श्रीरामांचा रथ चालत चालत गंगातीरी शृंगवेरपूर नगराच्या सीमेवर येऊन थांबला. तेथपर्यंत आलेल्या अयोध्येतील लोकांना श्रीरामांनी मोठ्या कष्टाने निरोप देऊन परत जाण्यास सांगितले त्यामुळे ते जड अंतकरणाने अयोध्येच्या दिशेने चालू लागले.
तेथून नदी पार करून श्रीरामांना पैल तीरी जावयाचे होते. परंतु रात्र झाल्यामुळे त्यांना मुक्काम करणे आवश्यक होते. गंगातीरी असणाऱ्या नावाडी लोकांनी तो रथ बघितला व त्यातून तीन तेजस्वी व्यक्ती बाहेर आलेल्या बघितल्या ते लगेच आपल्या समुदायाच्या म्होरक्याला म्हणजेच निषादराज गृह ह्याला सांगायला गेले.
श्रीरामांची कीर्ती सर्वत्र पसरल्यामुळे निषाद राजाला नावाड्यांच्या आणि कोळ्यांच्या तोंडून ऐकलेल्या वर्णनाने हे कळलं की कोणीतरी असामान्य व्यक्ती नदीतीरी आलेल्या आहेत. तो लगेच नदीतीरी त्यांना भेटण्यास गेला तेथे मंत्री सुमंत ने श्रीरामांचा परिचय निषाद राजाला करून दिला. तो ऐकताच निषाद राजाचे डोळे भक्तिभावाने भरून आले. तो श्रीरामांच्या चरणी नतमस्तक झाला.
"हे प्रभू माझे आहोभाग्य की आपले दर्शन झाले. माझी आपणास विनंती आहे की माझ्या नगरीला म्हणजे शृंगवेरपुरी ला येऊन आपण माझं आदरातिथ्य स्वीकारावे.",निषाद
"उठ निषादराज तुझ्या स्वागतामुळे आम्ही उपकृत झालो आहोत परंतु माता कैकयी च्या वरा मुळे मी चौदा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही नगरात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे मला ह्या गंगातीरी च रात्र सरेपर्यंत मुक्काम करावा लागेल.",श्रीराम
श्रीरामांनी असे म्हंटल्यावर निषाद राजा एका मोठ्या अशोक वृक्षाखाली त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतो. कोवळ्या पानांचा वापर करून तो श्रीराम व देवी सीते करीता विश्राम करण्यास आसनांची व्यवस्था करतो.
त्याचप्रमाणे श्रीराम,देवी सीता, भ्राता लक्ष्मण व मंत्री सुमंत ह्यांच्यासाठी मधुर फळे तसेच कंदमुळांची तजवीज करतो.
तो फलाहार घेऊन श्रीराम व देवी सीता आसनावर विश्राम करतात. लक्ष्मण थोड्या अंतरावर विरासन घालून पहारा द्यायला सज्ज होतो. त्याच्यासोबत निषादराज सुद्धा कमरेला बाणांचे भाते घेऊन सज्ज होतो. मंत्री सुमंत सुद्धा विश्राम करतात.
निषाद राजाला आश्चर्य वाटते तो लक्ष्मणास विचारतो," असे कसे माता पिता आहेत ज्यांनी अश्या कोमल श्रीरामांना वनवासात पाठवले." राजवाड्यात मऊ गादीवर झोपणारे राजकुमार व राजकुमारी आज ह्या जाड्या भरड्या आसनावर झोपले आहेत हे बघून निषाद राजाचे डोळे झरू लागतात. तेव्हा लक्ष्मण त्याला समजवतात,
"निषादराज शोक आवर! श्रीराम स्वतः ब्रम्ह आहेत ही सगळी त्यांचीच लीला आहे. कर्म कोणालाच चुकत नाही. आपल्या वाईट अवस्थेवर लोकांना दोष देण्यात काही अर्थ नसतो. जो तो आपापल्या कर्माचे फळ भोगतो. प्रारब्धात जे असते ते आपल्याला भोगावेच लागते. आपल्या हातात चांगले कर्म करणे आहे ते आपण सातत्याने केले पाहिजे. बाकी सगळे देवावर सोडून निश्चिन्त राहिलं पाहिजे."
