनवासी आयुष्य व्यतीत करणे उचित राहिल?",श्रीराम
"इथून काही अंतरावर चित्रकूट पर्वत आहे. त्याच्या जवळून मंदाकिनी नदी वाहते आहे. त्या नदीच्या तीरी आपण कुटी बांधून राहणे योग्य होईल असे मला वाटते.",भारद्वाज ऋषी
"जशी आज्ञा मुनिवर! आता आम्हास आज्ञा द्यावी",श्रीराम भारद्वाज मुनींचा निरोप घेताना म्हणतात.
"श्रीराम आपण, जानकी देवी व लक्ष्मण कुमार आपल्या तिघांचे पदस्पर्श आमच्या कुटीला लागले त्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत. माझा आपणाला आशीर्वाद आहे आपला प्रवास सुखकर होईल.",भारद्वाज ऋषी त्या त्रयींना निरोप देतात.
तेथून पुन्हा त्यांचा मजल दरमजल प्रवास सुरु होतो. जवळपास शृंगवेरपूर पासून तर चित्रकूटा पर्यंत त्यांचा 1200 किलोमीटर पायी प्रवास होतो. अखेर ते मंदाकिनी नदीच्या तीरी चित्रकूट पर्वताजवळ पोचतात. तेथे एक चांगली जागा बघून श्रीराम लक्ष्मणास कुटी बांधायला सांगतात.
अखेर ते मंदाकिनी नदीच्या तीरी चित्रकूट पर्वताजवळ पोचतात.
तेथे एक चांगली जागा बघून श्रीराम लक्ष्मणास एक कुटी बांधण्यास सांगतात.
श्रीराम म्हणतात,
"हे लक्ष्मणा ह्या ठिकाणी तू आपल्यासाठी कुटी बांध. हा चित्रकूट पर्वत साधासुधा नसून अद्वितीय आहे. ह्या पर्वतावर अनेक मुनीजन साधक राहतात. ईश्वरप्राप्तीसाठी, सिद्धीप्राप्ती साठी अनेक तपस्वी येथे तप करतात. त्यांच्या सान्निध्यात आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल.",पुढे ते जानकी देवींना म्हणतात,
"सखे जानकी इथली निसर्ग शोभा बघ किती भुलवून टाकणारी आहे. भडक लाल पळस बघ! तर कुठे बेलफळाने वाकलेले बिल्ववृक्ष बघ. कुठल्याही वृक्षाच्या फांद्या वाकवल्या सारख्या ओढल्या सारख्या वाटत नाही ह्याचाच अर्थ ह्या वृक्षांना कुणा मानवाचा हात लागला असेल असे वाटत नाही.
इथले फुलं पहा अगणित रंगांचे पुष्प ह्या वनात आहेत. त्यांचे अगणित प्रकारचे सुगंध आहे.
ह्या शांत वनाची रमणीयता आणखी वाढते जेव्हा एखाद्या पक्षाचे मधुर कूजन कानी पडते. कुठे कोकीळ पक्षी सुरेल स्वरात गातो आहे तर कुठे निळा मोर आपला रत्नरुपी पिसारा खेळवत नाचतो आहे. त्या दोघांचा रम्य स्वर मनोहर भासतो आहे.",पुढे ते जानकी देवी व लक्ष्मण यांना म्हणतात,
"इकडे झाडांवर बघा ठिकठिकाणी मोहोळ लागले आहे. ज्यातून मधुर अमृततुल्य मध खाली गळतो आहे. अनेक फुलांमधील अमृत गोळा करून मधू मक्षिकांनी छोट्या छोट्या षटकोनी घागरींमध्ये भरून ठेवले आहे."
तेवढ्यात त्यांना झाडीतून कुठले तरी श्वापद गेलेले दिसते तेव्हा ते लगेच लक्ष्मणास म्हणतात,
"सौमित्रा! सावध राहा! जसे अनेक नयनरम्य देखावे ह्या ठिकाणी आहेत तसेच क्रूर हिंस्त्र पशु सुद्धा इथे आहेत. तेव्हा आपला धनुष्यबाण सदैव तयार राहू दे.", पुढे ते लक्ष्मणास म्हणतात,
"जानकी तर झाडे वेली, झाडांच्या लतिका, फुले, कळ्या ह्यातच गुंगून जाईल व वनवासात ही आनंदित राहील पण आपल्याला मात्र असे गुंगून जाता येणार नाही आपल्याला सदैव सावध राहावं लागेल. आपल्या बाणांच्या भक्ष्यस्थानी हिंस्त्र पशु पडले तरच आपण सुरक्षित राहू.
ह्या वनात आपण आलो ती शुभ वेळ होती. त्यामुळे आता जास्त वेळ न दवडता उत्तमोत्तम लाकडे बघ त्याची आपण सुंदर आणि मजबूत कुटी बनवू व वर छपरावर झाडांचे पाने फांद्या टाकून सुशोभित करू. व आपल्या उज्वल भविष्याचे चित्र आकाशाच्या पटावर रेखाटू.
श्रीरामांची आज्ञा मिळताच लक्ष्मणकुमार कुटी बांधण्यास सिद्ध होतात.
(पुढे रामकथेत काय होईल हे जाणून घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
ग.दि. माडगूळकर रचित गीतरामायण मधील विसावे गीत:-
या इथे, लक्ष्मणा, बांध कुटी
या मंदाकिनिच्या तटनिकटी
चित्रकूट हा, हेच तपोवन
येथ नांदती साधक, मुनिजन
सखे जानकी, करि अवलोकन
ही निसर्गशोभा भुलवि दिठी
पलाश फुलले, बिल्व वाकले
भल्लातक फलभारे लवले
दिसति न यांना मानव शिवले
ना सैल लतांची कुठे मिठी
किती फुलांचे रंग गणावे?
कुणा सुगंधा काय म्हणावे?
मूक रम्यता सहज दुणावे
येताच कूजने कर्णपुटी
कुठे काढिती कोकिल सुस्वर
निळा सूर तो चढवि मयूर
रत्ने तोलित निज पंखांवर
संमिश्र नाद तो उंच वटी
शाखा-शाखांवरी मोहळे
मध त्यांच्यांतिल खाली निथळे
वन संजीवक अमृत सगळे
ठेविती मक्षिका भरुन घटी
हा सौमित्रे, सुसज्ज, सावध,दिसली,
लपली क्षणांत पारध
सिद्ध असूं दे सदैव आयुध
या वनी श्वापदा नाहि तुटी
जानकिसाठी लतिका, कलिका
तुझिया माझ्या भक्ष्य सायका,
उभय लाभले वनांत एका
पोचलो येथ ती शुभचि घटी
जमव सत्वरी काष्ठे कणखर
उटज या स्थळी उभवू सुंदर
शाखापल्लव अंथरुनी वर
रेखु या चित्र ये गगनपटी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★