Making a love marriage, with a little thought in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | प्रेमविवाह करताय, जरा विचार करून

Featured Books
Categories
Share

प्रेमविवाह करताय, जरा विचार करून

प्रेमविवाह करताय? जरा विचार करुन

अलिकडील काळ हा जास्त वाईट काळ आला आहे. आता वातावरण एवढं खराब झालं आहे की आईबाप आपल्या मुलाला ओळखत नाही व मुलं आपल्या आईबापाला. त्यामुळंच मुलांवर कसे संस्कार टाकायचे याचा विचार मायबापाला पडल्याशिवाय राहात नाही. आजची मुलं शिकविणाऱ्या शिक्षकांचंही ऐकत नाहीत. याला जबाबदार कोणता घटक असावा? असा विचार केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांवर असणारा शिक्षकाच पुर्वीचा धाक. पुर्वी शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवीत असायचे. त्यासाठी ते बालपणापासूनच विद्यार्थ्यांना शिक्षा करायचे. घरी वडीलांचाही धाक असायचा. वडील शिक्षकाला म्हणायचे,
"गुरुजी, मारा पिटा, काहीही करा. परंतु माझा मुलगा शिकला पाहिजे, त्याच्यात संस्कार फुलले पाहिजेत."
वडीलांचं ते म्हणणं असायचं. त्यातच घरीही आईवडील चांगले चोरायचे. म्हणून मुलांवर चांगले संस्कार घडण्याचे प्रमाण पुर्वी जास्त होते. मुलं अगदी बालवयापासूनच आईवडीलांच्या आज्ञेत वागत असत. परंतु काही दिवसानं लक्षात आलं की यात लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांचा हक्कं मारला जातोय. त्यानंतर मुलांना मायबापानं मारणं बंद केलं. त्यातच लोकसंख्या वाढीवर मर्यादा घालण्यासाठी लोकांनी कुटुंबनियोजन केलं व एक किंवा दोनच मुलं ठेवली. या कुटुंबनियोजनातूनच ती मुलं नंतरच्या काळात लाडाची बनली. त्यानंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत काही नियम आले. त्याचाच फायदा आईवडीलांनीही घेतला व विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षकाने मारल्यास त्या शिक्षकाला तासायला आईवडीलांनी मागंपुढं पाहिलं नाही. यातूनच संस्कार नावाचा व शिस्त नावाचा जो घटक होता, तो साहजीकच दूर पळाला. आता मुलं ना घरी कोणत्याच मायबापाला ऐकत. ना शाळेतील कोणत्याच शिक्षकाला. ते सर्वांनाच ब्लॅकमेल करीत असतात. याबाबत एक प्रसंग सांगतो. एका मुलीचा प्रसंग आहे. एक मुलगी. ती दहावीला होती व तिनं एका मुलीशी त्याच वर्गात असतांना प्रेम केलं. त्यानंतर ते प्रेम त्याच वर्गात असतांना तिच्या आईवडीलाला माहीत झालं व त्यांनी तिच्या वयाचा विचार करता तिला रागावणं सुरु केलं. परंतु ते मायबापाचं रागावणं तिला पटलं नाही व तिनं आपल्याच जन्मदात्या मायबापाची तक्रार पोलिस स्टेशनला केली. म्हटलं की तिचे मायबाप तिला फारच त्रास देतात.
