खामोशसे कुछ सपने है
खामोशसे कुछ नगमे
रेह गये वो अधुरे
जिते जिते ही मुझमे
आयुष्याला सुंदर बनवायला हवं असत ते सुंदर हसू. आपल्याकडे जर सुंदर हसू असेल तर कदाचित आयुष्यात आलेल्या समस्यांनादेखील आपण दूर ठेवू शकतो. एक वेळ अशी येते की ते सुंदर हसू बघून समस्यांना देखील आपल्या आयुष्यात राहणे लाजिरवाणे वाटते आणि त्या कायमच्या दूर निघून जातात. जीवन जगण्याचा हाच सर्वात सुंदर उपाय आहे. समस्यां हा आयुष्याचा भाग आहे. आपण जोपर्यंत त्यांना आपल्यावर हावी होऊ देऊ तोपर्यंत त्या वरचढ ठरतील आणि एकदाकी आपण त्यांचं महत्त्व कमी करतो तेव्हा त्या आयुष्यात तर राहतात पण कदाचित त्यांचा प्रभाव नाहीसा होता. जीवन जगण्याचा सर्वात सुंदर मंत्र सुंदर हसू. जो आपला दिवस तर बनवतो पण आपल्या शत्रूंना पण विचार करायला भाग पाडतो की हा एवढा आनंदी कसा? काय आहे ह्याच्याकडे अस जे ह्याला कायम आनंदी ठेवत?
स्वराच्या आयुष्यात प्रॉब्लेम नव्हतेच कारण स्वराच आयुष्यच प्रॉब्लेम होत पण तिने आता सर्वांसमोर रडगाणं ऐकवन बंद केलं होतं त्याऐवजी ती स्वतःच्या मनाला खंबीर बनवू लागली होती. तिच्या मनात आता ना आशा होत्या ना कसली स्वप्न, होता तो तिरस्कार पण तोही तिने कधीच कुणाला दाखवला नाही. तिला क्षणोक्षणी कुणीतरी दुखवायच पण ती तेवढ्याच खंबीरपणे उठून उभी राहायची. ना तिला आता जगाची भीती होती ना कुणाकडून अपेक्षा. तिने कदाचित जीवन जगण्याचा आपला स्वतःचा मार्ग शोधला होता.
हळूहळू दिवस जाऊ लागले होते. स्वरा ऑफिसचा भाग असूनही कधीच ऑफिसचा भाग होऊ शकली नाही. तीच काम बघून अगदी सर्व खुश होते पण कुलकर्णी सरांनी उभी केलेली भिंत भेदून कुणीच तिच्या आयुष्यात गेलं नाही. स्वराला त्या सर्व गोष्टींच आधी वाईट वाटायचं पण हळूहळू तिलाही समजत गेलं की मुळात कुणाकडून अपेक्षा करणेच चुकीचे त्यामुळे तिने त्या सर्व गोष्टी सहज स्वीकारल्या. ती आता वेळ झाला की ऑफिसला जायची आणि वेळ झाला की परत यायची. हळूहळू तिने अपेक्षा करणे सोडले आणि तिला जाणवू लागल की आता आपल्याला कसलाच त्रास होत नाही. ऑफिसमधूनही परत आल्यावर फार काही बदलायचं नाही. फक्त स्कार्फ निघायचा बाकी ती आणि तिचा एकांतपणा कायम सोबती असायचा. तिला ह्या काही दिवसात जाणवू लागल होत की कदाचित ती अशीच राहिली तर नक्कीच वेडी होईल त्यामुळे तिने कथा कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली आणि कसाबसा तिचा वेळ जाऊ लागला. ती नॉर्मल राहायचा प्रयत्न तर करत होती पण कधी कधी त्या एकटेपणाचाही तिला त्रास होऊ लागायचा. मुंबई ही स्वप्ननगरी. ह्यात प्रत्येक व्यक्तीच स्वप्न पूर्ण होत पण स्वरा ह्याबतीतही कमनशिबीच ठरली. एका शहराने तिची ओळख हिरावली होती तर दुसऱ्या शहराने तीच स्वातंत्र्य.
