Sundara in Marathi Horror Stories by Krishnashuchi books and stories PDF | सुंदरा

Featured Books
Categories
Share

सुंदरा

महत्त्वपूर्ण निवेदन :-

● सदर कथेचा उद्देश हा निव्वळ शुद्ध-मनोरंजनासाठी असून त्याद्वारे समाजात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरविण्याचा लेखकाचा उद्देश नाही, हे कृपया वाचकांनी जाणावे.

● कथेतील सर्व पात्रे, स्थळे आणि घटना या पूर्णतः काल्पनिक असून केवळ कथेची आवश्यकता म्हणून त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे, त्यांचा वास्तवातील कोणतीही जीवित किंवा मृत व्यक्ती, स्थळे अथवा घटना यांच्याशी संबंध नाही. तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

● कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव असून, लेखकाच्या परवानगीशिवाय सदर कथा-

१) अन्य व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहांच्या नावे प्रकाशित केल्यास,

२) गैर अथवा अनधिकृत वापर केल्यास,

३) अन्य प्रकाशनीय माध्यमांमार्फत प्रदर्शित केल्यास,

संबंधित व्यक्तीवर/व्यक्तीसमूहांवर अथवा संस्थेवर कठोर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया वाचकांनी दखल घ्यावी, ही नम्र विनंती.

◈◈◈

 

ग्लासातली दारू एका घोटात पिऊन रोहनने तो ग्लास टेबलावर आपटला. साली आज चढतच नव्हती ! जाम डोकं फिरलं होतं. एकतर कामावर जातांना सकाळी सकाळी बायकोची पैशांवरून किरकिर आणि पुढे ऑफिसमध्ये दिवसभर बॉसच्या कामावरून शिव्या ! अख्खा दिवस नुसता कटकटीत आणि मनस्तापात गेला होता. संध्याकाळी साडेसात-आठला ऑफिस सुटलं तेव्हा तो घरी न जाता थेट या अण्णाच्या बारमध्ये येऊन बसला होता. घरी जायची आणि पुन्हा त्या तोंडाळ बाईच्या नादी लागण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. झाला तो दिवसभराचा ताप पुष्कळ झाला होता आता घरी जाऊन पुन्हा नवा अध्याय सुरू करण्याची त्याची मुळीच शारीरिक आणि मानसिक कुवत नव्हती ! तसा तो दारू फार क्वचितच प्यायचा. अगदी खूप आनंदाचा प्रसंग असला तर किंवा हे असं आजच्या सारखं डोकं सुसाट फिरलेलं असलं तर ! बाकी माणूस तसा भोळा आणि सुस्वभावी !

रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते तरी याचं पिणं काही थांबलं नव्हतं. दोन प्लेट चिकन फ्राय आणि दारूचे खंबे रिचवूनही त्याच्या डोक्याची भणभण काही शांत होत नव्हती. प्रियाच्या, त्याच्या बायकोच्या रोजच्या कटकटींना तो अक्षरशः वैतागला होता. 'आता नाही कमवत जास्त पैसे तर काय करू ? मीही प्रयत्न करतोच आहे ना ? करियरला ब्रेक मिळावा, चांगलं प्रमोशन व्हावं यासाठी मीही खस्ता खातोच आहे ना ? नुसता घरात बसून थोडीच राहिलोय.. हिच्यासारखा !.. दिवसभर कष्ट करून घाम गाळून घरात पैसे आणणं किती अवघड आहे हे हिला थोडीच काळायचं.. नुसते ऐती घरात बसून दिवस काढत असते ! अन् म्हणे मलाही घरातली कामं असतात ! ह्या बायकांना ना नुसती किरकिरच करता येते ! अरे घरची कामं करायला कसली अक्कल लागते ? बाहेर पडून चार पैसे कमवून दाखवा म्हणजे कळेल !', मनातल्या विचारांनी संतापून त्याने ग्लासातली दारू एका घोटात संपवून ग्लास टेबलावर आपटला होता अन् पुढे कितीतरी वेळ तसाच बसून होता...

रात्रीची वेळ वाढू लागली तशी बारमधली गर्दी कमी होऊ लागली. आता कुठे हळूहळू दारूचा अंमल त्याच्या तापलेल्या डोक्यावर चढत होता. भिरभिरणाऱ्या नजरेने त्याने मनगटीच्या घड्याळात बघितलं तर साडेदहा वाजून गेले होते. अख्खा बार रिकामा झाला होता. रघू अण्णा साफसफाई, आवराआवरी यात गुंतला होता. लवकरच बार बंद होणार होता. घरी जायला हवं म्हणून अखेर रोहनने टेबल सोडलं. नेहमीप्रमाणे काउंटरवरच्या असिफला बिल 'लिहून' ठेवायला सांगून स्वारी बारच्या बाहेर पडली.

'भिखारी साला ! फोकट पिता हय ! भगवान जाने कब पैसा चुकाएगा !' पाठमोऱ्या रोहनकडे बघून अण्णाने शिव्या दिल्या...

आज बाहेर नेहमीपेक्षा जरा जास्तच गारठा पसरला होता. बाहेर आल्या आल्या रोहनला त्याची जाणीव झाली. थंडीनं त्याच्या अंगावर काटा आला. आभाळात चंद्र-चांदण्यांचं अस्तित्वच जणू गायब झाल्याचं दिसत होतं. 'अरे हो! आज अमावस्या आहे' त्याला आठवलं. दुपारी त्याचा डेस्कमेट मिलिंद म्हणत होता. आजूबाजूला दाटून आलेल्या काळोखाची आज त्याला प्रथमच भीती वाटू लागली. कदाचित हे असं एकट्याने एवढ्या रात्री आवसेचं बाहेर असल्यामुळे अन् मनातल्या नको त्या विचारांचा हा प्रभाव असला पाहिजे.. तो मात्र हे अमावस, शुभ-अशुभ वैगरे मानणाऱ्यांतला मुळीच नव्हता. 'या असल्या फालतू अंधश्रद्धेच्या गोष्टी मानायला लागलो तर कसं व्हायचं ?' त्याच्या मनात विचार आला अन् तो स्वतशीच हसला. बाईकला किक मारली अन् स्वारी सुसाट वेगात घराच्या दिशेने निघाली...

