नसीब से कुछ पल चुराणा चाहती हु
ईश्क के रंगो मे घुलना चाहती हु
ए खुदा दे अगर मौका तू मुझे
मै माँकी कोकमेही फिरसे पलना चाहती हु
स्वरा आज खूप दिवसाने शांत झोपली होती पण तिच्या हजारो प्रश्नांनी तिच्या आई-वडिलांची झोप उडवली होती. स्वरा म्हणजे त्यांची हिम्मत. स्वरा म्हणजे आधार. स्वरा वादळ आल्यावर विसावा घ्यावा असा निवारा. स्वरा म्हणजे त्यांच्यासाठी जीवनच. जेव्हा कधी त्यांच्यावर बिकट परिस्थिती येत असे तेव्हा तीच त्यांना मोठया माणसासारखं समजवत असे. ती एकदा बोलायला लागली की प्रॉब्लेम किती छोटे आहेत अस वाटून जायचं पण आता सर्व काही बदललं होत. वादळ शांत झाल तेव्हा सोबत निवारा उडवून घेऊन गेला होता. स्वराची परिस्थिती पाहण्यासारखी नव्हती. आपल्या स्वतःच्याच मुलीला हरताना बघून, तिला हतबल होताना बघून आई - वडिलांचा जीव तीळतीळ तुटत होता. ते तिला आनंदी करायचे, तिच्या चेहऱ्यावर हसू आणायच साधन शोधत होते पण आयुष्यात पहिल्यांदा ते हतबल झाले होते. स्वराने कधीही काहीही मागितल तरीही ते क्षणात तिच्यासमोर ते हजर करायचे पण स्वराच्या चेहऱ्यावर हसू कस परत आणायच, जुन्या स्वराला कस परत आणायच हे त्या दोघांनाही कळत नव्हतं. आज पहिल्यांदा त्यांना आपण खूप गरीब आहोत ह्याची लज्जा वाटत होती आणि स्वराच्या आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. त्या रात्री स्वरा शांत झोपली आणि त्यांनी रात्रभर जागून निर्धार केला होता की तिने आपल्याला जस कधी हरू दिलं नाही, आपली ओळख बनून कायम सोबत राहिली तसच आपणही तिच्या पाठीशी रहायच. लोक कितीही काहीही बोलू दे पण आपण तिच्यापर्यंत दुःख पोहोचू द्यायचं नाही. आजपर्यंत आपण फक्त तिचे आईवडील होतो पण आता तिचे मित्र, शिक्षक बनून तिला पुन्हा एकदा जगायला शिकवायच, हसायला शिकवायचं.
तेरे हसी के लिये दुनिया वार दु
दुखो को तेरे करिब ना आने दु
बस चले तो मै लड जाऊ सारी दुनिया से
तेरी जिंदगीके लिये मे हर सांस त्याग दु
स्वरा रात्री लवकर झोपली आणि सकाळी निवांत उठली. सकाळी सकाळी पूजाने तिला कॉल केल्याने तिचा दिवस छान निघाला होता. तिच्या चेहऱ्यावर आज दुःखाचा लवलेशही नव्हता. शांत झोप झाल्याने ती आज फ्रेश वाटत होती. पूजा, कियाराने त्या मूडमध्ये आणखी भर घातली आणि तीही दिलखुलासपणे हसू लागली. स्वराच्या हसण्याचा आवाज बाहेर हॉल मध्ये ऐकू येत होता आणि स्वराच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे मोती पसरू लागले. स्वरा हसत खिदळत होतीच की घरात कुणाच्या तरी येण्याचा आवाज आला. टपटप करणाऱ्या त्या पावलाने स्वराच हसू क्षणभर गायब झाल. तो आवाज जरा मोठा होऊ लागला आणि स्वराने कॉल कट केला. तिने आपल्या कानांना आवाज एकण्याचे फर्मान धाडले आणि कानांनी शोध लावायला सुरुवात केली. काहीच क्षणात तिला आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. तो आवाज ऐकून स्वरा जरा घाबरलीच कारण तो आवाज तिच्या नावडीतल्या आवाजांपैकी एक होता. स्वराने घाबरून उशी आपल्या मांडीवर घेतली आणि पुढे काय होतंय त्याची आतुरतेने वाट पाहू लागली. तो आवाज होता तिच्या मामांचा. मामा जुनाट विचाराचे, कायम संस्कृतीवर भाष्य करणारे. