नाती -एक विखारी प्रवास
ती त्याच्या खांद्यावर मान ठेवून डोळे मिटून बसली होती. तिला खुप दिवसांनी शांत झोपायच होत पण झोप येत नव्हती. बसच्या खिडकीतून येणारा गार वारा अंगाला स्पर्श करून जात होता.बाजूने जाणार्या वाहनांचा आवाज मध्ये-मध्ये कानात पडत होता.विचारांचे अनेक भुंगे तिचा मेंदू कुरतडत होते.
तिने मान झटकली. तिची चुळबुळ बघून त्याने हलकेच तिच डोक प्रेमाने थोपटले.
तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले अर्धवट प्रकाशात त्याच्या डोळ्यातले भाव तिला वाचता आले नाहित.
" हे सगळं खर आहे?" तिने विचारले.
" का? तूला शंका का आली? मागच सार आयुष्य विसर. आपण दोघ नव आयुष्य जगणार आहोत...नव्या उमेदीने...मी ...मी तुला सुखात ठेवीन. " तो म्हणाला.
तिने बाहेर पाहिले.दूरवरचे दिवे...गाडीच्या वेगासोबत मागे- मागे जात होते.मध्येच अंधार होत होता व पुन्हा नव्याने दिवे दिसत होते. ती विचार करत होती की आज पर्यंतच्या आयुष्यातले दिवस पुसून टाकण्याचा एखादा खोडबर असता तर तिने
मागील आयुष्यातला एक क्षणही शिल्लक ठेवला नसता.
अगदी नाव..गाव...नाती -गोती अगदी सगळं -सगळ
तिला फेकून द्यायच होत.किती भीषण व वेदनादायी आयुष्य होत तिचं? नुसत्या आठवणीने ती शहारली. लोखो थंडगार साप अंगावरून रेंगाळत गेल्यासारखे तिला वाटल.तिने दचकून त्याचा दंड गच्च पकडला.
तिच्या या छोट्या आयुष्यात अनेक वेळा तिच नाव व गावही बदलल होत. खरच आता नव्याने तिच आयुष्य बदलेल? ती विचारात हरवली.
एकोणीस वर्षाची 'मधुरा 'अल्लड तेवडीच निरागस होती पण एकोणीसाव्या वर्षी बापाने तिला बोहल्यावर उभ केल. मुलगी म्हणजे ओझ..शिकून पुढे काय करायच ? अश्या विचाराचा बाप.संसार म्हणजे नेमक काय याचा अर्थही माहित नसताना ती संसारात पडली. मधुराची
'अवंती ' झाली. नवरा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता.
वैवाहिक जीवनांबद्दल कोमल भावना असलेल्या मधुराचा पहिल्याच रात्री भ्रमनिरास झाला.ओरबडणे...दुसर्याच्या
भावनांचा विचार न करता फक्त शरीराशी खेळणे म्हणजेच लग्न! अशी तिची भावना झाली.प्रेम...विश्वास...एकमेकांना ओळखत..समजत एकमेकांना सुख देण या तिच्या धारणेला तडा गेला.वर्षभरात नवर्याचे अनेक रंग तिला जाणवेले.अगदी दारू पिऊन..मारझोड करणे..अर्वाच्य शिव्या देणे, त्यात सासूचा जाच.मधुराच जीवन नरकासारख झाल.माहेरच दार तर कधीच बंद झाले होते.दारातल पायपुसण एवडाच
तिच्या जीवनाला अर्थ राहिला होता.अखेर तो दिवसही आला.मधुराला तिच्या नवर्याने व सासूने हात धरून बाहेर काढले.रात्रीचे अकरा वाजले होते. अंधार्या रात्री ती रस्ता तुडवत आसरा शोधत होती.तिच्यासाठी गावातल कुठचच दार या वेळी उघड नव्हते. अखेर एका गुरांच्या गोठ्यात त्या मुक्या जनावरांसोबत तिने रात्र काढली.भल्या पहाटे ती बेभान अवस्थेत गावातल्या स्टॅंण्डवर गेली.फलाटावर उभ्या असलेल्या एका एस.टीत बसली.ती बस कुठे जाते...तिला कुठे जायचय काहीच तिला समजत नव्हते.
" बाई , कुठे जाणार?" कंडक्टर तिला विचारत होता.
बाहेर पडताना कनवटीला खोचलेली एक शंभरची नोट तिने कंडक्टरला दिली.
" कुठच तिकीट देवू ?"
"गाडी कुठे जाते?" तिने प्रतिप्रश्न केला.
