Murder Weapon - 17 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | मर्डर वेपन - प्रकरण 17

Featured Books
Categories
Share

मर्डर वेपन - प्रकरण 17

प्रकरण १७
सकाळी पुन्हा कोर्ट चालू झालं तेव्हा कोर्टात सूज्ञा आली नव्हती.कोर्टाने खांडेकरांना खुणेनेच काय झालं म्हणून विचारलं.
“ युअर ऑनर, पोलिसांना अजून सूज्ञा सापडली नाहीये.” खांडेकर म्हणाले. “ पण आज ते तिला नक्की शोधून काढतील.”
“ तुम्हाला तो पर्यंत आणखी काही साक्षीदार सादर करायचे आहेत?” न्या.ऋतुराज फडणीस यांनी विचारलं.
“ नाही युअर ऑनर.” खांडेकर म्हणाले.
“ युअर ऑनर , खुनी कोण असावं या बद्दल मला खात्री झाली आहे. त्यासाठी मला दोन साक्षीदारांची तपासणी करायची आहे. एक, अॅडव्होकेट भोपटकर आणि दुसरा कणाद मिर्लेकर. या दोघांच्या साक्षीतून खरा खुनी मी कोर्टासमोर हजर करेन. या दोन पैकी भोपटकर इथेच आहेत. मिर्लेकारांना कोर्टाने समन्स काढावा अशी विनंती आहे. मिर्लेकर येई पर्यंत कोर्टाची परवानगी असेल तर मला अॅडव्होकेट भोपटकर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. ” पाणिनीने विचारलं
कोर्टाने परवानगी दिली आणि भोपटकर पिंजऱ्यात आला. पाणिनीने उठून त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“केरशी इथे राहणाऱ्या उत्क्रांत उदगीकर हे तुमचे अशील आहेत?” पाणिनीने विचारलं
“ मिस्टर पटवर्धन, तुम्ही स्वत: वकील आहात.आपल्या अशिलांची माहिती बाहेरच्यांना द्यायची नसते.तुम्हाला माहित असेलच हे.” भोपटकर म्हणाला.
“ मी फक्त अशील आहेत वा नाहीत एवढंच विचारलं.पण ठीक आहे मी प्रश्न बदलून विचारतो, त्याना तुम्ही ओळखता? ” पाणिनीने विचारलं
आता भोपटकर चा नाईलाज झाला. तो उत्तरं न देता चुळबुळ करायला लागला.
“ युअर ऑनर भोपटकर यांना नसेल द्यायचं उत्तर तर मी उत्क्रांत उदगीकर यांना समन्स काढून इथे बोलावून ही माहिती घेऊ शकतो.पण त्यात वेळ जाईल, वकील या नात्याने कोर्टाला सहकार्य करायची त्यांची इच्छा असेल तर ..... ” पाणिनी म्हणाला.
“ हो ओळखतो मी त्यांना.” भोपटकर पटकन म्हणाला.
“ तुमची सेक्रेटरी सूज्ञा आणि उत्क्रांत ची मुलगी हिमांगी या मैत्रिणी होत्या? ” पाणिनीने विचारलं
“ मला माहीत नाही.”
“ तुमची अशील मैथिली आणि हिमांगी व सूज्ञा या सुद्धा एकमेकींच्या मैत्रिणी होत्या?”
“मला माहीत नाही.” भोपटकर म्हणाला.
“सूज्ञा ही घटस्फोटित आहे?” पाणिनीने विचारलं
“ हो.”
“ या तिघींची ओळख होण्याचं कारण म्हणजे सूज्ञा आणि मैथिली दोघीजणी उत्क्रांत च्या बंगल्यातल्या आवारात ज्या खोल्या भाड्याने दिल्या जायच्या त्यात राहायच्या? ” पाणिनीने विचारलं
“ माहित नाही.”
