महत्त्वपूर्ण निवेदन :-
● सदर कथेचा उद्देश हा निव्वळ शुद्ध-मनोरंजनासाठी असून त्याद्वारे समाजात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरविण्याचा लेखकाचा उद्देश नाही, हे कृपया वाचकांनी जाणावे.
● कथेतील सर्व पात्रे, स्थळे आणि घटना या पूर्णतः काल्पनिक असून केवळ कथेची आवश्यकता म्हणून त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे, त्यांचा वास्तवातील कोणतीही जीवित किंवा मृत व्यक्ती, स्थळे अथवा घटना यांच्याशी संबंध नाही. तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
● कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव असून, लेखकाच्या परवानगीशिवाय सदर कथा-
१) अन्य व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहांच्या नावे प्रकाशित केल्यास,
२) गैर अथवा अनधिकृत वापर केल्यास,
३) अन्य प्रकाशनीय माध्यमांमार्फत प्रदर्शित केल्यास,
संबंधित व्यक्तीवर/व्यक्तीसमूहांवर अथवा संस्थेवर कठोर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया वाचकांनी दखल घ्यावी, ही नम्र विनंती.
◈◈◈
मला लहान-लहान मुलं खूप आवडतात. आता तुम्ही म्हणाल की, लहान मुलं तर सगळ्यांनाच आवडतात, कारण ती निष्पाप असतात, गोंडस असतात, भाबडी असतात. पण माझं म्हणणं थोडं वेगळंच आहे... इतरांना लहान मुलं जितकी गोंडस आणि गोड वाटतात त्याहून जास्त मला ती वेगळ्या पद्धतीने इंट्रेस्टिंग वाटतात. अगदी माझ्या तरुण वयापासूनच मला लहान लहान मुलांचं विशेष आकर्षण आहे... नव्हे, आसक्तीच आहे...
अरे! मी तर थेट माझी कथाच सुरू केली! माझं नाव तुम्हाला सांगायलाच विसरलो...माझं नाव श्रीकांत रणदिवे, वय पंचेळीस. अविवाहित, सुखी, सडाफटिंग, टोणगा, 'एकटा जीव सदाशिव' अश्या अनेक मानाच्या(आणि अपमानाच्या) उपाध्या आजपर्यंत समाजाकडून लाभलेला, या पृथ्वीवरच्या अफाट गर्दीतला एकुलता एक जीव.
अनाथ असलेला मी लहान वयातच एका कापड दुकानात पोऱ्या म्हणून कामाला लागलो आणि बघता बघता प्रगती करत आता इतक्या वर्षात त्याच कापड दुकानाचा सिनियर मॅनेजर झालोय! राहायला या आमच्या सदानंद सोसायटीत छान २ बीएचकेचा फ्लॅट आहे.
पैसापाणी, घरदार मुबलक असलं की तुमच्या-आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याची अर्धी चिंता मिटलेली असते नाही ? असो...
आता तुम्ही म्हणाल, इतकं सगळं छान सेट असतांना या माणसाने लग्न का नाही केलं ? तर त्याला कारण, हीच माझी आवड... अहो कोणती म्हणून काय विचारताय ! हीच, लहान मुलांची आवड.
आला आला, तुमच्या मनातला प्रश्न माझ्या अचूक लक्षात आला! मग मुलं आवडतात तर छानच आहे की! लग्नाला काय प्रॉब्लेम आहे ?... पण कसं आहे, मी ही माझी आवड ज्या पद्धतीने जोपासतो आणि कुरवाळतो किंवा माझ्या या बाबतीत ज्या काही संकल्पना, तत्वं आहेत ती बाहेरच्या समाजाला तितकीशी पटणारी नाहीत हे इतक्या वर्षांच्या माझ्या आयुष्यात मला लक्षात आलंय. मी घरात बायको आणायचो आणि तिचा माझ्या या प्राणांपलीकडे प्रिय असणाऱ्या छंदाला विरोध असायचा तर मग कसं जमायचं ? म्हणूनच मी या फंदात पडलोच नाही! आपण भले आणि आपला एकांत भला!