" रत्नागिरीला. "
" यात येईल तिकीट?"
कंडक्टरने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले.
तिचा एकंदर अवतार बघून तो संभ्रमित झाला होता.
संशयित नजरेने तिच्याकडे बघत त्याने तिला तिकिटं दिल.
भुकेलेली मधुरा रत्नागिरीला उतरली तेव्हा भुकेने
कासावीस झाली होती. स्टॅण्डच्या समोर असलेल्या खानावळीत ती गेली. शिल्लक राहिलेल्या पैश्यात चहा व वडापाव घेतला.तिथे जेवण वाढणार्या बाईला
तिने भित - भित विचारल.
" आई , मला इथ एखाद काम मिळेल?" तिने विचारले.
" कुठून आलीस? तुझ कुणी नातेवाईक नाही?"
त्या बाईने तिला न्याहाळत विचारल.
मधुराने तिला काहिही न लपवता आपली सर्व कर्मकहाणी सांगितली. त्या बाईला तिची दया आली.खानावळीत जेवण करण्याचे काम तिला दिल. जेवण मोफत मिळणार होत.थोडा पगार मिळणार होता.तिने निर्विकारपणे मंगळसूत्र विकले.
ज्याने आपल कर्तव्य निभावल नाही त्या नात्याची तमा का बाळगावी? त्या पैश्यात तिने खानवळीच्या
बाजूलाच एक छोटी खोली भाड्याने घेतली. आयुष्य थोड सावरल अस तिला वाटल.खानावळीत तिचा वेळ जावू लागला.मन रमल.
अशीच एक बाई खानावळीत जेवायला आली.बोलता -बोलता ओळख झाली.पुणे इथे राहणारी ही बाई रत्नागिरीत काही कामासाठी आली होती.ती बाई मधुरा सोबत तिच्या खोलीत राहिली.खानावळवाली बाई म्हणाली ' अग तिची ओळख ना पाळख उगाचच तिला थारा दिलास."
ती बाई सकाळी बाहेर पडायची दुपारची यायची.रात्री गप्पा गोष्टी होत.तिने मधुराची माहिती काढून घेतली. तिच सांत्वन केल.तिच्या धाडसाचे कौतुक केले म्हणाली...
" खुप सोसलस बाई, एक काम कर माझ्या सोबत पुण्याला चल चार दिवस रहा. विश्रांती मिळेल बदल होईल.माझा बंगला आहे."
मधुराला वाटल चला, दोन दिवस बदल होईल. खानावळीत तिने चार दिवस सुट्टी घेतली.
" मधु, जा पण काळजी घे.लवकर ये."खानावळवाली बाई म्हणाली.
" हो आई, लवकरच येते.काळजी करू नका."
पण...पण...तिला माहित नव्हते नियतीने तिच्यासाठी काय वाढून ठेवल होत.पुण्यात सोनवणेबाई तिला एका छानदार बंगल्यात घेवून गेल्या .आजुबाजुला तसेच पाच सहा छोटे बंगले होते. शहराच्या थोड बाजूला ही वस्ती होती.त्या दिवशी संध्याकाळी सोनवणेबाई पटकन जाऊन येते अस सांगून कुठेतरी गेल्या. त्या घरातली एक पन्नास एक वर्षांची बाई तिला म्हणाली " चल, तुझ्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्यात.."
" माझ्यासाठी? पण का? सोनवणेबाई कुठे गेल्या?"
ती बाई हसली.तिच्या हसण्यात अस काहीतरी होत की मधुरा चरकली.
" तुला आता नटाव लागेल. तुझ्यासाठी इथ लोक येतील.त्यांना खुष कराव लागेल.तुझ्या सोबत आलेल्या बाईने तुला विस हजारात विकलय. समजल."
"क..क...काय? मी ...तसली नाहिय...मी घरंदाज स्त्री आहे.म...मला जाऊ द्या...मला इथून जायचय..पाया पडते मी तूमच्या."
" अरे ये, छमीया रोना बंद कर दे. इथ पहिल्यांदा येणार्या सगळ्याच घरंदाज असतात. कुणी आपल्या मर्जीने येत नाही. समजल..! आणि हो एकदा इथ आल्यावर पुन्हा जाता येत नाही..मरेपर्यंत!"
" माझ्यावर दया करा. मला विकणारी ती कोण? .. मला जाऊ द्या"
मधुराने टाहो फोडला.