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही की सरळ मोठ्याने ओरडून मोकळे व्हायचे त्यामुळे तीच आणि त्यांचं कधीच पटलं नाही. त्यांच्यात कायमच वैचारिक भांडण व्हायची. ते आले हा विचार करताच तिच्या मनात धडकी भरली. ते पुन्हा काहीतरी जीवाला लागणार बोलतील हे विचार करून स्वरा गारच पडली. आता स्वराची अशी मनस्थिती नव्हती की ती मामाच बोलणं ऐकून घेईल. तिने मोबाइल बाजूला ठेवला आणि बेडवर शांत बसून राहिली. तिच्या डोक्यात विचार सुरूच होते की मामा बेडरूमच्या दारात आले. ती त्यांच्याकडेच पाहत होती आणि त्याच वेळी त्यांची नजर तिच्यावर पडली. क्षणभर ते दोघेही एकमेकांना पाहत होते. दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या होत्या. स्वरा त्यांच्या नजरेला नजर देऊन अधिकच घाबरली कारण त्यांच्या नजरेत अस काहीतरी होत जे तिने ह्याआधी कधीच बघितलं नव्हतं. त्यांची ती विषारी नजर बघूनच तिचे हातपाय गळून पडले होते आणि तेव्हाच मामा बेडरूममधून बाहेर जात मोठ्यानेच म्हणाले," सारिका मी तुला आधीच सांगितलं होतं ना मुलीला बाहेर शिकायला जाऊ देऊ नकोस. मुली बाहेर गेल्या की असेच विघ्न घेऊन येणार. उगाच शास्त्र मुलींना चूल आणि मूल ह्यामध्ये अडकून राहायला सांगत नाही. त्यामागेही कारणे आहेत. मी कायम मुलीला बाहेर जायला विरोध का करत होतो आता समजलं?? बघितलं ना काय करून आलीय ही? माझं ऐकलं असत तर आज अशी स्थिती आली नसती. नुसतं मुलींना चढवून ठेवलं ना तर असच होणार ! ती तुम्हाला स्वप्न दाखवत राहिली आणि तुम्ही पाहत राहिलात. मी म्हणतो कुठे गेली ती आता स्वप्न ? बघितलं का तिच्याकडे लोक काय काय बोलत आहे तिच्याबद्दल की आणखी काही ऐकायचं सोडलं तुम्ही? "
ते बोलतच होते की स्वराची आई आपल्या भावाला विनवणी करत म्हणाली," दादा ही वेळ नाही ह्यावर बोलायची तू शांत हो आधी. पोरगी आधीच घाबरून आहे, कसतरीे सावरल आहे तिला नको जास्त बोलुस. तिला आता हे सर्व सहन होणार नाही. तिला आता जास्त बोललास ना तर आवरण कठीण जाईल रे हळू बोल किंवा चल आपण बाहेर जाऊन बोलू. "
स्वराच्या मामानी स्वराच्या आईचा हात जोर्याने झटकला आणि मामा पुन्हा आवाज चढवत म्हणाले," का आता का? माझ्याशी मोठ्या आवाजाने बोलायची, मला नको ते शिकवायची तेव्हा काही बोलल असत, तिला उत्तम संस्कार दिले असते, आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं असत ना तर अशी वेळ आली नसती. आत सहन होणार नाही हिला मग नुसते धंदे करायचेच कशाला की ही स्वतःला झाशीची राणी समजते!!! मुलींना आपल्या हदमध्ये राहावं कळत नाही का हिला?? कळलं असत तर अशी स्थिती झाली असती का म्हणा! आणि काय ग सर्व जगाला माहिती झालं हिच्याबद्दल पण मला सांगायला काय धाड भरली होती तुला. मलाही बाहेरच्या माणसांकडून कळावं किती लाजिरवाण गोष्ट आहे ही आणि आता म्हणतेस की बाहेर चला. तिला सहन होणार नाही. ती तर बसली आहे घरात पण आम्ही लोकांची बोलणी सहन करतोय त्याच काय? तुम्हाला नसतील लाजा पण मला आहेत म्हणून न सांगताही आलोय वरून मलाच बाहेर चलायला सांगते आहेस."
