Bhagy Dile tu Mala - 37 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ३७

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ३७






लगता है अरसा हो गया है
खुद को पेहचाने हुये
हम धुंडने लगे है खुदको
अब तो दुनिया की नजरो मे

आयुष्यात आपले विचार कायम सारखेच असतील अस म्हणणं तितकस योग्य नाही. कधी कधी आपल्या आयुष्यात काही लोक नकळत येतात आणि आपण त्यांच्या रंगात रंगायला लागतो. आपल्याही नकळत आपण त्यांचा केव्हा विचार करू लागतो ते आपल्यालाही कळत नाही. स्वराचसुद्धा असच काहीसं झालं होतं . तिने मागील काही वर्षात स्वतःला बंदिस्त करून घेतलं होतं. तिने स्वतालाच वचन दिल होत की तिला आता जगाचा विचार करायचा नाही पण अचानक अन्वय आयुष्यात आला आणि पुन्हा एकदा ती त्याचा विचार करायला लागली. कलीगने तिला फक्त पार्टीला नेल नाही म्हणून रागावणारा तो तिला कधी कधी खूप मस्त वाटायचा तर अचानक सर्वांवर रागावणारा तो विचित्र वाटायचा. तो इतरांशी कसाही वागत असला तरीही स्वराशी कायम चांगला वागत असे. तस तिला आपल्या आयुष्याबद्दल कधीच नवीन व्यक्तींना सांगायला आवडत नसे पण स्वरा नकळत त्याला सर्व सांगून जात होती. ती बोलून जायची तर अन्वय तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधू लागला होता. त्याचे दिवसरात्र फक्त तिचाच विचार करण्यात जात होते. त्याला शक्य होत का तीच आयुष्य बदलणं? कदाचित त्याने तीच आयुष्य तात्पुरत बदललं असत पण आयुष्यभर त्याला शक्य होत का? जो चेहरा तिचा स्वतःचा शत्रू होता त्या पलीकडे जाऊन त्याने तिला समाजात स्थान मिळवून दिल असत? प्रश्न भरपूर होते पण अन्वयकडे सध्या त्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तरीही तो जमेल तेवढे प्रयत्न करत होता. तिला आनंदी ठेवण त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वपूर्ण गोल बनल होत आणि स्वरा त्याच्या तनामनात बसल्या गेली.

हळूहळू एक एक दिवस समोर जात होता आणि स्वराला त्याचा सहवास आवडू लागला. ती त्याच्याशी मनमोकळं बोलत गेली. तिकडे माधुरी तर इकडे अन्वय आता तिच्या आयुष्यात नवीन रंग भरू लागले होते आणि तिच्याही नकळत तिच्या आयुष्यात आनंद पसरू लागला. ह्या काही दिवसात तिला लोकांचा एकदाही विचार आला नव्हता. ती खुश राहू लागली होती आणि त्याच कारण होत अन्वयच आयुष्यात येन. अन्वयच्या आयुष्यात येण्याने कायमस्वरूपी बदल झाले नव्हते पण काही काळाकरिता तीच आयुष्य नक्कीच बदलू लागलं होतं.

तारीख ३० मे . अन्वयला आज घरून निघायला उशीरच होत होता. आज सकाळपासून कितीतरी लोकांनी त्याला कॉल केले होते म्हणून साधी तयारी करायला त्याला वेळ मिळाला नव्हता. आईने कॉल केला तेव्हा साधारण तासभर असाच गेला होता. त्याने घड्याळात नजर टाकली तेव्हा घरीच ११ वाजले होते. शेवटी त्याने काही वेळासाठी फोनकडे दुर्लक्ष केले आणि फ्रेश होऊन बाहेर परतला . अजूनही त्याचे कॉल सुरूच होते. त्याने पटकन बॅग घेतली आणि पुन्हा एकदा कॉल रिसिव्ह करत तो समोर चालू लागला. त्याचे कॉल सुरूच होते आणि तो बोलता-बोलता ऑफिसला पोहोचला. तेव्हा साधारणता १२.३० वाजले होते. अन्वयने ऑफिसमध्ये पाऊल टाकले आणि सर्व कलीग मोठ्याने ओरडत म्हणाले," विश यु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर अन्वय सर!!"

