तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटणे
शब्दशः(अक्षरशः)अर्थ:- धुपाटणं म्हणजे ज्यात आपण धूप लावतो त्यात खाली आणि वर दोन्ही बाजूने धूप लावायला जागा असते आणि मध्येत धरायला हँडल असते. तर असं धुपाटणं घेऊन एक माणूस किराणा दुकानात जातो आणि तेल मागतो तेल घ्यायला तो धुपाटणं पुढे करतो मग तूप मागतो आणि तूप घ्यायला तेच धुपाटणं उलटं करतो आणि आणि तूप घेतो. जेव्हा त्याला कळते की तूप घेण्याच्या नादात तेल सांडलं आहे तेव्हा ते बघायला तो पुन्हा धुपाटणं उलटं करतो त्यामुळे तूपही सांडते आणि अश्याप्रकारे तेलही जाते तूपही जाते आणि हाती राहते धुपाटणे.
गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ):- दोन्ही बाजूने नुकसान होऊन हाती काहीच न राहणे.
त्यावर आधारित कथा:-
"गजू चल बाबा पोरगी पाहायला जावं लागते लवकर आटोप",शीला बाई त्यांच्या मुलाला म्हणाल्या.
"पोरगी खूप शिकलेली आहे. कसा संसार करते काय माहीत?",गजूचे बाबा शिरपत राव म्हणाले.
"बाबा जमाना बदलला आता! मला शिकलेलीच मुलगी पाहिजे उलट मी तर म्हणतो मला नोकरी असलेली मुलगी सुद्धा चालेल.",गजू
"बरं बरं पाहू आधी वेळेत तिथे पोचायला तर पाहिजे की नको!",शीला बाई
गजू आणि त्याचे आईबाबा मुलगी बघायला जवळच्या गावी गेले.
तिथे मुलगी बैठकीत येऊन बसली.
"पोरी तुझं नाव काय?",गजूची आई
"सीमा",सीमाने अगदी हळू आवाजात सांगितलं.
"पोरी तुझं शिक्षण किती झालं?",गजूचे बाबा
मुलगी उत्तर देणार तेवढ्यात तिच्या आईनेच
"पंधरावी पर्यंत शिकली आहे ती",असं उत्तर दिलं
"पंधरावी म्हणत असतात का",असं हळू आवाजात मुलीच्या वडिलांनी तिच्या आईकडे डोळे मोठे करून बघत म्हंटल आणि शिरपत राव कडे बघून मोठ्याने म्हंटल," बी ऐ पर्यंत शिकली आहे ती आणि तालुक्याच्या गावी शिक्षिका म्हणून नोकरी करते."
"असं! असं! ठीक आहे",गजूचे बाबा
मुलगी नोकरी करते हे बघून गजूला लयच हरीक आला(खूप उत्साह वाटला).त्याने विचार केला तालुक्यच्या गावी काम करते म्हणजे जरा आपल्या गावाहून लांब आहे पण हरकत नाही रोज अप डाउन करत जाईल ती असं त्याने तिथल्या तिथे मनातच ठरवूनही टाकलं.
मुलीला आणखी काही प्रश्न विचारून काही इतर चौकश्या करून चहा पोहे खाऊन 'कळवतो' असं सांगून ते घरी आले.
आधीच ठरल्याप्रमाणे आणखी एक स्थळ बघायला दुसऱ्या एका जवळच्याच गावी गेले.
तिथेही मुलगी बैठकीत येऊन बसली. तिच्याही शिक्षणाची वगैरे चौकशी झाली.
"नाव काय तुझं",गजूची आई
"माझं नाव निमा",पोरीने लाजत उत्तर दिलं
"किती शिक्षण झालं तुझं पोरी",शिरपत राव
"मी नॉनमॅट्रिक पास आहे",मुलीने मुरकत उत्तर दिलं
"बापरे खूपच झालंय शिक्षण",अचानक गजू बोलून गेला तशी निमा आणखीच लाजली.
शिरपत राव ने त्याला नजरेनेच दटावले.
अश्या तर्हेने तिथे सुद्धा मुलीची इतंभूत चौकशी करून तिथलाही पाहुणचार करून 'कळवतो' असं सांगून त्रिकुट(गजू, त्याचे आई बाबा) घरी आले.
"बोल गजू कोणाला काय कळवायचं आहे ते सांग उगीच कोणाला ताटकळत ठेवणं मला पटत नाही.",शीला बाई
"मला वाटते सीमाला नकार दयावा",गजू
"का रे बाबा तुला तर शिकलेली नोकरी असलेली मुलगी हवी होती न",शिरपत राव
"हो पण निमा गोरी आणि दिसायला सुंदर आहे सीमा सावळी आहे त्यामुळे मला वाटते निमा ला होकार द्यावा आणि सीमाला नकार.",गजू
"बघ बरं गजू विचार कर चांगली मुलगी आहे हातची जायला नको",शीला बाई
"मी केला विचार सीमाला नकार कळवा",गजू ठामपणे म्हणाला.
झालं सीमाला नकार कळवण्यात आला. इकडे निमाला होकार कळवण्यासाठी शिरपत राव ने जेव्हा फोन केला तेव्हा निमाच्या वडिलांनी
"ते तुम्ही काही तेव्हाच कळवलं नाही म्हणून तुमच्या नंतर जे पाहुणे आले त्यांनी लगेच होकार कळवला म्हणून आम्ही निमाचं लग्न त्यांच्या सोबतच ठरवलं तेव्हा माफ करा.",असं सांगितलं.
"घ्या! सीमा ही गेली आणि निमा ही गेली. गजू चांगलं आधी सीमाला होकार देणार होता ते बरं नव्हतं का आता बघ काय झालं 'तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धुपाटणं' ",शिरपत राव म्हणाले.
"आता कमीतकमी धुपाटणं तरी जाऊ देऊ नको हातचं, शेजारच्या सुमीला कुरूप म्हणवून इतके दिवस तू हिणवलं आता ती तरी मिळते का बघावं लागेल.",शिलाबाई
डोक्याला हात लावत गजू म्हणाला,"आता तेच करावं लागेल."
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