रोहनचं घर तसं शहराच्या वर्दळ-वस्तीपसून बऱ्यापैकी दूर हायवेच्या जवळ होतं. तुटपुंज्या पैश्यांत नोकरी करणारे, नवीनच लग्न होऊन पैसे कमावण्यासाठी गावाकडून शहराकडे धाव घेणारे त्याच्यासारखे असंख्य तरुण कमी पैश्यांत परवडणाऱ्या, शहराबाहेर विस्तारणाऱ्या अश्या निम्न प्रतीच्या संकुलांतच आपली गुजराण करत होते आणि हीच या मोठमोठ्या महानगरांची खरी शोकांतिका होती. ज्याच्याकडे पैसा त्यालाच इथं मान..!

रोहनचं घर ऑफिसपासून बऱ्यापैकी दूर होतं. साधारण २५-३० किलोमीटरचं अंतर कापत त्याला रोज हायवेवरून ऑफिसला ये जा करावी लागायची. आजही वाढत जाणाऱ्या रात्रीच्या बहरात अन् सभोवती पडलेल्या चिवट गारव्यात ही मोठी वाट सर करावी लागणार होती. थोडं अंतर कापून झालं असेल, आता मात्र शहरी गजबजटाच्या सर्व खुणा मागे पडू लागल्या. रुंद पसरलेल्या मोकळ्या हायवेवर त्याची गाडी सुसाट वेगाने धाऊ लागली. सभोवतीचा गारवा एव्हाना चांगलाच वाढला होता. जोराने जातांना अंगाला फटफट वारं झोंबत होतं तरी त्याला जरासं बरच वाटत होतं. आपल्याच तंद्रीत बायकोला, आपल्या नशिबाला अन् कर्माला मनातल्या मनात शिव्या देत गडी मोटरसायकल हाकत होता. एखाद्या शांत अजगरासारखा पहुडलेला तो रुंद रस्ता दूर अनंतापर्यंत पसरलेल्या वाटेची जाण देत होता. रात्रीचा वाढत जाणाऱ्या अंधाऱ्या काळोखाला छेदण्याचा प्रयत्न त्याच्या गाडीचा हेडलाईट अगदी जीव खाऊन करत होता, पण त्या एवल्याश्या प्रकाशाच्या वलयाबाहेर मात्र गर्द काळोखी रात्र जबडा वासून घास घ्यायला बसली होती...

आजूबाजूला बदलणाऱ्या हवेची अन् अंधाराची जाणीव होऊन रोहनच्या मनात चालू असलेले सगळे विचार हळूहळू दूर होत होते. सभोवती पसरलेल्या अंधाराची अन् तीव्र गारव्याची नाही म्हणायला त्यालाही जराशी भीतीच वाटू लागली होती. दाबून पिलेली दारू आता बऱ्यापैकी उतरली होती. अगदी भेदरून नाही पण लक्षपूर्वकपणे तो आता गाडी चालवू लागला होता. मगाशी मनात डोकावलेला अमावस्येचा विचार परत डोकं वर काढू लागला अन् आता मात्र थोडं का होईना पण त्याच्या मनावर दडपण येऊ लागलं. शेवटी माणसाचं मनच ते ! आपण रोखलं म्हणून त्याच्या विचारांचा अन् भावनांचा सतत वाहणारा प्रवाह थोडीच आपल्याला थांबवता येतो ?... 'आपण लहानपणापासून ऐकत आलोय तसं खरंच या अवसेच्या रात्री भूतांची जत्रा वैगरे भरत असेल का ?' त्याच्या मनात विचार चमकला. 'श्याsss मी पण काय विचार करतोय? हे असलं भूत-बित काही नसतंय ! नुसत्या थापा !' तो मनातल्या मनात म्हणाला...

 

मनातील विचारांची भांडणं सोडवण्यात तो गर्क होता की तोच हेडलाईटच्या प्रकाशात समोर कुणीतरी उभं असल्याचं त्याला दिसलं ! गडबडीत करकचून ब्रेक मारत वेगात असलेली बाईक त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला. कशीबाशी धुरधूरणारी ती गाडी गपकन पुढ्यात उभ्या त्या व्यक्तीच्या पायापाशी जाऊन थांबली. रोहनने वैतागून समोर बघितलं तर हेडलाईटच्या प्रकाशात त्याला दिसलं की समोर कुणीतरी बाई उभी आहे. रात्रीच्या वेळी या अश्या सुनसान भयाण रस्त्यावर ही एकटीदूकटी बाई काय करतेय हेच रोहनला कळेना !

 

"काय ओ बाई, मरायला काय माझीच गाडी सापडली होय ?", तो खेकसून म्हणाला.

 

ते ऐकून समोर उभी ती बाई आणखी पुढे सरकली अन् हेडलाईटच्या पिवळ्याधमक प्रकाशात तिचं बावन्नकशी सोन्यासारखं उजळलेलं रूप बघून रोहन अवाक झाला ! अंगावर नववधूची लालचुटूक भरजरी साडी, सोन्याचे भरगच्च दागिने, अप्सरेसारखं उजळलेलं रूप... रोहन तिच्याकडे बघतच राहिला.

 

"आवं दादा म्या हिथं कशी आले कुनास ठाऊक ? तुम्ही भले दिस्ता, मला मदत करा की..!", तिच्या काकुळतीच्या शब्दांनी रोहन भानावर आला.

 

"अहो पण बाई, तुम्ही कोण कुठच्या ? या एव्हढ्या रात्रीच्या वेळेला इथं या सुनसान रस्त्यावर एकट्यादुकट्या काय करायला आल्या ? कुठं लग्नाबिग्नाला चालल्या होत्या का ?", रोहनने तिला पुन्हा एकदा निरखून विचारलं.

 

काही क्षण ती बाई विचारात मग्न झाल्याचं रोहनला दिसलं. 

 

"दादा तुम्हांस्नी खरं सांगते, म्या वळकणी गावची हाय, सुंदरा नाव माझं... आमचा बा, दौलतराव पाटील गावचा लय मोठा जमीनदार, आज माझं लगीन व्हतं, आमच्या गावच्या सरपंचांचं धाकलं मालक परतापराव ह्यांच्यासंगट, पन कसं काय झालं कुनास ठावूक, अंतरपाटाच्या येळी माझ्या डोसक्यात अशी काय कळ आली अन् म्या खालीच पडले धाडदिशी... त्यापतुर मला काय बी आठवं ना झालंय ? म्या हितं कशी आले, माजी सारी मानसं कुठं गेली, आमचे आवं कुठं गेले काय बी उमग ना झालंय बघा ? डोळे उघडले तेव्हा हितं रस्त्यावर पडून व्हते.. त्या आदीचं मला काय बी आठवं ना झालंय..!", डोक्याला हात लावत कळवळून सुंदरा आपली कहाणी सांगत होती. 

