Bhagy Dile tu Mala - 40 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ४०

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ४०




किसी से दिल लगाने की खता क्या होगी?
रुठ जाने की वजह क्या होगी?
हम सोच रहे शाम-ओ-सहर इस पहेली का जवाब
किसी को इन्कार करने की सजा क्या होगी?

सकाळचे १०:३० च्या आसपास झाले होते जेव्हा स्वरा उठली. आज ती जरा फ्रेश वाटत होती. चेहरा थोडा प्रफुल्लित वाटत होता आणि डोकंही दुखणं बंद झालं होतं. ती उठताच माधुरीने तिच्या कपाळाला हात लावला. तिचं अंग थंड पडलं होतं शिवाय तिच्या चेहऱ्यावर हसू बघताच माधुरी उत्तरली, "गुड मॉर्निंग ताई!! आता कस वाटत आहे तुला?"

स्वराने तिचा हात पकडला आणि तिच्या हातांना किस करत म्हणाली, "तू असताना कशी असणार बरं? मी मस्त. आता छान वाटत आहे."

माधुरी क्षणभर हसली आणि लगेच बाजूला बसली. स्वरा उठली आणि घड्याळात बघत म्हणाली, "बापरे साडे दहा!! तू उठवल का नाहीस? ऑफिसला जायला किती उशीर होईल मला आता. ऑफिसला गेले नाही तर तो मारून खाईल मला. तसाही जास्तच मेहरबान आहे तो. कोणत्या दिवशी कोणतं सरप्राइज देईल आणि माझ्या अंगावर येईल मलाच नाही माहिती. शीट यार गेले मी कामातून! "

ती घाईघाईने उठतच होती की माधुरी उत्तरली, "आज दोघीही बहिणी सुट्टी घेऊ. मज्जा करू. काय म्हणतेस? काय नुसतं काम काम करत बसायचं?"

स्वरा रागावतच म्हणाली, "मधू ही गमतीची वेळ आहे का? मधू त्या हिटलरला समजलं ना की मी सुट्टी घेतली तर मला मारून खाईल तो! चल हो बाजूला आवरते मी. मोठी आली सुट्टी घेऊ म्हणे. तू ओळखत नाही त्याला कामात उशीर झाला की बस गेलेच समजा."

ती बाथरूमला जातच होती की माधुरी रुसत म्हणाली, "ठीक आहे जा पण मी आधिच घेतली आहे सुट्टी. तू गेलीस तरीही मी बसेन इथेच दिवसभर एकटी."

स्वराने तिच्याकडे बघितलं. ती रुसून मोबाईलमध्ये बघत बसली होती. तेवढ्यात तिने फोन उचलून कुणाला तरी कॉल केला आणि म्हणाली, " काळे सर, आज मला यायला जमणार नाही. माझी तब्येत बरी नाहीये, उद्या येते."

तिने फोन ठेवला आणि माधुरीचे गाल ओढत म्हणाली, "खुश वेडाबाई ! करू मस्ती दिवसभर. पण आधी फ्रेश होऊन येते. "

स्वरा बाथरूममधून जाऊन परत यायला २० मिनिट गेले होते. तोपर्यंत माधुरीने चहा बनवून ठेवला होता. स्वरा बाहेर येताच तिने चहा तिच्या हातात ठेवला. स्वरालाही चहाची खूप गरज होती म्हणून हळूहळू ती एक एक सिप घेऊ लागली. स्वरा चहा घेतच होती की हळुवार आवाजात माधुरी म्हणाली, "ताई, तू झोपेत म्हणत होतीस की अन्वय तू कशाला आला आहेस माझ्या आयुष्यात ? प्लिज मला काही करू नकोस. काही घडलंय का ग दिवसभरात? नाहो तर उगाच तू असं बोलणार नाहीस!! सांग ना काही घडलं का?"

स्वरा आताही चहाच घेत होती. स्वराला तिला टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून ती शांत बसली होती तर माधुरी म्हणाली, "इट्स ओके. पर्सनल असेल तर राहू दे. काही गरज नाहीये सांगायची. तेवढंही महत्त्वाचं नाही मला उत्तर देणे."

