ईबादत थि तेरे मोहब्बत मे
वरणा हम कभी रोते नही
प्यार ये अल्फाज ना होता जिंदगी मे
तो हम तुम्हे कभी खोते नही
प्रेम म्हणजे नक्की काय...??
या प्रश्नाचं निश्चित अस काही उत्तर नाही. प्रेमाची व्याख्या व्यक्तिपरत्वे, परिस्थिनुसार बदलत जाते. तेव्हाच तर एके वेळी मी प्रेम मनातून केव्हाच बाहेर काढलं म्हणणारी स्वरा स्वयमचा कॉल येताच त्याच्याशी बोलायला आतुर झाली होती. प्रेमाला कुणी क्षणात नष्ट करू शकत नाही. प्रेमाच्या आठवणी चांगल्या असो की वाईट त्या कायमच मनात घर करून राहतात. प्रेमाला आपण सहज माफ सुद्धा करू शकतो तर त्या व्यक्तीवर सहज रागावूसुद्धा शकतो. स्वराला त्रास तिला मिळणाऱ्या वागणुकीचा झाला नव्हता तर ती ज्याला आपल्या सुखा-दुःखात वाटेकरी समजत होती, त्याच प्रवासात स्वयम तिच्या सोबत नसल्याचा झाला होता पण जेव्हा त्याने तिला काहीतरी घडलेले सांगितले तेव्हा तिचा राग क्षणात नाहीसा झाला आणि ती स्वयमच्या विचारात हरवली. ती वर्तमानात जगत असताना तिच्या भूतकाळाचा एक पाठ पुन्हा वर्तमानात येऊ पाहत होता आणि त्याच नादात तिने तिच्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती गमावली. अन्वय मुंबई सोडून गेला आणि कदाचित त्यांच्यासोबतच तो तीच नशीब पण घेऊन गेला होता.
प्रेम राजने केलं ते नव्हतंच. प्रेम केलं ते अन्वयने. त्याला माहित होतं की स्वरा त्याच्या आयुष्यात येणे कठीण आहे तरीही त्याने तिच्यावर प्रेम करणं सोडलं नाही. त्याने तिला नवीन आयुष्य, नवीन विचार दिले. जे आता तिला आयुष्यभर कामी येणार होते. तिने एकदा अन्वयला म्हटलं होतं की कदाचित तिच्या आयुष्यात कुणीतरी एखादा व्यक्ती येईलही पण तो गेल्यावर तीच आयुष्य पुन्हा जसच्या तस असेल पण अन्वय त्याला अपवाद ठरला. अन्वयने तिला जगण्याचा असा एक मूलमंत्र दिला होता की ती आता कधीच कुणासमोर हरणार नव्हती. तो मनात बरच दुःख साठवून गेला पण त्याने तिच्या आयुष्याचा उर्वरित प्रवास सोपी केला. अन्वयने तिला शिकविल की आयुष्यात एक व्यक्ती वाईट आला म्हणून पूर्ण आयुष्य वाईट होत नाही उलट समोर येणारा व्यक्ती त्यापेक्षा चांगला येऊ शकतो. अन्वयने स्वतःच हे सिद्ध केलं. त्याने तिला मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने मनातले भाव व्यक्त केले पण तिला उत्तर द्यायला त्रास होऊ नये म्हणून त्याने तिला कधीच कॉल करून त्रास देणार नसल्याचे कळविले. बहुतेक ह्यालाच म्हणतात निस्वार्थ प्रेम...पण प्रश्न एकच. तो असा की अन्वयच निस्वार्थ प्रेम स्वराला का दिसू नये आणि ते कधी दिसेल का? विशेषतः जेव्हा तो आता तिच्या रोजच्या जीवनात नसेल? म्हणतात की व्यक्ती एकदा रोजच्या जगण्यातून बाहेर गेला की मग तो फक्त सुंदर आठवण बनून राहतो. अस काही होणार होत का? स्वराच्या आयुष्याचा पुन्हा एक अध्याय सुरू होणार होता. तो तिला नक्की कुठे घेऊन जाणार होता ह्याबद्दल तिला अंदाज नव्हता. तिच्या आयुष्यात समोर आनंद भरभरून राहणार होता पण तो कसा? कदाचित हीच खरी कथा आहे स्वराच्या नशिबाची..