" ले...मुझे तुझपर तरस आ रहा है.मेरे बीस हजार अभी दे.मी तुला सोडते. आहेत पैसे तुझ्याकडे?"
मधुरा रडत राहिली...डोक आपटत राहिली.
" येडी ..लडकी...अग कुणावर विश्वास ठेवायचा ते पण कळल नाही. उसका काम है पाखरू धुंढना और यहा लाना.अब नखरे मत कर." मधुराचे केस ओढत ती बया म्हणाली.
मधुराची मंजुळा झाली.तिच्या देहाचे जबरदस्तीने लचके तोडले गेले.ती हसण...रडण सारच विसरली.तिथून बाहेर पडण शक्यच नव्हते. तिच्यासारख्या आणखीही काहीजणी त्या घरात होत्या.सगळ्यांवर नजर ठेवली जात होती.पूर्वी कुण्या मुलीने पळण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या देहाचे तुकडे वेगळ्या ठिकाणी फेकले गेले होते.अगदीच कुणाला काही कामासाठी बाहेर जाव लागल तर सोबत एखादा इसम असायचा.त्याची निर्विकार नजर सर्वत्र फिरत राहायची.ती कोठेवाली बाई म्हणाली होती.
" भागनेकी सोचनाभी मत, ...तंगड्या तोडून अपाहिज करून रस्त्यावर फेकेन..समजल.पुलीस हमारी जेब मे होती है."
सात - आठ महिने झाले अनेकांची शय्या सजवून झाली. जे घरी बायकोसोबत करता येत नव्हते ते करण्यासाठी ह्या ठिकाणी लोक येत.तरूण...प्रौढ...अगदी लोचट म्हातारे ...बरेच राजकारणी...पोलीस अधिकारी...व्यवसायीक...अगदी एखाद दुसरा शिक्षकसुध्दा यायचा. शेवटी देहाच्या वासना सार्या संस्कारावर मात करतात हेच खर.ही माहिती इथला पंधरा वर्षाचा एक पोरगा 'लाल्या ' तिला द्यायचा. सगळी दारे त्याच्यासाठी उघडी होती.त्याचा जन्म तिथेच झाला होता.तो वस्तीतल्याला सगळ्या घरात फिरायचा.वैराण वाळवंटातला तो एक छोटा सुखद झरा होता.पहिल्यांदा मधुराने त्याला त्याची ओळख विचारली तेव्हा तो म्हणाला...." दिदी , यहां कोई किसका नही होता.. लहानपणा पासून मी ऐकत आलोय..." रंडी का बेटा, यही मेरी पहचान है. मेरा बाप कौन है मालूम नही...माॅ एक दिन किसी रोग के कारण दम तोड गयी. शेवटच्या क्षणी तिला बघितल पण नाही.अब उसका भी चेहरा भूल गया हूॅ"
बापरे, किती भयाण...उघड-नागड जग आहे हे. त्यावेळी ती खुपच उदास झाली होती. ' रंडी का बेटा' हे शब्द तिच्या कानाला इंगळ्यासारखे ढसत होते.उद्या चुकून आपल्याला मूल झाल तर.?..आणि...आणि...तिला त्या पुढचा विचारही करवला नाही. अरे देवा! कुठे फेकलस मला? नको ! असल आयुष्य..कुणालाच देवू नकोस.तिचा सगळ्यावरचा विश्वासच उडून गेला होता.पण एक दिवस तो आला.ती नेहमीप्रमाणे तयार होती.तो आता आपल्या देहावर तुटून पडणार...देहाचे लचके तोडणार.... या अपेक्षेने ती वाट बघत होती.पण तो तिच्या पलंगावर बसला. साधारण तिच्याच वयाचा होता तो.
" हे बघ मला , तुझ्याकढून काहिच नको. फक्त तुझ्याशी बोलायचय. " तो मृदू स्वरात म्हणाला.
ती थक्क झाली.
" फक्त बोलण्यासाठी एवडे पैसे मोजलेस?"
" मला देहाची भूक नाही...बाईने तूझा फोटो दाखवला ...मला तूझा चेहरा बघून वाटल तू खूप भोगलय...तूझ्याशी बोलाव."
तो तासभर तिथे थांबला. त्याने तिला साधा स्पर्शही केला नाही. तो असाच दर आठवड्याला येत राहिला. अखेर तिने त्याला आपल्याबध्दल सांगितल.तिची गाथा ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो तसाच स्तब्ध बसून राहिला.असच एक दिवस तो म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायच !
