*नवीन अभ्यासक्रम ; तुर्त राबवणे गरजेचे?*
*नवीन अभ्यासक्रम. सरकार राबविण्याचाच विचार करीत आहे. त्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करुन प्रशिक्षण लावत आहे. प्रशिक्षण करुन घेत आहे आणि सांगत आहे की सर्वांनी काशीलाच जावं. इतर कुठेही जावू नये. यावरुन लक्षात येतं की सगळेजण जाणार की काय?*
सरकार प्रत्येक वेळेस निवडून येतं व निवडून आलं की काही ना काही उपद्व्याप करीत असतं. त्याचं कारण असतं आमच्या सरकारचं काही ना काही वेगळं काम दिसायला हवं. तसं पाहिल्यास कोणतंही सरकार का असेना जेव्हा बसतं. तेव्हा ते काही नवीनच पिल्लू आणत असतं.
सरकार नवीन पिल्लू जन्मास घालत असतांना शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्यासाठीही नवीनच पिल्लू जन्मास आणत असतं. असंच नवीन पिल्लू योजना रुपात प्रत्येक सरकारनं जन्माला घातलं. जसं इंग्रजी हा विषय पहिलीपासून सुरु करणे, क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम राबवणे. नवीन आकृतीबंध तयारकरणे. तो अंमलात आणणे. नवीन शैक्षणिक धोरण तयार करणे. यात काही चांगल्या गोष्टी असतात तर काही वाईट. काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्यांना आपण वाईट गोष्टी समजतो. जसे. आठवीपर्यंतच्या परीक्षेचे गुण टाकणे. नापास न करता पासच करणे. काही गोष्टी नक्कीच वाईट असतात. जशी पेन्शन बंद करणे. असाच बदल करीत करीत सन २०१४ ला नवीन सरकार बसलं व त्यांनी २०२० चा नवीन शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध तयार केला. त्यानुसार त्यांनी निपुण भारत योजना मांडली. निपुण भारत याचा अर्थ भारताला सर्वच क्षेत्रात परीपुर्ण बनवणे. हे परीपुर्ण बनवीत असतांना सरकारनं त्याचं मुळ शोधलं. ते मुळ सापडलं ते शाळेत. कारण सरकारलाच नाही तर जगातील सर्वांनाच माहीत आहे की देशाच्या भवितव्याचं मुळ हे शाळेतच दडलेलं आहे. त्या शाळेतील वर्गखोल्यातून देशाचं भविष्य तयार होत असते. यातूनच सरकारनं भविष्यवेधी शिक्षणाची योजना मांडली व त्यानुसार भविष्यवेधी शिक्षणाचा आकृतीबंध तयार केला.
भविष्यवेधी शिक्षण? काय आहे भविष्यवेधी शिक्षण? भविष्यवेधी शिक्षणाचा सारासर अर्थ म्हणजे भविष्यात उपयोगी पडणारं शिक्षण. मग हे शिक्षण कसं भविष्यवेधी शिक्षण ठरु शकणार? खरंच मुलांना आजच्या तारखेला भविष्यात उपयोगी पडणारं शिक्षण शिकवता येवू शकते काय? तर याचं उत्तर होय असंच आहे. कारण आजच्या शिकविल्या जाणाऱ्या शिक्षणातून असं शिक्षण शिकवलं जाणार आहे की ज्यातून मुलांना प्रेरणा मिळेल. याचाच अर्थ असा की ते स्वतःच स्वतः प्रेरीत होतील व स्वतःच शिकू शकतील. इतरांची मदत घेणार नाहीत. तसेच ती जिज्ञासेनं शिकतील. तंत्रज्ञानाचा वापर करीत करीत शिकतील. यात त्यांना शिक्षक शिकवणार नाही. फक्त मार्गदर्शन करतील. मूल्यांकन करतील. परीक्षा घेतील. आव्हान देतील. निरीक्षण करतील. यात एकाचवेळेस अनेक वर्ग शिकतील. अनेक विषय शिकतील. अनेक विद्यार्थी शिकतील.
