गावाबाहेर असलेल्या छोट्याश्या झोपडीच दार उघडत एक एकोणीस वर्षाची मुलगी बाहेर येते.ती अगदी सावकाश झोपडीसमोरील बोराच्या झाडाच्या भोवती असलेल्या दगडी चौथऱ्यावर बसते. सूर्य मावळतीला आला असतो.ती बाजूच्या मातीत हात फिरवत त्यात फुलांचे आकार बनवत असते तोच एक छोटा मुलगा तिला हाक मारतो.
"वेदिका ताई"
"अरे सचू आज उशीर झाला तुला...मला वाटलं आज येणार नाही तू"....वेदिका
वेदिका त्या लहान मुलाकडे बघत बोलते.साधा मळलेला ढगला कुर्ता आणि पांढर गुढग्यापर्यंत असलेल धोतर जे काहीस ओल झाल होत.खांद्यावर मासळी पकडायची जाळी आणि कमरेला लावलेलं छोट मडक जे लहान मासळी ठेवायला वापरल जायचं.तो मुलगा हसत त्या लाकडी कुंपणावर रेलत बोलतो.
"अग आज नदीत मासळी सापडतच नव्हती...म्हणून मग उशीर झाला.. चल निघतो नाहीतर आई येईल शोधत मला"....... सचू
"सचु थांब जरा".....वेदिका
वेदिका त्याला थांबवते आणि झोपडीत जाऊन साठवलेली बोर मोठ्या पानांत गुंडाळते आणि त्याला वेलीने बांधत झोपडी बाहेर येते.
"हे घेऊन जा"....वेदिका त्याच्या हातात ती पुडी देते.
"धन्यवाद ताई....तू खूप चांगली आहे".....सचू लाडात बोलतो.
"रोज बोर देते म्हणून चांगली....हो ना"...वेदिका
"तस नाही ताई".... सचु
"हो का? मला माहित आहे.. रोज बोर खायला मिळावी म्हणून रोज मला हाक मारायला येतो तू"......वेदिका खोटा राग दाखवत बोलते
"अग ताई तस काही नाही तू एकटीच असते म्हणून सहज तुझी विचारपूस करतो ...हवं तर बोर नको देऊ मला पुन्हा ..मग तरी विश्वास ठेवशील माझ्यावर?"..... सचू रडका चेहरा करत बोलतो.
"अरे सचू तू.....रडायला काय लागला लगेच...मी फक्त थट्टा केली तुझी..तू..तू... रडण बंद कर"....वेदिका त्याला समजावत बोलते.
सचू त्याचे डोळे पुसतो आणि नाकातून निघालेल शेंबूड कुर्त्याला पुसत हसत वेदिका ला बोलतो.
"काय ताई आधी तरी सांगायचं थट्टा करते अस.. म्..मी रडलो नसतो.मी मोठा झालोय आता रडायला नाही आवडत मला".... सचू
"बरं माफी असावी सचू"....वेदिका
"बोर दिल्यात म्हणून केलं माफ पुन्हा माफी नाही देऊ शकणार हा".... सचू मोठ्या मुलाचा आवाज काढत बोलतो.
"ठीक आहे..बर जा आता घरी नाही तर आई शोधत येईल इथपर्यंत" ........वेदिका स्मितहास्य करत त्याला निरोप देते.
सचू दिसेनासा होईपर्यंत वेदिका त्याच्या कडे बघते. सचू त्याच्या घराकडे निघून जातो.वेदिका तिच्या झोपडी कडे बघत दुःखी सुस्कारा सोडते.वेदिका ची झोपडी गावापासून दूर असल्याने इथे लोकांची वर्दळ नसायची.केवळ नदीवर जाणारे मच्छीमार किंवा वाटसरू एवढेच काय ती लोक तिच्या घरासमोरून जायची तीही अनोळखीच होती तिच्यासाठी. बघता बघता रात्र होते.....आज मध्यरात्र झाली तरी वेदिका च्या डोळ्याला डोळा लागला नव्हता.वेदिका कुस बदलून झोपायचा प्रयत्न करत होती पण आज काय निद्रादेवी तिला पावत नव्हती.वेदिका उठते आणि घरातला दिवा घेऊन बाहेर ओट्यावर येऊन बसते.सर्वत्र काळोख पसरला असतो.केवळ वेदिका कडील दिव्याचा काय तो तेवढा प्रकाश आणि त्यात भयाण शांतता.अधूनमधून जंगली श्वापदांचे येणारे आवाज त्या शांततेला भंग करत असतात.
