Silence Please - 2 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | सायलेन्स प्लीज - प्रकरण 2

Featured Books
Categories
Share

सायलेन्स प्लीज - प्रकरण 2


प्रकरण २
“सॉरी, मी एकदम दांडगाई केल्या प्रमाणे आत आलो. मला एकदम नैराश्य आलय आणि मला अस होतं तेव्हा मी असचं विचित्र वागतो..”
माझी भाची ज्योतिष जाणते.तिला माझी कुंडली माहिती आहे.मला मात्र त्यावर बिलकुल विश्वास नाही.पण तरीही तिने सांगितलेली गोष्ट माझ्या मनातून जात नाही.ती म्हणते मी वकिलाचा सल्ला घ्यायला हवा . आणि असा वकील गाठायला हवा ही त्याच्या आडनावात पाच अक्षरे आहेत.मी शहरातले सगळे वकील पालथे घातले आणि पाच अक्षरे असलेल्या आडनावाचे आणि सर्वात चांगले नाव तुमचे होते, मी ते भाचीला सांगितल्यावर ती म्हणाली तुम्हालाच भेटले पाहिजे मी. काय फालतू पणा आहे हा ! पण तरीही मी तिचे ऐकून आलोय.” विहंग म्हणाला.
“ तुम्हाला नेमका काय त्रास आहे? म्हणजे वकिलाचा सल्ला कोणत्या बाबतीत हवाय?” पाणिनी म्हणाला .
“ माझ्या बायकोला घटस्फोट हवा होता.कोर्टाची प्रक्रिया चालू केली तिने पण आता ती पुन्हा माघारी फिरली.मला वेडा आणि मानसिक स्वास्थ्य ढळलेला असा माणूस म्हणून शाबित करायचय तिला.” विहंग म्हणाला.
“ कोर्टात केस कितपत पुढे गेल्ये? ” पाणिनी म्हणाला .
“ तिला अंतरीम हुकुम मिळालाय कोर्टाचा.”
“ तसा मिळाला असेल तर ती पुन्हा काढून नाही घेऊ शकत केस.”
“ शेफाली कशी आहे ते तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही असं बोलताय.तिने असा मुद्दा मांडलाय की आमचं दोघांच पुन्हा सूत जमलंय.त्यामुळे घटस्फोटाची गरज नाही.”
“ खरंच जमलय का पण?” पाणिनी म्हणाला .
“ अजिबातच नाही. तिने मला एक भावनात्मक पत्र लिहिलं.त्यात पुन्हा एकत्र यायचं का वगैरे. मी त्याला जरा गुळमुळीत उत्तर दिलं, त्याचा फायदा घेऊन तिने असा बनाव रचला की एकत्र येण्याला विहंग चा म्हणजे माझा विरोध नाहीये.त्यामुळे घटस्फोट रद्द करावा.एकीकडे तिने पोटगी म्हणून दरमहा पंधरा हजार मी तिला द्यावेत असा अंतरीम आदेश पूर्वी मिळवला आणि आता घटस्फोट नको आमच सूत जुळलंय असा अर्ज दिलाय” विहंग म्हणाला.
“ यात तिचा काय फायदा आहे ? तिला तुम्ही पोटगी देताय ना दरमहा? घटस्फोट रद्द झाला तर पोटगी रद्द होईल .तिला काय फायदा? ” पाणिनी म्हणाला .
“ घटस्फोट रद्द होऊन आम्ही नवरा बायको झालो तर ती माझ्या कडून , मला ब्लॅकमेल करून अजून पैसे उकळू शकेल.”
“ का? ब्लॅकमेल का करेल ती? ”
“ मी एकीच्या प्रेमात पडलोय. मला लग्न करायचंय. तिला वाटतंय मी तिच्या पासून कायमची मुक्ती मिळावी म्हणून तिला हवे तेवढे पैसे देईन.” विहंग म्हणाला.
“ त्यापेक्षा घटस्फोट कायम ठेऊन दरमहा पंधरा हजार तिला देणे फायदेशीर आहे.” पाणिनी म्हणाला
“ यात इतरही काही विषय आहेत.” विहंग म्हणाला.