माधुरी नजर खाली करून चहा घेत होती. स्वराला समजलं होतं की तिला राग आलाय म्हणून हळूच हसत म्हणाली, "तुझ्यापासून काय लपवणार मधू? मी सरांना एक प्रश्न विचारला होता."

माधुरी तिला अडवत म्हणाली, "कोणता प्रश्न तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हा प्रश्न? "

स्वरा हसतच उत्तरली, "नाही वेडाबाई ! ते कसं अचानक विचारणार? मी विचारलं की जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते तर तिला मिळवायला काय करणार?"

माधुरी विचार करत म्हणाली, " काय म्हणाले मग ते?"

स्वरा क्षणभर शांत झाली आणि उदास होत म्हणाली, "जे राज म्हणाला होता तेच. एखादी गोष्ट मिळवायला मी काहीही करू शकतो. काहीही म्हणजे काहीही!! त्यांना हरायला आवडत नाही. जिंकण्याची नशा काय असते हे मिळविल्यावरच कळतं."

रूममध्ये थोड्या वेळ शांतता होती. फक्त चहाच्या फुरक्यांचा आवाज येत होता. स्वरा एकदमच शांत झाली होती तर माधुरी तिच्याकडे बघत होती. तिला समजत होत स्वरा नक्की काय फिल करत असेल तरीही तिला काहीच न समजवता काही वेळ तिने शांत राहणंच पसंद केलं होतं. स्वरा तिच्याही नकळत आपले डोळे पुसत होती की माधुरी म्हणाली,"ताई, लहान बहीण ह्या नात्याने एक बोलू?"

स्वरा मिश्किल हसत म्हणाली, "बोल वेडोबा. विचारत काय आहेस?"

माधुरीने चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाली, "ताई, तुझी स्थिती मी समजू शकते. खूप अभिमान वाटतो मला तुझा. पण एक सांगते. तू मला राजबद्दल जेवढंही सांगितलं आहेस आणि अन्वयबद्दल आता माझ्या डोळ्यांसमोर जे घडत आहे त्यात खूप फरक आहे. राजने तुला मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुझ्याकडे खूप काही होत. चेहरा, ओळख सर्वच. पण अन्वय जिथे तुझी मदत करतोय ना तिथे त्याला तुझ्याकडून मिळेल असं काहीच नाही. दुसरी गोष्ट तुझ्या आयुष्यात इतके वाईट अनुभव आले आहेत की तुला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण विचार कर त्याने प्रेम म्हणून नाही आणि माणुसकी म्हणून ते सर्व केलं असेल तर? तर आज तू शंका घेऊन एका चांगल्या व्यक्तीला दुखावशील. मग तुझ्यासारख्या लोकांना कुणीच मदत करणार नाही. तुझ्या फक्त शंकेमुळे तू एका चांगल्या व्यक्तीला वाईट बनवून सोडशील. पुन्हा असं की समजा त्याचं तुझ्यावर प्रेम असेलही आणि त्याने चुकीचं काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व आहोत. तू आता एकटी नाहीस. किंबहुना तू स्ट्रॉंग आहेस. कदाचित तू स्वतःच ह्या सर्वाला सामोरे जाशील. पण विचार कर जर त्याने चांगल्या इंटेन्शनने केलं असेल आणि नंतर तुला माहिती झालं की तू चुकलीस तर स्वतःला माफ करू शकणार आहेस का आयुष्यभर?"