वेदिका साठी हा एकटेपणा आता सवयीचा झालेला असतो.ती बाजूला ठेवलेल्या दीव्याकडे बघू लागते त्या दिव्याभोवती एक पाखरु उडत असते व सतत त्या आगीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते.वेदिका तो दिवा उचलून उजव्या बाजूला ठेवते.पुन्हा ते पाखरु त्या दिव्या भोवती चक्करा मारू लागत.
"तू वेडा आहेस का?.... का त्या आगीजवळ जातोय जळून जाशील तू".........वेदिका त्या पाखरा कडे बघत पुटपुटते.पण तिला काय माहित की भविष्यात तिचाही सामना एका ज्वलंत व्यक्तिमत्त्वाशी होणार आहे.
-----------------------------------------------------------
त्याच रात्री वेदिका च्या झोपडीपासून काहिदुर अंतरावर एका राजकक्षात महाराज आणि त्यांच्या प्रधानमंत्री ची चर्चा चालू असते.
"आज आपली दोन नगर आणि पाच गाव ऐश्वर्य साम्राज्याने जिंकून घेतल्यात....आम्हाला भीती आहे जर ऐश्वर्य साम्राज्य याच गतीने युद्ध करत राहील तर ते लवकरच आपल्या स्वर्ण गडापर्यंत येतील आणि आपल साम्राज्य लोप पावेल."..........प्रधानमंत्री नकाशा वरून हात फिरवत बोलतात.
"चिंता सोडा सेनापती ऐश्वर्य साम्राज्य आता कुठे आपल्या साम्राज्याच्या सीमेपर्यंत पोहचलाय.इथपर्यंत यायला त्यांना सलग दहा दिवस कूच करावा लागेल.".......महाराज त्याच सुटलेल पोट सांभाळत तिथल्या गाडीवर बसत बोलतो.
"शत्रू ला कमजोर समजण धोक्याच ठरू शकते महाराज....त्यात बातमी आहे की युद्धात स्वतः ऐश्वर्य युवराज उतरले आहेत आणि ते कुटनितीत केवढे कुशल आहेत हे तर आपल्याला ज्ञात आहेच...आणि आपण ऐश्वर्य साम्राज्याशी लढायला आपल्या गडावरील अर्ध्याहून अधिक सैन्य सीमेवर पाठवले आहे आता गडावर केवळ सतरा हजार सैन्य आहे.".....प्रधानमंत्री अगदी चिंतेत येऊन बोलतो.
"प्रधानजी तुम्ही गरजेपेक्षा अधिक चिंतित होतात...सीमेपासून ते स्वर्ण गडापर्यंत चे अंतर कैक मैलाच आहे ते इथवर येई पर्यंत आपल्याला खबर मिळेलच ना आणि आपल अर्ध सैन्य गडावरून सिमेकडे गेलाय ही माहिती केवळ आपण व आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांनाच ठाऊक आहे....आणि तसंही गडाचे भिंती व दरवाजे मजबूत आहेत सलग एक आठवडा तोफ डागली तरी तुटणार नाही आणि गड चडून येणं तर अशक्यच...तेव्हा चिंता सोडा... जोपर्यंत गड मजबूत आहे तो पर्यंत आपण सुरक्षित आहोत."........महाराज त्याची दाडी कुरवाळत बोलतो.
तेव्हाच त्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात एक युवराज त्याच्या सात हजार सैनिकांना आज्ञा देत असतो.
"मिराज तुम्ही आणि तुमची तुकडी दोन विभागात विभागेल आर्धी तुकडी आग्नेय आणि दुसरी वायव्य दिशेने गड चढेल."