 

ते ऐकून तर रोहन अजूनच गडबडला. आता हे काय आणखी नवीन नाटक आपल्या समोर उभंय ? वैतागून तो मनातल्या मनात म्हणाला. काहीवेळ त्याने विचार केला. बाई तशी साधीसुधीच दिसत होती. कुण्या चोर-लुटारूंच्या टोळीतली वाटत नव्हती. अचानक त्याच्या मनात वेगळीच शंका आली. त्याने चटकन पुढे वाकून तिची पाउलं पाहण्याचा प्रयत्न केला. 'उलटे-बिलटे असले तर ?' त्याचा विचार असावा. पण ती बाई ज्याप्रकारे उभी होती त्यामुळे गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश तिच्या पावलांपर्यंत पोहोचतच नव्हता तिथं मात्र घुप्प काळा अंधार होता. ती बाई मात्र हा माणूस आपल्याला मदत करेल या आशेने निरागसपणे त्याच्याकडे बघत उभी होती.

 

"तुमच्याकडे मोबईल तर असेल ना ?", त्याने अगदी सहजतेने विचारलं. 

 

ते ऐकून ती बाई त्याच्याकडे अगदी एखादं भूत बघावं तसं बघू लागली. 

 

"आं ? मोबाईल ? अन् ते काय असतंय ?", तिने अगदीच आश्चर्याने त्याला विचारलं.

 

ते ऐकून तर रोहन आणखीनच वैतागला. 'काय बाई आहे ही ! हिला साधा मोबाईल म्हणजे काय माहीत नाही ? कुठून आलीय देव जाणे... अडाणी कुठची !' वैतागून तो मनातल्या मनात म्हणाला. आता या क्षणी या बाईचं काय करावं त्यालाच कळेना. 'बहुतेक तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय.. असं कसं काय काहीच आठवत नाही ? पण तोंडावरून तरी ही वेडीबिडी वाटत नाहीये ? काय करावं ?' रोहनने क्षणभर विचार केला अन् त्याला एक कल्पना सुचली...

 

"बाई हे बघा, तुम्ही माझ्या मागे गाडीवर बसा, मी तुम्हाला पोलिस स्टेशनपाशी सोडतो, पोलिस तुम्हाला तुमच्या घरचा पत्ता शोधून देतील आणि तुमच्या घरच्यांशी नक्कीच कॉन्टॅक्ट करतील", तो म्हणाला. खरंतर पुन्हा मागे वळून एवढं अंतर कापून परत शहरात जायचा त्याला भयंकर कंटाळा आला होता पण ह्या बिचाऱ्या एकट्या बाईची मदत करणंही भाग होतं म्हणून तो कसंतरी म्हणाला अन् तसंही एकदा का हिला पोलिसांच्या हवाली केली की पुढचं काय ते तेच बघून घेणार होते... 

 

ते ऐकून ती बाई जरा विचारात पडली. 'या परक्या पुरुषाला हो म्हणावं की नाही म्हणावं' असा विचार कदाचित ती करत असावी असं रोहनला वाटलं. त्यालाही तिची अवस्था कळत होती. एवढ्या रात्री, सुनसान रस्त्यावर ही अशी वाट हरवलेली एकटी बाई त्यात अंगावर हे भरगच्च सोनं.. चोरा-चिलटांची, दरोडेखोरांची किती भीती होती !... क्षणभर न जाणे का पण त्यालाही तिची काळजी वाटून गेली...

 

"हे बघा, तुम्हाला जर कसली भीती वाटत असेल तर प्लीज घाबरू नका. मी उलटं तुमची मदतच करण्याचा प्रयत्न करतोय.. आपण पोलिसांकडे जाऊ ते तुमची नक्की मदत करू शकतील आणि नाहीतरी सध्या दुसरीकडे कुठे मी तुम्हाला सोडू शकतो का ? मला नाही वाटत... त्यातनं तुमच्याकडे मोबाईल नाही... त्यापेक्षा आपण सरळ पोलिसांकडे जाऊ.. ते काय ते तुमचं गाव.. वळकणी.. तिथं नक्कीच ते कॉन्टॅक्ट करून तुमची व्यवस्था करतील, हाच एक पर्याय उरला आहे!", रोहन तिला शांतपणे म्हणाला.

 

अजूनही तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. तिच्या मनात चलबिचल सुरू होती. असं एका क्षणात, एका दिवसांत आपल्या जवळचे सगळे सखे-सोबती गायब होणं आणि त्याहूनही भयंकर म्हणजे आपल्याला काही म्हणजे काहीच न आठवणं या विचारांनी ती अगदी कासावीस झाली होती. बऱ्याच वेळापूर्वी डोळे उघडले तेव्हापासून ती या गर्द काळोखात एकटीच रस्त्याच्या आडोश्याला घाबरून बसून होती. कुठे जावं काय करावं या भीतीपोटी तिच्या डोळ्यांतून अविरत आसवं गळत होती. आजुबाजूच्या काळ्याकुट्ट अंधारात काहीच दिसत नव्हतं. थंड वाऱ्याने पानांची होणारी विचित्र सळसळ त्या शांततेत आणखीनच विचित्र वाटत होती. आभाळातून चंद्राचं अस्तित्वही दिसून येत नव्हतं. सर्वत्र पसरलेल्या काजळी काळोखाने तिच्या एकटेपणाला भीतीची किनार आखली होती.

जरा वेळ जाताच दुरवरून एखाद्या गाडीचा उजेड दिसून आला आणि ती लगोलग मोठ्या आशेनं रस्ता अडवून उभी राहिली. कुणी लुच्चा-लफंगा असला तर अन् त्यानं मलाच काही केलं तर याची भीती होतीच पण घरी जायची ओढ स्वस्थ बसू देईना म्हणून तिनं हे पाऊल उचललं. कशीबशी तिने ती येणारी गाडी थांबवली. अंधारात निरखून बघितलं तर तो एक तरुण होता. तिच्या मनात काळजीने थोडी कालवाकालव झाली पण आता दूसरा पर्यायही नव्हता. तिने हिम्मत करून त्याला मदत मागत आपली दुर्दैवी कहाणी सांगितली. तो माणूसही तसा भला वाटत होता. 'मदत करतो' म्हणत होता पण ठाणेदाराकडं जाऊ म्हणत होता. तिला काय करावं काहीच कळत नव्हतं. हा माणूस भले तोंडावरून भोळा दिसत असला, पण त्यानंच माझं काही बरवाईट केलं तर ? पण सध्यातरी त्याच्यावर विश्वास ठेऊन ठाणेदाराकडं जाण्याशिवाय दूसरा पर्याय तिला समोर दिसत नव्हता. तिच्या मनाची फारच बिकट अवस्था झाली होती. आपण कुठं येऊन पडलोय ? हे आपलं गाव तरी आहे का ? आपली माणसं परत आपल्याला भेटतील का ? आपल्या काळजीने त्यांना किती त्रास होत असेल ? हे आणि असे अनेक विचार तिचा मेंदू पार पोखरून टाकत होते.

