Shri Anna-best grain in Marathi Science-Fiction by Balkrishna Rane books and stories PDF | श्री अन्न-श्रेष्ठ धान्य

Featured Books
Categories
Share

श्री अन्न-श्रेष्ठ धान्य

श्रीअन्न-श्रेष्ठ धान्य
पात्रे-1)सूत्रधार
2) देव
3)शेतकरी
4) जोंधळा
5) बाजरी
6) नाचणी
7)वरी
8)मका
( सूत्रधार येतो.हातात डफ.डफ वाजवतो...गोल गिरकी घेतो.)
मी सूत्रधार, या नाटकुल्याचा आधार .बर का ! मला सांगा माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? बरोबर ओळखलात...अन्न, वस्त्र व निवारा..आपण छान उंची वस्त्रे वापरतो..टोलेजंग घर बांधतो.पण अन्ना बध्दल आपण फारसा विचार करत नाही. खाताना फक्त चव बघतो.पौष्टिक काय आहे..
शरीराला फायदेशीर काय आहे याचा विचारच करत नाही? आज आम्ही या नाटुकल्यात याचच सादरीकरण करणार आहोत ते पण गोष्टीतूनच...एक आटपाटनगर होत तिथे एक शेतकरी जगण्याला कंठाळला होता...वैतागला होता कशासाठी ते प्रत्यक्षच बघूया..
( शेतकरी कपाळाला हात लावून बसलाय ..हातात कोयती...)
शेतकरी -- कर्म माझा.अहो वरीसभर राब - राब राबतय पण दोन गोटे पण मिळनत नाय. बायका -पोरांक धड दोन घास पण खावक मिळनत नाय. तुमका सागंतय गाववाल्यांनू...ईख खावक पण दोन पैसे गाठीक उराक नाय. (हात हलवत) तरवो...तरवो म्हणा नको लावणी म्हणा नको सगळा व्यवस्थित करतय पण हाताक कायच लागना नाय कधी व्हवान जाता कधी करापता तर कधी सगळा भात पोलाच जाता.माझा नशीबच खोटा.देवच माझ्यावर रूसलोसा...
कधी ..कधी वाटता देवाचा नावसुध्दा घेव नये...दुनयेत देवच शिल्लक नाय...
( एवड्यात देव येतो पितांबर ...उपरणे वर मूकूट...शेतकर्या समोर उभा राहतो.) अरे बाबा कोण तू...स्वांग घेवून ईलय..?
आधिच सांगतय एक पैसो पण मिळाचो नाय..समाजला मा!
देव- अरे थांब ! अरे, मी खराखुरा देव आहे. तूच माझी आठवण काढलीस ना?,
शेतकरी- फटकी पडो व्हरान तू काय माका येडो समाजलय...ऑ..! खरो देव असलय तर मी मागान ता देशीत.
देव- निश्चितच. माग काय पाहिजे तूला.
शेतकरी- ह्या बग मिया राब-राब राबतय पण पिकच नाय मिळना. बाकिच्यांच्या शेतात मात्र भरपूर धान्य पिकता.अवनू माझ्या शेतात भरपूर धान्य पिकात असो वर दे. जमात तुका?
देव - दिला...तूला वर दिला. तूझ्या शेतात या वर्षी विपुल धान्य पिकेल.पण माझ्या काही अटी आहेत.
शेतकरी -- देवा , आता तू पण अटी घालूक लागलय.
सांग बाबा काय ता एकदा.
देव- ऐक, तूझी जमीन रेताड..त्यात पाणी कमी
त्यामुळे पिक कमी येत.तू अस पीक घे की
त्याला पाणी कमी लागेल....या वर्षी तू चांदण्याच पीक घे.तरच पीक चांगले येईल.
(देव निघून जातो.)
शेतकरी- चांदण्याचे?देवा ही कसली अट?
( डोक खाजवत जातो.)
(सूत्रधार येतो.)
सूत्रधार- देवाने अट घातली ...चांदण्याचे पीक घे..शेतकरी विचारात पडला.पण शेतकरी हुषार त्याने लढवली शक्कल. त्या वर्षी भरपूर घान्य पिकल. अन् देव हजर झाला.
बघा पुढे काय झाल.
शेतकरी- व्वा.! देवान आपलो शब्द पाळलो. सगळो मळो कसो कणसांनी भरान गेलोसा? सगळ्यानी बोटा तोंडात घातली.जळतत सगळे मेले माझ्यार!
( देव येतो)
देव-- मग झाल मनासारख? पण माझी अट पाळलीस का?
शेतकरी- फटकी पडो व्हरान .सगळा शेत चांदण्यान भरलासा. बघ ...देवा तूझ्या डोळ्यान.
देव-- खरच...मोत्यासारख चमकतय शेत! काय पेरलस?