माधुरी बोलत होती तर स्वरा विचार करत होती. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. पण तिने बोलायची हिम्मत देखील केली नाही. तेव्हा माधुरीच म्हणाली, "ताई, प्रत्येक व्यक्ती वाईट नसतो ग!! मान्य की तुला वाईट अनुभव आलेत पण म्हणून तू आपल्या अनुभवांवरून त्यांना जज करणं, नाही आवडणार मला. मी जिथून अन्वयला बघते आहे ना तिथून मला त्याच्यात काहीतरी वेगळं दिसत आहे. मला सतत वाटत आहे की काहीतरी कारण आहे जे तो इथे आले आहे किंवा देवाने त्याला पाठवलं आहे. माझं अस म्हणणं नाही की तू माझं मत स्वीकारावं. कदाचित मला तेवढे अनुभव नाहीत. पण ॲटलिस्ट ताई तू न्यूट्रल होऊन त्याला बघावं. तो चुकीचा असेल तर स्वतःच दूर राहा. पण त्याला न ओळखता त्याला जज करणं म्हणजे तू शिक्षा देत आहेस त्याला. ताई, तू सर्वाना एक प्रश्न विचारला होता ना की 'माझी काय चूक?' मग आज तोच प्रश्न मी तुला विचारते. त्याची काय चूक? तुला मुक्त करणं ही त्याची चूक की तुला सन्मान मिळावा म्हणून त्याने केलेली धडपड ही चूक आहे? शेवटी लहान तोंडी मोठा घास घेतेय. तू म्हणालीस की तू कशाला आला आहेस माझं आयुष्य उध्वस्त करायला? पण मी तुला विचारते, ताई तुझ्याकडे सध्या असं काय आहे जो तो घेऊन जायला आहे? आयुष्य उध्वस्त करायला नेमकं कोणतं आयुष्य आहे तुझ्यायकडे? उलट तो जिथे उभा आहे तिथून देऊच शकतो तुला. खूप काही देऊ शकतो आणि तो देत सुद्धा आहे. पुढेही देईल जर त्याचं मन साफ असेल तर. पण स्वतःच्या काही अनुभवांवरून प्रत्येक व्यक्तीला जज करणं खरंच मूर्खपणा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वार्थी नसतो. काही असतात निःस्वार्थी पणे माणुसकी जपणारे. त्यांना काही घ्यायचं नसतं, ते फक्त द्यायचा प्रयत्न करतात. सॉरी मी जास्त बोलले असेल तर. पण मला वाटलं ते मी बोलले. विचार कर ह्यावर."

स्वरा क्षणभर विचार करत होती आणि हळुवार आवाजात म्हणाली, "पटतंय मधु तुझं बोलणं!! मी जो प्रश्न सर्वांना विचारत होते, तीच चूक मी करते आहे हे विचार करून. आता माझं मलाच वाईट वाटत आहे. कदाचित जुन्या अनुभवांवरून मी जास्तच विचार करून गेले. माझी स्वतःची तशी इच्छा नाही मधु. पण आयुष्यात काही माणसं, प्रसंग असे घडले की नकळत ती वाट पकडल्या गेली. मधू खरं सांगू तर मी कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवायची हिम्मत आज करू शकत नाही. पण हेही खरं की मी एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा पण देणार नाही. एका व्यक्तीला विनाकारण शिक्षा दिली जाते तेव्हा किती त्रास होतो मला माहित आहे. सो मी करेन विचार न्यूट्रल होऊन. नाही जज करणार आता त्यांना आणि खरच थॅंक्यु तू मला लक्षात आणून दिलं ते. तू लहान तोंडी मोठा घास घेतला नाहीस तर लहान असून तुला समज आहे ह्या समाजाची ह्याचा आनंद होतोय मला. वेडाबाई लव्ह यु!! प्लिज गीव्ह मी हग!! आज तू नसती तर मी एकाला विनाकारण शिक्षा दिली असती, तेही त्याचा गुन्हा माहिती नसताना. थॅंक्यु!!"