“घटस्फोट देतांना पती पत्नी यांना वेगळे राहावं लागत आणि पत्नीला जर माहेर नसेल तर तिला सहा महिने राहण्यासाठी उत्क्रांत या खोल्या भाड्याने द्यायचा? ”
“ मी ऐकल होतं तसं.” भोपटकर म्हणाला.
“ हिमांगी उदगीकर आणि सूज्ञा पालकर यांच्यात करार झाला होता की या खोल्यात भाडेकरू म्हणून घटस्फोटाच्या प्रतीक्षेतील स्त्रिया मिळवून द्यायच्या?”
“ मला नाही माहिती.”
“ याच प्रयत्नातून मिळालेली एक भाडेकरू म्हणजे मैथिली होती?” पाणिनीने विचारलं
“ माहित नाही.”
“ आणि दुसरी म्हणजे अंगिरस खासनीस ची सेक्रेटरी निवेदिता नंदर्गीकर होती? ”
“ ओह ! युअर ऑनर......” खांडेकर हरकत घेण्यासाठी उठून उभे राहिले. “ मूळ खटल्याशी काहीही संबंध नसलेले निरर्थक प्रश्न ...”
“ ओव्हर रुल्ड” न्यायाधीश ऋतुराज फडणीस म्हणाले. “ मला या सर्व प्रश्नांच्या उत्तरातून घटनांची एक विशिष्ठ साखळी उभी राहते आहे असे वाटते आहे. म्हणजे साक्षीदार जरी बहुतेक प्रश्नांना उत्तरे देत नसला तरी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन खुनाची पार्श्वभूमी काय असावी आणि हेतू काय असावा हे कोर्टाच्या नजरेला आणून देण्याचा प्रयत्न करताहेत असं मला वाटतंय.त्यांनी हे सर्व निवेदनातून सांगितलं असतं तर तुम्ही हरकत घेतली असती की केवळ तर्कावर आधारित पण पुरावा नसलेले विधान पटवर्धन करताहेत म्हणून. त्या ऐवजी पटवर्धन या साक्षीदाराच्या तोंडून खुनाची पार्श्वभूमी उलगडण्याचा प्रयत्न करताहेत.भले साक्षीदार त्यांना सहकार्य न करो.”
“ पण युअर ऑनर.....” –खांडेकर
“ मी फेटाळली आहे तुमची हरकत. खाली बसा.” न्यायाधीशांनी फटकारलं.
“ रायबागी एन्टरप्रायझेस च्या कणाद मिर्लेकर याचा तुमचा परिचय आहे?” प्रश्नांचा रोख बदलत पाणिनीने विचारलं
“ आहे. ”
“ कशी ओळख झाली तुमची?”
“रायबागी एन्टरप्रायझेस च्या बऱ्याचशा कायदेशीर बाबी मी हाताळत होतो. कणाद मिर्लेकर हे तिथे मॅनेजर आहेत.”
“ तुमची सेक्रेटरी आणि कणाद मिर्लेकर हे खास मित्र आहेत? एकमेकांवर प्रेम आहे त्याचं?” पाणिनीने विचारलं
“ मला माहीत नाही. माझ्या स्टाफ च्या खाजगी भानगडीत मी पडत नाही.”-भोपटकर
“ कणाद मिर्लेकर हा जुना कर्मचारी असून सुद्धा त्याला रायबागी एन्टरप्रायझेस मधे फारसे महत्व नव्हतं?”
“ ऑब्जेक्शन ! साक्षीदाराचा अंदाज आहे हा.”—खांडेकर.
“ सस्टेंड.” –फडणीस
“ भोपटकर, तुम्हाला तुमच्या सेक्रेटरी पालकर हिने सांगितलं की मिर्लेकर हा जुना कर्मचारी असून सुद्धा त्याला रायबागी एन्टरप्रायझेस मधे फारसे महत्व नव्हतं, अंगिरस खासनीस याला जबाबदारीची कामं दिली जात होती, हे खरे आहे की नाही. लक्षात ठेवा शपथेवर साक्ष देत आहात तुम्ही.” पाणिनी गरजला.