किस ग्रह की शांती से हात की लकीरे बदलती है
इसका जरा हमे भी अंदाजा दे दिजीए
हम उसकी मोहब्बत को मेहसुस करणे के लिये
नये ब्रह्मांड का अविष्कार कर देंगे...
आयुष्यात सुख-दुःख शाश्वत नसतात. आनंदात भारावून जाऊ नये तर दुःखात कोलमळून जाऊ नये. त्यात समतोल साधने जास्त गरजेचे आहे. नेमका ह्याचा अनुभव स्वराला काही तासातच आला होता. ती अन्वयसोबत असताना खूप खुश होती तर एकाच रात्री त्याच्या जाण्याने सर्व काही बदलल. स्वरा आज सकाळी ऑफिसला जायला उठली पण आज तिच्यात ऑफिसला जातानाचा उत्साह नव्हता. तिचे पाय घराच्या बाहेर पडत नव्हते. अन्वय आता ऑफिसला नसेल ह्याच विचाराने तिचा उत्साह कमी झाला होता तरीही ती ऑफिसला निघाली. माधुरीने आज लवकरच जाणार असल्याचे तिला कळविले त्यामुळे ऑफिसलाही तिला आज एकटीलाच जावं लागणार होतं. आज ट्रेनमध्ये जाताना खूप गर्दी होती. लोकांचा चिवचिवाट होता तरीही ती शांत होती. तिचा शांतपणे हा प्रवास सुरु झाला. कधीतरी कुणाच्याही असण्या- नसण्याने फरक न पडणारी स्वरा आज अन्वय ऑफिसला नसेल म्हणून कोमेजली होती. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची सवय झाली की मग त्याच्याविना राहणं कठीण होऊन बसत ह्याचा आता तिला प्रत्यय येऊ लागला होता. तो आता आपल्या आयुष्यात नसेल हे स्वीकारणं तिला कठीण जाणार होत पण तिला ते स्वीकारणं भाग होत. कारण तिने स्वतःच त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याच कारण काय होत ते फक्त तिला माहिती होत आणि ते कुणालाही सांगायला तीच मन आता तयार नव्हतं.
जवळपास ११ ला स्वरा ऑफिसला पोहोचली. नेहमीप्रमाणे तिने केबिनवर नजर टाकली. अन्वयला रोज " गुड मॉर्निंग" बोलून तिच्या दिवसाची सुरुवात व्हायची पण आज तो नसल्याने तिच्या दिवसाची सुरुवात काही खास झाली नाही. ती ऑफिसला पोहोचली पण सर्व शांत शांत वाटत होतं. सर्व आपल्या कामात व्यस्त होते. स्वरा अन्वयच्या केबिनकडे बघतच आपल्या डेस्कवर जाऊन बसली. तिने बाप्पाला नमस्कार केला आणि अन्वयच्या केबिनकडे बघत शांतपणे बसून राहिली. स्वरा तिकडे बघतच होती की दीपिका म्हणाली," आज ऑफिस खाली खाली वाटत आहे ना? सर होते तर कस ऑफिस प्रफुल्लित वाटायचं. त्यांचे ते जोक्स, अदा त्यांची गोष्टच वेगळी. अस वाटत आहे ते गेले पण ऑफिसची शानदेखील घेऊन गेले. ते काहीच महिने इथे राहिले पण ह्या काळात आयुष्याचे बरेच धडे त्यांनी शिकविले. अन्वय सरांसारखे दुसरे व्यक्ती ह्या ऑफिसला मिळणे पुन्हा शक्य नाही. खरच मिस करतेय मी त्यांना खूप. आयुष्यात आपला व्यक्ती गमावल्याची जाणीव होतेय. का गेले ग इतक्या लवकर ते आपल्याला लळा लावून??"