“ उदाहरणार्थ ? ” पाणिनी म्हणाला .
“ माझा भागीदार , ब्रिजेश मरुद्गण. ” विहंग म्हणाला. “ मी सिहोर ला असताना हा माझ्या संपर्कात आला. एक शास्त्रज्ञ असल्या सारखा होता तो.पण जवळ पैसा नाही आणि साहसी वृत्ती नाही. ऑटोमोबाईल व्यवसायात लागणारे व्हॉल्व्ह घासण्याचे यंत्र त्याने बनवले होते.पण ते हाताने चालवायला लागायचे.मी त्यात गुंतवणूक केली, मरुद्गण कंपनी नावाची कंपनी काढली,त्याचे पेटंट घेतले. त्याचा भागीदार झालो पण रोजचे काम, व्यवसाय हे सगळ तो बघायचा. तो मला वरचेवर व्यवसायाचा आढावा द्यायचा.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या हातात सर्व सोपवून इकडे आलो होतो.एक दिवस तो दुर्वास नावाच्या मित्राला घेऊन मला भेटायला आला . हा दुर्वास खर तर वकील होता. तो म्हणाला की ब्रिजेश मरुद्गण ला पगार म्हणून धंद्यातून उचल करूदे. तो पुढे म्हणाला की व्हॉल्व्ह घासण्याचे पेटंट असणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीशी मी काही पत्रव्यवहार करून त्या कंपनीला असे आश्वासन दिले होते ही आमच्या आणि त्या कंपनी च्या हित संबंधात बाधा आणली जाणार नाही.या पत्रामुळे मरुद्गण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय.”
“ थोडक्यात तो तुम्हाला आता पिळून काढतोय.” पाणिनी म्हणाला
“ केवळ पैशाचीच पिळवणूक नाहीये ही. ज्या विश्वासाने मी त्याला उभा केलं आयुष्यात, त्याला धोका दिला त्याने.”
“ माझ्या कडून अपेक्षा काय आहे? ” पाणिनी म्हणाला
“ माझे सगळे त्रास मी तुमच्यावर सोपवून मोकळा होऊ इच्छितोय पटवर्धन.” विहंग म्हणाला. “ तुम्ही माझ्या घरी येऊन माझी मरुद्गण आणि त्याच्या वकिला पासून मुक्तता करा.नंतर खांडवा ला जा आणि माझ्या बायको ला काहीतरी करा.”
“ तुम्हाला लग्न कधी करायचंय? ” पाणिनी म्हणाला .
“ जेवढं लवकर शक्य आहे तेवढ.”
“ तुमच्या बायकोशी मी किती रकमे पर्यंत तडजोड करू?” पाणिनी म्हणाला .
“ एक रकमी सात लाख रोख देऊन टाका ” विहंग म्हणाला.
“ म्हणजे दरमहा पंधरा हजारा व्यतिरिक्त?” पाणिनी म्हणाला .
“ नाही,नाही. एकूण सर्व मिळून एकदाच सात लाख.”
“ आणि तिने नाही स्वीकारला हा प्रस्ताव तर? ”
“ मग लढा तिच्या विरुध्द माझ्या साठी.ती मला वेडा ठरवणार आहे.”
“ का वाटतंय तुम्हाला असं ? ” पाणिनी म्हणाला .
“ मी सिहोर ला असताना मला झोपेत चालायची सवय होती.” विहंग म्हणाला.
“ झोपेत चालणे म्हणजे वेडा असतो असे नाही.” पाणिनी म्हणाला
“ मी झोपेत चालताना हातात स्वयंपाक घरात वापरतात ती सुरी घेऊन तिच्या खोलीत घुसलो होतो.”
“ कधीची घटना आहे ही?” पाणिनी म्हणाला .
“ वर्षभरापूर्वी ” विहंग म्हणाला.
“ आता तुम्ही पूर्णपणे बरे झालाय?” पाणिनी म्हणाला .
“ हो; फक्त मधूनच नैराश्याचा चा झटका येतो तो अपवाद वगळता.”
“ मी तुमच्या घरी कधी येऊ?” पाणिनी म्हणाला .