असा वार्तालाप करता करता पहाट उजाडते. श्रीराम व सीता देवी उठतात त्यांचे आन्हिक आटोपतात. गंगेत स्नान करून श्रीराम व लक्ष्मण आपल्या केसांच्या जटा डोक्यावर बांधतात. त्यांचे तपस्वी रूप बघून मंत्री सुमंतला गलबलून येते.
ते श्रीरामांना म्हणतात, "श्रीरामा! राजा दशरथांनी मला रथ घेऊन आपल्या सोबत जाण्यास सांगितले होते व गंगेत आपणाला स्नान करवून पुन्हा परत अयोध्येत आणण्यास सांगितले आहे. तेव्हा आता काय करायचे ते सांगा"
"मंत्री सुमंत वर हा चौदा वर्षे वनवास भोगण्याचा असल्यामुळे मला असे परत येता येणार नाही आपण पिताश्रींना समजवावे. आता आपण अयोद्धेकडे जाण्यास निघावे असे मला वाटते. अयोध्येत आपली जास्त गरज आहे. माझ्यासोबत आपण इथवर आलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.",श्रीराम त्यांना अभिवादन करत म्हणतात.
मंत्री सुमंतांचा निरोप घेतल्यावर श्रीराम निषाद राजाला नौका तयार करणयास सांगतात व नौका तयार होताच श्रीराम, जनकीदेवी व लक्ष्मण त्यात विराजमान होतात. नौकेत त्यांना सोबत करण्यास निषादराज सुद्धा बसतात. इतर नावाडी व निषाद राज गृह नौका वल्हवू लागतात.
गंगेच्या अथांग लाटा उचंबळून येतात जणू गंगा नदीला सुद्धा श्रीरामांना आयोध्येपासून दूर नेण्यास गहिवरून येते आहे. त्या लाटा बघून निषाद राजे गीत गात गंगेला म्हणतात,
"हे गंगे आपल्याला श्रीरामांना पैलतीरी न्यायचे आहे तेव्हा आपल्या भावना आवर असे उचंबळू नकोस, हे नौके आपल्याला पुढे जायचे आहे, आता मागे फिरू नको.
पहा दैवगती कशी विचित्र असते ! श्रीराम हे भवसागर पार करणाऱ्या श्रीविष्णूचे अवतार त्यांना आपल्याला ही नदी पार करून न्यायची आहे. श्रीराम ज्या दक्षिण देशी जात आहेत तो देश किती भाग्यवान आहे. तिकडे दक्षिण देशाचे भाग्य उजळले आहे तर इकडे अयोध्या अहल्ये प्रमाणे शापित ठरली आहे.
कर्तव्य पूर्ण करण्यास श्रीरामांनी वनवास स्वीकारला आहे. मग आपण तर त्यांचे सेवक आहोत आपण कर्तव्यात कसूर करून चालणार नाही. आपल्याला श्रीरामांना पैलतीरी पोचवण्याचे कर्तव्य करावेच लागेल.
गंगे काय पवित्र योग आला आहे. आज तुला ह्या पृथ्वीवर आणणारा भगीरथ त्याचाच वंशज श्रीराम यांना पार करून न्यायचा आहे. पवित्र अश्या श्रीरामांच्या सान्निध्याने गंगा, मी, माझे नगर व नागरवासी सगळे पावन झालो आहोत. श्रीरामांच्या दर्शनाने आमचे अवघे आयुष्य धन्य झाले आहे."
{रामकथेत पुढे काय होईल जाणून घेऊ पुढच्या भागात. जय श्रीराम🙏🚩}
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
ग.दि. माडगूळकर रचित गीत रामायण मधील एकोणविसावे गीत:-
नकोस नौके, परत फिरू ग, नकोस गंगे, ऊर भरू
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे, जय भागीरथी
जय जय राम दाशरथी
ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवूं मेघ
भाग्य आपुलें अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं
श्री विष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
तारक त्याला तारुन नेऊ, पदस्पर्शाने सर्व तरु
जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
ऐल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतिल कल्पतरू
कर्तव्याची धरुनी कांस
राम स्वीकरी हा वनवास
दासच त्याचे आपण, कां मग कर्तव्यासी परत सरू?
अतिथी असो वा असोत राम
पैल लाविणे अपुले काम
भलेबुरे ते राम जाणता, आपण अपुले काम करू
गंगे तुज हा मंगल योग
भगीरथ आणि तुझा जलौघ
त्याचा वंशज नेसी तूही दक्षिण-देशा अमर करू
पावन गंगा, पावन राम
श्रीरामांचे पावन नाम
त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरू
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★