अन्वयला कोण किती मिस करतय हे स्वरापेक्षा कुणाला चांगलं माहिती होत तरीही ती हसतच म्हणाली," ताई, ते आपल्या जगाचा भाग फक्त काही दिवस होते. ते इथे आले, आपल्याला मनमुराद आनंद दिला आणि पुन्हा एकदा आपल्या पुढच्या प्रवासास निघाले. ते मला कायम म्हणायचे की मी फक्त वाटाड्या आहे. मी कदाचित मार्गदर्शन करेल पण कायम सोबत राहणार नाही. त्यांना जे बोलायच होत ते स्पष्ट सांगितलं होतं त्यांनी. तस पण त्यांच जग दिल्लीला आहे. त्यांचं कुटुंब, लाइफ, मित्र सर्व तिथेच आहे सो ते तिथे खुश असतील. त्यांच्या आनंदापेक्षा आपल्याला आणखी काय हवं आहे बर? ते खुश तर आपण देखील खुश..!!"
दीपिका नाराज होत पुन्हा उत्तरली, " कळतय स्वरा पण वळत नाहीये. सरांचा चेहरा पाहून दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांचे जोक्स असो की त्यांची अदा अगदी सर्व कस डोळ्यासमोर दिसत. ते नाहीत हे स्वीकारणं खरच कठीण जातंय. कदाचित कुणाला त्याने फरक पडणार नाही पण माझ्यासाठी ते खूप खास होते. तुला कदाचित माहीत नसेल पण मी त्यांना एकदा माझ्या मनातील सांगितलं होतं आणि काय म्हणाले ते माहिती आहे?"
स्वरा क्षणभर मिश्किल हसत म्हणाली," काय म्हणाले?"
दीपिकाचा चेहऱ्यावर सहज आनंद पसरला होता आणि ती म्हणाली," ते म्हणाले की ह्या जन्मी माझ्या आयुष्यात आधीच कुणीतरी आहे. तिला मी वचन दिल की तिची साथ कधीच सोडणार नाही त्यामुळे हा जन्म तिचा पण पुढच्या जन्मी मी तुझा असेल. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मला तिच्याबद्दल प्रेम दिसत होतं. कोण आहे ती माहिती नाही पण क्षणभर तिच्यावर इर्शा होऊ लागली होती. काय आहेत अन्वय सर!! खूप सुंदर व्यक्तिमत्त्व. शांत, सर्वाना समजून घेणारे दिलखुलास व्यक्ती. त्यांची कमी कधी भरून निघेल का??"
दीपिकाच उत्तर ऐकून स्वरा इमोशनल झाली होती. रात्रभर ह्याच विचाराने तिचा डोळा लागला नव्हता त्यामुळे तिला आता ते विचार नको होते आणि स्वरा थोड्या उदास स्वरात उत्तरली," ताई सोड आता अन्वय सराना. ते खुश असतील आपल्या आयुष्यात. उद्यापासून पुन्हा नवीन सर येतील मग पुन्हा नव्याने सर्व सुरू होईल. काहीच दिवसात त्यांच्या नसण्याची सुद्धा सवय होईल.बरोबर ना??"
दीपिका नाखूष होत उत्तरली," हो जशी असण्याची लागली होती तशीच नसण्याचीची लागेल. जगण्याच सत्य आहे कुणिच शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहत नाही. त्यांचं काम झालं की ते जाणारच."
दीपिकाने उदास स्वरातच लॅपटॉपला हात लावला आणि अन्वयचा विषय तिथेच बंद झाला...
