Geet Ramayana Varil Vivechan - 14 in Marathi Mythological Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | गीत रामायणा वरील विवेचन - 14 - मोडू नका वचनास नाथा

Featured Books
Categories
Share

गीत रामायणा वरील विवेचन - 14 - मोडू नका वचनास नाथा

राजा दशरथांनी जेव्हा श्रीरामांस राज्यपदी बसवण्याचा निर्णय घेतला तेव्हा भरत व शत्रुघ्न आपल्या आजोळी गेले होते.

ते नसताना राज्याभिषेक करणे हे देवी कैकयी च्या दासीला म्हणजेच मंथरेला व कैकयी ला सुद्धा खटकले. नक्की काहीतरी ह्यात गोम आहे असे त्या दोघींना वाटू लागले. मंथरेने कैकयीच्या डोक्यात गैरसमज भरून दिला.
देवी कौसल्या ह्याच राजे दशरथांना प्रिय असून श्रीराम च त्यांचा प्रिय पुत्र आहे.
म्हणूनच आज भरत नसताना श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे.
उद्या राम राजा झाला की कौसल्या देवी राज माता होतील मग तुला आणि तुझ्या मुलाला काहीहि महत्व राहणार नाही.
असे मंथरेने कैकयीचे मन कलुषित करून टाकलं.
मग आता मी काय करू असे कैकयीने मंथरेला हतबुद्ध होत विचारलं. तेव्हा मंथरेने थोडा विचार केला व कैकयीला भूतकाळातील एका प्रसंगाची आठवण करून दिली ती अशी की:-
***********************************
(काही ठिकाणी अशी कथा वाचायला मिळते की

कैकयी ही दशरथाची तिसरी पत्नी होती व अत्यंत प्रिय असल्याने तो आपल्या पत्नीस सदैव आपल्या सोबत नेत असे. अगदी युद्धात ही सोबत घेत असे. काही ठिकाणी असे वाचण्यास मिळते की कैकयी ही फार हुशार असल्याने दशरथ तिच्याकडून राजकारणात सल्ले घेत असे युद्धनीतीचे सल्ले घेत असे त्यामुळे युद्धयाच्या समयी कैकयी बऱ्याचदा दशरथाच्या रथाचे सारथ्य करत असे. त्यामुळे एका युद्धाच्या समयी कैकयीने राजा दशरथ आपल्या रथात जखमी पडला असताना तो रथ रणभूमीच्या बाजूला नेऊन दशरथावर औषध उपचार केले व दशरथाचे प्राण वाचवले.

आणखी एक कथा अशी वाचायला मिळते की कैकयी ने दुर्वास ऋषींची सेवा केली असता दुर्वास ऋषींनी तिला तुझा हात वज्रसमान शक्तिशाली होईल असा आशीर्वाद दिला आणि काही काळाने जेव्हा एका सूर-असुरांच्या युद्धात कैकयी आणि राजा दशरथ सामील होते तेव्हा युद्धसमयी राजा दशरथाचे चाक निखळून पडणार होते तर कैकयीने ते चाक धरून ठेवले आणि दशरथाचे प्राण वाचले.

काही ठिकाणी असे वाचावयास मिळते की त्याच युद्धात एकदा रथाचे चाक धरून ठेवून आणि एकदा रथाला बाजूला नेऊन औषधोपचार करून असे दोनदा प्राण वाचवल्याने दशरथाने तिला दोन वर मागण्यास सांगितले होते.

राजाने कैकयी ला कोणतेही दोन वर मागण्यास सांगितले. तेव्हा कैकयी म्हणाली की योग्य वेळ येताच मी हे वर मागेन.

(ह्याचा अर्थ त्याकाळी स्त्रिया सुद्धा युद्धात भाग घेत असत किंवा कदाचित तशीच काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असावी म्हणून कैकयीला युद्ध भूमीत यावं लागलं असावं.)
( एक प्रश्न मनात येतो की कैकयी जर एवढी हुशार होती मग तिला आपल्या दाईचे किंवा दासी मंथरेचे का ऐकवेसे वाटले? मंथरेचे ऐकून आपला विनाश होईल असे तिला का कळले नाही? )
*******************************
कैकयीने दासी करवी दशरथास निरोप पाठवला.
देवी कैकयी कोपगृहात आहे हे कळताच काळजीने दशरथ कैकयी च्या कक्षात आले. तिथे कैकयी केसं मोकळे सोडून काळे वस्त्र परिधान करून विलाप करीत होती.