शेतकरी- देवा ह्यो बघ टुणुटुण उडये मारीत येताहा.
(जोंधळा येतो.डोक्यावर जोंधळ्याचा मुकूट)
जोंधळा- देवा मी आहे जोंधळा. गोल गरगरीत मोत्यासारखा आगळा. मी तुम्हाला भरपूर ऊर्जा देतो. तंतुमय पदार्थ माझ्यात असल्याने पचन व मलविसर्जन सहज होते. कर्बोदके , प्रथिने माझ्यात ठासून भरलीत. माझ्यावर कोणतीच विशेष प्रकिया करावी लागत नाही. मला खापरात भाजलात तर चविष्ट लाहे तयार होतात.माझ्यामुळे रक्तातली साखरही कमी होते.गरम लुसलुसित भाकरी खाल्लात तर दिवसभर चव जाणवते.
म्हणून म्हणतो...
' अन्नात करा मला समाविष्ट
भोजन बनेल पौष्टिक व चविष्ट '
देव- शब्बास ! शेतकर्या छान शक्कल लडवलीस.
शेतकरी- या वर्षी पण माझ्या शेतात भरपूर धान्य पिकू दे.
देव- शेतकर्या माझी पण एक अट आहे.ऐक,
आता पिक घ्यायचे ते मातीच्या रंगाचे.त्याचा दाणा जमिनीवर घरंगळत गेला तर सापडणारही नाही. समजल !
( देव निघून जातो. शेतकरी डोक खाजवत विचार करतो.सूत्रधार येतो.)
सूत्रधार- देवाने घातल कोडे. पण शेतकरी हुषार त्याने केला चांगला विचार. त्याने पेरणी केली .पिक रसरसून आल. तरारून कणस आली. इवलीसी रोप सुखान भरून गेली.मातीतून मातकट लाल रंग लेवून पिक आल. शेतकरी खुष झाला. तेवड्यात देव आला...बघा पुढे काय घडल.
शेतकरी -- माझे डोळे तृप्त झाले. चार -पाच गाड्या भरतील एवड पीक आलय. अवनू दिवाळी
आनंदात जातली. बायको -पोरांच्या अंगार दागिने करूक होये.
( देव येतो.)
देव- शेतकर्या हुरळून जाऊ नकोस. मला सांग माझी अट पाळलीस? यंदा कोणत बी पेरलस.
शेतकरी- फटकी पडो...देवा तुझे सगळे अटी पाळलय . मातीचो रंग घेवन मातीतसूनच पीक ईलासा.ह्या बघ नाचत -नाचत येतासा.
(नाचणीचा मूकूट घातलेली मुलगी/ मुलगा येतो)
नाचणी- मी नाचणी लालसर रंग माझा, वेगळाच ढंग माझा.इवलासा दाणा पण आरोग्याचा कणा.
कॅल्शियमचा भरपूर साठा सोबत लोह , फाॅस्फरचा
पण असतो वाटा. तंतुमय पदार्थ तसे कर्बोदके पण मिळतील.तपकीरी काळपट भाकरी ...मधुमेहाची नको काळजी.म्हणून म्हणते ऐका......
' हाड, दात अन् स्नायू यांच आरोग्य
इन्सुलीन अन् हिमोग्लोबीन राखी योग्य
हिच नाचणीची कहाणी....अन् निशाणी '
देव --व्वा...व्वा.. खरच मी प्रसन्न झालो तुझ्या हुषारीवर. कमी पाणी लागणार आणी कमी श्रमात पिकणार श्रेष्ठ अन्न तू पिकवलस.
शेतकरी- देवा तू प्रसन्न झालस मा तर आता पुढच्या मौसमात पण असाच पीक येवंदे असो वर दे.
देव- अरे तू तर आता मागेच लागलास माझ्या. ठिक आहे . पण माझी अट ऐक आता तू पांढर पीक घे. हलक - फुलक पीक घे..समजल?
(देव जातो. शेतकरी डोक खाजवतो...विचारात पडतो.)
शेतकरी - पांढरा आणि हलक्या - फुलक्या पीक?
आता काय करतय...डोक्या चलवक होया.
सूत्रधार- शेतकरी विचारात पडला देवाच कोड कस सोडवाव बर? तो पण होता चलाख त्यान खूप विचार करून बी पेरल. छान पाऊस पडला बक्कळ पीक पिकल. पीक बघून शेतकरी आनंदाने नाचू लागला. तेवड्यात देव प्रकट झाला.
देव-- -शेतकर्या झाल ना मनासारखे? पण मी सांगितल तसेच केलस ना? नाहीतर सगळे पीकच नाहिस होईल .
शेतकरी-- फटकी पडो व्हरान. तू सांगलय तसाच केलय.
देव- या वेळी कसल पीक घेतलस.
शेतकरी- - तूच बघ ...कसा हलक्या - फुलक्या पांढरा पीक घेतलय ता.
( एक मुलगी/ मुलगा वरीच्या लोंब्याचा मूकूट घालून येतो.)