माधुरीने तिला झप्पी दिली तर स्वराच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं होतं. ते हसू माधुरीच्या असण्याचं नव्हतं. ते हसू होतं एका मैत्रिणीने दिलेल्या शिकवणुकीचं. जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते ना तेव्हा चांगले लोक सुद्धा वाईट निर्णय घेतात. स्वराने तर अक्ख जग काहीच दिवसात बघितलं होतं. म्हणून स्वरा त्याला काही अपवाद नव्हती. पण माधुरीने तिच्या निदर्शनास एक चूक लक्षात आणून दिली आणि नकळत तिने स्वतः केलेले गैरसमज दूर केले. स्वरा आज खुश होती. पण माधुरीला एक प्रश्न पडला होता, "समजा अन्वय सर स्वरा वर खर प्रेम करत असतील आणि स्वीकारायला तयार असतील तर स्वरा ताई त्यांना सर्व विसरून स्वीकारेल की ही प्रेम कहाणी अशीच अधुरी राहील? आणि अपूर्ण राहिली तर नक्की चूक कुणाची? तिच्याबद्दल सर्व स्वीकारून तिच्यावर प्रेम करणाऱ्या अन्वयची? की प्रेमामुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या स्वराची जिला प्रेम ह्या शब्दापासूनही चीड होती?"

तिला नव्हतं माहिती की त्याने माणुसकीच्या नात्याने हे सर्व केलं होतं की प्रेमामुळे. पण एक प्रश्न तसाच होता स्वराच त्यावेळी उत्तर काय असेल ???

स्वराने स्वतःची चूक स्वतः स्वीकारली होती. पण ती ती ज्या परिस्थितीतून जात होती त्यावेळी असे विचार येणं स्वाभाविक होतं. कधी कधी परिस्थिती अशी असते की चांगले लोक सुद्धा वाईट निर्णय घेतात. ज्या स्वराने कायम दुःख सहन केले होते, तिने अन्वयवर असा अविश्वास दाखवणे योग्य नव्हते. मग कारण काहीही असो. पण ही गोष्ट जेव्हा तिच्या लक्षात आली तेव्हा ती स्वतःवरच रागावली होती आणि त्या रात्री तिने मनाची तयारी केली. त्याचं प्रेम स्वीकारण्याची तयारी का? तर अजिबात नाही. ती तयारी होती पुन्हा एकदा नव्याने अनुभव घेण्याची. आपला अनुभव योग्य ठरतो की माधुरीचे विचार? हे जाणून घेण्याची… उत्तर तिने भाग्यावर सोडलं होतं.

अन्वय १% मधला होता ज्याला मेहनतीने भाग्य बदलायचं होतं, तर स्वरा आता त्या ९९ % मधली होती जिला हाताच्या रेषा जिथे घेऊन जातील तिथे जायचं होतं. ह्या दोन वेगळ्या वाटा कधी एकत्र येतील का? की आज प्रेमाचा विचार करून इतक्या खोलवर विचार करणारी स्वरा प्रेमाचं नाव ऐकूनच अन्वयला कायमची सोडून जाणार होती?

******************

दुपारची वेळ. सर्व टिफिन काढून जेवायला बसले होते. मागचे २-३ दिवस स्वराचे खूप वाईट गेले होते. तिच्या अंगाला नीट जेवण लागलं नव्हतं पण पुन्हा एकदा तिने ते विचार सोडले आणि तिला जाणवलं की आजूबाजूचे वातावरण खरंच सुंदर आहे. माणसं नक्कीच चुकली पण शेवटी त्यांनी मनाने तिला स्वीकारलं. आता अशी एकही जागा नव्हती जिथे लोक स्वराला नेत नव्हते. नाईलाज म्हणून नाही हा!! उलट आनंदाने ते सर्व करत होते. अन्वय बरोबर म्हणतो की सर्व काही नजरेत असतं. एखादी व्यक्ती सुंदर आहे म्हटलं की ती सुंदरच दिसणार आणि सुंदर नाही म्हटलं तर हजारो चांगले गुण असतानाही आपण त्यातली एखादी कमी नक्की काढू. सर्वांनी स्वराकडे वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात केली आणि स्वराची भीती नाहीशी झाली. उलट स्वराशी बोलताना, तिच्या सोबत राहताना त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. तिचा स्वभाव त्यांना पाहायला मिळत होता आणि सर्व तिच्या स्वभावाचे फॅन झाले होते. आता तिचा चेहरा तिचा दुश्मन नव्हता. कदाचित तिचे विचार तिचे दुश्मन होते.