"जी युवराज".... उपसेनापती मिराज झुकत बोलतो.
"मिराज आमच्यामते तुम्ही वायव्य दिशेच्या तुकडीसोबत जावे कारण वायव्य दिशेस अधिक पाहरेकरी आहेत."
"जशी आपली आज्ञा युवराज"..... मिराज
"विद्युत तुम्ही पायथ्याशी असलेल्या गुप्त मार्गाने गड चढा...गुप्त मार्ग शस्त्रगाराजवळील पिंपळाच्या झाडाजवळ निघतो.....जो पर्यंत युद्धाचा इशारा मिळत नाही तोपर्यंत त्या मार्गाच्या मुखाजवळ येऊ नका.
"जी युवराज"....युद्धकला प्रशिक्षक विद्युत आदराने लवून बोलतो.
"कामगिरीला लागा"..... ऐश्वर्य युवराज पश्चिम दिशेकडील कड्याकडे नजर फिरवत बोलतो.
मिराज आणि विद्युत जाड दोर व इतर आवश्यक हत्यार घेऊन निघून जातात.तेव्हा एक तरुण अधिकारी येऊन ऐश्वर्य युवराजाच्या बाजूला उभ राहून काळजीत बोलतो.
"युवराज पुन्हा एकदा विचार करा...आपल अर्ध सैन्य सीमेवर आहे.. आपण स्वर्ण गड निम्या सैनिकांच्या साहाय्याने जिंकणे शक्य आहे?"
"आमच्यासाठी अवघड अस काहीच नाही वीर... खबऱ्यांनी माहिती दिलाय स्वर्ण भुपतींची अर्धी गडसेना आता आपल्या सैन्याशी लढत असेल...युद्ध लवकर संपवण्याचा हा उत्तम मार्ग आहे की सरळ महाराजवर वार करायचा...कारण सैन्य हे राज्याच्या इशाऱ्यावर काम करत"
"ते तर ठीक आहे पण ह्या गडाच्या कडा सपाट शिळां च्या आहेत चढण अवघड आहे."
"खूप वर्षांपूर्वी शेजारील देशाने स्वर्ण साम्राज्यावर हल्ला केला होता...अनेक दिवस युद्ध चाललं..कित्येक दिवस स्वर्ण गड तोफांचे मारे झेलत होता गडाला काही झाल नाही पण पूर्व आणि उत्तर द्वाराजवळील स्फोटाच्या हादऱ्याने वायव्य,आग्नेय दिशेच्या कडांमध्ये काही ठिकाणी छोटे खच पडल्यात....त्या मुढ स्वर्णपती ला याची कल्पना देखील नसेल."
वीर आता निश्चिंत होतो, तसही कुठल्याही गडा वर हल्ला करण्याआधी त्या गडाच्या कोपऱ्या न कोपऱ्याची माहिती युवराज गोळा करत हे त्याला ठाऊक होतच. नजर झुकवत माफीच्या स्वरात बोलतो
"तुमच्या युद्धनीती वर शंका करण्याचं धाडस केल्याबद्दल माफी असावी युवराज"
"हरकत नाही वीर...आम्ही पश्चिमेचा कडा चढून जातो..त्या मार्गाने सरळ युद्धनियोजन कक्षात जाऊ तिथून तुम्हाला युद्धाचा इशारा देण्यात येईल तेव्हा तुम्ही सरळ मुख्य द्वाराने हल्ला करा...तुम्ही मुख्य द्वारा जवळ येईपर्यंत विद्युत ची तुकडी तुमच्या साठी द्वार खोलेल.".......युवराज त्याच गड चढण्यासाठी बनवलेल खास हत्यार घेत बोलतो.
"जी युवराज".....वीर आणि त्याची टोळी तलवारी सज्ज करत बोलतात.
युवराज त्याची तीक्ष्ण नजर सैनिकांच्या नजरेला भिडवून स्पष्ट काहीश्या कठोर आवाजात बोलतो "स्ववियर्ये यः समाश्रित्य समाहवयती ..."(जो आपल्या बळ पराक्रमावर विश्वास ठेऊन शत्रूंना ललकारतो .....)