वरी- मी आहे वरी लहान दिसली तरी गुणवान आहे खरी. डोंगर उतारावर व पडिक जागेत सहज मी तग धरते.पाणी...कमी अन् खतही मी खात नाही.
सकस आणि पौष्टिक हिच माझी ओळख.
प्रथिनांची रेलचेल..सगळं शरीरच राहत आलबेल.
तंतुमय पदार्थ दूर ठेवतील मधुमेह.हलके फुलके पांढरे लाडू....वरीचा भात यांचा पौष्टिकतेत कोण धरील हात !लक्षात राहू द्या...
' वरीचा वापर....असू दे आहारात वारंवार
होईल शरीराची तंदुरुस्ती अन् उठेल रोगांची वस्ती '
देव-- -शेतकर्या तू तर शेरास सव्वाशेर निघालास.बर डोक चालवलस. यावेळी मी स्वतःहून तूला वर देतो यावेळी ही तूझ शेत पीकाने भरून जाईल.पण यावेळी मला तूझ्याकडून काहीतरी पाहिजे.
शेतकरी आता मीया काय तूका दितलय? ह्या म्हंजे पावळ्याचा पाणी पास्टाक गेल्यासारख्या होताला.
देव ऐक यावेळी तू माझी अट पाळलीस तर
तूला मी कायमचा शुभ वर देईन. यावेळी तू जे पीक घेशील त्याचा खालचा वरचा व मधला भाग मला द्यायचा. बस्स ऐवडेच तूला करायचे आहे.
शेतकरी-- म्हणजे सगळाच तूका द्येवचा तर माका काय शिल्लक रवताला.
देव- -ते तू ठरवायच. जर तू यशस्वी झालास तर
कायमच तूझ शेत पीकाने बहरेल. तूझी भरभराट होईल. तूझ सगळं कुटुंब आनंदी होईल.
( देव जातो. शेतकरी डोक्याला हात लावून विचार करतो.)
सूत्रधार--- यावेळी देवाने शेतकर्याला भलताच पेचात पकडल आहे. अट कठिण आहे खरी पण शेतकरी सुध्दा आहे हुषार भारी.मला तर काही सुचत नाही . कोणत पीक घेईल बर शेतकरी चला पाहुया...काय केल शेतकर्याने.अरेच्चा हेज काय! भारीच बुवा. बघा कस शेत कणसांनी बहरलय. वार्यावर डोलतय. चला...चला...आता देव येईल बघुया शेतकरी काय करतो ते.
शेतकरी--- फटकी पडो व्हरान....बघा कसा सोनपिवळा शेत झालासा. अवनू कणसांचो ढिग पडलोसा ठेवक पण जागा नाय. पण देव खय रवलोसा...माका फसव बघि व्होतो...आता चकित जातोलो.
( एवड्यात देव येतो.)
शेतकरी देवा, साष्टांग नमस्कार ( नमस्कार घालतो)
देव-खुषीत दिसतोस.मी सांगितलेली अट पाळलीस का? नाहीतर जे जे मिळवलस ते सगळे नाहिसे होईल.
शेतकरी---फटकी पडो व्हरान! सगळा येवस्थित आसा. तुझ्या अटी परमाणा पीकाचो खालचो वलचो व मधलो भाग काढू ठेवलय खुशाल घेवन जा.
देव अस म्हणतोस होय. अस कोणत पीक घेतलस यंदा?
शेतकरी-(हेल काढत) तरवो...देवा तूच बघ.तो बघ सोनपिवळो दाडीवालो येतासा.
( मक्याच्या कणसांच चित्र असलेला मूकूट घालून
मुलगा येतो. )
मका --मी आहे मका...मी आहे मका
सगळेच बघतात माझ्याकडे टकामका
तपकिरी दाढीसंगे सोनपिवळे अंग माझे
गरीबांचे अन्न म्हणून हिणवतात मला
पण पूरक आहार म्हणून मी आहे भला
बर का, मी तुम्हाला देतो मॅग्नेशियम व कॅल्शियम त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहत.ह्रदय बळकट राहत. हाड आणि दात निरोगी राहतात. माझ्या दाण्यात तंतुमय पदार्थ खुप आहेत त्यामुळे पोट साफ राहत. माझ्या कणा कणात भरलीयत कर्बोदके
त्यामुळे माझ्यासारखीच तुम्हालाही ऊर्जा मिळते.
भाजून खा, उकडून खा, पीठ करून खा...माझ्या आंबवण्यातून मिळतात काही आम्ल
मुलांना आवडणारे हलके फुलके पाॅपकाॅर्न म्हणजे माझेच दाणे.माझ्या पानांच्या चार्यावर गुरे तुटून पडतात..व दुध-दुभत्यात वाढ होते. 'अ ' जीवनसत्व व बीटा कॅरोटीनामुळे मिळतात तेजस्वी डोळे अन्
तुकतुकीत कांती....मनाला मिळते शांती.