 

"काय बाई, कसला एव्हडा विचार करताय ? काय करता मग.. सोडू का तुम्हाला ?", रोहन म्हणाला.

 

त्याच्या आवाजाने तिची तंद्री भंगली.

 

"हम्म चालतंय जी.. म्या येते तुमच्यासंग.. पण ते ठानेदार मामा करतील नव्हं मला मदत ?", तिने काळजीने विचारलं.

 

"आहो तुम्ही नका काळजी करू ! पोलिस नक्की तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवतील... हं बसा आता माझ्या पाठीमागे..." रोहन तिला आश्वस्थ करत म्हणाला. 

 

ती बिचकत कशीबशी त्याच्या मागे बसली. रोहनने आल्या वाटेवरून गाडी परत फिरवली आणि तिला घेऊन तो शहराकडे निघाला... आधीच अर्ध्याधिक अंतर तो कापून आला होता आणि तेच अंतर आता त्याला परतीच्या वाटेवर कापायचं होतं... गाडीचा वेग बऱ्यापैकी जास्त ठेवत पण सावधपणे तो हायवेवरून गाडी पळवत होता. अधूनमधून रीयर मिररमधून त्या बाईकडे लक्ष ठेवत होता. तिच्या बिचारीच्या चेहेऱ्यावर मात्र काळजी आणि भीती साफ दिसून येत होती. जरासं अंतर पार झालं आणि त्याने पुन्हा मिररमधून मागे बघितलं ती बाई अजूनही खिन्न चेहेऱ्याने मान खाली घालून बसल्याचं त्याला दिसलं. त्याने दुर्लक्ष केलं आणि पुन्हा गाडीचा वेग वाढवला. या अश्या बिकट अनामिक प्रसंगी, आधीच जिवावर इतकी वाईट वेळ असतांना अचानक आलेल्या परक्या पुरुषासमावेत ती तरी काय विषय काढून बातचीत करणार होती ? काही तसूभर क्षणात तिच्या आयुष्याला ही कशी अशी कलाटणी मिळाली होती !

 

'पण हे असं झालंच कसं असेल ? चक्कर येऊन पडल्यावर माणूस फारतर गडबडून जातो, पण त्याला काही म्हणजे काहीच आठवत नाही असं कसं होईल ? बरं आली तर आली चक्कर.. पण मग ह्या बाईच्या घरच्यांनी काहीच केलं नाही का ? ही अशीकशी ह्या आडरस्त्यावर एकटीदुकटी येऊन पडली ? का आपण विचार करत होतो तशी ही बाई खरीच वेडीबिडी आहे का ? सगळंच झमेलं दिसतंय.. काहीच कळत नाही !', रोहन मनातल्या मनात विचार करत होता. त्याचं सारखं लक्ष मागे बसलेल्या तिच्या अंगावरच्या भरगच्च दागिन्यांवर जात होतं. 'बरं झालं आपल्याला दिसली म्हणून ते.. कुणा चोराच्या हातात सापडली असती तर हिची काही खैर नव्हती', त्याच्या मनात विचार आला.

सोबतीला असलेल्या या दोन्ही 'शांतता' त्याला अस्वस्थ करू लागल्या म्हणून शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून त्याने तिला म्हटलं - "आज फारच गारवा आहे नाही का ?" .. ती काहीच बोलली नाही. तशीच मान खाली घालून शांत बसली होती.

 

"बर बाई, मला एक सांगा, तुम्ही अश्या कश्या काय इथे आलात ? तेही इतक्या रात्रीच्या वेळी... ते तुम्ही म्हणालात की तुम्ही चक्कर येऊन बेशुद्ध पडलात आणि तुम्हाला पुढचं काहीच आठवत नाही, हा असा प्रकार या आधीही तुमच्यासोबत झालाय का ?", त्याने पुन्हा विचारलं. 

 

ती मात्र तशीच निश्चल दगडासारखी मान खाली घालून बसली होती.

त्याला वाटलं, 'कदाचित तिला आपल्याशी बोलायची इच्छाच नसेल, कशाला उगीच त्रास द्या...'

 

रोहनच्या दणकट बाईकने आता मात्र अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापलं होतं. दूर नीट लक्ष देऊन पाहताच शहरातल्या दिव्यांचा क्षीण प्रकाश डोळ्यांना दिसत होता. त्याने गाडी चालवता चालवता मनगटातल्या घड्याळात बघितलं- साडेबारा झालेले होते... एव्हाना आत्तापर्यंत प्रियाचे बरेच मिसकॉल येऊन गेलेले होते. रागात अन् दारुत गुंग झालेल्या रोहनला खिशातल्या मोबाईलच्या घरघरीकडे लक्ष द्यायची इच्छा नव्हती अन् उसंतही नव्हती. 'आता घरी जाऊन ही प्रिया पुन्हा कटकट करेल, इतका उशीर का झाला ? कुठं होतास ? कुणासोबत होतास ? असले प्रश्न विचारून मला पार भंडावून सोडेल !', मनातल्या विचारांनी त्याची पुन्हा चिडचिड होत होती... 

 

मागे बसलेली ती बया मात्र तोंडातून एक अवाक्षरही काढायला तयार नव्हती. साधं मान वर करून बघतही नव्हती. एखाद्या निश्चल पुतळ्यासारखी गप्प बसून होती. रोहन गाडी चालवतांना अधुनमधून मागे बघत होता पण त्या बाईची शून्य हालचाल बघून त्याला भलतंच नवल वाटत होतं. तिला बघून त्याला असं वाटत होतं जस की त्याच्या मागे कुणी बसलंच नाहीये, मागचं सीट अगदी रिकामं आहे, इतकी ती बाई शांत आणि निश्चल बसून होती !

 

कितीक वेळापासून असलेली ती शांतता त्याला आता अगदी जीवघेणी वाटू वागली. ह्या बाईच्या प्रकरणाच्या नादात एवढी पिलेली दारू उतरली तर होतीच पण वेळेचाही चुराडा झाला होता...