तिचे मामा बोलत होते आणि स्वरा आणखीच गळून पडली. तिचे हातपाय थरथर कापू लागले होते . तिची आईही काहिच बोलत नव्हती आणि पुन्हा ते म्हणाले, " माझ्या हातात दिली असती ना तिला तर आतापर्यंत सुतासारखी सरळ केली असती म्हणजे आता पूर्ण जगभर आमचं नाव बदनाम झालं नसत. बघितलं का लंगुर तरी बर दिसत हिच्यासमोर!! कलंकित केलंय हिने आमचं नाव !! एवढं करून जिवंत कशी आहे कुणास माहिती . निर्लज्ज ना कशी मरेल? "
ते समोर काही बोलणारच तेवढ्यात स्वराची आई ओरडतच म्हणाली," दादा खूप ऐकलं तुझं!! तुला तिची स्थिती समजून घ्यायची नसेल तर इथून चालता हो. माझ्याच घरी येऊन माझ्या मुलीबद्दल बोलण्याचा अधिकार तुला कुणी दिला रे?? आधीही तिच्याशी तोडून बोलत होतास आणि आताही. काही काळ, परिस्थिती बघावी माणसाने मग बोलावं पण तुला तर तिच्यापेक्षा जास्त आपली इज्जत दिसते आहे. तुझी इज्जत खराब होतेय ना तिच्या नावाने सो एक काम कर आजपासून समज की तुझी बहीण मेली तुला आणि जगालाही हेच सांग आता तर तुझी इज्जत नाही जाणार ना!! वाटलं होतं तू तिची विचारपूस करायला आला आहेस पण तू तर नेहमीप्रमाणे माझ्या मुलीची इज्जत काढायला आला आहेस. नको बाबा मला नको आता तुझी काळजी. मी आहे समर्थ माझ्या मुलीची काळजी घ्यायला. "
स्वराची आई आज रागातच पहिल्यांदा बोलून गेली आणि स्वराचे मामा म्हणाले, " मला वाटलं फक्त मुलीलाच पंख फुटले आहेत पण इथे तर आईलाच पंख फुटले आहेत मग अस नाही तर कस होणार!! करा जे करायचं ते आणि आजपासून तोंड बघणार नाही तुझं. तीच तोंड तर बघण्यासारखच नाही म्हणा!! शूर्पणखा कुठली !! मला कायम उलट बोलायची ना आज बघ देवाने तिलाच शिक्षा दिली आहे. मोठ्यांचा आदर नाही केला तर असच होणार. तू आज जे जे बोललीस ते लक्षात ठेव. मीही बघतो आता तुला कोण मदत करत तर? आज फक्त तिचा चेहरा खराब झालाय उद्या काय काय होईल ह्याबद्दल अजून विचार केला नाहीस. भिक मागायची वेळ येईल ना तेव्हा तुला हा भाऊ आठवेल तेव्हा सांगेन तुला पण तू केलेली ही बेइज्जती कायम आठवणीत राहील. "
ते रागारागाने बोलून गेले तर स्वराचे बाबा तिला शांत करू लागले. त्यांचे शब्द ऐकून स्वराची काय हालत झाली होती तीच तिलाच माहिती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. बाहेर स्वराच्या आईच भांडण निपटल. आई रागात बरच काही बोलून गेल्या तेव्हा त्यांना भान नव्हतं पण सर्वकाही शांत झाल्यावर आता त्यांना लक्षात आलं की स्वराने सर्व काही ऐकलं असेल, स्वराची काय स्थिती झाली असेल. लक्षात येताच त्या धावतच बेडरूममध्ये गेल्या आणि तिच्याकडे पाहू लागल्या. स्वराला त्यांच्या येण्याचा आवाज आला होता आणि तिने पटकन अश्रू पुसले. ती आताही आईकडे हसून बघत होती. आईने तिच्याकडे बघून क्षणभर ओठांवर हसू आणले आणि बाजूला पलटली. आईलाही माहिती होत की ती खोट खोट हसते आहे पण तिची बोलायची हिम्मत झाली नाही म्हणून त्या स्वराला बघून पुन्हा बाहेर गेल्या.