एकाच वेळेस एक शिक्षक अनेक विद्यार्थी शिकतील. अनेक विषय शिकतील. अनेक वर्ग शिकतील. नवीन शैक्षणिक धोरण व भविष्यवेधी शिक्षण हेच सांगतं परंतु महत्वाची बाब ही की हे कसं शक्य आहे. कोणी म्हणेल की बोलणारा वा सांगणारा व्यक्ती वेडा झाला की काय? त्यातच आता कोणी म्हणेल की शिक्षक काहीच शिकवणार नाही. मग एकाच वेळेस अनेक विद्यार्थी अनेक विषय अनेक वर्ग कसे शिकतील? ही आश्चर्याची बाब आहे. परंतु यात खरं सांगायचं म्हणजे ही गोष्ट तसुभरही खोटी नाही. नवीन शैक्षणिक धोरण यावरच तयार केलं गेलं आहे. आता शिक्षक शिकवणार नाहीत. पण विद्यार्थी शिकणार आहेत.
*विद्यार्थी कसे शिकणार आहेत?*
नवीन शिक्षण धोरणानुसार व भविष्यवेधी शिक्षणानुसार शिक्षक आता शिकवणार नाहीत तर ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरीत करतील. त्यांना प्रवृत्त करतील. तसं प्रवृत्त करीत असतांना ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आव्हान देतील. तसे आव्हान पुर्ण करीत असतांना ते विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करतील. त्यासाठी ते विद्यार्थी शिक्षकांनी शाळेत वा वर्गात पाडलेल्या विद्यार्थ्यांच्या जोड्यांची मदत घेतील. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं आव्हान पुर्ण झालं की शिक्षक ते आव्हान पुर्ण करणाऱ्यांची सेल्फी घेतील. निरीक्षण करतील. मुल्यमापन करतील व निकाल जाहीर करतील. त्यानंतर त्यातील उणीवा दिसल्या की त्या उणीवा विद्यार्थ्यांना न रागवता सांगतील. मग त्या उणीवा दिसल्या की विद्यार्थी त्यानंतर त्या उणीवा स्वतःच दूर करण्याचा प्रयत्न करतील. परंतु यात एक असंही होवू शकते. ते म्हणजे उणीवा सांगील्यानं न्यूनगंड निर्माण होवू शकतो. यावर उपाय एकच. तो म्हणजे विद्यार्थ्यांना निकाल न सांगता व उणीव न दाखवता असलेल्या उणीवा दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. जेणेकरुन विद्यार्थ्यात कोणत्याही स्वरुपाचा न्युनगंड निर्माण होणार नाही.
वरील विषयांशानुसार सरकारनं शिक्षक विरहीत शिक्षणाची योजना मांडली. जी स्वागतार्ह आहे. परंतु खऱ्या अर्थानं विचार केल्यास ही योजना का बरं मांडली असेल? असा विचार केल्यास सरकारचा यात हेतू दिसून येतो. तो म्हणजे सरकारला आता शाळेतील या शिक्षकाला देशातील इतर कामात व्यस्त करायचे आहे. मग बी एल ओची नोकरी असो वा निवडणुकीत तो व्यस्त असो. तो कोरोनासारख्या साथीत व्यस्त असो, वा तो प्रशिक्षणात. तो सतत शिकवीत राहायला हवा आपल्या विद्यार्थ्यांना. तसेच आता कमी पटसंख्येच्या शाळेत विद्यार्थी कमी असतात. त्यातच ती अनेक वर्गाची मुलं असतात. त्यावर उपाय म्हणूनही ही नवीन संकल्पना सरकारच्या कामी येणार आहे.
*एकाच वेळेस अनेक विद्यार्थी, अनेक वर्ग व अनेक विषय कसे शिकवता येतील?*
आता शिक्षक नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनवणार. त्या ग्रुपवर ते जर बाहेर असले तरी आव्हानं टाकत जाणार. तसं पाहता त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आधीच तयार केलेलं असणार. विद्यार्थी ते आव्हान पाहतील. त्या आव्हानाचं उत्तर ते गुगलवरुन शोधतील. त्यात आपल्या ज्ञानाची भर टाकतील व ते आव्हान पुर्ण करतील. असा हा एकंदरीत अभ्यासक्रम आहे. याचाच अर्थ असा की शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि देशासाठीही सरकारनं हा अभ्यासक्रम सोपा करुन दिला आहे. आता पाहूया यातून फलीत काय निघते ते? खरंच हा भविष्यवेधी अभ्यासक्रम देशाच्या भवितव्यासाठी साधक ठरतो की बाधक ठरतो. तो काळ सांगणार आहे. परंतु तो तुर्तास तरी राबवणे गरजेचे आहे यात शंका नाही. कारण सरकारला सर्वांना काशीलाच न्यायचे आहे. इतर ठिकाणी नाही. त्याचंही एक कारण म्हणजे २०४७ पर्यंत देशाला महासत्ता बनवायचे आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०