तर जेवणाची वेळ झाली होती. सर्व गप्पा मारत जेवण करत होते. तेवढ्यात अन्वय नेहमीप्रमाणे बाहेर नाशता करायला जात होता. त्याने काही पावले टाकलीच होती की दीपिका म्हणाली, "सर, आज जॉईन होणार का आम्हाला??"

अन्वय क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला, " खरं तर आवडेल मला!! बाहेरचं खाऊन-खाऊन तब्येत खराब झाली. आई नाहीये ना… नाही तर तिच्या हातचं खायचो. आता पर्याय नाही. पण मला भीती आहे की मी तुम्हाला जॉईन झालो तर जेवण कमी पडेल. सो नको, असू द्या. ऑल ऑफ यु एन्जॉय!!"

तेवढ्यात जयेश म्हणाला, "सर, एकाकडून खाणार तर नक्कीच कमी पडेल. पण सर्वांकडून थोडं थोडं घेतलं तर काहीच कमी पडणार नाही. प्रेम वाटल्याने तर वाढतं ना!! बरोबर ना??"

अन्वय हसतच उत्तरला, "जयेश, तू मला उत्तरच सोडलं नाहीस द्यायला. आता पर्याय आहे का माझ्याकडे न बसण्याशिवाय?"

त्याचं उत्तर ऐकताच काका खुर्ची घेऊन आले आणि नेमकी खुर्ची स्वराच्या बाजूला लावली. त्याला जवळ बसताना बघून स्वराने आपली खुर्ची दूर केली. त्याला समजलं होतं की तिचं काहीतरी बिनसलं आहे. पण तो काहीच म्हणाला नाही. तो बसला आणि सर्वांनी त्याला एक एक पोळी दिली. आतापर्यंत कमी पडेल म्हणणारा अन्वय आता तेवढं जेवण बघून भारावून गेला होता. सर्वांनी हसून खायला सुरुवात केलीच होती की अन्वयने स्वराचा डब्बा स्वतःकडे ओढला. त्याला हवी तेवढी भाजी त्याने घेतली. तिला कमी पडू नये म्हणून इतरांनी दिलेली भाजी त्याने तिला दिली आणि जेवण करू लागला. तिच्या हातचं खाताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं. अगदी लहान मुलाप्रमाणे तो खात होता. आतापर्यंत खुर्ची बाजूला करणारी स्वरा आता त्याच्याकडे बघत बसली. तिचा चेहरा बघून पळणाऱ्या लोकांमध्ये तो असा होता की त्याला तिची भीती वाटत नव्हती. उलट तो तिची प्रत्येक गोष्ट आवडीने स्वीकारायचा. त्याने जेवण हिसकावून घेतलं म्हणून ती क्षणभर त्याच्याकडे पाहत होती. तेवढ्यात तो म्हणाला, "हॅलो फ्रेंड्स!!! मी ना जरा स्वार्थी होतोय. पण प्लिज उद्यापासून सर्व माझ्यासाठी एक पोळी जास्त आणणार का?"

दीपिका हसत म्हणाली, "सर, त्यात काय!! आवडीने आणू. "

अन्वयने एक घास तोंडात टाकलाच होता की पुन्हा म्हणाला, "आणणार ते ठीक आहे. पण असं म्हणू नका की सर आपणे हमारा नमक खाया है तो आप हमे गाली नही दे सकते. मी तर तुमचच खाऊन तुमच्यावर ओरडणार आहे त्यात सूट नाही बरं का?"

त्याच्या एका वाक्याने टेबलवर आनंदी आनंद पसरला. स्वराला खरं तर त्याच्या बोलण्यावर हसायच नव्हतं. पण तो बोलायचाच असा की तिला हसू आवरलं नाही आणि नेमका त्याच वेळी तिला ठसका लागला. स्वराला ठसका लागताच त्याने बॉटल समोर धरली आणि तिला पाणी पाजू लागला. तिला वाटत होतं की त्याने हातात बॉटल द्यावी. पण तो स्वतःहून पाजत होता आणि गंमत अशी की ती नाही म्हणाली नाही. उलट तिची नजर त्याच्यावरच होती. त्याने पाणी पाजलं. आता ती बरी वाटत होती आणि अन्वय हसत म्हणाला, "ह्या मिस स्वरा पण ना!! फक्त नावाला दिल्ली टॉपर आहेत. बाकी नुसता वेंधळटपणा भरलाय ह्यांच्यात!! मी ना शोध लावणार आहे की ह्यांना स्टुडन्ट ऑफ द इयर कुणी दिला. चिटिंग तर करून मिळालं नाही ना?"