मामांच्या शब्दांनी स्वराच तन-मन सर्व घायाळ झालं होत. आपल्याला लोक लंगुर म्हणत आहेत, कुणी भूत म्हणत आहेत हे ऐकून ऐकून ती एकट्यातच वेड्यासारखी हसत होती. ते २४ तास स्वरा कधीच विसरू शकली नाही. ती सतत कसलातरी विचार करत होती आणि एकट्यात स्वतःच हसत होती.
तिला हा पूर्ण काळात शांती हवी होती पण तिला कुणी शांती देत नव्हते आणि काहीच दिवसात तिची मनस्थिती आणखी खराब झाली. तिचे आई-वडील तिला सावरायचा प्रयत्न करत होते पण एखादी घटना अशी व्हायची की त्यांनी केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या जायचं. स्वरा हसायला लागली की पुन्हा काहीतरी व्हायचं नि पुन्हा ती दुःखाच्या गर्द छायेत बुडली जायची.
स्वरा अलीकडे एक मृत मूर्ती झाली होती. जी श्वास घेत होती पण जगत आहे की नाही ह्याबद्दल शंका होती. ती घरात एकटीच वेड्यासारखी बसून असायची. टीव्ही बघण्यात तिला इंटरेस्ट नव्हता की मोबाइल बघण्यात. तिला लोक कॉल करून सतत विचारत असल्याने तिने मोबाइल सुद्धा बंद करून ठेवला होता. ती २४ तास बेडवर बसून राहायची. ना बोलणं ना चालन फक्त बेडवर कसल्या तरी विचारात हरवली असायची. घरी काही बुक्स तर आणले होते पण ते धूळ खात पडले होते. ज्या बुक्स साठी ती घरच्यांशी भांडण करायची आज तेच बुक्स समोर असताना सुद्धा ती वाचत नव्हती. सुरुवातीला ती पूजा सोबत बोलत होती पण हळूहळू दिवस जात होते आणि तिने सर्वांशीच बोलणं सोडलं. ना पूजा, ना कियारा. आई - बाबांशीदेखील ती फार कमी बोलायची. सतत रूमच दार बंद असायचं आणि डोक्यात हजारो प्रश्न. ती पुतळा बनत चालली होती. प्रेमातला नकार एका दिवसात पचवणारी कॉन्फिडन्ट स्वरा अचानक अबोल झाली होती. नकारात्मकता तिच्या डोक्यात सतत फैलू लागली होती. तिचे आईवडील तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते पण ती अबोल झाली होती. लोकांचे विचार, त्यांचे बोलण ऐकून तिच्या मनात स्वतःबद्दल घृणा निर्माण झाली होती आणि काहीतरी खूप मोठं तिच्या मनात शिजत होत. ज्याबद्दल घरच्यांना क्षणभर चाहूल सुद्धा लागली नव्हती.
मुझे देदो सजा- ए- ईश्क
जो किसीं और को ना दि हो
रुहभी काप उठे पलभर
जब भी बात मेरे सुरत की हो
कसूर उसका नही जीसने मुझे सरेआम जलाया है
उसका भी नही जीसने बातो से दिलं को तार तार किया है
कसूर है तो है सिर्फ और सिर्फ मेरे नसीब का
जीसने मुझे लडके की सीरत से नही लडकीके सुरत से नवाजा है !
क्रमशा ....