तर अशी ही माझी आवड, माझा हा छंद मला माझ्या जीवापेक्षा प्यारा आहे. याविषयी मी तुम्हाला आणखी जास्त स्पष्टीकरण देत बसत नाही. त्यापेक्षा काही दिवसांपूर्वी झालेली घटनाच वर्णन करतो...
साधारण चार महिन्यांपूर्वी आमच्या सोसायटीत दामले कुटुंब राहायला आलं. मी. दामले बँकेत नोकरीला आणि मिसेस दामले शाळेत शिक्षिका. या दोघांना दोन गोंडस जुळी मुलं. मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. अवघ्या चार-साडेचार वर्षांची ती गोंडस चिमणी-पाखरं या नव्या जागेत राहायला आल्यापासून आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये, किड्स झोनमध्ये फुलपाखरासारखी भिरभिरायची. त्यांचं ते गोंडस हसणं, खिदळणं, उडया मारणं पाहून सोसायटीतल्या जवळपास प्रत्येकालाच त्या लेकरांची भुरळ पडली होती. संध्याकाळच्या वेळी बागेत फिरायला येणारे, सोसायटीत कामाला येणाऱ्या कामवाल्या बायका अशी जवळपास सगळीच मंडळी या दामले नवरा-बायकोला थेट त्यांच्या मुलांच्या नावानेच ओळखू लागली होती. मिसेस दामलेंची ओळख सोसायटीमधल्या सगळ्या बायकांमध्ये या दोन्ही मुलांमुळेच निर्माण झाली होती.
तुम्हाला खरं सांगतो, दोन्ही मुलं म्हणजे त्या इंग्रजी अमेरिकन कथांमधल्या गोऱ्यापान, गुटगुटीत अश्या साक्षात देवदूतांसारखीच दिसायची. लाडाने अख्खी सोसायटी त्यांना 'चिकू आणि चेरी' म्हणायची. मुलगा निहार, म्हणजे चिकू आणि मुलगी निहिरा म्हणजे चेरी!
माझ्या घराच्या बेडरूममधल्या मोठ्या खिडकीतून आमच्या सोसायटीचं गार्डन थेट दिसून येतं. संध्याकाळच्यावेळी ही दोन्ही लेकरं नव्याने खाली खेळायला यायची तेव्हा त्यांना बघून माझा जीव अगदी कासावीस व्हायचा. वाटायचं, एकदा लेकरांना मिठीत घ्यावं त्यांचा गोड पापा घ्यावा...
१५ मजल्यांच्या आमच्या बिल्डिंगमधलं माझं घर सातव्या आणि दामल्यांचं घर नवव्या मजल्यावर. येताजता कधी मिसेस दामले मुलांना घेऊन लिफ्टमध्ये भेटल्या की मी त्या मुलांशी हमखास होऊन बोलायचो. कधी त्यांना चॉकलेट द्यायचो तर कधी जोकरची नक्कल करून दाखवायचो. दोन्ही पोरं मनापासून पोट धरून हसायची. 'काका काका' म्हणत मी दिलेलं चॉकलेट आनंदाने आपल्या छोट्याश्या हाताच्या मुठीत दाबायची. त्यांच्या त्या गोड बाललीला बघून मन अगदी हरखून जायचं. मिसेस दामलेही पोरांना नव्या वातावरणात मोकळं झालेलं बघून खुश व्हायच्या. आमच्या खिदळण्यात मग त्याही सामील व्हायच्या..!
काही दिवसातच आमची चांगली मैत्री जमली. अं हं..! तसला विचार करू नका, माझी आणि मिसेस दामल्यांची नाही, माझी आणि चिकू-चेरीची! त्याचं असं झालं की, आईबाप नोकरीवाले असल्यामुळे दोन्ही मुलं दुपारी बारा नंतर त्याचं प्रीस्कूल सुटलं की जवळच्याच पाळणाघरात जायची आणि मग थेट संध्याकाळी ५ वाजता मिसेस दामले शाळेतून येताना मुलांना घरी घेऊन यायच्या. माझी आणि या तिघांची घरी यायची वेळ एकच व्हायची त्यामुळे रोज त्यांची आणि माझी गाठभेट ठरलेली असायची.
