अर्थ:- थेंब थेंब साठत गेला की हळूहळू एक दिवस त्यातून तळे निर्माण होईल एवढं पाणी साठते.
थोडं थोडं साठवत गेलं की एकदिवस त्याचा मोठा संचय होतो मग ते पाणी असो पैसे असो वस्तू असो किंवा आणखी काही
त्यावर आधारित कथा:-
एका गावी दोन मित्र राहत होते राम आणि श्याम. ते फक्त एकमेकांचे मित्र नसून शेजारी सुद्धा होते. ते सोबतच शाळेत जायचे सोबतच खेळायचे अगदी जीवश्च कंठश्च मित्र होते ते.
त्या दोघांचे वडील त्यांना शाळेत जाताना रोज गोळ्या बिस्किटं खाण्यासाठी किंवा पेन पेन्सिल आणण्यासाठी पाच रुपये द्यायचे.
शाम रोजच्या रोज ते पाच रुपये खर्च करून टाकायचा पण राम मात्र त्यातील तीन रुपये खर्च करायचा आणि दोन रुपये गुल्लक मध्ये टाकून द्यायचा.
बरेचदा शाम जे चॉकलेट्स विकत घ्यायचा तसे चॉकलेट्स राम ला घेण्याची इच्छा व्हायची पण तो मनाला आवर घालायचा आणि दोन रुपये बाजूला काढून ठेवायचा नियम कधीच मोडायचा नाही.
शाम त्याला म्हणायचा सुद्धा अरे हे पैसे आपल्या वडिलांनी आपल्याला मौजे साठी दिलेले आहेत त्याची कुठे बचत करतो तू? आणि असे कितीसे पैसे साठणार आहेत दोनदोन रुपयांनी? जास्त विचार करू नको खर्च करून टाक पैसे!
पण राम त्याच्या मतावर ठाम होता त्याने आपलं दोन दोन रुपये साठवणे सुरूच ठेवले. असे अनेक वर्षे निघून गेले. ह्या वर्षांमध्ये अनेकदा राम च्या मनात गुल्लक फोडून त्यातील पैसे वापरावे असा विचार आला. नवा मोबाईल घ्यावा, मित्रांना पार्टी द्यावी कधी नवनवीन कपडे घ्यावे असं त्याला वाटलं पण तो त्याच्या मनाला आवर घालत राही.
जसजसे त्यांचे वय वाढले तसतसे त्यांच्या वडिलांनी त्यांची पॉकेट मनी सुद्धा वाढवली पण राम ने तोच नियम ठेवला अर्धे पैसे खर्च करायचे आणि अर्धे पैसे शिल्लक ठेवायचे. शाम मात्र पूर्ण पैसे खर्च करून टाकी.
राम आणि शाम आता बालवयातून युवकावस्थेत गेले होते. शाळा संपून त्यांचं कॉलेज जीवन सुरू झालं होतं. शाम ने विज्ञान शाखा निवडली होती तर राम ने कला शाखा निवडली होती त्यामुळे त्यांचे कॉलेजेस वेगवेगळे होते आणि एकमेकांपासून लांब होते तसेच घरापासून सुद्धा खूप लांब होते. दोघांच्याही घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सायकल वरच जावं लागे.
कॉलेज मध्ये पोचेपर्यंत त्यांची दमछाक व्हायची. अजूनही राम चा थोडे थोडे पैसे साठवण्याचा दिनक्रम सुरूच होता. काही दिवसांनी राम ला वाटलं आता बरेच वर्षे झालेले आहेत आणि त्याचं रांजणा एवढं गुल्लक पण भरलं होतं त्यामुळे त्याने ते फोडायचं ठरवलं. ते गुल्लक फोडल्यावर त्याने जेव्हा पैसे मोजले तेव्हा ते एक 2 व्हीलर विकत घेण्याएवढे जमले होते. राम ला खूप आनंद झाला त्याने लगेच एक 2 व्हीलर विकत घेतली.
आता कॉलेज मध्ये 2 व्हीलर वर जाऊ लागला त्याचे कष्ट वाचू लागले. त्याच्या आईबाबांना सुद्धा त्याचं कौतुक वाटलं.
त्याचे बाबा म्हणाले "बेटा थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण तू खरी केली." आणि त्यांनी त्याला शाबासकी दिली.
इकडे शाम मात्र दमछाक करत सायकल चालवत राहिला. दोघांचे कॉलेज एकमेकांपासून लांब असल्याने राम ची इच्छा असून तो त्याची मदत करू शकत नव्हता. शामला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला पश्चाताप झाला.
राम सारखंच आपणही तेव्हा थोडे थोडे पैसे साठवले असते तर बरं झालं असतं. तेव्हा आपण राम ची टिंगल केली की दोनदोन रुपयांनी काय होणार पण थेंबे थेंबे साठवत राहिलो की कधी तळे साठते हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही हेच खरं.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
वाचकांनो अभिप्राय नक्की कळवा कारण वाचकांचा अभिप्राय हीच लेखकांची प्रेरणा.
खूप धन्यवाद.