त्याने समोर बघितले तर सर्व कलीग समोर त्याचीच वाट बघत होते. समोर केक सुद्धा तयारच होता. ते बघून अन्वयला आनंद झाला आणि त्याने फोन पटकन कट केला. आपली बॅग केबीनमध्ये ठेवून तो पुन्हा परतला. आता प्रत्येक व्यक्ती त्याला हँडशेक करून शुभेच्छा देत होता आणि तोही आनंदाने स्वीकारत होता. काही क्षण गेले. सर्वांच्या शुभेच्छा देऊन झाल्या आणि पहिल्यांदाच त्याची नजर सर्वांकडे गेली. त्याला लक्षात आलं की स्वरा त्यात कुठेच नव्हती. त्याने तिच्या केबिनवर एकदा नजर टाकली. ती केबिनच्या आतून सर्व बघत होती पण तिची बाहेर यायची काही हिम्मत होत नव्हती. अन्वयला ते बघून फारच वाईट वाटलं होतं. त्याचा चेंहँरा जसा पटकन आनंदी झाला होता तसाच खाडकन उतरला. त्याला आता वाढदिवस साजरा करायची इच्छाच राहिली नव्हती तेवढ्यात दीपिका म्हणाली," सर या ना केक कट करायला!!"

अन्वयने हातात चाकू घेतला. तो केकजवळ पोहोचला. त्याने केक कापायला चाकू तर समोर केला पण त्याची हिम्मत काही झाली नाही. त्याने चाकु तसाच हातात ठेवला आणि आपला चेहरा सर्वांकडे वळवीत म्हणाला," फ्रेंड्स तुम्हाला एक प्रश्न विचारू?"

सर्वांच्या चेहऱ्यावर हसू होत आणि तो पुन्हा म्हणाला," मला एक सांगा तुम्हा सर्वांच खरच माझ्यावर प्रेम आहे?"

अन्वय सर्वांकडे बघत होता तर इतर सर्व विचार करत होते तेव्हाच दीपक म्हणाला," हो सर प्रेम आणि आदर दोन्हीही आहे तेव्हाच तर आनंदाने वाढदिवस साजरा करतोय."

अन्वय आता उदास स्वरात म्हणाला," मग हे सर्व प्रेम फक्त माझ्यावरच का? मी तर फक्त काही दिवस झाले ऑफिसला येऊन? तिकडे स्वरा तिथून एकटीच सर्व बघत आहे तरीही तुम्हाला एकदाही तिला बोलवावस वाटलं नाही? हा फक्त आजचा प्रश्न नाही. तर गेल्या वर्षापासून हे असंच सुरू आहे. तुम्ही सर्व मिळून कुठलाही कार्यक्रम साजरा करता पण त्यात स्वरा कुठेच असत नाही. का तिचा चेहरा खराब आहे म्हणून? चेहरा महत्त्वाचा नसतो नियत महत्त्वाची असते हे कधी कळणार तुम्हाला? मी फक्त काही महिने झाले इथे आलोय, तिला बघितलं तेव्हापासून माझं मन स्वस्थ बसत नाही आणि तुम्ही वर्ष झाले तिच्यासोबत राहून तर एकदाही विचार आला नाही की तिला माणूसकीची वागणूक दिली जावी. हेच आहे का तुमचं प्रेम? अस जर तुमचं प्रेम असेल तर सॉरी पण मला नकोय हे प्रेम. मी फक्त एक दिवस तुमच्यावर रागावलो तर कसे चेहरे पाडून बसला होतात दिवसभर. तुम्हाला मी बोलल्यामुळे किती त्रास झाला होता पण हाच त्रास नकळत तुम्ही तिला रोज देता तेव्हा काहीच वाटत नाही का? एकाच ऑफिसमध्ये राहून तुम्हाला तिच्याशी तस वागायला काहीच वाटत नाही का? खरच फ्रेंड शेम ऑन यु!! तिला पूर्ण जगाने त्रास दिलंय. तरीही ती कधी कुणाला उलटून बोलत नाही आणि तुम्ही एक संधी सोडत नाही तिला तिची जागा दाखवण्याची. तिचा चेहरा खराब झालाय ह्यात नेमकी तिची काय चूक? तुमच्याच कुठल्यातरी घरच्या एका पुरुषाने तिला अस बनविल आहे ना मग तिला ह्याची शिक्षा का? शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. उद्या समजा तुमचा एखाद्याचा अपघात झाला? तुम्हाला पैशांची, मित्राची फार गरज आहे अशा वेळी तुम्ही माझ्या काही कामाचे नाही म्हणून जॉबवरून काढून टाकल तर कस वाटेल? आणि आताही जर कळत नसेल तर तुम्हाला प्रेम ह्या शब्दाचा अर्थ खरच समजला नाहीये!! "