ती प्रचंड दचकली....सुन्न झाली. हे ...हे कस शक्य
आहे. एका वेश्यशी लग्न करण्याची इच्छा कोण धरू शकतो.ती गप्प बसलेली बघून तो म्हणाला "
नाही म्हणू नकोस मी ..मी...कोलमडून पडेन."
" हे बघ ते शक्य नाहि.ती .कोठेवाली मला सहज सोडेल? वीस हजा मोजलेत तिने माझ्यासाठी. "
" मी देईन तिला विस हजार.." तो म्हणाला.
जगावरचा विश्वास उडालेली ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली.
पुढच्याच आठवड्यात त्याने विस हजार भरले.तिला घेवून तो बाहेर पडला.एका देवळात त्यांनी लग्न केल.ती हरखून गेली. आपण पुन्हा नव्याने बाहेरच्या जगात जाऊ हेच तिने मनातून काढून टाकल होत.लग्न केल्यावर तो तिला गोव्यात घेवून चालला होता.गोव्यात त्याची मावशी राहत होती.आज ती त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून बसली होती.मधुराला सार आठवल.नव्याने आपण आयुष्य सुरू करू ...अशी संधी चुकून कोणालातरी मिळते.
" मधुरा, उठ.... आपल्याला उतराच आहे."
तिने आपली बॅग उचलली व खाली उतरली.
" मावशी ..मला स्विकारेल?"
" का नाही... ? ती आधुनिक विचाराची आहे. दोन तिन दिवसात आपण खोली घेवू. चल."
पुन्हा एक बस पकडून ती तासाभरात एका थांब्यावर उतरली.
एका टुमदार घरासमोर ती दोघ पोहचली .तिथे दूर दूरवर काही घर होती...बाकि सगळी शांतता होती.
एका प्रौढ स्रीने त्यांच स्वागत केल.तो आत गेला.ती एका खोलीत गेली...आपली बॅग ठेवून ती एक दिर्घ सुस्कारा सोडून खुर बसली. आजूबाजूला नजर फिरवताना तिला त्या वातावरणात काहीतरी परीचित वाटल.तिच मन तिला कसली तरी जाणीव देत राहिल.तो फ्रेश होवून आला.मावशीने त्याला काहीतरी आणण्यासाठी बाहेर पाठवल.
मावशी तिच्याखोलीत आली.तिच्या हनुवटीला हात धरून तिचा चेहरा डावीकडे - उजवीकडे फिरवला.
" छान दिसतेस...पस्तीस हजार रूपये लवकरच फिटतील."
" पस्तीस हजार..." मधुरा सुन्न झाली. थिजलेल्या डोळ्यांनी ती समोर बघत राहिली.
" त्या भडव्याने तूझ्या सोबत डबलगेम केला. बाकी तूला काय फरक पडतो म्हणा.विस हजार देवून पस्तीस हजार घेतले अधिक येण्या-जाण्याचा खर्च"
" मावशी..मला फक्त एकदा त्याला भेटायच. येणार तो पुन्हा?" ती सपाट स्वरात म्हणाली.
" होय तो येईल मी त्याला सगळे पैसे दिले नाहित. आत्ता तो बार मध्ये गेला असेल.पाठवते त्याला ..पण त्याचा काहिही फायदा होणार नाही. तो व्यवसायीक दलाल आहे.पण मी त्याला पाठवते..आणि हो इथून..."
" इथून पळून जायचा प्रयत्न करू नकोस...हेच ना!"
मावशीला मध्येच थांबवत ती म्हणाली.ती विचित्रपणे हसली.
कोणही येतो तिला कूणालाही विकतो. मुक्या गायीसारखी तिची अवस्था झालीय. तिच मन...तिच्या भावना कश्यालाही या जगात अर्थ नव्हता. तिन मन स्थिर केल. व त्याची वाट पाहू लागली. अखेर तो आत आला. त्याचे डोळे लाल झाले होते.
काही क्षण ती त्याच्याकडे बघत राहिली.तिच्या नजरेतली आग ....विखार बघून त्याने आपली नजर फिरवली.
" का? का? केलस अस?"
तो तसाच गप्प उभा राहिला.त्याचा चेहरा निर्विकार होता.
" हे बघ तू परत- परत फसत राहिलीस माझा दोष काय? मी हाच धंदा करतो." तो कसबस तोंड करत म्हणाला.