लक्षात ठेवा-
नका करू दुर्लक्ष सदा रहा दक्ष
श्री अन्न वापरा देह होईल साजरा
देव भले बहाद्दर, शेतकर्या मी अती प्रसन्न झालोय.या पुढे तुला माझी गरज भासणार नाही.
तुझी हुषारी आली माझ्या लक्षात...मक्याची मुळ...मधला दांडा व वरची पाने मला तर कोनात येणारी कणस तूला...शब्बास.
( लोकांकडे बघत)
लोकहो, ऐका...भात, गहू व अन्य पिकांसोबत कमी पाणी लागणारी उन्हात तग धरणारी...रेताड व भरड जमिनीत किंवा डोंगर उतारावर पिकणारी पिकही घ्या. नाचणी , नागली , वरी, ज्वारी , बाजरी , मका ही तृणधान्ये घ्या.ही धान्ये श्रेष्ठ धान्य आहेत.पौष्टिक, सकस असलेली ही धान्ये तुमची प्रतिकार क्षमता वाढवतात...निरोगी ठेवतात.या शेतकर्यासारखे हुषार व्हा...अन् आनंदी रहा.
सूत्रधार ऐकलात देव काय म्हणाले ते... भरड धान्यांकडे दुर्लक्ष करू नका....रोजच्या नाष्ट्यात...जेवणात त्यांचा वापर करा. आता आपण सर्वांनी ह्या श्री अन्नांचा महिमा गाण्यातून सादर करूया...या रे सारे..जोंधळा. नाचणी, वरी व मका या सारे.
शेतकरी- फटकी पडो व्हरान..
या बाबानू या लवकर या...
चला एक साथ म्हणा
(सगळे हात जोडतात. देव सर्वांना आशिर्वाद देत हात वर करतो.)
( सगळे एका सूरात म्हणतात
चाल- सदा सर्वदा योग तूझा घडावा.)

सदा सर्वदा घास श्री अन्नाचा घ्यावा
पौष्टिकतेचा हव्यास मनी धरावा
उपेक्षू नको तू गुणवत्ता मानवा
सकस आहार रोज सेवीत जावा
सदा सर्वदा घास श्री अन्नाचा घ्यावा----1

कुपोषीत मुले अन् माता जगी किती
तसे भूकबळी जगी कितीएक जाती
नाना व्याधी नाना रोग शरीरा ग्रासती
सकस आहार रोज सेवीत जावा---
सदा सर्वदा घास श्री अन्नाचा घ्यावा 2

ज्वारी , बाजरी आणि साजरी वरी
नाचणी , नागली तसा तो मका
राखिती शरीर अन् मन निरोगी
सकस आहार रोज सेवीत जावा
सदा सर्वदा घास श्री अन्नाचा घ्यावा 3
(ही एकांकीका सादर करावयाची असल्यास परवानगी घ्यावी)