".....वै परान अभितो युध्यते शञुन स वै पुरूष उच्यते.....(आणि निर्भय होऊन त्यांच्याशी युद्ध करतो तोच पुरुष {योद्धा} म्हणून ओळखला जातो )"युवराजच बाकीचं वाक्य सैन्य जोशात आणि उत्साहात पूर्ण करते.
युवराज पश्चिम कडे च्या दिशेने जातो.....तर इथे मिराज आणि त्यांची तुकडी गड चढत असतात.गड चढायला तसा कठीणच असतो पण जागो जागी खच पडल्याने काही अंशी सैनिकांना चढण सोप्प जात.एक सैनिक दबक्या आवाजाने मिराज ला बोलतो..
'' सेनापती आपण चढायला फार घाई करत आहेत...जो पर्यंत युवराज गडावर येत नाहीत तो पर्यंत आपण हल्ला नाही करू शकत ना."
"युवराजांच्या वेगाशी तू अवगत आहेसच ना..एव्हाना त्यांनी आर्धा गड चढला देखील असेल...आपल्याला जलद गतीने गड चढायला हवा.. वर बुरुजावर दर एक प्रहराने राजाची विशिष्ट सेना फेरी मारते.आपल्याला युवराजांच्या इशारा येई पर्यंत गडावर पोहचायला हवं"......... मिराज
-----------------------------------------------------------
युवराजने एव्हाना अर्धा कडा चढलेला असतो...म्हणायला पश्चिम कडा गडावर पोहचण्याचा सर्वात छोटा कडा असतो पण तेवढाच कठीण ही..युवराज अगदी लक्षपूर्वक तिथल्या दगडाच्या फटीत त्याच हत्यार रुतवत चढत असतो..एके ठिकाणी त्याची हत्याराची पकड सैल होते आणि त्याचा तोल जातो पण युवराज दुसऱ्या दगडाच्या फटीत बोट रुतवत तोल सांभाळतो...यात त्याचा कोपरा दगडावर घासला जातो.तो याची पर्वा न करता अधिक जोमाने चढायला लागतो.
"ह्या ऐश्वर्य युवराजने युद्धात उतरून आमची झोपच उडवलाय...आमच्या मते तुम्ही त्या युवराज च्या कोणा निकट वर्तियकडून त्याचा खून करा....कारण युद्धात त्याला हरवण आम्हाला आता केवळ अशक्य वाटते"..... स्वर्ण भूपती सेनापतीने पाठवलेल्या युद्ध अहवाल पाहत बोलतो.
"महाराज माझ्यामते तुम्ही काही दिवस अज्ञात स्थळी जावं.... ऐश्वर्य युवराजांपासून तुमच्या जीवाला धोका नक्की निर्माण होईल".....प्रधानजी युद्ध अहवाल बाजूला ठेवत बोलतो.स्वर्ण भूपती च या युद्धात बरच आर्थिक नुकसान झालं असते.तो चवताळून ओरडतो
"हा मूर्ख ऐश्वर्य युवराज..."
"तुम्ही आमची आठवण काढली आणि आम्ही आलो"
स्वर्ण महाराज आणि प्रधानजी आवाजाच्या दिशेने बघतात तर तिथल्या गवक्षातून युवराज उडी मारून आत येत असतो.
"महाराज तुम्ही बाहेर जा तुमचे रक्षक तुम्हाला संरक्षण देतील."......प्रधानजी त्याची तलवार म्यानातून काढत बोलतो.
राजा युवराज ला बघून तिथून धूम ठोकतो.युवराज त्याच्या दिशेने पावल टाकतो तर प्रधानजी त्याच्या समोर तलवार धरत बोलतात "राजांपर्यंत पोहचण्याआधी आमच्याशी आमच्याशी लढण पसंत कराल ऐश्वर्य युवराज?"