स्वराने आपलं लक्ष दीपिका वरून लॅपटॉपवर केंद्रित केलं. खर तर तिला आज खूप काम करायचं होतं पण मधात कधीतरी तीच लक्ष अन्वयच्या केबिनवर जायचं आणि तो तिच्यावर हसताना दिसायचा. तिला क्षणभर वाटत होतं की अन्वय अजूनही इथेच आहे म्हणून त्याच्याकडे ती हसून बघायची पण पुढच्याच क्षणी तो तिथे नसायचा. स्वराच्या आयुष्यात अन्वयच असन खूप मॅटर करत होत. कारण तो तिची सकारात्मक ऊर्जा होता. तो सोबत असला की तिचे अर्धे टेन्शन जायचे. तिला त्याची आता इतकी सवय झाली होती की तो जसाच्या तसा समोर दिसत होता आणि समोर नसतानाही तो तिला त्रास देऊ लागला.तो मुंबई वरून तर गेला पण त्याची प्रत्येक गोष्ट अजूनही तिथे ऑफिसमध्येच होती. चांगल्या लोकांची हीच खासियत असते. ते जिथून जातात तिथे कायम चांगल्या आठवणी देऊन जातात.
दुपारची वेळ होती. मागील दोन तीन दिवस स्वराच जेवणाकडे दुर्लक्ष झाल होत. तरीही तिची जेवायची अजिबात इच्छा नव्हती. आजही ती जेवण न करता आपल्या आधीच्या केबिनमध्ये जाऊन शांत टेकली आणि तिने डोळे मिटले. तीच अशी जागा होती जिथे तिला शांती मिळू शकत होती म्हणून ती कितीतरी वेळ तिथेच बसून राहिली. ना कसले विचार न चिंता. तशा त्या केबिनमध्ये स्वराच्या खूप आठवणी होत्या. ती टेकून पडली आणि स्वरा मनातल्या मनात बोलू लागली," थॅंक्यु सर! मी माणसांवर कधीच विश्वास टाकला नाही आणि तुम्ही मला मानस जोडायला शिकवली. खरच मानस खूप गरजेचे असतात आयुष्यात. मग दुःख शेअर करायला असो की आनंद व्यक्त करायला. तुम्ही मला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकविल. मी एकदा विचार केला होता की तुम्ही काय घेऊन जायला आला आहात माझ्याकडून? मी तेव्हा मूर्ख होते की माझ्या डोक्यात असा विचार आला. तुम्ही तर काहीच घेऊन गेले नाही पण हा ओंजळीभर सुख माझ्या वाट्याला टाकून गेलात. तुम्ही खूप काही दिलं आणि मी आजही तुम्हाला काहीच देऊ शकले नाही. पण तुम्ही ज्या गोष्टींच्या प्रेमात पडला आहात ती काहीच उपयोगाची नाही म्हणून ती देऊ शकले नाही. सर आठवत, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्हाला माझ्यासारख बनायचं आहे तर मी म्हणेन नका बनू. मी थोडी स्वार्थी निघाले. तुम्हाला जातानाही थांबवलं नाही. खर सांगू सर त्या रात्री इतका गोंधळ उडाला होता माझा की नक्की काय करू समजत नव्हत. एकीकडे तुम्ही होता तर दुसरीकडे होता माझा भूतकाळ स्वयम. त्याने माझ्याशी परत बोलावं आणि मी तुम्हाला विसरून गेले.हो, आहे मी स्वार्थी. ज्याने माझ्यासाठी एवढं सर्व केलं त्यालाच मी विसरून गेले म्हणून म्हणतेय सर नका होऊ माझ्यासारखे. उलट मी होईल तुमच्यासारखी. सदैव प्रेम वाटेन सर्वाना आणि आदराने सांगेन की मी हे तुमच्याकडून शिकले आहे. तुम्ही कायम म्हणायचा ना की मी टॉपर आहे, तू हरवलस मला पण सर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात कायमच टॉपर राहिला आहात. तुम्हाला त्या प्रवासात कुणीच हरवू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायला त्याने ते सहन करन गरजेचं नसत. गरजेचं असत ते फिल करणं. तुम्ही केलंय ते प्रेम पण मी तुम्हाला नाही देऊ शकले तुमचं प्रेम.सॉरी सर! शक्य असेल तर मला लवकर विसरून जा. कदाचित तुमच्याही आयुष्यात खूप आनंद येतील आणि मी बाप्पाला हीच प्रार्थना करेन. मिस यु अन्वय सर!!"
