Geet Ramayana Varil Vivechan - 15 in Marathi Mythological Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | गीत रामायणा वरील विवेचन - 15 - नको रे जाऊ रामराया

Featured Books
Categories
Share

गीत रामायणा वरील विवेचन - 15 - नको रे जाऊ रामराया

कैकयी चा दुराग्रह बघून राजा दशरथाची प्रकृती बिघडते. कैकयी चा विचित्र हट्ट आणि त्यामुळे दशरथाची ढासळलेली प्रकृती राजवाड्यात ही बातमी हळूहळू पसरते. श्रीराम आपल्या वडिलांना बघायला कैकयी च्या कक्षात येतात. तेव्हा त्यांचे वडील तर काही सांगू शकत नाहीत पण कैकयी मात्र निर्लज्ज पणे श्रीरामास तिने मागितलेल्या दोन वरांबद्दल सांगते आणि ते जर पूर्ण झाले नाहीत तर रघुकुलास कमीपणा येईल असे सांगते.

ते ऐकताच श्रीराम आपल्या पिताश्रींना म्हणतात,
"हे तात आपण स्वतः ला दोषी समजू नये. मी आपण दिलेलं वचन नक्की पूर्ण करेल. मला वनवासात जाण्यास काहीही आपत्ती नाही."

"श्रीरामा वर मी दिलेले आहेत पण ते तू पूर्ण केलेच पाहिजे असे तुझ्यावर बंधन नाही. माझ्या नावाला काळिमा लागत असेल तर लागू दे पण तू वनवासात जाऊ नको.",दशरथ

"तात हे आपण मला काय करण्यास सांगता आहात? असे पातक माझ्या हातून कदापि घडणे शक्य नाही. पितृवचनाचे पालन करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. त्यामुळे आपण माझी काळजी करू नये. आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. मी शीघ्र अति शीघ्र वनवासास निघण्यास तयार होतो.",श्रीराम

राजा दशरथ हतबल होतो. श्रीरामाने वनवासास जाऊ नये हे त्याला तीव्रतेने वाटते पण तो धर्मसंकटात सापडला असतो.

(इथे एक माणूस म्हणून एक असा विचार येतो की कैकयी ने मागितलेले वर हे खरंच वर होते का? वरदान हे आपल्या फायद्याचं असावं इतरांचे अहित ज्यात असेल ते वरदान कशाचं? हे दोन वर नसून दोन कपटी कावे होते कैकयी चे ते दशरथ राजाने पूर्ण केले नसते तरी चालले असते पण विधिलिखित घटना घडायच्याच असतात. असो.)

श्रीराम आपल्या मातेची आज्ञा घेण्यास त्यांच्या कक्षात प्रवेश करतात. कौसल्या देवीला सुद्धा कैकयी चे कारस्थान एव्हाना माहीत झालेले असते.

"मातोश्री मला आशीर्वाद व आज्ञा द्या की मी पितृवचन पूर्ण करून चौदा वर्षे वनवास पूर्ण करून लवकरात लवकर आपल्या सेवेस हजर होईल.",श्रीराम

"पुत्रा! तुला हे बोलावते तरी कसे? अनेक नवस सायास करून तुझी प्राप्ती झाली ते काय हा दिवस बघायचा होता म्हणून? मातेचे हृदय तुला वनवासास जाण्यास कशी आज्ञा देईल? कैकयी एक आई असून एवढी कशी काय निर्दयी झाली? ती तिच्या मुलाला वनवासात पाठवू शकेल का? मग माझ्या पुत्रास वनवसात पाठवा अशी म्हणण्यास तिची जीभ कशी धजावली? भरत राजा झाला तर माझं काही म्हणणं नाही. होउदे भरतास राजा, होऊ दे कैकयीस राजमाता पण तुला वनवास कशासाठी मागतेय ती वैरीण?

आत्तापर्यंत तुला कधी सांगितलं नाही पण आज सांगते, तुझ्या पिताश्रींना नेहमीच माझ्यापेक्षा कैकयी च जास्त प्रिय होती. माझं हे दुःख आजवर मी कोणालाही सांगितलं नाही. तिच्या सवती मत्सराने, तिच्या नजरेतील विखाराने आजपर्यंत मन जाळतच मी जगत आली आहे. आता वृद्धकाळी तरी तुला राजा झालेले बघून त्या मनाला शांती मिळणार होती ते सुद्धा त्या दुष्टेला बघवलं नाही. ",कौसल्यादेवी

