श्रीराम व लक्ष्मण विश्वामित्र ऋषींसोबत त्यांच्या यज्ञस्थळी पोचतात. विश्वामित्र ऋषी इतर ऋषीगणांसह आता निश्चिन्त पणे यज्ञास स्थानापन्न होतात. श्रीराम व लक्ष्मण दैत्य येतात का हे बघण्यास आणि त्यांच्याशी लढण्यास सावध पवित्रा घेऊन उभे असतात.
यज्ञ सुरू असतो. यज्ञ मध्यावर येताच कुठूनतरी राक्षसांची झुंड तिथे प्रकट होते. श्रीराम व लक्ष्मण सावध च असतात ते त्या सगळ्यांचा नायनाट करतात. विश्वामित्रांना व इतर ऋषींना हायसं वाटते. यज्ञात आहुती टाकणं सुरू असते. पुन्हा दैत्यांची फौज येते. इकडून दैत्यांचे हत्यारं यज्ञाच्या दिशेने सुटतात तिकडून श्रीरामाचे बाण दैत्यांच्या दिशेने सुटतात. पुन्हा श्रीराम व लक्ष्मणाचे बाण लागून सगळ्या दैत्यांचा नाश होतो.
थोडावेळ गेला नाही की पुन्हा पुन्हा दैत्य येत राहतात आणि श्रीरामाच्या बाणाने घायाळ होऊन धारातीर्थी पडतात. ह्या दैत्यांमध्ये सुबाहु नामक अवाढव्य राक्षस मारला जातो पण मारीच राक्षस घाबरून पळून जातो.
यज्ञाचा विधी आता शेवटच्या टप्प्यात येतो. दैत्यांना काही केल्या यज्ञ पूर्ण होऊ द्यायचा नसतो. चांगल्या कार्यात विघ्न आणणे हे दैत्यांचे कामच असते पण श्रीराम असल्याने ते यज्ञात अडथळा निर्माण करू शकत नव्हते. मग त्यांनी एक युक्ती केली. श्रीराम स्त्रीवर वार करीत नाही हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी त्राटीका नावाच्या स्त्री राक्षशीणीला यज्ञात व्यत्यय आणण्यास सांगितले.
तिला बघताच श्रीराम व लक्ष्मण यांनी बाण चालवणे थांबवले. राक्षसीण हिडीस हास्य करत यज्ञाच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागली हे बघताच ऋषी विश्वामित्र श्रीरामांना म्हणाले,
"हे श्रीरामा विचार काय करतो? त्वरित धनुष्याला बाण लाव आणि सोड बाण त्या त्राटीकेवर. ती स्त्री जरी असली तरी ती दुष्ट आहे. तिचे वर्तन अभद्र आहे. तिने आपल्या विध्वंसक वागणुकीने सगळे वनं, झाडं वेली ओरबाडून टाकले आहेत. तिचे रूप बघ स्त्री मध्ये असलेला कोमल स्वभाव तुला कुठेतरी दिसतोय का? तिचे अघोरी हास्य ऐक, तिचे अक्राळ विक्राळ दात जबडा बघ, एखादा हत्ती सुद्धा मरून जाईल अशी गुहेसारखा तिचा जबडा आहे. शिवाय ती एक शापित याक्षिणी आहे तुझ्या ह्यातूनच तिचा उद्धार होणे नियोजित आहे. तेव्हा तंद्री सोड आणि धनुष्याची दोरी ओढ आणि सोड तिच्यावर बाण.
(त्राटिका राक्षसी ला ताडका सुद्धा संबोधले जात होते. ती एक अप्सरा असून सुकेतू यक्षाची कन्या होती. परंतु ऋषी अगस्त्य ह्यांना तिने त्यांच्या योगसाधनेत त्रास दिल्याने त्यांनी तिला राक्षसी होण्याचा श्राप दिला होता. त्यानंतर तिने क्षमा मागितल्यावर श्रीरामाच्या हातून तुझा उद्धार होईल असा त्यांनी उ:शाप दिला होता. सुबाहु व मारीच हे त्राटिकेचे पुत्र होते.)
मला कळतेय की ती स्त्री आहे म्हणून तू तिच्यावर बाण सोडत नाही पण जगाच्या कल्याणासाठी जर दुष्ट नारी चा वध केला तर त्याचे पाप लागत नाही. तो नारी वध ठरत नाही. पुरा नावाची दैत्य कन्या संपूर्ण पृथ्वी गिळायला निघाली होती तेव्हा इंद्राने तिचा वध केला. दैत्यगुरु शुक्राचार्य ह्यांची माता स्त्री होती पण ती क्रूर होती त्यामुळे श्रीविष्णूंनी तिचा वध केलाच न! मग तू आता फार विचार करू नको. मार बाण आणि पाठव तिला नरकात. हे पुरुषोत्तमा हे कार्य करून ह्या यज्ञाची सांगता विनाअडथळा पूर्ण होऊ दे. ह्या ग्रहण रुपी दैत्यीनीला मारून पौर्णिमेचा चंद्र होऊ दे."
(रामायणात पुढे काय होईल बघू पुढच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम🙏)
**********************
जोड झणि कार्मुका
सोड रे सायका
मार ही ताटिका, रामचंद्रा!
दुष्ट मायाविनी
शापिता यक्षिणी
वर्तनी दर्शनी, ही अभद्रा
तप्त आरक्त ही पाहता लोचने
करपल्या वल्लरी,
करपली कानने अतुलबलगर्विता
मूर्त ही क्रूरता
ये घृणा पाहता, क्रूर मुद्रा
ऐक ते हास्य तू, दंत, दाढा पहा
मरुन हस्ती जणू, भरुन गेली गुहा
मृत्यु-छाया जशी
येतसे ही तशी
ओढ दोरी कशी, तोड तंद्रा
थबकसी का असा? हाण रे बाण तो
तूच मृत्यू हिचा, मी मनी जाणतो
जो जना सुखवितो
नारीवध क्षम्य तो
धर्म तुज सांगतो, मानवेंद्रा!
दैत्यकन्या पुरा, ग्रासु पाहे धरा
देव देवेंद्रही, मारि तै मंथरा
विष्णु धर्मोदधी
शुक्रमाता वधी
स्त्री जरी पारधी, अरि मृगेंद्रा
धावली लाव घे, कोप अति पावली
धाड नरकी तिला, चालल्या पावली
बघती तव विक्रमा
देव पुरुषोत्तमा
होऊ दे पौर्णिमा, शौर्यचंद्रा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★