आज स्वराला सुट्टी होती. रोज लोकलचा प्रवास करून तिचा जीव रडकुंडीला आला होता म्हणून आज ती काही अंथरूनावरून उठली नव्हती. तिने चादर अंगावर घट्ट ओढून घेतली आणि वाऱ्याच्या गार स्पर्शाने तिला मस्त झोप लागली होती. ती आज खूप दिवसाने स्वप्नात हरवली होती म्हणून कदाचित तिला उठण्याच भान नव्हतं. ती खूप दिवसाने हे क्षण एन्जॉय करतच होती की तिचा फोन वाजला. पहिली रिंग झाली तेव्हा स्वराने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि कुस बदलून झोपू लागली पण पुन्हा रिंग वाजू लागली आणि आता स्वराला कॉल उचलणे भाग पडले. स्वराने बाजूला पडलेल्या मोबाइलकडे हात वळविला आणि हळूच मोबाइल हातात घेत स्क्रीनकडे पाहू लागली. तो कियाराचा कॉल होता. कियाराच नाव दिसताच स्वराने पटकन कॉल रिसिव्ह केला. स्वरा काही बोलणार त्याआधीच कियारा ओरडत म्हणाली," हाय मेरी जाण कैसी हो? जबसे जॉब मिली है तबसे बात नही करते कुछ नही. लगता है जॉब बहोत भा गयी है तूमको, सच है ना? "
कियाराचे शब्द ऐकून तर स्वरा काही क्षण गप्पच बसली. कियारानेच तिला जॉब मिळवून दिली होती त्यात तिला जॉबची सत्य परिस्थिती समजली असती तर कदाचित तिला जास्तच वाईट वाटलं असत म्हणून स्वराने शांतच राहणं पसंद केलं होतं. तेवढ्यात कियारा पुन्हा ओरडत म्हणाली," हा या नही?"
स्वराने मात्र आता स्वताच्या विचारांना बाजूला सारले आणि ओठांवर खोट हसू आणत म्हणाली," हा बेबी डॉल!! सब कुछ मस्त है. देख ना इतनी बिजी हो गयी हु की वक्तही नही मिलता और ये सब तुम्हारे वजहसे हैे सो थॅंक्यु सो मच. अगर तू नही होती तो आज मेरा क्या हाल होता सच मे पता नही. "
कियारा क्षणभर हसतच उत्तरली, " नही मिली होती तोभी उससे बेटर मिल जाती. तुझे कौन नही देता जॉब आफ्टरऑल यु आर द बेस्ट."
स्वराला क्षणभर स्वतःवरच हसू आलं कारण जर तिला स्वतःच जॉब मिळाली असती तर कदाचित हे अस जेलसारख जीवन जगाव लागलं नसत त्यामुळे क्षणभर ती हसतच राहिली. तेवढ्यात कियारा पुन्हा म्हणाली," स्वरा एक बात पुछु?"
स्वराने हसतच उत्तर दिले," परमिशन क्या मांग रही हो पुछो!"
कियारा हसता हसता आता शांत झाली. कियाराच्या दीर्घ श्वासांचे आवाज स्वराला ऐकू येत होते त्यावरून तिला समजलं होत की कियारा नक्कीच काहीतरी सिरीयस विचारणार आहे म्हणून श्वास रोखून तीही तिच्या शब्दांची वाट पाहू लागली आणि कियारा विचार करत हळुवार शब्दात म्हणाली," स्वरा ऑफिसमे सच मे सब ठीक है ना? तुम्हारे चेहरे के वजहसे कोई तकलीफ तो नही देता ना?"
स्वराला अंदाज आलाच होता की ती असच काहीतरी बोलणार म्हणून तिने आधीच मनाची तयारी केली होती . तिने घट्ट डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेत म्हटले," हा यार! तेरे रेहते हुए कुछ गलत हो सकता है क्या ? तूम भी ना बहोत ज्यादा सोचती हो. सच मे बहोत मस्त चल रहा है सब. तू टेन्शन लेना छोड दे. "
स्वराच उत्तर ऐकून कियाराला बर वाटल आणि त्यानंतर तिचा मूड छान झाला. आज कियारा स्वरासोबत खूप गप्पा मारत होती. तिला फोन ठेवायचा नव्हता पण बहुदा आज ते कुठेतरी बाहेर जाणार होते म्हणून तिला नाईलाजाणे फोन ठेवावा लागला होता. कियाराने फोन ठेवला आणि स्वराने सुस्कारा सोडला कारण ती थोड्या वेळ कियारा सोबत बोलत बसली असती तर कदाचित ती ते सर्व जास्त वेळ लपवून ठेवू शकली नसती. कियाराने फोन ठेवला आणि स्वराच घड्यळीकडे लक्ष गेल. जवळपास ११ वाजायला आले होते. कियाराशी बोलताना स्वराला वेळेचा भान उरला नाही पण आता मात्र तिने उठून पटकन सर्व आवरायला घेतलं.
स्वरा सर्व आवरून निवांत पडली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. पुन्हा एकदा तिने मोबाइल हातात घेतला आणि मोबाइल बघू लागली. त्यावर माधुरीचा मॅसेज येऊन होता. तिने पटकन लॉक ओपन करून मॅसेज बघितला.