"माते मला आपली मनोवस्था समजतेय परंतु पितृवचनाचे पालन पुत्राने न करणे हे अयोग्य ठरेल.",श्रीराम

"तू पितृवचनाचे पालन करू नको असं मी म्हणणार नाही परंतु तुझ्या पित्याकडून ह्या कौसल्येला सुद्धा तुझ्यासोबत वनवासात येण्याची परवानगी माग. तुझ्याशिवाय ह्या राजप्रसादात मला राहवल्या जाणार नाही. पुत्रा!तू तिकडे वनात उन्हात भटकत राहशील आणि मी तुझी माता इथे राजवाड्यात कशी बरं राहू शकेन? त्यापेक्षा तुझ्या तातांनी जमदग्नी ऋषींनी जसे त्यांच्या पुत्रास आपल्या मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली होती त्याप्रमाणे तुला माझा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली तर किती बरं होईल, ह्या पुत्रवियोगाच्या यातनेतून माझी सुटका तरी होईल. तुझ्याच हातून मला मरण येऊ दे मग तू राजा हो किंवा वनवासी माझा आत्मा सदैव तुझ्यासोबत राहील.",कौसल्या देवी

"माते असं बोलू नकोस आणि अशी हताश होऊ नकोस! चौदा वर्षे सहज निघून जातील. तू माझ्यासोबत वनवासात येण्याऐवजी प्रासादात राहून पिताश्रींकडे लक्ष दे कारण आधीच ते अपराधी भावनेने खचलेले आहेत. तुझा श्रीराम तुझ्या चरणाशी लीन होण्यास लवकरच हजर होईल. आता आज्ञा आणि आशीर्वाद दे",श्रीराम मातेला वंदन करत म्हणतात.

(जमदग्नी ऋषी हे परशुराम जे विष्णूचा सहावा अवतार होते त्यांचे पिता होते व परशुरामांची आई व जमदग्नी ऋषींची पत्नी देवी रेणुका होत्या. एकदा जलाशयातून जल आणण्यास रेणुका देवी गेल्या असता त्यांना एक राजा व त्याच्या काही राण्या जलक्रीडा करताना दिसतात ते बघून रेणुकादेवींना त्यांचा हेवा वाटतो. ते अंतर्ज्ञानाने जमदग्नी ऋषींना कळते म्हणून ते संतापतात. रेणुका देवी जल घेऊन आश्रमात येताच ते आपल्या ज्येष्ठ पुत्राला मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा देतात पण पहिले दोन पुत्र ती आज्ञा मानीत नाहीत. मातेचा शिरच्छेद कसा काय करायचा असे त्यांना वाटते मग जमदग्नी ऋषी त्यांचा कनिष्ठ चिरंजीव परशुराम जो आपल्या मातेचा अत्यंत लाडका असून त्याला सुद्धा आपली माता अत्यंत प्रिय असते अश्या पुत्राला मातेचा शिरच्छेद करण्यास सांगतात आणि तोही एकही प्रश्न न विचारता आपल्या वडिलांच्या आज्ञेच पालन करतो. जमदग्नी ऋषी अत्यंत प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगतात तेव्हा परशुराम माझ्या मातेला पुनर्जीवित करा असे सांगतात. जमदग्नी ऋषी अभिमंत्रित जल मृत रेणुका देवींवर शिंपडतात आणि काय आश्चर्य! रेणुका देवी जिवंत होतात. त्या जमदग्नी ऋषींना आपल्या मनात यापुढे असे दूषित विचार येणार नाहीत असे म्हणून त्यांची क्षमा मागतात.)

(रामायणात पुढे काय होईल ते पाहू पुढल्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏 जय कौसल्या माता🙏)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउ रामराया

शतनवसानी येउन पोटी
सुखविलेस का दुःखासाठी?
प्राण मागतो निरोप,
रडते कासाविस काया

कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला, आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारी जाया?

तृप्त हो‍उ दे तिची लोचने
भरत भोगु दे राज्य सुखाने
वनी धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया?

सांगु नये ते आज सांगते
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणा न कथिल्या मूक यातना या

तिच्या नयनिंच्या अंगारांनी
जळतच जगले मुला, जीवनी
तुझिया राज्यी इच्छित होते अंति तरी छाया

अधर्म सांगू कसा बालका
तुष्ट ठेव तू तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननिते कांतारी न्याया

तुझ्यावाचुनी राहु कशी मी?
वियोग रामा, साहु कशी मी?
जमदग्निसम तात तुझे का कथिति न माराया

तुझ्या करे दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावाचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★