साक्षीदार चुळबुळला.
“ उत्तर द्या.” फडणीस म्हणाले.
“ होय.” भोपटकर नाईलाजाने म्हणाला.
“तुम्हाला तुमच्या सेक्रेटरी पालकर हिने सांगितलं की मैथिलीने तिला आश्वासन दिले होते की जेव्हा पद्मराग रायबागी मरेल तेव्हा तीच म्हणजे मैथिली हीच मालकीण होईल त्यावेळी मैथिली कणाद मिर्लेकरला चीफ एक्झिक्युटिव्ह करेल, म्हणजे रायबागी समूहाचा प्रमुख. हे खरे आहे की नाही ” पाणिनीने विचारलं
“ ही ऐकीव गोष्ट आहे युअर ऑनर. म्हणजे मैथिलीने पालकरला सांगितलेली त्यावर या साक्षीदाराला प्रश्न विचारले जाणे योग्य नाही. ” खांडेकर आक्षेप घेत म्हणाले.
“मी विधानाच्या सत्यतेबाबत प्रश्न विचारलेला नाही. मी फक्त एवढंच विचारलं की साक्षीदाराला सूज्ञा पालकर ने हे सांगितलं की नाही.साक्षीदार या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं देऊ शकतो.फक्त तो कोर्टात शपथेवर बोलतोय म्हणजे खरं बोलणं अपेक्षित आहे.” न्यायाधीशांनी निर्णय देण्याआधीच पाणिनी म्हणाला. ”
“ अगदी याच शब्दात नाही पण तशा अर्थाचं विधान सूज्ञाने माझ्याशी बोलताना केलं.”
“ दॅटस् ऑल.” पाणिनी म्हणाला. “सध्यातरी भोपटकर जाऊ शकतात. मला या नंतर कणाद मिर्लेकर यांना प्रश्न विचारायला परवानगी द्यावी.”
“ मिर्लेकर हजर आहेत इथे. सरकारी वकिलांची काही हरकत मिर्लेकरांच्या साक्षीला?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ नाही.”—खांडेकर म्हणाले.मिर्लेकर आत आला.पिंजऱ्यात उभा राहिला.
“ कणाद मिर्लेकर, हा पदाचा विचार केला तर ऑफिसात तुम्ही खासनीसचे बॉस होता?” पाणिनीने विचारलं
“ हो.” कणाद मिर्लेकर म्हणाला.
“ त्याचं आणि तुझं कामाचं स्वरूप काय होतं?”
“ मी रायबागी साहेबांच्या खालोखाल होतो.,सर्वच विभागाचा प्रमुख.सर्वांच्या कामाचे नियंत्रण नाही म्हणता येणार पण पाठपुरावा करायचे काम आणि त्याची अद्ययावत माहिती साहेबाना द्यायची जबाबदारी माझ्याकडे होती.”
“ बँकेचे व्यवहार कोण पहात असे?” पाणिनीने विचारलं
“ मीच पहात असे. ”
“तुमच्या देणेकऱ्यांना म्हणजे क्रेडीटर ना तुम्ही ज्या चेक ने पेमेंट करायचात ,ते मूळ चेक्स तुम्ही बँकेतून परत घ्यायचात? ”
“ हो तशी पद्धत होती.बँक आम्हाला मूळ चेक परत द्यायची आणि त्यांच्याकडे त्याची कॉपी ठेवली जायची.” मिर्लेकर म्हणाला.
“ जवळ जवळ रोजच कुठले न कुठले चेक्स काढले जायचे?”- पाणिनीने विचारलं
“ हो.”
“ आणि मूळ चेक्स किती दिवसांनी तुम्हाला बँकेकडून मिळायचे?”
“ आठवड्यातून एकदा.”-मिर्लेकर.
“ शेवटचे चेक्स कधीचे आलेत तुमच्या ताब्यात? म्हणजे आज ८ तारीख आहे. तर १ तारखेचे चेक्स तुमच्याकडे असतील? ” पाणिनीने विचारलं
“ हो.”