 

"आलं बरका शहर... पोहोचूच आपण थोड्या वेळात... बरं मला एक सांगा बाई, तुमचे होणारे पती दिसायला कसे होते ? म्हणजे ठीकठाक होते ना ? नाही म्हणजे तुम्ही एवढ्या दिसायला देखण्या आणि उगीच ते आपले दिसायला काहीतरीच असले तर ?", वातावरण जरा हळकं करण्यासाठी तो जरासा हसून तिला म्हणाला. खरंतर हे ऐकल्यावर तिची प्रतिक्रिया कशी असेल याची त्याला भीती होतीच पण तरी त्याने धाडस करून म्हटलं.

 

"आमचं व्हनारं मालक ना ? ते.... ते बघा अगदी तुमच्यासारखं हाय दिसायला.. एकदम देखनं अन् रुबाबदार....", इतकावेळ मुक्यासारखी बसलेली सुंदरा अचानक त्याच्या कानाशी थंड आवाजात म्हणाली.

तिच्या त्या अनपेक्षित आणि इतक्या जवळून आलेल्या शब्दांनी रोहनच्या अंगावर अक्षरशः काटा आला. दचकून त्याने मिररमध्ये बघितलं तर ती त्याच्या अगदी जवळ होती. वेगात धावणाऱ्या गाडीवर फिरणाऱ्या थोड्या बहुत प्रकाशात तिचा थंड चेहरा लख्ख चमकत होता अन् परत अंधारात जात होता..! रोहनच्या काळजात धडकीच भरली. 

 

कसंतरी स्वतःला सावरून तो अडखळत म्हणला, "अर् अरे व् वा, छान छान..", आणि पुन्हा त्याने आपलं लक्ष गाडी चालवण्याकडे केंद्रित केलं.

 

शहराचे दिवे जसजसे जवळ यायला लागले तसे कोण जाणे का पण रोहनला हायसं वाटायला लागलं. कशी का पण त्याला या सगळ्या प्रकाराबद्दल थोडीशी नकारात्मक भावना मनात निर्माण झाली होती. या सुंदराबाईचं सगळंच प्रकरण विचित्र वाटत होतं. आताश्या काही वेळापासून त्याला असं जाणवायला लागलं होतं की मागे बसलेली ती त्याच्या अजून जवळ सरकून बसली होती. 'कदाचित तिला थंडी वाजत असेल ?, का.. का.. दुसरंच काही..?' त्याच्या मनात विचार आला. 'श्या तसलं काही नसेल, बिचारी अंधाराला घाबरली असेल', त्याने मनाची समजूत घातली.

 

थोडाच वेळ गेला होता की अचानक सुंदरेने आपला हात हळूच त्याच्या खांद्यावर ठेवला आणि त्याच्या अंगावर जरासं रेळून बसली. बर्फापेक्षा थंड असलेला तिचा हात..! तो हात खांद्यावर अचानक पडताच रोहन गडबडला..

 

"ओ बाई, अहो काय करताय तुम्ही? हात काढा आधी तो", तो चिडून जोरात म्हणाला. बाईकचा वेग त्याने एकदम कमी केला.

 

"चिडताय सा काय एवढं.. मला वाटलं तुम्हाला बी आवडतंय", गालातल्या गालात खुदकन हसत ती पुन्हा त्याच्या कानांच्या अगदी जवळ सरकून म्हणाली.

 

ते ऐकून रोहन आणखी चिडला.. 'च्यायला काय जमाना आलाय, एकटीदुकटी बाई बघून आपण म्हटलं मदत करावी तर ही बया खुशाल आपल्याशी फ्लर्ट करते !' त्याने कचकन ब्रेक मारून गाडी थांबवली आणि जोरात खेकसून म्हणाला,

 

"ओ बाई, काय लाजबिज वाटते की नाही तुम्हाला ! एकटी समजून मदत काय केली तुम्ही खुशाल निर्लज्जासारख्या माझ्या खांद्यावर काय हात ठेवता ! उतरा आधी खाली आणि निघा तुमच्या वाटेनं... उतरा !"

 

सुंदरेच्या चेहेऱ्यावर काही फारसा परिणाम झाल्यासारखा दिसला नाही...

 

"आवं एवढं काय चिडताय? नाय आवडत तर नाय आवडत.. राहिलं", अगदी काहीच झालं नाही अश्या अविर्भावात ती म्हणाली.

"पन हे तर आवडल ना?", असं म्हणत एकाएकी तिने त्याच्या कमरेला मागून घट्ट मिठी मारली. रोहनचं अख्खं अंग शहरून उठलं कारण तिचा स्पर्श उबदार नसून बर्फासारखा थंडगार होता. पोटावर टेकलेले तिचे हात आता हळूहळू त्याच्या छातीवरून फिरू लागले.. शर्टाच्या बटनांशी चाळा करू लागले. स्पर्शाची संवेदना होताच क्षणात रोहनने तिचे हात जोराचा झटका देऊन झिडकारून टाकले.. त्याचा संतांपाचा पारा इतका अनावर झाला की, त्याने ती मागे बसलेली असतांनाच खाडकन साईड स्टँड लाऊन ती धुड गाडी उभी केली आणि खसकन सुंदरेला बाईकवरून ओढून खाली ढकलली...

त्या जोराच्या हिसक्याने सुंदरा रस्त्यावर तोल जाऊन पडली...

 

"ए बाई काय नालायक म्हणावं तुला ?! लाज नाही वाटत खोटंनाटं कारण सांगून लोकांना मदत मागते आणि त्यांचा गैरफायदा घेतेस..!, आणि पुढं उठून माझ्याच विरुद्ध कंपलेंट करशील, बाइमाणसाचा गैरफायदा घेतला म्हणून..! चल निघ थोबाड काळं कर तुझं कुठतरी.. विकृत कुठची ..!", रोहन संतांपून म्हणाला. क्षणात त्याने बाईक सुरू केली आणि पुन्हा आपल्या घराच्या वाटेवर यूटर्न मारून तूफान वेगात निघून गेला...

 

सुंदरा मात्र तो गेला त्या रस्त्याने मोठमोठ्याने विकृत, कर्कश असं हास्य करू लागली !

 

"आवं धनी, थांबा की, कुठं सोडून जाताव मला.. आता माझ्याशिवाय कोन तुमच्याशी लाडी करनार.. आं आं..!", मोठ्यामोठ्याने किंचाळत, हसत ती तिथेच उभी राहून ओरडत होती.