तो पोटतिडकीने बोलून रागातच बाहेर जात होता तर सर्व त्याच्याकडे बघत होते. तो समोर जात होता तेवढ्यात तो थांबला आणि पुन्हा एकदा रागातच म्हणाला, " तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी धन्यवाद पण ज्या ऑफिसमध्ये एका सोबत वेगळी ट्रीटमेंट तर दुसर्याला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते तिथे मी माझा वाढदिवस साजरा करू शकत नाही. तिला स्पेशल केबिन नक्कीच आहे पण ते तिच्या बंदिस्त असण्याच प्रतीक आहे, शिक्षेचं प्रतीक आहे आणि जोपर्यंत तिला बंदिस्त वातावरणातून मुक्त केल्या जात नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान मिळणार नाही. तुम्हाला मला जर काही गिफ्ट घ्यायच असेल तर तिला त्या बंदिस्त वातावरणातून मुक्त करा. मी तुमच्या प्रेमाचा आयुष्यभर ऋणी राहील."

कैसा ये सफर है तेरी बंदगी का
चाहू तो भी खत्म कर नही सकता
तकलीफ होती नही ऐसा नही है
पर देखकर भी मै शोर कर नही सकता

तो रागात बोलला आणि बाहेर कुठेतरी निघून गेला. रागात असला की अन्वयला काहीच सुचत नाही. इथे काही वेळ तो थांबला असता तर त्याचा आणखिच मूड खराब झाला असता म्हणून त्याने तिथून पळ काढला होता. आज त्याचा वाढदिवस खराब झाला त्याहीपेक्षा त्याला स्वराला जी वागणूक दिली जात होती त्याच वाईट वाटत होतं. आजपर्यंत त्याने पाहून सुद्धा दुर्लक्ष केलं होतं पण आज त्याला राहवलं नाही आणि त्याचा पूर्ण राग त्यांच्यावर निघाला. इकडे तो रागात बाहेर पडला होता तर बाकी ऑफिसमध्ये शांत वातावरण होत. सर्व एकमेकांकडे बघत होते. त्यांचे चेहरे शरमेने खाली झाले होते आणि सर्वांनी एकसाथ स्वराकडे नजर टाकली. स्वरा त्या सर्वांना बघत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता की दुःख. होती ती हलकीशी स्माईल. त्या सर्वानी तिच्या स्माईलकडे लक्ष दिले आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटली. काही क्षण ते सर्व तिच्याकडेच बघत होते तर ती त्यांच्याकडे. कुणाचीच काम करायची इच्छा नव्हती.

अन्वय तासभर झाला होता बाहेरच फिरत होता . त्याच कशातच लक्ष लागत नव्हत. त्याने मोबाइलदेखील बंद करून ठेवला होता. एक तर तो रागवायचा नाही पण त्याला राग आला की मग स्वतःला आवरू शकत नव्हता. आज देखील त्याला कसतरीच वाटत होतं. आज स्वराचा शांत चेहरा त्याला मनातून दुखावून गेला होता. तिच्या चेहऱ्यावर हजारो प्रश्न होते आणि त्याच्याकडे एकही उत्तर नव्हतं त्यामुळे स्वतःला हतबल समजून त्याला आज खूप वाईट वाटत होतं. तो कितीतरी वेळ इकडे तिकडे फिरत होता पण त्याच्या समोरून तिचा तो शांत चेहरा काहीं जाईना. त्याला बाहेर राहून पण बराच वेळ झाला होता. आज तो स्वतःच्याच नजरेतून पडला होता. तिला नजर मिळविण्याची हिम्मत आज त्याच्यात नव्हती तरीही तो ऑफिसमध्ये परतला. त्याला आज इतका त्रास होत होता की ऑफिसमधून केबिनमध्ये जाताना सुद्धा त्याने कुणाकडेच बघितले नव्हते. तो केबिनला पोहोचला आणि खुर्चीवर टेकून पडला. त्याची आज स्वराकडे बघण्याची इच्छा खूप होती पण तिच्याशी नजर मिळविणे त्याला खूपच कठीण जात होतं म्हणून आज स्वतःहून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तो खुर्चीवर डोळे मिटून पडलाच होता की दीपक म्हणाला," मे आय कम इन सर?"

त्याच्या आवाजाने अन्वयचे डोळे उघडले. त्याला जाणवलं की सर्वच बाहेर उभे होते. त्यांना बघताच हळुवारपणे म्हणाला, " येस प्लिज!!"