📲 ताई आज आपण सुरुचीच्या किनाऱ्यावर जाणार आहोत सो मला सायंकाळी भेट.
स्वराचा आज कुठेही बाहेर जायचा मूड नव्हता त्यामुळे तीन पटकन मॅसेज टाइप केला
📲 मधू आज नको! मला बसू दे घरी कंटाळा आलाय बाहेर राहून. आज आराम करेन सो तू एकटी जाऊन ये.
काहीच क्षण गेले आणि समोरून पुन्हा माधुरीचा मॅसेज आला ...
📲 ताई मला काहीच ऐकायचं नाही. एक तर आई बाहेर जाऊ देत नाही त्यात तिनेही परवानगी दिली सो तुला ह्यावच लागेल नाही तर ना मी तुझ्या घराबाहेर पहारा देईन. प्लिज ताई!! आपल्या छोट्या बहिणीच ऐकणार नाहीस का?
स्वराला आता बोलायला काहीच उरल नव्हतं. माधुरी एवढ्या प्रेमाने सर्व बोलली होती की ती नाही म्हणू शकत नव्हती म्हणून पटकन तिने मॅसेज टाइप केला.
📲 बर बाई जाऊया पण लवकर ये म्हणजे लवकर परत येऊ घरी.
तिने मॅसेज पाठवलाच होता की माधुरीने पटकन रिप्लाय केला...
📲 हो येते. दिदु लव्ह यु सो मच बाय!!
स्वरा तीच बोलणं ऐकून क्षणभर हसतच होती. स्वराच्या आयुष्यात त्रास देणाऱ्याची काहीच कमी नव्हती पण प्रत्येक वेळी तिच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती यायची जी तिला एकट पडू द्यायची नाही त्यामुळेच स्वरा दुःखातून सुद्धा आनंद शोधू शकत होती. स्वरा कितीतरी वेळ हाकंग विचार करत बसली होती. काय आहे ही दुनिया भास की आभास? उत्तर कदाचित तिच्याकडे नव्हतं आणि त्यावर एकमेव सुंदर उपाय. तीच गोड हसू आज काहीच क्षणात विचार गायब.
सोचा ना था कभी
हसी की किंमत बढ जायेगी
जमाना रुलाता जायेगा
और हसी अनमोल हो जायेगी
******************
सायंकाळची वेळ. बहुदा ५ वाजत आलेले असावेत. माधुरी स्वराचा हात पकडतच तिला किनाऱ्यावर घेऊन आली होती. स्वराची आधी तर बाहेर यायची इच्छा नव्हती पण तो समुद्र किनारा बघून स्वराच मन थोडं फार शांत झाल होत. बाजूची उंचच उंच सुरुचीची झाडे बघून स्वरा त्या निसर्गात इतकी हरवली की तो कंटाळा क्षणात नाहीसा झाला. स्वरा त्या निसर्गात हरवली होती तर माधुरी उड्या मारतच पाण्यात पोहोचली. माधुरीच्या आवाजाने स्वराच तिच्यावर लक्ष गेलं आणि स्वरा तिला बघून क्षणभर हसू लागली. माधुरी इतकी एन्जॉय करत होती की स्वराला राहवलं नाही आणि तिने पर्समधून फोन काढून तिचे फोटो काढायला सुरुवात केली. माधुरी सुद्धा इतकी खट्याळ की तिला वेगवेगळे पोज देऊ लागली. स्वराचा चेहरा आता बऱ्यापैकी खुलून निघाला होता फक्त फरक एवढाच की तो कुणाला पाहता येणार नव्हता. तिच्या गोड हसूने वातावरण आणखीच रंगतदार झालं होतं. स्वरा बाहेरून फोटो काढत होती तर माधुरी तिला येण्यासाठी विनंती करू लागली. स्वराने मात्र सरळच नकार कळविला होता.
काही क्षण तसेच गेले. स्वराने आपल लक्ष माधुरीवरून हटविले आणि ती निसर्गाचे फोटो काढण्यात दंग झाली तेवढ्यात माधुरी मागून आली आणि स्वराचा स्कार्फ तिने खेचला. तो थोडा खाली आला तेव्हाच तिने पुन्हा नीट केला. स्वराच तिच्याकडे लक्ष नव्हतं त्यामुळे तिला रागच आला होता. स्वराने कसातरी स्कार्फ सोडवण्यापासून वाचविला आणि पलटून पाहू लागली. ती माधुरी असल्याने तिचा राग थोडा कमी झाला आणि हळूच आवाजात स्वरा म्हणाली," काय करते आहेस मधू?"