“ आज रात्री आठ वाजता. येताना चांगला डॉक्टर घेऊन या.तो सांगेल मला तपासून की मी वेडा नाही म्हणून. माझी भाची म्हणते की ही चांगली वेळ आहे.”
“ ग्रह ,तारे, भविष्य याचा तिच्यावर फारच प्रभाव आहे अस दिसतंय ” पाणिनी म्हणाला
“ ती त्याचा अर्थ लावण्यात हुशार आहे.”
“ तुमच्या बरोबर कोण नातलग राहतात? ” पाणिनी म्हणाला .
“ माझा सावत्र भाऊ, वदन राजे. माझी संपत्ती मी त्यालाच देणार आहे. ” विहंग म्हणाला.
“ तुमच्या भाचीचे काय?” पाणिनी म्हणाला .
“ तिला गरज नाही माझ्या पैशांची. ती ज्या तरुणाशी लग्न करणार आहे त्या हर्षद ने च मला सुचवले की मी माझं आधीच मृत्युपत्र बदलावं आणि माझ्या भाची ऐवजी दुसऱ्याला संपत्ती दयावी. बायकांच्या पर्स च्या चेन ला कुलूप लावलं तरच संसार सुखाचा होतो असं त्याचं तत्व आहे.!”
“ पण समजा पुढे तुमची भाची आर्या आणि हर्षद यांचं नाही जमलं तर?” पाणिनी म्हणाला .
“ तर मी पुन्हा मृत्युपत्र बदलीन.” विहंग म्हणाला.
“ तो पर्यंत उशीर झाला तर? ” पाणिनी म्हणाला .
“ माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काय वाटतंय. आपण माझी संपत्ती ट्रस्ट च्या नावाने करू शकतो का? ”
“ करू शकतो की.” पाणिनी म्हणाला
“ मग करुया.माझू सेक्रेटरी प्रांजल वाकनीस हिला अडीच लाख द्यायचे आहेत मला.माझ्याशी ती फारच प्रामाणिक आहे.”मी गेल्या नंतर तिला काम करावे लागू नये अशी माझी इच्छा आहे.त्या नंतर आपण ट्रस्ट करू आणि त्याचे उत्पन्न माझ्या सावत्र भावाला द्यायची व्यवस्था करू.जो पर्यंत आर्या आणि हर्षद लग्ना नंतर एकत्र रहात आहेत तो पर्यंत सावत्र भावाला मिळेल उत्पन्न.आणि त्यांच्यात घटस्फोट झाला तर त्या उत्पन्नातला वाटा आर्या ला मिळेल.”विहंग म्हणाला.
“ तुमच्या सावत्र भावाला माहित्ये का , की तुमच्या उत्पन्नाचा वाट तुम्ही त्याला द्णार आहात?” पाणिनी म्हणाला .
“ हो ”
“ ट्रस्ट केलं म्हंटल्यावर तो नाराज नाही होणार?” पाणिनी म्हणाला .
“ नाही होणार.मी त्याला फक्त उत्पन्नातला हिस्सा देणार आहे.मिळकतीतला नाही. तो गुंतवणुक करण्यात फारसा हुशार नाहीये. कधी काळी त्याने काही बऱ्या पैकी रक्कम एका ठिकाणी गुंतवली होती पण दुर्दैवाने ती गुंतवणुक अयशस्वी ठरली.तेव्हा पासून त्याचं धाडस झालं नाही. शिवाय इतर यशस्वी आणि श्रीमंत लोकांचा त्याला हेवा वाटायला लागलाय.....अगदी माझा सुध्दा...” विहंग म्हणाला.
“ तरीही तुमच्या इच्छा पत्रात तुम्ही त्याला उत्पन्न मिळेल अशी तजवीज करताय? ” पाणिनी म्हणाला .
“ हो करतोय.कारण तुम्ही त्याला ओळखत नाही.तो वेगळाच माणूस आहे.” विहंग म्हणाला.
“ तुमच्या होणाऱ्या पत्नी बद्दल काय सांगाल?” पाणिनी म्हणाला .