लांबून मी दिसताच दोन्ही लेकरं 'काकाsss' म्हणत धावत यायची आणि मला त्यांच्या इवल्याश्या हातांनी मिठी मारायची. आई शप्पथss काय जाणीव होती ती..! एक वेगळ्याच प्रकारचं समाधान, एक वेगळाच आनंद मला त्या लेकरांच्या स्पर्शाने व्हायचा. मनात एका प्रकारची तहान दाटून यायची. वाटायचं, ही लेकरं, हा सुंदर आनंद कधी दूर जाऊच नये, कायम माझ्या सोबतच राहावा. माझ्या अवतीभोवतीच बागडावा..!
एव्हाना त्यांची आणि माझी वेळ एक असते हे बघून मीही रोज त्यांच्यासाठी दुकानातून घरी येतांना काहीबाही खाऊ, गंमत घेऊन येऊ लागलो. दोघं माझ्यापाशी धावत आली की खाली वाकून हळूच त्यांच्या समोर गंमत लपवलेली हाताची मूठ उघडून दाखवू लागलो होतो. माझ्या हातातले ते चॉकलेट, बिस्किटे, गोळ्या बघून दोन्ही पिल्लं आनंदाने नुसता कल्ला करायची. आनंदाने माझ्या भोवती नुसत्या घिरट्या घालत राहायची. मग मीही त्यांच्यात समरस होऊन जायचो. नकळत मीही स्वतःला लहान मूल समजून जायचो आणि त्यांच्याशी खेळत बसायचो...
मिसेस दामले मात्र मुलांना रोज रोज काकांकडून खाऊ घेतात म्हणून ओरडायच्या तेव्हा एवढंसं तोंड केलेली ती छोटूकली बदकं माझ्याच पायांमागे लपायची! हो, दोन पांढरीशुभ्र बदकंच होती दोघं, गोरापान रंग, गुटगुटीत सश्यासारखं अंग, चमचमणारे छोटूकले काळे पाणीदार डोळे, डोक्यावर सोनेरी झाक असलेले भुरभुरे केस.. पाहणाऱ्याला अगदी मोहून टाकतील अशीच होती दोन्ही पाखरं.
दिवसेंदिवस त्यांच्यावर माझा भलताच जीव जडत चालला होता, ही गोष्ट मात्र खरी !
असेच महीने दोन महीने गेले. सुट्टीचा दिवस होता. मी घरीच होतो. संध्याकाळचे साडेपाच सहा वाजले असतील. मी आपला नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे गरमागरम कॉफीचा मग हातात घेऊन बेडरूमच्या रुंद खिडकीत सूर्यास्त बघत बसतो होतो. खालीच गार्डन मध्ये सोसायतीतली मोठी मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांचा कल्ला सुरू असल्याने सोसायटीतलं वातावरण बऱ्यापैकी बोलकं झालं होतं.
आज रविवारचा दिवस असल्याने गार्डन मध्ये कुणी मोठी मंडळी दिसत नव्हती. बाजारहाट, सिनेमा, खरेदी ही अशी काम ही संसारी लोकं रविवार आणि सुट्टी असल्याने आज उरकतात हे मला आता माहीत झालंय...
कॉफीचे घोट घेता घेता मी त्या मुलांची मॅच अगदी निवांतपणे बसून बघत होतो. तेवढ्यात चिकू-चेरी गार्डन मध्ये आली. त्यांना बघून माझा श्वास अचानक वाढला. छाती भरून आली. त्या दोघांना बघून मला तूफान आनंद झाला!
जुळी मुलं असल्याने आईवडील दोघांना जवळपास सारख्या रंगाचे होतील असेच कपडे घ्यायचे. आज चिकू लाल रंगाच्या हाफचड्डी-शर्टमध्ये आणि चेरी चिकूच्याच शर्टाच्या सेम कापडाच्या लालचूटुक फ्रॉकमध्ये अगदी गोंडस दिसत होती.