अन्वयच्या बोलण्याने पुन्हा सर्वच हसू लागले होते तर स्वराने त्याला बघून डोळे मोठे केले. त्याने ते बघितलं आणि मग वर बघायची त्याची हिम्मत झाली नाही. आता उलट झालं. अन्वय शांत झाला तर स्वरा क्षणभर हसत होती.

जेवण आटोपलं आणि सर्व आपापल्या कामाला लागले. दोन तीन दिवस स्वरा नीट काम करू शकली नव्हती म्हणून ती आज मन लावून काम करत होती. अन्वयच्या विचारात तिचे दोन तीन दिवस खराब गेले होते. पण अन्वयनेच नकळत तिचा मूड बनवला होता आणि ती मन लावून काम करत होती. तेवढ्यात तिच्या समोर एक फाईल आली. स्वराने काकांना विचारलं, "हे काय?"

काका हळूच आवाजात म्हणाले, "अन्वय सरांनी पाठवली आहे तुम्हाला द्या म्हणून."

मुळात तिचं कुठलंच काम बाकी नव्हतं. म्हणून सरांनी फाईल का पाठवली तिला कळत नव्हतं. तरीही तिने फाईल ओपन केली आणि त्यातून एक पेज खाली पडला. स्वराने फाईल बाजूला ठेवली आणि पेजवर काय लिहिलं आहे ते वाचू लागली.

"मिस टॉपर, तुम्ही त्यादिवशी पूर्ण न केलेला प्रश्न मी पूर्ण करतो आणि उत्तरही देतो. तर प्रश्न असा होता की माणसांना पण मिळवायला तुम्ही काहीही करू शकता का?? प्रश्न बरोबर आहे ना?? तर उत्तर असं की वस्तू मिळवली जाते आणि माणसं कमावली जातात. माणसं कमावणं वस्तू मिळविण्यापेक्षा पूर्णतः वेगळं आहे. माणसांना प्रेमाने कमवायचं असत मिस टॉपर!! मी वस्तू मिळविण्यासाठी काहीही करू शकतो. पण माणसं मिळवायला काहीही करणार नाही. उलट त्यांना स्वातंत्र्य देईल की तुम्हाला हवं तसं वागा. माझ्या आयुष्यात असताना तुमच्यावर बंधने नाहीत. माणसं माझी असतील तर जग फिरूनही माझ्याकडे येतील आणि माझी नसतील तर दुसरीकडे आनंदी राहतील. सो सिम्पल आहे वस्तू मिळवली जाते त्यात जास्त समाधान आहे, तर माणसं कमावली जातात तेव्हा समाधान मिळत. हेच उत्तर अपेक्षित होतं ना तुम्हाला. मग आता तो रडका चेहरा बाजूला ठेवा आणि क्षणभर हसा. म्हणजे काम बिघडणार नाहीत. हसताना एक गोष्ट लक्षात येत नसेल. समोर स्क्रीनवर बघा तुमची कोडिंग चुकते आहे. नीट बघा आणि कायम हसत रहा. कारण हसणंच प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे. एक मिनिट काही चुकीचा विचार करू नका. मला तुमच्या हसण्याची काळजी नाही हो. मला काळजी आहे ती माझ्या कामाची. तुम्ही हसलात की काम नीट होणार. बघितलं, एका बिजनेसमनला हसूमध्ये पण प्रॉफिट दिसतं. मग हसणार ना आता?"