“ आणि त्यावर तुझ्या सह्या आहेत?”
साक्षीदार चुळबुळला.
“ उत्तरं दे.” पाणिनी गरजला.
“ हो सर माझ्या सह्या आहेत. म्हणजे असतील, त्यावर.”
“ ठीक आहे मला मागच्या आठवड्यातले कोणतेही ३-४ चेक्स ,ज्यावर तुझ्या सह्या आहेत, असे तू मला दाखवायला आणू शकतोस? लगेच? ” पाणिनीने विचारलं
“ नाही सर, माझ्या सह्या नाहीत.”-कणाद म्हणाला.
“ कुणाच्या सह्यांनी चेक्स इश्यू झाले आहेत?” पाणिनीने विचारलं
“ अंगिरस खासनीस.” कणाद मिर्लेकर म्हणाला आणि न्यायाधीश ऋतुराज फडणीस एकदम सावध झाले.
“ कणाद मिर्लेकर, आता नीट ऐक, मी सांगतो अशीच वस्तूस्थिती आहे की नाही सांग मला, ” पाणिनी म्हणाला. आणि खांडेकरच काय न्यायाधीश पण एकदम कान टवकारून ऐकू लागले.
“ तू पद्मराग रायबागी चा सर्वेसर्वा होतास.त्याच्या खालोखाल तू त्याच्या ऑफिसचा प्रमुख होतास. होतास.भूतकाळात.पण गेले काही महिने तुला कोणतीही महत्वाची कामे दिली जात नव्हती. रायबागी साहेबांनी तुला हेतूपुरस्सर थोडा लांब ठेवला होता. विशेषतः बँकेचे कोणतेही काम त्यांनी तुला करू दिले नव्हते.ते अंगिरस कडे सोपवले होते. याचं कारण असं आहे कणाद,की तू मोठा फ्रॉड केला होतास.आर्थिक घोटाळा.रायबागीच्या ,म्हणजे कंपनीच्या खात्यातून गेले काही महिन्यात थोडी थोडी रक्कम काढून एकूण मोठ्या रकमेचा अपहार केला होतास.आणि ही रक्कम तू चतुराईने स्वत:च्या खात्यात वर्ग न करता दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्याला वर्ग केलीस कारण तुझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून. पण रायबागी यांना तुझा संशय आला होता.पण पूर्ण पुरावा मिळाल्यावरच ते पोलिसात जाणार होते.पुरावा मिळवण्यासाठी त्यांनी एक विशेष ऑडीट चालू केलं होतं. दरम्यान बँकेला पत्र देऊन तुला असलेले चेकवर सह्या करायचे अधिकार काढून घेतले होते आणि ते खासनीस ला दिले होते.पोलिसात तक्रार केली गेली असती तर तू पूर्ण संपला असतास.आणि म्हणूनच रायबागी चा मृत्यू होणं तुझ्यासाठी आवश्यक होतं.” पाणिनी कडाडला.
“ धादांत खोटं आहे हे सर्व. मी रायबागी यांचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा माणूस होतो. आणि मी का अपहार करीन तिथे? मला कंपनी उत्तम पगार देत होती, सोयी सुविधा देत होती.”
“ ओह! युअर ऑनर, पाणिनी पटवर्धन यांनी त्यांची नेहेमीची क्लुप्ती वापरली आहे इथे. सुरुवातीला ते म्हणाले की खऱ्या खुन्याला इथे हजर करण्यासाठी मला भोपटकर आणि मिर्लेकर यांचं साक्षीदार म्हणून सहकार्य हवय आणि आता मिर्लेकर साक्ष देताहेत तर त्यांच्यावरच ते खुनाचा आरोप करताहेत. ”-खांडेकर म्हणाले.