मी दोघांच्या आजूबाजूला बघितलं पण मिस्टर किंवा मिसेस दामले या दोघांपैकी कुणी पोरांच्या जवळ दिसत नव्हतं. बहुतेक दोघंच पोट्टी खाली खेळायला आली होती.
पण काही म्हणा! दोघा लेकरांना खाली बघून मला खूपच हर्षवायू झाला होता.
हातात छोटासा बॅटबॉल घेऊन फिरत फिरत दोघांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे वरती माझ्या खिडकी कडे बघितलं. मला खिडकीत आनंदाने हात हलवतांना बघताच दोघांची कळी खुलली. मी लगोलग दोघांना हात हलवत वरती बोलावलं. दोन्ही पोरं लगेच दुडूदुडू धावत सोसायटीच्या लिफ्टमध्ये शिरली आणि वर माझ्या मजल्यावर आली. दारात मी उभाच होतो.
लगोलग दोघांना घरात घेतलं. आत आल्या आल्या दोघं सोफ्यावर उड्या मारून बसली. नेहमी येत असल्याने माझं घर आता त्यांना नवीन नव्हतं. दोन्ही लेकरं बिनधास्त माझ्या घरात इकडून तिकडे बागडायची, खेळायची.
"काय रे चिकू-चेरी, एकटेच आलात का खाली खेळायला, आईबाबा कुठेत?" दोघांनी सोफ्यावर बसताच मी विचारलं.
"श्ली काका, मम्मा आणि डॅडी बाहेल गेलेत अनी मला अनी चेलीला वैजू आज्जीकले ठेऊन गेले, पण मी आणि चेली खाली खेलायला पलून आलो!", चिकूने बदमाश हसत सांगितलं.
"आणि वैजू आज्जी, त्यांना काय सांगितलं?"
"वैजू आज्जीला वातलं अमी आत खेलतोय आणि ती किचम मदे खाऊ बनवायला गेली, मग अमी बाहेल आलो अनी डोर लाऊन ताकलं", बोलत बोलता फिदीफिदी हसत चिकूने चेरीला टाळी दिली.
त्यांचा हा प्रताप ऐकून मी डोक्याला हात लावला, त्या एवढ्याश्या पोरांचं डोकं बघून मला खुदकन हसायला आलं.
"चिकूss चेरीss असं का केलंत तुम्ही ! आता थांबा तुमच्या मम्मा आणि डॅडीलाच तुमचं नाव सांगतो.. थांबा थांबा" मी मुद्दाम त्यांना घाबरवण्यासाठी डोळे मोठे करत दटावलं पण ही पोट्टी माझा बाप निघाली. वर आणखी दात दाखवत खट्याळ नजरेने माझ्याकडे हसून बघू लागली. मग मात्र मलाही हसून आवरलं नाही आणि मीही त्यांच्या निरागस हास्यात सामील झालो!
त्यांना खाऊ देण्यासाठी मी हसत हसतच किचनमध्ये आलो. बाहेर दोघा पोरांचा कल्ला चालूच होता.
काय खाऊ द्यावा या विचारात खाऊचे डबे चापसतांना मला पुन्हा ती अनामिक जाणीव व्हायला लागली होती. तीच जाणीव जेव्हा मी चिकू-चेरीला पहिल्यांदा बघितलं तेव्हा झाली होती. मेंदूच्या अगदी आतल्या कोपऱ्यात निर्माण होणारी ती क्षुधा, ती आर्तता, वासना, भूक, वेदना की आणखी काही... नाव देता येत नव्हतं त्या भावनेला. पण मेंदूत वाहायला सुरुवात झालेला त्या भावनेचा बुलंद प्रवाह माझ्या क्षणिक स्थिरतेच्या बांधला कधीच जुमानणारा नव्हता.