 

कानावर पडणारं तिचं कर्कश विकृत ओरडणं हळूहळू कमी होऊन गेलं तरी रोहनच्या उरात त्या हास्याने भयंकर धडकी भरली होती. इतकावेळ गोगलगाईसारखं वागणाऱ्या त्या बाईने क्षणांत एखाद्या चेटकिणीसारखं रूप घेतलं होतं. जिवाच्या मुळासकट आता त्याला भीती वाटू लागली होती. जमेल तितक्या वेगात रोहन आपली गाडी पळवत होता. बस झालं हे नसतं लचांड ! त्याला आता काहीही करून घरी पोहोचायचं होतं. घड्याळात त्याने ओझरती नजर टाकली तेव्हा दीड वाजायला आला होता. मध्यरात्रीच्या ऐन बहरात त्याचा प्रवेश झाला होता. तूफान वेगात जमेल तसं कौशल्य पणाला लाऊन तो त्या हायवेवर एखादं विमान उडवावं त्या वेगात गाडी चालवत होता...

 

थोडा वेळ जातो न जातो तोच त्याला लांबून ती जागा दिसायला लागली जिथे त्याला सुंदरेने थांबवलं होतं आणि हे काय ?! तिथे परत कुणीतरी हात दाखवत रस्त्याच्या जवळपास मध्येच येऊन उभं होतं..!

ते दृश्य बघून रोहनच्या काळजात भीतीने जोरात कळ आली. मनात तो विचित्र विचारही येऊन गेला. गाडीच्या तूफान वेगामुळे काहीच क्षणात तो त्या व्यक्तीच्या पुढ्यापर्यंत पोहोचलाही होता ! नाईलाजाने भीतभीत त्याने गाडी थांबवली...

 

समोर उभी व्यक्ती अंधारातून आणखी पुढे सरकली आणि हेडलाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा लख्ख उजळून निघाला... आणि जशी रोहनची नजर त्या व्यक्तीला जाऊन भिडली तसं भीतीने त्याचं काळीज अक्षरशः त्याच्या तोंडात आलं कारण समोर उभी ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून सुंदरा होती !

कानाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत वासलेल्या जबड्यातले पांढरेशुभ्र सुळे वासून विकृत हसत रोहनकडे पाहत होती..! भीतीने रोहनची अक्षरशः ततपप होत होती. समोर उभी ती खरंच सुंदरा आहे का आपल्याला भास होतोय हे त्याला समजेना... 'हिला तर आपण इतक्या लांब मागेच सोडून आलो होतो, मग ही एवढं मोठं अंतर इतक्या वेगात कापून इथं उगवलीच कशी ?' हेच त्याला कळेना...

 

हलकी हलकी चाल करत सुंदरा रोहनच्या शेजारी हळूच येऊन उभी राहिली. ती जवळ आली तेव्हा त्याला दिसलं की तिच्या डाव्या कानाच्या वर डोक्यातून भळभळ रक्त वाहत आहे, आणि ती जखम ज्या पद्धतीची होती त्यावरून कुणीही सांगू शकलं असतं की ती एका बंदुकीच्या गोळीची आहे. अर्थात सुंदरेच्या डोक्यात बंदुकीची गोळी घुसली होती !

 

पण हे असं कसं होऊ शकतं ? डोक्यात गोळी लागलेला माणूस तर तत्काळ गतप्राण होतो, मग ही जीवंत कशी ? म्हणजे.. म्हणजे... त्या भयंकर विचाराने रोहन नखशिखांत हादरला ! भीतीने रोहनच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता, त्याला कशीतरी थांबवलेली गाडी परत वेगात आणून तिथून सटकायचं होतं पण मेंदूची ही आज्ञा मानायला त्याच्या शरीरचं कुठलंही गात्र ताळ्यावर राहिलं नव्हतं. हातपाय बर्फासारखे थंड पडले होते. डोक्यात सगळीकडे झिणझिण्या उठत होत्या. हा सगळा प्रकार अमानवी आणि खूपच भयंकर आहे याची एव्हाना त्याला जाणीव झाली होती. समोर उभी ही सुंदरा कुणी साधीसुधी बाई नसून एक पिशाच्च होतं हे रोहनच्या लक्षात आलं होतं. कसंतरी करून इथून दूर पाळायला हवं होतं पण शरीर बिलकुलच साथ देत नव्हतं. भीतीने त्याचा श्वास त्याच्या छातीतच अडकला होता...!

 

जवळ आलेल्या सुंदरेने हळूच त्याच्या कानापाशी बर्फापेक्षा थंड अश्या आवाजात म्हटलं,

"धनी, मला असं रातच्या वखताला एकटीला सोडून कुठं निघलात ?, आपल्या कारभारीनिला असं रस्त्यात रातीचं उतरून देनं शोभतं का तुम्हाला ?! आता लगीन झालं हाय आपलं..!"

 

तिचे ते शब्द रोहन आणखीनच घाबरला. जगात असल्यानसल्या सगळ्या देवांची मनातल्या मनात प्रार्थना त्याने म्हणायला सुरुवात केली. कोन धनी ? कसलं लग्न ? त्याला कसला ताळमेळ लागेना ? इतकावेळ एक परकी बाई म्हणून आपल्याला मदत मागणारी ही अशी अचानक हात काय लावते, नवरा काय म्हणते, लग्न काय म्हणते त्याला काही म्हणजे काही उमगेना !

 

त्याला एक गोष्ट मात्र लक्षात आली होती !

ही सुंदरा काही त्याचा मुडदा पाडणार नव्हती ! कारण तसं जर असतं तर इतक्या वेळात तो केव्हाच स्वर्गात त्याच्या वडिलांना भेटायला गेलेला असता ! हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं.. पण जाऊदे.. काही का असेना.. त्याला आता कसंही करून इथून सुटका हवी होती. रक्ताने बरबटलेला सुंदरेचा चेहरा आपल्या अगदी जवळ बघून त्याला आता फक्त भोवळच यायची बाकी होती. तिचा नूर बदलला आणि क्षणात तिने आपलं नरडं धरलं तर कुणीही वाचवायला येणार नव्हतं..!

 

कसातरी धीर करून तो काकुळतीने तिला म्हणाला,

"ओ ओ बाई मला प्लीज सोडा, मी एक संसारी माणूस आहे ओ, तुम्ही समजता तसं काही नाही.. मी कुठल्याही बाईचा गैरफायदा घेत नाही, तिला त्रास देत नाही, साधं भांडण पण केलं नाही ओ कुणाशी कधी.. (हे बोलतांना त्याच्या डोळ्यांसमोर काही क्षण प्रियाचा चेहरा तरळून गेला.. इथून सुटलो, वाचलो तर प्रियाची आधी पाय धरून माफी मागायची..त्याने मनाशी ठरवून टाकलं..) मला प्लीज जाउद्या.. मी तुमचे हात जोडतो, माझी बायको माझी घरी वाट पाहत असेल.. ", रोहनने तिच्यापुढे हात जोडले...