पाहता पाहता सर्वच आतमध्ये आले. अन्वय त्यांना पाहतच म्हणाला, " सॉरी जरा रागात जास्त बोलून गेलो. होत नाही सहसा अस कधी पण राग आला की आवरत सुद्धा नाही. सो सॉरी!! "

तो बोलतच होता की दीपिका उत्तरली, " सर तुम्ही सॉरी म्हणू नका. आज तुमच्यामुळेच आम्हाला आमची चूक लक्षात आलीय. नकळत तिच्या चेहऱ्यावर लक्ष देताना आम्ही कधी तिच्या कामावर, तिच्या स्वभावावर लक्ष दिलं नाही. कदाचित ती आमच्यापेक्षा वयाने लहान आहे पण बाकी सर्वच गोष्टीत ती मोठी निघाली. तुम्ही म्हटल त्यातला एक-एक शब्द खरा होता. आम्ही आमच्यातून कधी बाहेरच निघालो नाही. आम्हाला सर्वाना माहिती होत तिच्यासोबत काय झालंय ते पण कुलकर्णी सरांनी निर्णय घेतला आणि त्यापलीकडे जायचा आम्ही कधी विचारच केला नाही. सो सॉरी सर पण आज आम्ही ती चूक सुधरवली. तुम्हीच बघा सर. तुमचं गिफ्ट रेडी आहे. स्वरा आमच्यासोबत बाहेर डेस्कवर बसली आहे. आता तरी येणार ना सर केक कट करायला? प्लिज सर!! इतक्या सुंदर दिवशी स्वतःला त्रास करून घेऊ नका. आम्ही सर्व मनातून माफी मागतो. प्लिज चला सर!"

त्याने गर्दीतून बाजूला नजर टाकली आणि त्याच्या लक्षात आलं की स्वरा बाहेर डेस्कवर बसून होती. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले आणि हळूच त्याच्या डोळ्यात अश्रू येऊन गेले. त्याने ते पुसले आणि सर्वांकडे बघू लागला. सर्व त्याला न्यायला उत्सुक होते आणि अन्वय हसतच उठला. ते समोर जात होते तर अन्वय मागे. केक पुन्हा मागवल्या गेला आणि समोर टेबलवर सज्ज झाला. कुणीतरी स्वराला बोलावलं आणि समोर उभ केलं आणि त्या सर्वांच्या समवेत त्याने केक कट केला. आज त्याच्या डोळ्यातील अश्रू केकच्या प्रत्येक भागावर पडत होते पण ते दुःखाचे नव्हते. त्यात आज आनंद होता, जे त्याने ठरवलं होतं ते आज पूर्ण करून दाखवलं होत. समाजात नाही पण ऑफिसमध्ये त्याने तिला हक्काच स्थान मिळवून दिल होत. त्याने केक कट करून सर्वाना केक भरवला. आज फक्त त्याच्या एकट्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता तर सर्वच आनंदी होते फक्त एक व्यक्ती सोडून. ती म्हणजे स्वरा. आज तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ते पुसण्यासाठी आता त्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार नव्हती. आता तिचा प्रत्येक अश्रू पुसायला तिचे साथीदार होते.

आज पूर्ण दिवस अन्वय स्वराकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद कमी झाला नव्हता. आज त्याच्या वाढदिवसाला सर्वात सुंदर गिफ्ट मिळालं होतं. अस गिफ्ट जो अन्वय स्वराला देऊ इच्छित होता. किती दिवसापासून ज्या गोष्टीने त्याला त्रास दिला होता आता तीच गोष्ट त्याला मनातून सुखावू लागली होती. आज त्याच्या आयुष्यातला सर्वात सुंदर वाढदिवस होता हे त्याचं मन त्याला सांगत होत.

ती सायंकाळची वेळ होती. आज अन्वयने वाढदिवसाची पार्टी दिली असल्याने कुणीच घरी गेल नव्हतं. ते बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला बसले होते. हॉटेलमध्ये असताना आज वेगळंच वातावरण होत. जे लोक कधीतरी तिचा चेहरा बघून नजर वळवून घ्यायचे तेच लोक आता तिच्याशी सतत बोलत होते. आज स्वरावरून त्यांची नजर हटत नव्हती. तिच्या बाजूला बसून सर्व मस्ती करत होते तर समोर कुठेतरी बसून अन्वय ते सर्व बघत होता. तिथे सर्वांचा गोंधळ सुरू होता फक्त दोन लोक शांत होते. एक स्वरा, जी सर्वांच्या चेहऱ्याकडे सतत नजर देऊन होती तर दुसरा अन्वय जो स्वराकडे सतत बघत होता. आज स्वरा खूपच खुश होती म्हणून तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू पडत होते तर अन्वय तिला बघून आज खूप खुश होता. आज त्याने स्वतःला दिलेलं एक वचन पूर्ण केलं होतं. ती त्या बंदिस्त रूममधुन मुक्त झाली होती . कदाचित आपल्या विचारांमधूनही. ती मुक्त झाली आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू पसरू लागलं. आज कितीतरी वेळ सर्वांच्या गप्पा सुरु होत्या आणि जेवण संपताच सर्व बाहेर निघू लागले. अन्वय बिल पे करून बाहेर पडला तेव्हा त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन सर्व घरी जात होते. जसे सर्व निघाले तशीच स्वराही निघाली. तिने काही पावले टाकलीच होती की ती परत आली. अन्वय अजूनही तिथेच उभा होता आणि ती हात समोर करत म्हणाली," वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अन्वय सर!! तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो."