हो, ही भावना मला काही नवीन नव्हती. तिचा आणि माझा जन्म-जन्मान्तरीचा बंध होता. त्या भावानेशिवाय माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ नव्हता, काहीच ओळख नव्हती. माझी ही भावना, माझी ही आवड, हा छंद, माझ्या अंतापर्यंत माझी सोबत कधीच सोडणार नव्हता. नव्हे, सोडणार नाही !
बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर चिकू-चेरीचे गोंडस चेहरे चमकू लागले. ते इथे आल्यापासून त्यांची आणि माझी झालेली ओळख, ते क्षण डोळ्यांसमोर फिरू लागले. त्यांचा वास, तो सहवास, गोड इवलासा स्पर्श या साऱ्या साऱ्या जाणिवा मला बेचैन करून टाकू लागल्या. विचारांनी डोकं पार भिनभिनलं. हातापायाला मुंग्या येऊ लागल्या.
पण तुम्हाला सांगतो, या सगळया जाणीवा आणि भावना मला मुळीच नव्या नाहीत! याची मला पुरेपूर सवय आहे, कारण हाच माझ्या आवडीचा, माझ्या छंदाचा एक भाग आहे...
गरगरणारं डोकं मी माझ्या दोन्ही हातांनी दाबून धरलं. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त चिकू-चेरीचे हसते खिदळते चेहरे फिरत होते. त्यांच्या तो आनंद, ते हसणं, बागडणं हे सर्वच्या सर्व मला माझ्यात उतरवून घायचं होतं. त्यांच्या आनंदाशी त्यांच्या सुखाशी मला एकरूप व्हायचं होतं!
हो, ती दोन्ही लेकरं आता माझी झाली होती. त्यांचं प्रेम, त्यांचा आनंद यांच्याशी समरस होण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मला होता! कारण, लहान मुलं माझी आवड होती आणि त्यांना मिळवणं हाच माझा छंद !!
हातात दाबून धरलेलं डोक मी शांतपणे सोडलं. एक दीर्घ श्वास घेतला. जवळच किचनच्या ओट्यावर फळे कापायचा मोठा सूरा नाईफ होल्डरमध्ये रोवून ठेवला होता तो मी शांतपणे होल्डरमधून बाहेर काढला आणि माझ्या मुठीत घट्ट आवळून धरला...
चालत चालत बाहेर आलो. बाहेर हॉलमध्ये चिकू-चेरी त्यांच्या खेळात व्यस्त होती...
मी बाहेर आलेलो पाहताच दोन्ही लेकरं माझ्याकडे 'खाऊ आणला का?' या नजरेने बघू लागली.
अशश्श्शsss पुन्हा त्यांचे ते ताऱ्यांसारखे लुकलुकणारे डोळे...
मेंदूतली ती भावना आता अधिकाधिक उत्तेजित होऊ लागली..!
चेहेऱ्यावर शांत हसू ठेवत मी चिकूच्या जवळ गेलो...
"काका खाऊ आणल्ss", त्याचे शब्द पुरे व्हायच्या आतच मी त्याची मान घट्ट पकडली आणि त्याच्या कंठात हातातला सुरा खसकन खुपसला ! उष्ण रक्ताची मोठी चिळकांडी त्याच्या घशातून बाहेर उसळून माझ्या चेहेऱ्यावर उडाली. शेजारी बसलेल्या चेरीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडण्याआधीच मी तिची मान धरून तिच्याही कंठात तो सुरा खसकन खुपसला आणि बाहेर काढला.
काहीच क्षणात माझ्या दोन्ही चिमण्या-पाखरांची
चीलबिल, थरथर-तडफड होत शांत झाली....
माझ्या चेहेऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं. आता ही पाखरं फक्त माझी होती. ती आता कधीच किलबिल करत भूर उडत माझ्यापासून दूर जाणार नव्हती. कधीच मला सोडून जाणार नव्हती. फक्त आणि फक्त माझ्याजवळ राहणार होती. कायमची !