"नक्कीच पण सध्या आमच लक्ष्य तुम्ही नाही आहात"
"ऐश्वर्य युवराज एका मंत्र्याशी लढायला घाबरले अस समजावं का आम्ही....आम्ही लालकरतोय आपल्याला लढायला सज्ज होऊन तुमचा क्षत्रिय धर्म पाळा"
" तुम्हाला लवकर मारायचाच आहे तर.. जशी तुमची इच्छा"
युवराज त्याची तलवार म्यानातून काढत बोलतो...प्रधानजी त्याच्यावर धावून जात त्याच्या वर वार करतो पण युवराज मागे सरत वार चुकवत प्रधनजीचा हात धडावेगळा करून त्याचा देह गवक्षातून खाली फेकतो...तर त्याच गवाक्षाकडे दुर्बिणीने बघणाऱ्या वीर ला युवराज चा इशारा मिळतो.वीर क्षण भर ही उशीर न करता त्याच्याकडे असलेला विशिष्ट शंख फुंकून युद्धाचा इशारा देतो. मिराज आणि विद्युत लाही शंख फुंकल्याचा आवाज येतो.
मिराज आणि विद्युत त्यांच्या तुकडी सह स्वर्ण गडावर हल्ला करतात...स्वर्ण राजा त्याच्या रक्षकांसोबत गडाच्या गुप्तमार्गाजवळ येतात.पाच पैकी तीन रक्षक जाऊन तिथल्या दगडी जमिनीत गुप्तमार्गाचा सुरुंग शोधू लागतात.
"अरे सापडल का सुरुंग?"राजा तावातावाने आजूबाजूला बघत बोलतो.
"जी अजून नाही महाराज...फार काळाने इथे येणं झाल म्हणून जरा गोंधळ उडालाय..चिंता नसावी आम्ही शोधतोय"
"अरे काय माझी तिरडी उचलल्यावर मिळणार आहे का तुम्हाला सुरुंग?.....तो ऐश्वर्य युवराज एव्हाना आम्हाला शोधायला निघाला असेल."
"ते स्वतः युद्धात उतरल्यात म्हणजे म्हणजे रक्ताचा सडा नक्की पडणार".........सुरुंग शोधत असलेला सैनिक पुटपुटटो.
"काय...काय ? बडबडलास.".....महाराज त्याच्यावर खेसकत बोलतात.
"महाराज....महाराज...सुरुंग सापडला"....सैनिक उत्साहात बोलतो आणि सुरुंगाच्या तोंडावर असलेल्या सपाट दगडी विटा काढू लागतात.
"या महाराज तुम्ही सुरुंगमार्गे निघा आम्ही तुम्हाला...."
"आम्ही तुमच्या गडावर आलो आणि तुम्ही निघालात....स्वागत ही नाही करणार आमचं?"......त्या सैनिकांच बोलण मध्येच तोडत युवराज बोलतो.
राजाचे रक्षक राजासमोर ढाली प्रमाणे उभे राहतात.
"तर तुम्हालाही तुमचा प्राण प्रिय नाही आहे"......युवराज त्याची रक्ताने माखलेली तलवार त्यांच्यावर रोखत बोलतो.
पाच पैकी दोन सैनिक गुपचूप त्यांची तलवार खाली घेऊन युवराज समोर झुकतात.युवराज त्यांना हातानेच बाजूला सरकायचा इशारा करतो.ते रक्षक बाजूला गुडघ्यावर बसून निमूटपणे मान खाली घालतात.युवराजची तलवार काही क्षणातच त्या रक्षकांना कापून काढते.युवराज क्रूर हसत महाराजांकडे बघतो.
-----------------------------------------------------------
त्या सोन्याच्या स्वर्ण सिंहासनावर ऐश्वर्य युवराज अगदी ऐटीत बसलेला.त्याच्या समोर वीर, मिराज, विद्युत आणि इतर ऐश्वर्य अधिकारी व सैनिक उभे होते.
"युवराज तुमची आज्ञा असल्यास आरोपीला..."
"आज्ञा आहे"
वीर सैनिकांना हातानेच खुणावतो त्याच प्रमाणे सैनिक बेड्यांनी जखडलेल्या स्वर्ण महाराजला आणून दरबाराच्या मध्यभागी आपटतात.
