अलिकडील शिक्षण ; फारच जड वाटतंय?
अलिकडील काळात शिक्षणाला फारच महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळंच ते कोणत्याही माध्यमातून का मिळेना. लोकं आपल्या पाल्यांना शिकवू लागले आहेत. त्यातच हा काळ स्पर्धेचा आहे व तो काळ स्पर्धेचा असल्यानं मुलांना दर्जेदार शिक्षण हवं आहे व असं दर्जेदार शिक्षण हे कॉन्व्हेंटलाच मिळतं असा कयास पालकांचा असल्यानं पालक वर्ग आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटला टाकत आहेत.
दर्जेदार शिक्षण म्हणजे अपडेट झालेलं शिक्षण. ज्याला भविष्यवेधी शिक्षण असं देखील म्हणता येईल. परंतु ते शिक्षण विद्यार्थ्यांचा जीव घेते की काय? अशी भीती आज प्रत्येक पालकांच्या मनात होवू घातली आहे. त्याला कारणंही तसंच आहे. ते कारण म्हणजे दप्तराचं ओझं व दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये शिक्षक देत असलेला अभ्यास. तो अभ्यास करतांना मुलं एवढी गुंतून जातात की त्यांना झोप येते तरी ते झोपत नाहीत. तसाच एक धाक विद्यार्थ्यात शाळेचा दिसून येत आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी अशाच एका जागणाऱ्या एका मुलीला विचारलं असता ती म्हणाली,
"सर, काय करु. मॅडम छडी मारतात. जर हा उपक्रम नाही केला तर........." त्याबाबत दुसरी मुलगी म्हणाली,
"सर जागावेच लागेल. कारण मी जागले नाही व उपक्रम पुर्ण केला नाही तर दुसऱ्याच मुलीचा पहिला क्रमांक येईल."
अभ्यासक्रम व उपक्रम छान होते. तसे रोजच उपक्रम येत होते त्या दोन्ही मुलींना आणि दोन्ही मुली जागत होत्या दररोजच. त्यातच आरोग्याच्या संबंधी कुरकुर दररोजच होत होती. तसे मायबापही परेशानच होत होते. परंतु त्यांनाही भीती होती की तशी तक्रार शाळेला केल्यास शाळा त्या मुलींना शाळेतून काढून तर टाकणार नाही.
विशेष म्हणजे ती गोष्ट वाखाखण्याजोगी नव्हती. उपक्रम चांगला होता. परंतु तो राबवीत असतांना अजुनही छडीचा धाक गेलेला नाही असं त्या एका मुलीवरुन दिसून आलं. तर दुसऱ्या मुलीवरुन तिची स्पर्धा दिसत होती. परंतु यात दोन्ही मुलींचं होणारं नुकसान साहजीकच दिसत होतं.
अलिकडील काळात दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली शिक्षकानं काहीही शिकवू नये व फक्त मार्गदर्शन करायचं हेच ठरलं. त्यात विद्यार्थ्यांना प्रेरीत करायचं, आव्हान द्यायचं, जिज्ञासुवृत्ती वाढवायची. तसा अभ्यासक्रम शासनानं ठरवला व त्याच अभ्यासक्रमावर आधारीत शिक्षणाची व्याख्या करुन तो अभ्यासक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. तसं पाहता असा अभ्यासक्रम राबवीत असतांना शासनानं खाजगी शाळेला परवानग्या दिल्या. तसेच जि. परीषद शाळा व खाजगी शाळा यात स्पर्धा लावल्या. तुमच्यात ताकद आहे तर मुलं टिकवून दाखवा.
शासनानं शाळेबाबत स्पर्धा लावल्या की त्यांनी आपल्या शाळेत मुलं टिकवावी. मग या स्पर्धेत कॉन्व्हेंटच्या शाळा टिकल्या. कारण ते अपडेट धोरणानं वागत गेली. तशा जि. परीषद शाळा अपडेट धोरणानं वागत नव्हत्या. कारण त्यांना अपडेट धोरण म्हणजे काय? हेच माहीत नव्हतं. जे कॉन्व्हेंटला माहीत होतं.
काळ हळूहळू पालटत होता. मुलांचा कमी वयात शाळेत प्रवेश सुरु झाला. पुर्वी हात कानाला पुरल्याशिवाय शाळेत मुल दाखल होत नव्हते. आता शाळेतील मुल दाखल करतांना कानाला हातच पुरवावा लागत नाही. कमी वयातच शाळेतील नाव दाखल होतं. त्यातच आजच्या काळात दहावीत दाखल होणारे विद्यार्थी हे कमी वयाचेच असतात असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
आजचा काळ पाहता वाढती इयत्ता, तसंच कमी होत गेलेलं वय. त्यातच वाढता अभ्यासक्रम विचारात घेवून शासनानं अभ्यासक्रम तयार केला. त्यामुळंच साहजीकच पाठ्यपुस्तकात जास्त अभ्यासक्रम केंद्रीत झाला. त्यानंतर जो अभ्यासक्रम तयार झाला. त्या आधारावर पाठ्यपुस्तकं तयार झालीत. जी पाठ्यपुस्तकं आजच्या काळात विद्यार्थ्यांना वाहायला जड झाली. दप्तराचे ओझे वाढले व त्यानं विद्यार्थ्यांचे खांदे दुखायला लागलेत.