दोघांचे देह शांत होताच मी अतिशय कौशल्याने दोघांच्या छातीतून त्यांची हृदये उपसून बाहेर काढली. अर्थात हे माझ्या सवयीचेच होते. छोट्याश्या मुठीतली त्यांची कोवळी काळीजं बघून त्या क्षणी मला जे समाधान मिळत होतं त्याची सर या जगातल्या कशालाच नाही! साक्षात त्या देवेंद्राच्या स्वर्गात मिळणाऱ्या अमृतालाही नाही !
दोघांची ती चिमुकली हृदये मुठीत आवळून मी त्यांचा एक छानसा पापा घेतला. आता माझे चिकू-चेरी कायम माझ्यासोबत राहणार या विचारांनीच मला खूप आनंद झाला. सावकाश उठत मी किचनमध्ये आलो. फ्रीज उघडला आणि खालच्या बाजूला ठेवलेला आईस बॉक्स उघडून त्यात माझी ही मौल्यवान संपत्ती, माझं प्रेम, माझा छंद अगदी काळजीपूर्वक जपून ठेवून दिला. आता पुढचे कितीतरी दिवस ही माझी पाखरं माझी सोबत करणार होती. माझ्या सोबतीला असणार होती...
चेहऱ्यावरचं अलोट समाधान आणि मनात न मावणारा आनंद घेऊन मी तसाच बेडरूममध्ये आलो. माझ्या लाडक्या पाखरांच्या रक्ताने माखलेला माझा देह घेऊन सोनेरी सांजेचा साज अनुभवण्यासाठी पुन्हा खिडकीपाशी विसावलो....
***
आज तीन दिवस झालेत. सकळचा चहा उरकून मी पेपर वाचायला बसलोय आणि हे काय ! पहिल्याच पानावर ही बातमी:
'सावधान! खूनी सत्र पुन्हा सुरू: निष्पाप मुलांची हत्या करणारा माथेफिरू शहरात मोकाट !'
तान्ह्या-लहान मुलांची हत्या करून व नंतर त्यांचे काळीज ओरबाडून काढणाऱ्या सैतानरूपी माथेफिरूने आज पुन्हा एकदा आपली दहशत कायम केली आहे. शहराच्या दक्षिण-मध्यवर्ती भागात असणाऱ्या सदानंद रेसिडेन्सीलगत वाहणाऱ्या नाल्यात दोन लहान मुलांची काळीज काढलेली छिन्नविछिन्न अवस्थेतली प्रेते आढळून आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ही मुले सदानंद सोसायटीत वास्तव्यास असण्याऱ्या नागरिकांची (नावे गुप्त) आहेत व या दोन्ही जुळ्या मुलांचे वय साधारण चार ते पाच वर्षे आहे. काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेने अवघ्या शहरात घबराट पसरली आहे. गेल्या ६ महिन्यांतील ही तिसरी घटना असून संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. या भयंकर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तांनी सर्व नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे त्यासोबतच या विकृत खून्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.'
ही बातमी वाचून माझ्या डोळ्यातून अक्षरशः आसवं गळू लागलीयेत. अतीव दुःखाने माझ्या मनावर मोठा आघात झालाय. मनापासून जोपासलेल्या माझ्या या परमप्रिय छंदाला हे लोक आज एक खून म्हणून का संबोधत आहेत ?!
ही निर्दयी दुनिया, हा नियमांचे फास लावून चालणारा जुलूमी समाज माझ्या निखळ, निरागस भावनांना कधी समजून घेणार आहे ??
माझ्या एकांताला लाभलेल्या या अनेक नाजूक चिमण्या-पाखरांची साथ या तथाकथित संस्कारी समाजाला का खुपते आहे ??
माझ्या हक्काच्या लेकरांना माझ्याजवळ बांधून ठेवायची माझी उर्मी, त्यांच्या काळजाला आपलंसं करून घेण्याचा माझा हा निरागस छंद, हा कठोर समाज कधी स्विकारणार आहे ??
वाचकहो तुम्हीच सांगा... कधी ???
*********************************************************************
समाप्त