"हे देवी कैकयी आपणास काय झाले आहे? आपल्या ह्या अवस्थेला कोण कारणीभूत आहे हे आम्हास सांगावे",दशरथ

"नाथ ह्या अवस्थेस आपणच कारणीभूत आहात",कैकयी

"ते कसे काय? आमच्याकडून काही आगळीक(चूक) झाली आहे का?",राजा दशरथ

"आपल्याला देवी कौसल्या व श्रीरामच जास्त प्रिय आहे असे दिसते.",देवी कैकयी

"असे आपणास का वाटावे? मला तीनही राण्या व चारही पुत्र सारखेच प्रिय आहेत देवी",राजा दशरथ

"तसं असेल तर नुसते शब्द उपयोगी नव्हेत आपल्याला कृतीतून ते दाखवावे लागेल. आपण त्वरित भरताला आजोळी हुन बोलवा व त्याला राज्यपदी बसवा.",कैकयी

"ते कसे काय शक्य आहे? मी श्रीरामाला शब्द दिला आहे की त्यालाच राज्यपदी बसवेन",दशरथ

"आपल्याला श्रीरामास दिलेले वचन लक्षात आहे पण आठवा तो दिवस जेव्हा दंडकवनात सम्बरासुर राक्षसासोबत देवराज इंद्राचं युद्ध सुरू होतं त्यात आपण देवांच्या बाजूने लढत होतात. तेव्हा आपले प्राण धोक्यात असताना मी आपणास वाचवले तेव्हा आपण प्रसन्न होऊन मला दोन वर मागावयास सांगितले होते जे मी योग्य वेळ येताच मागेन असे म्हंटले होते. आज ती वेळ आली आहे.
एक वर मी असा मागते की भरतास राज्याभिषेक करा.
व दुसरा वर मी असा मागतेय की रामास चौदा वर्षे वनवासास पाठवा.",कैकयी

"कैकयीsss कुलक्षणेss तुला कळतेय का तू काय बोलतेय ते?",राजा दशरथ क्रोधाने थरथरत म्हणाले.

"तुम्ही काहीही म्हणा माझे हे दोन वर आहेत जे तुम्ही अमान्य केले तर रघुवंशाला बट्टा लागेल. प्राण जाईल पण वचनभंग होणार नाही ही रघुकुळाची रीत आहे.",कैकयी निलाजरेपणे म्हणाली.

"कैकयी ऐक! भरतास मी राज्याभिषेक करण्यास तयार आहे पण रामास वनवास का? त्याऐवजी तू दुसरा वर माग",दशरथ

"महाराज मी माझे दोन्ही वर आपल्याला सांगितले आहेत त्यात यत्किंचितही बदल होणार नाही.",कैकयी बेपर्वाईने म्हणते.

हे ऐकताच दशरथास भोवळ येते व ते भिंतीचा आधार घेऊन तिथेच बसतात त्यावर कैकयी त्यांना बेदरकारपणे म्हणते
"महाराज आता मूर्च्छा येण्याचे नाटक नका करू. रघुवंशाला जागा आणि माझे दोन्ही वर त्वरित पूर्ण करा. आता आकाशातला चंद्र निखळून पडो किंवा जमीन दुभंगून जाओ मी माझे दोन वर पूर्ण झाल्याशिवाय ऐकणार नाही.",कैकयी दुराग्रहीपणे म्हणते.

(रामायणात पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात.
जय श्रीराम🙏🚩)

★★★★★★★★★★★★★★★★★★
मोडु नका वचनास नाथा मोडु नका वचनास
भरतालागीं द्या सिंहासन, रामासी वनवास

नलगे सांत्वन, नको कळवळा
शब्द दिले ते आधी पाळा
आजोळाहुन परत बोलवा, झणि माझ्या भरतास

उत्साहाने हो‍उन वेडे
का घेता हे आढेवेढे?
वचनभंग का शोभुन दिसतो, रघुवंशज वीरास?

दंडकवनि त्या लढता शंबर
इंद्रासाठी घडले संगर
रथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आस?

नाथ रणी त्या विजयी झाले
स्मरते काते काय बोलले? -
"दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस"

नारिसुलभ मी चतुरपणाने
अजुन रक्षिली अपुली वचने
आज मागते वर ते दोन्ही, साधुनिया समयास

एक वराने द्या मज अंदण
भरतासाठी हे सिंहासन
दुजा वराने चवदा वर्षें रामाला वनवास

पक्षपात करि प्रेमच तुमचे
उणें अधिक ना यांत व्हायचे
थोर मुखाने दिलेत वर मग, आता का निःश्वास?

प्रासादांतुन रामा काढा
वा वंशाची रीती मोडा
धन्यताच वा मिळवा देवा, जागुनि निज शब्दांस

खोटी मूर्च्छा, खोटे आसू
ऐश्वर्याचा राम पिपासू
तृप्त करावा त्यास हाच की आपणांसि हव्यास

व्योम कोसळो, भंगो धरणी
पुन्हा पुन्हा का ही मनधरणी?
वर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★