 

'बायको' शब्द ऐकून सुंदरा मोठमोठ्याने हसायला लागली. मोकळ्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या गर्द काळोखात तिचं हास्य एखाद्या सैतानासारखं वाटू लागलं !

 

"आंव असं काय करता मालक, म्याच नाय का तुमची बाईल ? आणखी कून आसनार ?", म्हणत ती खदखदून हसली.

"चला आता घरी, पुरे झाला पोरकेपना ..! मामंजी घरी वाट बघत असतील,", असं म्हणता म्हणता ती गाडीच्या मागे जाऊन बसू लागली..!

 

आत्ता मात्र रोहन सावध झाला, देवाने प्रत्येक सजीवात आपापला जीव वाचवण्यासाठी एक खास अशी मानसिक आणि शारीरिक यंत्रणा दिलेली असते, कितीही संकट ओढवलं तरी माणूस शेवटपर्यंत आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतो, रोहनला ही नेमक्या याच भावनेची जाणीव झाली आणि त्याच्या अंतर्मनाने त्याला एकाच इशारा दिला ! पळ..! जीव खाऊन पळ..! स्वतःचा जीव वाचव..! अन्यथा परत सुटका नाही..!

क्षणात त्याचा मेंदू आणि गात्रे पुन्हा कार्यान्वित झाली. सुंदरा पूर्ण बसायच्या आतच काहीतरी ओरडत त्याने वेगात आपली बाई पुन्हा सुरू केली आणि जोराचा अँक्सीलरेटर देऊन गाडी तूफान वेगात पुढं घेतली ! मागे चुकूनही वळून न बघता त्याने थेट घराचा रस्ता धरला... मागून त्याच्या कानांवर सुंदरेचं कर्कश किंचाळणं बराच वेळ पडत होतं..!

 

अखेर भीतीने काकडत, देवाचं नाव घेत, रडत पडत पुढच्या अर्ध्या तासात त्याने आपलं घर कसंतरी गाठलं.. पार्किंगमध्ये गाडी उभी केली. घामाने अन् भीतीने पूर्णपणे भिजून गेलेला तो धाडधाड जिना चढून आपल्या घराच्या दारापाशी पोहोचला आणि जोरजोरात दाराची बेल वाजवू लागला. काकुळतीला आलेल्या त्याच्या डोळ्यांतून आता मात्र भीतीने आणि परिश्रमाने आसवं गळायला लागली होती. बेल वाजवता वाजवता सारखं त्याचं लक्ष आपण आलेल्या मोकळ्या जिन्याकडे जात होतं. ना जाणो ती हडळ इथपर्यंत पाठलाग करत आली तर..! भीतीने जीवाचा अगदी थरकाप उडाला होता..!

 

अखेर पाच-दहा वेळा बेलचा आवाज घुमल्यानंतर दाराची कडी आतून सरकवल्याचा आवाज आला.. दार उघडलं तेव्हा त्याला चिडलेली, वैतागलेली, अर्धवट झोपेत डोळे चोळणारी प्रिया दिसली..

तिला बघून भीतीने गलीतगात्र झालेल्या त्याच्या चेहेऱ्यावर समाधानाचं अन् सुटकेचं पुसटसं हास्य उमटलं आणि तिने दार पूर्ण उघडायच्या आधीच तो दारात बेशुद्ध होऊन कोसळला....

***

 

तीन दिवसानंतर...

 

आज रोहनला पूर्णपणे शुद्ध आली होती. अंगातला अशक्तपणा बऱ्यापैकी कमी झाला होता. हळूहळू त्याने डोळे उघडले... 

 

त्याची बायको प्रिया चिंताक्रांत चेहऱ्याने त्याच्या शेजारी बसून होती. तो असा रात्रीबेरात्रीचा घरी येऊन दारातच बेशुद्ध होऊन कोसळला तेव्हा भीतीने तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं. अंगाला हात लावला तर तिला चांगलाच चटका बसला होता. रोहनला सडकून ताप भरला होता. एकंदर प्रकरणावरून काहीतरी खूप भयंकर घडल्याची एव्हाना तिलाही जाणीव झाली होती. त्याची ही अशी अवस्था बघून सकाळी झालेली भाडणं ती पार विसरून गेली होती. रात्रभर तिने त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत, त्याच्या उशाशी बसत, ती अख्खी रात्र जगून काढली होती अन् सकाळ होताच डॉक्टरांना बोलावून घेतलं होतं. त्याची एकंदर अवस्था बघून डॉक्टरांनी त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत सलग तीन दिवस तो शुद्धीवर आला नव्हता...

ताप तर बऱ्यापैकी कमी झाला होता तरीही अजून शुद्ध येत नव्हती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याने कशाची तरी भयंकर भीती किंवा धास्ती घेतली होती अन् त्यामुळेच त्याच्या मनाला कदाचित त्या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसला होता अन् या सगळ्याचा परिपाक म्हणून त्याच्या सबकॉन्शस माइंडने अर्थात अंतर्मनाने आपली 'शट डाउन' यंत्रणा कार्यान्वित केली होती...

त्यांच्या म्हणण्यानुसार आता धोक्याची ती जाणीव नाहीशी होईपर्यंत त्याला शुद्ध येणार नव्हती....

 

त्याने डोळे उघडलेले पाहताच प्रियाच्या चेहेऱ्यावर सुटकेचं हास्य आलं. प्रेमाने त्याच्या कपाळावर हात फिरवत तिने विचारलं,

"कसं वाटतंय आता ? काय झालं रे एवढं ? कशाने एव्हढा आजारी पडलास ? कसली भीती वाटत आहे तुला ?", प्रिया काळजीत पडली.

 

तिचे शब्द ऐकून रोहनला ती भयानक रात्र आठवली. त्या सुंदरेचा चेहरा डोळ्यांसमोर येताच त्याच्या अंगावरून पुन्हा सरसरून काटा आला... 

त्याला शांत बसलेलं बघून प्रियाने त्याला पुन्हा विचारलं. तेव्हडयात रोहनचा ऑफिसचा सहकारी मिलिंद रूममध्ये आला. रोहनला शुद्धीवर आलेलं बघून त्यालाही आनंद झाला.

 

"काय रोहन कसं वाटतंय आता ? काय रे असं अचानक झालं ? वहिनी कीती घाबरल्या होत्या माहितीय ? ते एक बरं झालं की त्यांनी मला वेळवर फोन करून सगळी हकीकत कळवली आणि मी मदतीला धावलो.. नाहीतर त्यांनी एकटीने कसं सांभाळलं असतं सगळं..?", मिलिंद म्हणाला.