“ मी तिला काहीही देणार नाहीये. म्हणूनच तुम्ही एक दस्त असे करा की जे ती लग्न पूर्वी सही करून देईल आणि दुसरे दस्त, लग्ना नंतर सही करून घ्यायचे असे.असे केले तरच माझी खात्री पटेल की ती माझ्याशी पैशासाठी लग्न करत नाहीये....खर तर ही तिचीच कल्पना आहे.तिला माझ्या मृत्यू नंतर माझ्या संपत्तीचा वारस व्हायचं नाहीये आणि आमचा घटस्फोट झाला तरी तिला पोटगी पण नकोय.” विहंग ने स्पष्ट केले.
पाणिनी ने आश्चर्याने आपल्या भुवया उंचावल्या
“ पटवर्धन, तुम्हाला खाजगीत सांगतो, की माझ्या कडून तिला कायद्याने काहीही मिळणार नाही अशा आशयाचा करार आमच्यात झाला आणि त्यावर सह्या झाल्या की मी तिला मोठी रक्कम रोख स्वरुपात भेट देणार आहे.”विहंग म्हणाला.
“ आर्या आणि हर्षद यांचा भविष्यात काडीमोड झाला तर तुमच्या उत्पन्नातला वाटा तिला मिळेल अशी तरतूद आपण ट्रस्ट मधे केली तर हर्षद जे टाळायचा प्रयत्न करतोय तेच घडेल.” पाणिनी म्हणाला
“ मुद्दा बरोबर आहे तुमचा.मला ते हर्षद शी एकदा बोलावे लागेल आज रात्री तुम्ही त्याला भेटा.त्यांच्या उत्पन्नाबाबतच्या तरतुदी चा विचार नंतर करू.ते सोडून माझ्या होणाऱ्या बायको बरोबर करायचे करार तुम्ही आज येताना घेऊन या. ते मसुदे मी तिला दाखवीन तिची एक प्रकारे परीक्षाच घेऊ आपण.ते वाचल्यावर सुध्दा ती लग्नाला तयार झाली तर ती माझ्या पैशाकडे बघून लग्न करत नाहीये, प्रेम आहे म्हणूनच करते आहे असे समजता येईल. ” विहंग ने सांगितलं
शांतपणे त्याने एक चेक सही करून पाणिनी पटवर्धन च्या हातात दिला. “हा चेक तुमच्या फी पोटी रिटेनर म्हणून ठेवा.” तो म्हणाला आणि बाहेर पडला.
“ सौम्या, हा चेक बँकेत भरून टाक.सुकृत ला आत पाठव.कनक ला फोन करून सांग की त्याच्यासाठी एक काम आहे.” पाणिनी म्हणाला
“ कोणावर गुप्त हेर सोडताय? ” -सौम्या.
“ शेफाली खोपकर वर. तिच्याशी पोटगी बद्दल तडजोड करायची आहे त्यामुळे,तिच्या बद्दलची कणभर गुप्त माहिती ही मणभर चर्चे पेक्षा सरस ठरेल.” - पाणिनी .
पाणिनी च्या सुचने प्रमाणे ओजस ला फोन करण्यासाठी हातात घेतलेला फोन सौम्या च्या हातात तसाच राहिला कारण तिचे पाणिनी च्या हालचालीकडे लक्ष गेले तेव्हा पाणिनी ने अचानक काहीतरी मनात येऊन दुर्भीण हातात घेतली होती आणि खिडकीतून रस्त्यावर बघत होता. तो काय करत असावा याचा अंदाज घेऊन , फोन खाली ठेऊन सौम्या ने पेन्सिल आणि पेन हातात घेतले .
“ (एम्पी-१२) ८-३-९-७” तो म्हणाला. “ लिहिलास?”
“ लिहिला.” सौम्या म्हणाली. “ काय भानगड आहे?”
“ एका तरुणीच्या गाडीचा नंबर आहे.आपलं अशील विहंग च्या ती मागावर असावी. तिचा चेहेरा नाही दिसला मला, पण तिच्या शरीर यष्टी वरून अंदाज येतोय की ती तुझ्या पेक्षा .... ”
सौम्या चा असूयेने भरलेला चेहेरा पाहून पाणिनी ने वाक्य हेतू पुरस्सर अर्धवट सोडलं !
(प्रकरण दोन समाप्त. )