" माझा सगळ्या नात्यांवरचा विश्वास उडाला होता. पण प्रेमावर विश्वास होता...जे मला तुझ्यात दिसल होत. भाऊ..बहिण ...मुलगी...आई....सखा सगळीच नाती फोल असतात का रे? उद्या कुणी कुणावर विश्वास ठेवायचा.? जगायच कश्याच्या भरवश्यावर? त्या सोनवणे नाव सांगणार्या बाईने मोठ्या बहिणीच नात सांगून मला विकल.. दलदलीत ढकलल...एक स्त्री दुसर्या स्रीला तिसर्याच स्त्री ला विकते किती रानटीपणा आहे हा !नवर्याने ...आणि बापाने फसवल...माझ उदाहरण बघून कोण कुणावर विश्वास ठेवेल.?"
अचानक मधुराने समोर फळांच्या डिशमध्ये ठेवलेली सुरी उचलली.काही कळायच्या आत तिने आवेगाने त्याच्या छातीत सुरी खुपसली...संतापाने लाल होत ती पुन्हा- पुन्हा सुरीचे वार करत राहिली.
तो रक्तबंबाळ होत खाली पडून तडफडत आचके देत राहिला. रक्ताळेली सुरी हातात धरून ती शून्यात बघत राहिली. एवड्यात खोलीत कुणी दबक्या पावलाने आला.दरवाजा बंद करून तो वळला.
" दिदी ..ये ..ये..क्या किया...? " तो तिला गदागदा हलवत म्हणाला.ती भानावर आली.
" लाल्या ..! लाल्या तू इथ कश्याला आलास? "
" मला पक्का संशय होता.हा तूला फसवतोय...मी दुसरी गाडी पकडून मागोमाग आलोय. दिदी तुम भाग जाओ.मी...मावशीच्या खोलीचा दरवाजा बंद केलाय. वो सुरी मुझे दे दो.मी पोलीसांना सांगेन मी खून केलेय...भाग..भाग दिदी.मेरा तो कोई नही है. रंडी का बच्चा जो ठहरा. पळ ना.मै कहता हूॅ जल्दी भाग जा. ." तो तिला विनवत होता.
" नाही.." ती ठामपणे म्हणाली.
" कश्याला भुलवतोस मला? पुन्हा नव्याने कुणावर विश्वास मला ठेवायचा नाहिय. नव नात जोडायच नाही .तू...तू जा! कोवळे वय आहे तुझे.माझ्या आयुष्याच मातेरे केव्हाच झालय. अहिल्या...माधवी...फक्त आणि फक्त पुराणातच आढळतात.मी माझी लढाई आता कोर्टातच लढेन.हो तिथपर्यंत पोहचले तर...! ओरडून सांगेन सगळ्यांना माझी कहांणी. जमलच तर एक काम कर...नव्हे वचन दे. कुणाची बहिण....कुणाची मुलगी... कुणाची आई...जबरदस्तीने इथे आणली जाऊ नये यासाठी प्रयत्न कर.याच्यासारखे अनेक दलाल कोवळ्या भोळ्या व अगतीक मुलींना फसवतात.गोड बोलून आपल्या जाळ्यात ओडतात. बुरखे घालून वावरणार्या या दलालाना ओळखून त्यांचे बुरखे टराटरा फाड. ' सेक्स वर्कर....समाजाला वाचवणारी. ' अस गोंडस नाव देतात लोक..या धंद्याला.कोवळे तरूण...येतात अश्या वस्तीत.जमलच तर त्याना थांबव...चळवळ उभार.मला तुझ्यात उद्याची आशा दिसते आहे. करशील एवडे?'" बोलता - बोलता तिला धाप लागली. डोळ्यात संतापाने रक्त उतरल.
" दिदी...मै करूंगा यह सब...हो..हो..लढेन मी...या सगळ्याशी....या व्यवस्थेशी! मी पण यातून जन्माला आलेला समाजाला नको असलेला ...अनचाही देन हूं. "
तो रडत -रडत म्हणाला. कोण कुठचा निरागस मुलगा तिच्यासाठी आसव ढाळत होता. तिच्यासाठी खंतावला होता.त्याच्यात तिने एक
ठिणगी पेटवली होती.
तो वळला...तस मधुराने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या खिशातला मोबाईल काढला व पोलीसांना फोन केला.
" माझ्या हातून इथ एक खून झालाय.लवकर या." एवढे बोलून तिने फोन फेकला व रक्ताने माखलेल्या हातात सुरी धरून खुर्चीत बसली.
खिडकीतून , दूर...दूर जाणारा पाठमोरा लाल्या तिला दिसत होता.
-----------*-------*------------*-------*-------*------
बाळकृष्ण सखाराम राणे