विद्यार्थ्यांचे खांदे दुखणे पाहता वाढलेल्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारनं पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचे चार भाग बनवले व त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करणे सुरु केले. एक पुस्तक दोन ते तीन महिण्यासाठी द्यायचं ठरलं व एकाच पाठ्यपुस्तकात सर्वच विषयाचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु ही बाब केली शासनानं जि. परीषद शाळेतील विद्यार्थ्यांबाबत. कॉन्व्हेंटच्या मुलांबाबत केली नाही. त्यामुळंच साहजीकच आजही कॉन्व्हेंटची मुलं दप्तराचे ओझे वाहात आहेत. त्यानं विद्यार्थ्यांचे खांदेही दुखतात तर शाळेतील विद्यार्थ्यांना चढायला उतरायला लिफ्टची व्यवस्था नसल्यानं ते चढतांना विद्यार्थ्यांचे पाय दुखायला लागले. तसंच नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन नवीन उपक्रम अशा कॉन्व्हेंटच्या शाळा घेत असल्यानं मुलं ते उपक्रम पुर्ण करण्यासाठी रात्र रात्र राबत आहेत. त्यातच त्यांची झोपमोड होत आहे व त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसाच आता हाच अभ्यासक्रम नवीन भविष्यवेधी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आला असून हा नवीन येणारा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा जीव घेणार की काय? याबाबत शंका आहे. कारण हा अभ्यासक्रम त्याच धर्तीवर आधारीत आहे. या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षक प्रेरीत करणार आहेत. जिज्ञासा वाढवणार आहेत व आव्हान देणार आहेत. यानुसार विद्यार्थी जर एखाद्या विषयासाठी प्रेरीत झाले आणि त्यांची जिज्ञासुवृत्ती वाढली आणि एखाद्या विषयाबद्दल त्यांनी आव्हान स्विकारलं, तर ती रात्र रात्र जागतीलच. यात शंका नाही. कारण ते आव्हान केव्हा केव्हा व कसं कसं पुर्ण करता येईल याचा विचार ते करणार आहेत. तसे आव्हान पुर्ण करण्यासाठी ते प्रेरीत झालेले असणार. ज्यातून पुरेशी झोप होवू शकणार नाही व त्याचा आरोग्यावर परिणाम होवून शकेल ही संभावना नाकारताही येत नाही.
महत्वाचं म्हणजे नवीन भविष्यवेधी अभ्यासक्रम तयार केल्या गेला. ही आनंददायी बाब आहे. त्याचा उहापोह नाही. तसं पाहिल्यास प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. पहिली बाजू आनंददायी असते तर दुसरी बाजू दुःखानंही भरलेली असते. पहिल्या बाजूनुसार परिणाम हा चांगलाच निघू शकतो तर दुसऱ्या बाजूनुसार त्याचा परिणाम हा वाईटही निघू शकतो. त्यामुळंच त्याचा परिणाम जर चांगला निघत असेल तर त्याचा पुरस्कार करण्याची गरज नाही. कारण ते शासनाचे कर्तव्य आहे. तसेच त्याचा परिणाम जर वाईट निघाला तर त्याला दोष देण्याचा अधिकारही कुणाला नाही. कारण बदलत्या काळानुसार वेगवेगळे प्रयोग करण्याचा अधिकार सरकारला आहे. तसा प्रयोग जर शासन करीत नसेल तर त्याला शासन म्हणता येणार नाही. शासनानं असा अभ्यासक्रम आणला, त्याचं स्वागतच आहे. कारण अभ्यासक्रम चांगला आहे व विद्यार्थ्यांची बौद्धीमत्ता व बौद्धिक पातळी वाढविणारा आहे. मात्र शासनानं हे धोरण राबवतांना एक बाब लक्षात घ्यावी, ती म्हणजे विद्यार्थ्यांची कुवत. त्या कुवतीनुसार आव्हानात मर्यादा पाडावी व विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार त्याला जेवढे झेपेल. तेवढेच आव्हान देणारा अभ्यासक्रम राबवावा. त्यात वेळेचं बंधन घालावं. तशीच अभ्यासक्रमाची आखणी करावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांना रात्र रात्र जागावी लागणार नाही. तसाच त्यांच्या आरोग्यावर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम होणार नाही व विद्यार्थ्यांचा जीव जाणार नाही. तशीच पावलं शासनानं उचलायला हवीत म्हणजे पावलं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०