 

रोहनला आता हळूहळू माणसांत आल्याने सुरक्षिततेची भावना होत होती. हळूहळू त्याने त्या रात्री घडलेली सगळी हकीकत प्रियाला आणि मिलिंदला कथन केली...

 

त्याच्या चेहेऱ्यावरची ओसंडून वाहणारी भीतीच सांगून जात होती की तो संगत होता यातला एकही शब्द खोटा नव्हता. प्रिया तर हे सगळं ऐकून भलतीच घाबरली होती. 'आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणूनच आज आपलं कुंकू थोडक्यात वाचलं..!', तिच्या मनात विचार चमकला.

 

मिलिंद मात्र रोहनने सांगितलेली सगळी हकीकत गंभीरपणे ऐकत होता...

 

रोहन शांत झाल्यावर तो म्हणाला,

"खरच गजाननाची कृपा म्हणून तू वाचलास रोहन, नाहीतर त्या रात्री तुझी काही धडगत नव्हती ! तू या शहरात नवीन आहेस म्हणून तुला काही गोष्टी माहीत नाहीत...

आपण ज्या जगात जगतो त्यापेक्षा एक खूप भयानक आणि अमानवी असं जग आपल्या समांतर अस्तित्वात असतं, आपल्या अवतोभोवती वावरत असतं. कधीकधी ते जग आणि आपलं हे जग यांचा आपापसात मिलाफ होतो किंवा त्यांच्या सीमा एक होतात आणि मग या अश्या भयंकर घटना आपल्याभोवती घडून येतात..!

 

तू जी म्हणतोस, ती सुंदरा बाई, ती खूप लोकांना, बऱ्याच वेळेला त्या हायवेवर दिसून आली आहे. खास करून त्या लोकांना जे रात्री ११-१२ नंतर त्या रोडवरून प्रवास करतात, आणि त्यातूनही एकटेदुकटे प्रवास करणारे पुरुष....

 

लोकं असं सांगतात की, सुमारे शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्याकाळी इथे जे गाव होतं त्याचं नाव वळकणी होतं असं लोकं सांगतात. त्या गावातल्या म्हणे खूप मोठ्या जमीनदाराची ती तरुण मुलगी होती, मी असं ऐकलं आहे की, तिचं लग्न ज्यावेळेस लागत होतं त्यावेळी एक खूप मोठा गोंधळ झाला..!

 

त्याकाळी गावाच्या वेशीबाहेर राहणारे डाकू-लुटारू यांची गावात बऱ्यापैकी दहशत होती. ती लोकं कधीही गावात येऊन चोऱ्या-दरोडे, खून पाडून जायची आणि लोकांना कळायचंही नाही. त्या दिवशीही नेमकं असंच काहीतरी झालं. गावचे मोठे प्रतिष्ठित जमीनदार म्हणून नावलौकिक असलेल्या सुंदराच्या वडिलांनी त्या दरोडेखोरांपैकी एका मोठ्या सरदाराला सापळा रचून पकडलं होतं आणि गावच्या भर चौकात सर्वांसमोर त्याला फाशी दिली होती. म्हणून त्याचा सूड उगवण्यासाठी त्या दिवशी त्यांची एक टोळी तिथे लग्नात हजर झाली आणि जसा अंतरपाट बाजूला झाला तसा त्यातल्या एकाने आपल्या लांब बंदुकीतून एक जोराचा बार उडवला. ती गोळी जाऊन थेट लागली ती पाटलांच्या मुलीला म्हणजेच सुंदराला !! डोक्यात निशाणा लागल्याने भर मांडवात सुंदरा गतप्राण होऊन जागीच कोसळली रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं तिचं मढं बघून तूफान गोंधळ उडाला...!

 

आता पुढे त्या पाटलांचं, त्या दरोडेखोरांचं, आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं काय झालं हे काही ठाऊक नाही पण लोक सांगतात की आजही सुंदरा 'आपण जीवंत आहोत, कुठतरी दूर येऊन पडलो आहोत आणि आपल्याला घरची वाट आठवत नाही' असं समजून अवसेच्या रात्री त्या रोडवरून जाणाऱ्या लोकांचा रस्ता अडवते आणि त्यांना मदत मागते. आता तुला जसा अनुभव आला तसा बऱ्याच लोकांना आला आहे. मदत करणाऱ्या लोकांनाच विशेषतः पुरुषांनाच ती आपला होणारा नवरा समजते आणि त्यांच्याशी लगट करते. आयुष्याची कितीतरी सोनेरी स्वप्न डोळ्यांत घेऊन लग्नाला उभ्या सुंदर मुलीचा असा दुर्दैवी अंत होतो तेव्हा तिचा आत्मा मरणोपश्चातही ती सुखं शोधण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी धडपडत असतो..!!

 

मला वाटतं रोहन, कदाचित आपलं मरण ती सुंदरा जाणतच नसावी... तिला कदाचित माहीतच नाही की आपला मृत्यू होऊन कैक दशकं उलटली आहेत... आपण या मनुष्यलोकातून आता खूप पुढे आलेलो आहोत, इथली सुखं-दुखं उपभोगण्याची आता आपल्याला परवानगी नाही...

 

काळ गेला, वेळ पुढे सरकली, ती जुनी गावं सुद्धा इतिहास जमा झाली पण काही घटना अजूनही त्यांचे पडसाद घेऊन काळाच्या पानांवर कोरल्या गेली आहेत त्या अश्या...

 

ही सुंदरा... आज अनंत काळ जन्म अन् मृत्यू, आसक्ती अन् तळमळ, प्रेम अन् विरह यांच्या कधीही न संपणाऱ्या चक्रात अडकली आहे... तो देवच जाणे कधी तिची या फेऱ्यातून सुटका होईल !...

 

येणाऱ्या दर अवसेच्या रात्री तिचा पुन्हा जन्म होतो, ती पुन्हा पुन्हा कासावीस होते, मदत मागते आणि उषःकाल होताच मृत्यूची छाया तिला आपल्या अंधारात कायमची ओढून घेते, गडप करते ती पुन्हा पुढच्या अवसेचा उगम होईपर्यंत...

 

न जाणो कीती काळ जन्म-मृत्यूची वाट चुकलेली ही सुंदरा अश्या कित्येक रात्री मदत मागत राहील....

याचीच वाट बघत की कोण तिला तिच्या घरी घेऊ

न जाईल ? तिची आणि तिच्या माणसांची कडकडून भेट घालून देईल ?.. त्या पुण्यात्म्याचीच वाट पाहत थांबलीय... ही सुंदरा....!"

*********************************************************************

समाप्त