स्वरा आज आपल्याशीच बोलत होती. अन्वयच्या नसण्याने तिच्या आयुष्यात किती फरक पडला होता हे तिला पहिल्याच दिवशी जाणवू लागल.
आज ती दिवसभर ऑफिसमध्ये तर होती पण तीच मन अजूनही अन्वयमध्येच हरवल होत. तिला पूर्ण ऑफिसमध्ये अन्वयच अन्वय दिसत होता. तो म्हणाला होता की तुला त्रास होऊ नये म्हणून कॉल करणार नाही पण त्या ऑफिसमधल्या अन्वयच ती काय करणार होती?? तिला प्रत्येक क्षणी त्याचा भास होत होता आणि तिच्याही ओठी अन्वयच्या कवितेच शीर्षक आलं" स्वप्न की आभास हा?" जेव्हा कुणी सहज दूर होत तेव्हा मागचं सर्व आयुष्य स्वप्नासारखं वाटत आणि जे समोर दिसतात ते भास असतात. माहिती आहे की तिथे कुणीच नाही पण त्यांचे विचार जे आपल्या मनावर हावी असतात ते बाहेर काढणे अशक्य होतं जात. हेच भास आणि जे पूर्ण होऊ शकत नाही ते पाहिलेले किस्से म्हणजे स्वप्न...
आजचा पूर्ण दिवस स्वरासाठी खूप कठीण होता. ऑफिस सुटायची वेळ झाली आणि ती अन्वयच्या केबिनकडे बघून बाहेर जाऊ लागली. आज तो रस्ता सुद्धा स्वराला त्रास देत होता कारण ऑफिस सुटल्यावर बऱ्याच गप्पा त्यांच्या तिथे होत असत. आजही ती एकटी जात नव्हती तर अन्वय तिच्या सोबत चालत होता आणि तिला सांगत होता की " मी दिल्लीला असलो तरीही कायम तुझ्यासोबत आहे. तुला वाटेल की माझी गरज आहे तेव्हा हक्काने कॉल कर. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही." त्याचे ते आश्वासक शब्द तिला समोर चालायला मदत करत होते, त्याच ते हसन तिला बळ देत होत आणि त्याचा तो शांत चेहरा तिच्या मनाला शांत करत होता. अन्यथा स्वराची हिम्मत तर अन्वय स्वता सोबतच घेऊन गेला होता.
कैसे भरलु तेरी कमी
किसीं और इंसान से
मुझे भिड मे पडे भेडीयो की नही
तेरे जैसे भगवान की जरूरत है
स्वरा स्टेशनवर पोहोचली आणि काहीच वेळात तिला ट्रेन मिळाली. ट्रेन सुरू झाली तरीही ती शांतच होती. ट्रेन धावत होती तर स्वरा एकाच जागेवर थांबुन होती. शरीराने आणि मनानेही. आजही वांद्रे स्टेशन आलं तरीही तिला भान नव्हतं. माधुरी ट्रेन मध्ये चढली. माधुरी ट्रेनमध्ये चढल्याच तिला माहिती होत तरीही ती माधुरीशी काहीच बोलली नाही. स्वरा कायम आनंदात असताना अचानक इतकी शांत का म्हणून माधुरी हसतच उत्तरली," काय ताई, आज पण तुला कुणी प्रश्न विचारला की काय? नाही तर तू आणि इतकी शांत, शक्यच नाही! बोला बोला काय झालं?? कुणी त्रास दिला पुन्हा आमच्या ताईसाहेबांना??"
स्वरा तिच्या बोलण्यावर फक्त क्षणभर हसली आणि गुपचूप पुन्हा उभी राहिली. स्वराला अलीकडे अस बघन म्हणजे आश्चर्यच होत म्हणून हळुवारपने माधुरी उत्तरली," ताई काही झालंय का?"