“ माझं विधान नीट ऐकलं नाहीत तुम्ही.” पाणिनी म्हणाला. “रायबागी चा मृत्यू होणं मिर्लेकर साठी आवश्यक होतं असं विधान मी केलंय. मिर्लेकरवर मी खुनी म्हणून आरोप ठेवलेला नाही.”
“ अप्रत्यक्ष रित्या करताय की.” खांडेकर म्हणाले.
“ मी शपथेवर सांगतोय, मी रायबागीना मारलेलं नाही.मी त्यावेळी चैत्रापूर मधे नव्हतो.माझ्याकडे पुरावा आहे तसा. ” मिर्लेकर म्हणाला.
“ खांडेकर आणि तारकर यांनी जेव्हा रायबागीच्या ऑफिसात येऊन सर्वांची झाडाझडती घेतली तेव्हा तर तू तिथे होतास. ” पाणिनी म्हणाला.
“ तेव्हा होतो पण खुनाच्या वेळी मी नव्हतो.”
“ युअर ऑनर, मर्डर वेपन वर मिर्लेकरच्या हाताचे ठसे नाहीयेत.” खांडेकर म्हणाले.
“ रतीच्या हाताचेही नाहीयेत.” पाणिनी म्हणाला. “ धातूच्या रिव्हॉल्व्हरवरचे ठसे मिळत नाहीत. तारकरला जो ठसा मिळालाय रतीचा, तो नेलपेंट किंवा तत्सम पदार्थ बोटाला लागल्यामुळे आणि त्या बोटाचा स्पर्श रिव्हॉल्व्हरला झाल्यामुळे त्यावर ठसा मिळालाय.पण तो ठसा कधी उमटला हे सिद्ध होत नाही.म्हणजे तो खुनाच्या आधी किंवा नंतरचाही असू शकतो. ”
“ मिस्टर पटवर्धन, सूज्ञा पालकर च्या साक्षीमधून तुम्ही खुनाचा हेतू स्पष्ट करणार होतात, अजून तिला पकडण्यात पोलिसांना यश आलं नसलं तरी तुमचा नेमका तर्क काय आहे हे स्पष्ट करू शकाल?” न्या.ऋतुराज फडणीस यांनी विचारलं.
“ माझी संकल्पना अगदी स्पष्ट आहे. मी सर्व सांगतो फक्त माझं निवेदन चालू असतांना कृपया कोणी मला मधेच थांबवू नये.आणि मिर्लेकर खुनी नाही हे मला माहित आहे पण ते सिद्ध करण्यासाठी आणि खऱ्या खुन्याला कोर्टात हजर करण्यासाठी मला आणखी एक साक्षीदार तपासावा लागणार आहे.पण तो अत्ता कोर्टात हजर नसल्यामुळे त्याला समन्स जारी करण्यात यावं अशी माझी कोर्टाला विनंती आहे. आणि तो साक्षीदार म्हणजे कणाद मिर्लेकरची पत्नी आहे. पती किंवा पत्नी एकमेका विरोधात साक्ष देऊ शकत नाहीत हा कायदा आहे हे मला माहित आहे पण इथे तिची साक्ष कणाद मिर्लेकरच्या विरोधात असणार नाही; उलटपक्षी तिच्या कडून मिळालेल्या माहितीमुळे आपण खऱ्या खुनी माणसापर्यंत पोचणार आहोत.तेव्हा कृपया मिसेस मिर्लेकारांना कोर्टात साक्ष देण्यासाठी म्हणून समन्स काढले जावे. आणि आणखी एक विनंती आहे की तिला समन्स काढले जाणे आणि सूज्ञा पालकर ला पकडण्यासाठी पोलिसांना अवधी मिळणे या सर्वांचा विचार करता कोर्टाचे आजचे कामकाज थांबवून उद्या सकाळी ते चालू करावे. ” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे.” न्यायाधीश म्हणाले. “ खांडेकरांची याला हरकत नसावी असं गृहीत धरतो.” आणि खांडेकरांची यावरची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार न करता ते उठले सुद्धा.
( प्रकरण १७ समाप्त.)