अन्वय हसतच उत्तरला," तुला माहिती आहे माझी काय स्वप्न आहेत?"

स्वरा हर्षोल्हासित म्हणाली," खर तर नाही पण ते जाणून घ्यायची इच्छाही नाही. तरीही म्हणेन की तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावे. देव तुम्हाला हवं ते नक्की देईल."

अन्वय तिच्या हातात हात मिळवित म्हणाला, " तुझ्या शुभेच्छा पाठीशी असल्यावर अशी कुठलीच गोष्ट नाही जी माझ्या स्वप्नांच्या मध्ये येईल. आता मला पूर्ण विश्वास आहे की माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आणि मीही देवाला प्रार्थना करेन की तू ज्या शुभेच्छा दिल्या त्या नक्की पूर्ण व्हाव्या."

तिने अलगद हात सोडवला आणि समोर जाऊ लागली. ती समोर समोर जात होती तर अन्वय अजूनही आपल्या हाताकडे पाहत होता. तिच्या स्पर्शाने त्याच मन सुखावल होत, तिच्या हसण्यानें त्याच्या मनाला समाधान मिळालं होतं. तो आपल्या हाताकडे बघतच होता की तिने जाता जाता त्याच्याकडे एकदा वळून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हसू बघून तीही हसू लागली होती आणि होते डोळ्यात अश्रू. तिने रुमालने डोळे पुसले आणि समोर जाऊ लागली. तिच्या डोळ्यात आज अश्रू होते पण अन्वय तिला बघून खुश होता कारण ते अश्रू नव्हते, ते बंधन होत तिने आपल्याच मनावर घातलेल. आज ते तुटून पडल होत. अश्रुच्या माध्यमातून बाहेर येत होतं. अन्वय तिचे अश्रू बघून सुखावला होता तर स्वरा त्याचे अश्रू बघून. कधीतरी स्वराच्या डोळ्यात अश्रू आले की त्याला त्रास व्हायचा पण आज तेच अश्रू बघून तो सुखावला होता. प्रेम म्हणजे नक्की काय हे सांगता येत नाही पण जेव्हा समोरचा आनंदी असतो तेव्हा आपण सर्व दुःख विसरून त्याच्या आनंदात सहभागी होतो हेच प्रेम आहे. ह्यापेक्षा प्रेमाची शॉर्ट आणि स्वीट व्याख्या होऊच शकत नाही.

तेरी हसी कितनी भी मेहंगी हो
करोडो देकर खरीद लु
तू पलभर मुस्कुरा संके इसलीये
मै सारी जिंदगी निछावर कर दु

क्रमशा ….

( हॅलो फ्रेंड्स. कसे आहात मजेत ना? मी ही कथा लिहितोय पण मला तेवढं समाधान मिळत नाहीये कारण अस वाटत आहे की मी एकटाच कथा लिहितोय. कुणी उघड मनाने कमेंट करत नाही की नाही. इतका संवेदशील विषय हाताळताना मलाच कितीतरी विचार येतो. तुम्हाला नाही येत का? कदाचित तुमच्या कमेंट्स माझ्यात नवीन ऊर्जा भरतील आणि सोबतच हा विषय अगदी माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे तेव्हा कदाचित तुमच्या कमेंट्समुळे मला लिहायला मदत होऊ शकते. थोड्या डिटेल कमेंट्स दिल्या तर लिहिण्याच समाधान मिळेल. आता तुम्हाला कथा नसेल आवडत तर नका देऊ. मी एकटा लिहीत बसेन पुढचे भाग. आतापर्यँत कथा वाचण्यासाठी आणि एकही रोमँटिक सिन नसलेल्या कथेला भरभरून प्रतिसाद द्यायला खूप खूप धन्यवाद..)