स्वराने माधुरीकडे लक्ष दिलं नाही पण हळुवार शब्दात उत्तरली," थोडं फार नाही खूप काही झालय. माझं भाग्य घेऊन गेलो तो."
माधुरी तिला अडवत उत्तरली," कोण तो आणि कुठे गेला?"
स्वरा मिश्किल हसू ओठांवर आणत म्हणाली," तो माझा लकी चार्म. ज्याच्या असण्याने माझ्या चेहऱ्यावर कायम हसू येत होतं. ज्याच्या असण्याने लोक माझ्याकडे वाईट नजरेने बघत नव्हते, ज्याच्या असण्याने मला लढायची हिम्मत मिळत होती. तो जो मला अर्ध्या वाटेवर सोडून गेला स्वतःला फक्त वाटाड्या संबोधून. अन्वय सर..ते गेले दिल्लीला कायमचे मला सोडून. मला म्हणाले की माझं सर्व तिथेच आहे सो मी तिकडेच राहीन आता कायमस्वरूपी. आता कदाचित कधीच परत येणार नाही ते!!"
तिच्या शब्दात ओलावा जाणवत होता, कंठही दाटून आला होता आणि माधुरी रागातच उत्तरली," ताई तू का जाऊ दिलंस त्यांना? थांबवायचं ना?"
स्वरा आता मात्र शांत झाली. तिच्याकडे ह्या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं म्हणून माधुरी उदास होत म्हणाली, " शिट यार! मला वाटलं होतं की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून कधीच सोडून जाणार नाहीत तुला पण इथे तर??"
ती उदास झालीच होती की स्वरा उत्तरली," बरोबर म्हणाली होतीस तू! प्रेम होतं त्यांचं माझ्यावर. त्यांनी शेवटच्या दिवशी सांगितल मला जाताना. हेही सांगायच विसरले नाही की तुला उत्तर देण्याचा त्रास होऊ नये म्हणून मी कधीच स्वतःहून कॉल करणार नाही. ते मला माझ्या हक्काच सर्व देऊन गेले आणि स्वता मात्र खाली हात गेले.काहीही न मागता. काहीही न बोलता. कोणत्या हक्काने थांबवू त्यांना? नाही थांबवलं मग आणि ते आले तसे भुर्रकन उडून निघून गेले माझ्या आयुष्यातुन कदाचित कायमस्वरूपी.. "
माधुरी तीच बोलणं होताच उत्तरली," ताई एक विचारू, तुझं प्रेम आहे त्यांच्यावर?? "
स्वराने नेहमीप्रमाणे ह्या प्रश्नावर चुप्पी साधली होती. माधुरी उत्तराची वाट बघत होती की स्वराने बॅगमधून फोन काढत एअरफोन कानात टाकले आणि गाणे ऐकू लागली. त्यात तिची आवडती कविता सुरू होती" स्वप्न की आभास हा?"
तिने उत्तर द्यायच टाळल होत पण अस काहीतरी होत तिच्या मनात ज्यामुळे तिचा गोंधळ उडाला होता. जे ती माधुरीला सांगू शकत नव्हती किंवा कुणालाच सांगू शकत नव्हती तर माधुरीच्या मनात तिला बघून एकच प्रश्न येत होता," अन्वयची प्रेम कहाणी इथेच संपली? स्वराच्या आयुष्यात पुन्हा अन्वय कधीच येणार नाही ??"
माधुरी विचार करत होती आणि विचार करूनच तिच्या डोळ्यात पाणी आलं. दुसरीकडे स्वरा गाने तर ऐकत होती पण पहिल्यांदा तिच्या डोळ्यात काहीतरी होत जे वाचता येत नव्हतं. तिच्या शब्दात वेदना होत्या पण त्या वेदनांना ती व्यक्त करू शकत नव्हती..
" हमारी अधुरी कहाणी!!!"
क्रमशा…..