"आम्ही निर्दोष आहोत...आम्ही निर्दोष आहोत"
"अमात्य वीर पूर्व स्वर्ण महाराजांना जरा त्यांच्या चुकांची उजळणी करून द्या."
"युवराज एक महिन्यांपूर्वी ऐश्वर्य सैन्य स्वर्ण साम्राज्याजवळील सूरराज्यासह युद्ध करून स्वर्ण साम्राज्याच्या सीमेवरून जात होते. ऐश्वर्य सैन्याने केवळ एक दिवसाच्या विश्रांतीसाठी स्वर्ण महाराजांना विनंती केली पण स्वर्ण महाराजांनी त्या विनवणी चा मान न राखत त्यांना नकार दिला सोबतच सैन्याच्या मुखियासाठी अपशब्द ही वापरले गेले....स्वर्ण महाराजांनी एका भव्य साम्राज्याच्या प्रतिभावान सैन्याचा अपमान केला आणि राजनियमानुसार सैन्याचा अपमान म्हणजे त्या राज्याचा अपमान"
"माफी....माफी..तुमचे सैनिक रात्री गडावर आले होते आणि तेव्हा आम्ही मद्यावस्थेत होतो म्हणून भुल झाली आमच्या कडून क्षमा युवराज क्षमा"
"युवराज हे केवळ सैन्याचा अपमान करूनच थांबले नाही यांनी आपल्या सैन्यावर भ्याडपणे हल्ला देखील केला."
"खोटं.... साफ खोटं आहे हे युवराज.. तुम..तुमच्या सैन्यावर तर एका कुख्यात लुटारुंच्या टोळी ने हल्ला केला ...आम्ही.. आम्ही स्वतः तुम्हाला हे पत्र लिहून कळवल होत."
"युवराज स्वर्ण महाराजांनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे..पत्रात लिहलेली एकूण एक गोष्ट खोटी होती..स्वर्ण महाराजांनी केलेल्या अपमानामुळे सैन्याने त्यांची मदत न घेता स्वर्ण साम्राज्याच्या सीमेजवळ रात्रीच्या विश्रामाची सोय केली पण ह्यांनी निद्राधीन ऐश्वर्य सैन्यावर हल्ला केला.. व हा लुटारुंचा हल्ला असल्याचा बनाव केला.एवढंच नाही युवराज त्यांनी ऐश्वर्य अधिकारी सत्यता तपासणी करायला येण्याआधीच मृत सैनिकांना अग्नी दिली...तेही कोणत्याही सन्मानाशिवाय जेव्हाकी ऐश्वर्य साम्राज्याच्या प्रथेनुसार प्रत्येक शहीद सैनिकाला मृत्युसमयी योग्य सन्मान देण्यात येतो."
वीर च्या तोंडून सत्य ऐकून राजाला घाम फुटू लागतो.ऐश्वर्य युवराज कडे बघायची त्याची हिंमतही नाही होत.आता यातून कस सुटाव? काय युक्तिवाद लावावा हा विचार तो करत होता तोच युवराज चा शांत पण गंभीर आवाज संपूर्ण दरबारात घुमतो.
"ह्या घटनेची तपासणी कोणी केली होती"
"मी युवराज"......विद्युत समोर येत बोलतो
"वीर यांनी सांगितलेला शब्द नी शब्द खरा आहे?"
"जी युवराज...मी स्वतः जातीने तपासात लक्ष घातलाय."