माधुरी हसतच उत्तरली," काय करते आहे म्हणजे तुझ्यासोबत फोटो काढायचे आहेत तेव्हा स्कार्फ काढते आहे. तू काय स्कार्फवरच फोटो काढणार आहेस का? आणि मला सांग इथे कोण स्कार्फ घालून फिरत बर. चल काढ पटकन."
स्वरा क्षणभर घाबरली. त्या स्कार्फच्या मागे अस एक सत्य दडल होत जे मधूला कळल्यावर कदाचित तीही जगासारखी वागणार नाही ना ह्याची भीती तिला सतावत होती शिवाय ती लहान होती म्हणून तिला हे सर्व सहन होईल की नाही ह्याची भीती स्वराला वाटत होती म्हणून ती शांतच बसली तेवढ्यात पुन्हा माधुरी म्हणाली," ताई काढ ना स्कार्फ मला फोटो काढायचे आहेत ना!"
स्वराच मन खूप घाबरत होत म्हणून अडखळतच ती बोलून गेली," मधु नको ना मला फोटो नाही काढायचे. तू म्हटलं तर आले ना मी तेव्हा हट्ट नको करुस आता."
स्वरा बोलून तर गेली पण मधू कुठे ऐकणार होती त्यामुळे ती जबरीने तिचा स्कार्फ ओढू लागली आणि स्वरा ओरडतच म्हणाली," मधू कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं मला नाही काढायचे फोटो म्हणजे नाही काढायचे."
स्वराच्या ओरडल्याने मधु गप्पच बसली. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले होते. ती स्वराच्या बाजूला झाली आणि रेतीवर एका कोपर्याला जाऊन बसली. तिला रडताना बघून स्वराला वाईट वाटलं आणि आपली चूक लक्षात आली. स्वरा तिच्या जवळ गेली आणि तिच्या हातावर हात मांडत म्हणाली, "सॉरी मधू! मी तुझ्यापासून एक सत्य लपवल की मी ऍसिड अटॅक पीडित आहे. माझा चेहरा खूप खराब झालाय म्हणून चेहरा दाखवत नाहीये. मला चुकीच समजू नकोस."
स्वराच उत्तर ऐकून माधुरीने रडन बंद केलं. ती स्वराकडे बघू लागली. स्वराच्या डोळ्यातही पाणी होत. तिने ते पुसून घेतलं आणि हळुवार स्कार्फ उघडत ती तिला बघू लागली. स्वराला वाटलं होतं की तिला बघून माधुरी घाबरेल पण अस काही झालं नाही उलट तिने आपला मोबाइल हातात घेत पटकन एक सेल्फी काढला आणि फोटोकडे पाहून म्हणाली, " ताई मस्त आलाय ना आपला फोटो?"
स्वरा आपले अश्रू पुसत उत्तरली, " तुला माझ्या चेहऱ्याने फरक नाही पडला?"
माधुरी हसतच उत्तरली," मी तुला असच ताई नाही म्हणत. मनातून म्हणावसं वाटत म्हणून म्हणते. ताई चेहऱ्याची सुंदरता कायम असेलच का हे सांगता येत नाही पण मनाची सुंदरता कायम राहते आणि मी ठामपणे सांगते की तू मनाने खूप सुंदर आहेस. आता तुझं रडून झालं असेल तर जाऊया खेळायला आणि बर का सेल्फी अजून काढायचे आहेत खूप."
माधुरीने फोन पटकन बॅग मध्ये ठेवला आणि तिचा हात पकडत पाण्यात घेऊन गेली. दोघीही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होत्या आणि दोघांच्याही चेहऱ्यावर व्यक्त न करता येण्यासारखा आनंद होता. क्षणभर माधुरीला बघून स्वराच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मनात एक विचार," वयाने लहान आहे पण कदाचित विचाराने मोठी आहे. का सर्वच लोक अस विचार करू शकत नाहीत? तस झालं असत तर कदाचित कितीतरी स्वराना समाधानाच जीवन मिळालं असत!"
स्वराला ह्या काळात भरपूर प्रश्न पडत पण त्याच उत्तर तिच्याकडे नव्हतं. तिला वाटायचं ह्या प्रश्नांची उत्तरं कुणी तरी द्यावी पण कुणीच देत नसत. किती कठीण आहे ही उत्तरे आणि विशेष म्हणजे काय आहे?
तेरे जवाबसेभी ज्यादा
तेरे सवाल हैराण करते है
एक सवाल मेरे दिलं मे है
क्यू तुझे इतने सवाल पडते हैं?
क्रमशा ...