नोट वाचून तिने लॅपटॉप मध्ये बघितलं तर खरच कोडिंग चुकत होती. तिला आता स्वतःवरच हसू येत होतं. फक्त ती आता हसली असती तर त्याला दिसलं असतं म्हणून ती वॉशरूममध्ये गेली आणि स्वतःवरच हसत म्हणाली, "बुद्धू ! कशी ग वेंधळट तू? मघाशी जेवताना हसू केलंस आणि आता हे असं? कसं होणार तुझं बाई? ते बरोबर म्हणतात कुणी दिला असेल बरं मला टॉपरशिप??"

ती हसत होती. अन्वय समोर नव्हता पण त्याला तिचं काय सुरू आहे कळत होतं. तिला कदाचित अन्वयबद्दल कळत नव्हतं. पण अन्वय तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघायला काहीही करू शकत होता. ती इकडे हसत होती तर अन्वय आपल्या केबिनमध्ये हसत होता. सर्व काही नॉर्मल वाटत होतं.

अन्वयचं तिच्यावर प्रेम होतं हे सत्य होतं. तेव्हा प्रश्न एकच होता, जिला प्रेमाचा राग आहे ती त्याच्यावर कसं प्रेम करणार होती? तो कोणत्या पद्धतीने तिला आपलं प्रेम समजावू शकला असता? त्याला मागच्या दोन दिवसात घडलेला किस्सा माहिती नव्हता. तेव्हा तिला प्रेमात पाडणं कितपत सोपं होतं? ह्या एका क्षणावरून विचार केला तर उत्तर एकच. स्वराला प्रेमात पाडणे अगदी अशक्य!! मग कशी असणार होती स्वराच्या भाग्याची कथा???

ईश्क का एक नाम हँसी भी है
वो साथ है तो खुशी भी है…
दर्द देने वाले तो मिल जायेंगे हजार
जो आसू पीकर प्यार बाट जाये, सच्ची वही आशिकी है…!!

क्रमशः …

(मला सांगितल्या जातंय ते असं की थोडे भाग मोठे लिहा. तर त्याचं उत्तर सर्वांना एकत्रच देईन. एक म्हणजे तुम्हीच म्हणत आहात की कमेंट काय करू कळत नाही. मग अगदी त्याच गोष्टी मी लिहितोय तर माझी काय स्थिती असेल. ही कथा लिहीत असताना मला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य विचार करून लिहावे लागतं, त्याचा तुम्हाला प्रत्यय वाचताना येत असेल आणि त्या चुका होऊ नये म्हणून खूप विचार करून कथा लिहितोय. तेव्हा माझा प्रयत्न असेल की १० ते १५ मिनिटांचे भाग मी लिहीन. इथे १० मिनिट लिहायला वाटत असले तरीही आम्हाला एडिट करून ३-४ तास लागतात आणि तेवढ्या वेळ लक्ष केंद्रित करणं तितक सोपं नाही. खरं सांगू तर स्वरा हे पात्र लिहिणं मलाही सोपं नाही. तेव्हा ते लवकर लवकर लिहिताना ते पात्र हरवलं जाऊ शकतं. आणि भाग मी किती मिनिटांचे होतात हे बघत नाही फक्त मला कुठे भाग थांबवायचे असते ते ठरवतो. मग ते कितीही शब्द होऊ दे फरक पडत नाही. ही कथा मी निवांत लिहिणार आहे. कारण ही कथा बेस्ट करण्यासाठी स्वरा हे पात्र विचार करून लिहावे लागेल. लवकर लवकर लिहून गेलो तर स्वरा हे पात्र मी खुलवू शकणार नाही. तिच्यातला आत्मा हरवून जाईल. मी असं म्हणत नाही की मी मोठे भाग लिहिणार नाही. पण जिथे भाग थांबवणं योग्य वाटतं तिथे थांबवेन. कारण कथा खूप मोठी आहे तेव्हा मधात बोर होऊन सर्वांनी कथा वाचायची सोडावे अशी माझी इच्छा नाही. उलट हळूहळू ते पात्र उलगडत जाईन म्हणजे कथा बोर होणार नाही आणि कथेतला रस पण तसाच राहील. तुम्हाला काही त्रास होत असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.)