" भद्रद्वीप तुम्हाला तुमची बाजू मांडायची असल्यास मांडू शकतात"
स्वर्ण महाराजाचेच नव्हे तर संपूर्ण दरबार व इतर कैदी असलेले स्वर्ण अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारतात.कोणा राजाला नावाने उच्चारणे म्हणजे त्याचा अपमान करणे असे मानले जायचे आणि आतातर एका युवराजने महाराज असलेल्या व्यक्तीला नावाने उच्चारल म्हणजे त्याला गौण समजल गेलाय असा अर्थ होतो. महाराज तर या अपमानाने पेटून उठतो.तो रागात ओरडत बोलतो
"तू...तू अल्लड कुमार तुझी हिम्मत कशी झाली मला नावाने संबोधण्याची...आम्हाला ठाऊक आहे तू केवढा क्रूर आहेस मग आता का एवढा न्यायप्रिय असल्याचं सोंग घेतोय..तू त्या तुच्छ सैनिकांच्या मृत्यूच कारण शोधायला नक्कीच आमच्या राज्यात गुप्तहेर पाठवले असतील त्याशिवाय तुला काय समजणार होत?.... मूढ ऐश्वर्य कुमार"
राजा रागाच्या ओघात अती बोलून गेला संपूर्ण दरबार त्याच्या या कृतीने स्तब्ध होतो कारण आता याची हालत काय होईल हे सर्वांना ठाऊक असते.
"तुम्ही स्वतः एवढे बुद्धिहीन असतील तर आम्हाला गुप्तहेर पाठवायची गरजच काय भद्रद्वीप....तुम्ही आता स्वतः सर्वांच्या समोर स्वतःच्या मुखाने तुमचे अपराध सिद्ध केले आहेत...आता आम्ही सांगतो तुमचे अपराध..अपराध क्रमांक एक साम्राज्याच्या सैनिकांचा अपमान, क्रमांक दोन विनाकारण सैन्यावर हल्ला करणे,क्रमांक तीन साम्राज्याला खोटी माहिती पुरवणे,क्रमांक चार तपासला लागणारे पुरावे नष्ट करणे आणि क्रमांक पाच ऐश्वर्य युवराजांना एकेरी संबोधणे आणि त्यांचा अपमान करणे.... राजनियमांनुसार पाच अपराध करणाऱ्याला मृत्यू दंडाची शिक्षा होते आणि आम्ही ऐश्वर्य युवराज तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा....."
युवराज पुढे काही बोलणार त्याआधीच स्वर्ण पती त्याच्या समोर हात जोडत जीवाची भिक मागतो
"क्षमा असावी युवराज क्षमा करा....पुन्हा तुम्हाला ललकारण्याच दुस्सहास नाही करणार..मोठ्या मनाने माफी द्यावी युवराज"
युवराज त्याच्या पोटात लाथ घालत त्याला स्वतः पासून दूर करतो. राजा दरबाराच्या जमिनीवर आदळतो.युवराज त्याची तलवार म्यानातून बाहेर काढत त्याच्या दिशेने चालत येतो.... राजा भीतीने मागे सरकतो समोर स्वतः त्याचा मृत्यू चालत येत असल्याचा भास त्याला होतो.पिळदार शरीरष्टी वर चमकणार चिलखत,रागाने लाल झालेले डोळे,शरीरावर आणि चिलखतावर उडलेले रक्ताचे शिंतोडे जे स्वर्ण सैनिकांच होत...असा हा ऐश्वर्य युवराज चालत येत राज्याच्या मानेवर त्याची तलवार ठेवतो..तो वार करण्याआधीच राजा त्याच्या पायावर डोक ठेवत रडत बोलतो
"मोठ्या मनाने माफी द्यावी युवराज"
"अपराध्याला क्षमा करण हे माझ्या क्रूर स्वभावास पटत नाही पूर्व स्वर्ण महाराज....पण मी मला शरण आलेल्या वर तलवार चालवत नाही त्यामुळे.....आज तुम्हाला मृत्यू मिळणार नाही"
" धन्यवाद धन्यवाद युवराज"
"वीर यांची कोठडीत रवानगी करा आणि उद्या सकाळी त्यांना भर चौकात फाशी देण्यात येईल"
"जी युवराज"
"नाही.....नाही माफी द्या युवराज माफी".....भद्रद्वीप युवराज चे पाय पकडत बोलतो
"आम्हाला अनोळखींचा स्पर्श सहन होत नाही".......राजाला लाथ मारत युवराज बोलतो आणि सैनिकांना त्याला तिथून नेण्याचा इशारा करतो.
क्रमशः
----------------------------------------------------------
हा ऐश्वर्य युवराज कोण?... आणि याच खर नाव तरी काय?...कळेलच पुढच्या भागात.