ती मुलगी.......त्या मुलीचं दहाव्या वर्गातच होणारं मुलावरील प्रेम. आपण प्रेम का करतो? हा मुलगा आपल्याला जीवनभर सोबतीला राहील का? याची पुसटशी कल्पना नसणारं ते वय आणि त्याच वयात तिचं प्रेम. त्यातच तिला असणारं कायद्याचं अभय. खरंच तिला संस्कारापासून दूर ढकलत होतं. बरं झालं की ती अठरा वर्षाची नव्हती. नाहीतर तिनं आपल्या मायबापालाच तुरुंगाची हवा खायला लावली असती. तसं पाहता वय वर्ष अठरा जरी झाले तरी मुलांना आवश्यक गोष्टी कळतात का? तर याचं उत्तर नाही असंच येतं. मुलं जवळपास पंचवीस तीस वर्षाचे होत नाहीत, तेव्हापर्यंत त्याला निर्णय घेण्याच्या गोष्टी कळत नाहीत. काहींना तर तेही वय पार करावं लागतं. त्यानंतरचंही वय पाहावं लागतं.
मायबाप. त्यांचा कोणता गुन्हा असतो की मुलं अठरा वर्षाची झाली की त्यांची तक्रार ते विनाकारण पोलीस स्टेशनला टाकतात. ते आपल्या मुलाला लहानाची मोठी करीत असतात. कशासाठी? तर त्याचंच जीवन फुलावं. ते जरी वाह्यात निघाले तरी ते वाईट नसतात आपल्या मायबापासाठी. ते मायबाप फक्त आपल्या मुलाचं भविष्यातील सुख शोधत असतात. म्हणूनच ते विरोध करतात काही काही गोष्टीत. ते प्रेमविवाहाला विरोध करीत असतात. जे प्रेमविवाह करीत असतात तेही आणि जे असा विवाह करीत नाहीत तेही. कारण त्यांना प्रेमविवाहाचे परिणाम माहीत असतात.
प्रेमविवाह.......प्रेमविवाहाचे फायदे कमी व नुकसानच जास्त असते. हो, मनासारखा जोडीदार नक्कीच मिळतो की जो सुरुवातीच्या काळात प्रलोभन जास्त देतो. परंतु एकदा का संसारात पडलो की सारं ब्रम्हांड आठवतं. जो जोडीदार प्रलोभन देतो, मोठमोठी आश्वासन देतो, तोच जोडीदार वयाच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत सोबत करेल असं सांगता येणं कठीणच असतात. अपवाद दोनचार जणांचा प्रेमविवाह करुन संसार चांगला होणे याला चांगला प्रेमविवाह म्हणता येत नाही. प्रेमविवाहाच्या फायद्यापेक्षा नुकसानाचेच प्रमाण जास्त आहे. म्हणूनच सर्वसाधारण मायबाप मुलांचा प्रेमविवाह करायचं टाळतात. परंतु कायद्यात अलिकडील काळात मुलांना अठरा वर्षानंतर अभय दिलं गेल्यानं मुलं प्रेमासाठी आपल्या मायबापांना तुरुंगात टाकायलाही मागेपुढे पाहात नाही. त्यावेळेस ते असा विचारही करीत नाहीत की याच मायबापानं आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे.
मुलांच्या उभ्या आयुष्याचं नुकसान होत असतांना त्यांची अडवणूक करणारे मायबाप. अन् त्यांच्या घरात डोकावून न पाहणारे कायदे प्रेमविवाहाचं समर्थन करतात. ठीक आहे. परंतु भोगावं कोणाला लागतं? त्या मायबापाच्याच मुलांना की नाही. परंतु ही गोष्ट मुलं जेव्हा प्रेमविवाह करतात, तेव्हा कळत नाही. ते कळतं, ती वेळ निघून गेल्यावर. ज्यावेळेस असा प्रेमविवाह होतो, त्यानंतर असा प्रेमविवाह करणाऱ्या कोणत्याच मुलामुलींना समाज स्विकारत नाही. मायबापही स्विकारत नाही. काही दिवसानं पती पत्नीतही किंतू परंतु कारणानंतर खटके उडतात. असे खटके उडतात की त्या खटक्यावर विरंजण घालणारं कोणीच नसतं. समजावून सांगणारं कोणीच नसतं. मग आत्महत्येचे विचार मनात घोळत असतात. त्यातून कोणी डिप्रेशनमध्ये जातो. कोणी नक्कीच आत्महत्या करतो तर,कोणी एकमेकांना सोडूनही जातात व असे सोडून गेल्यानंतर एकाकी जीवन जगावं लागतं. कोणी तर अशा भोळ्या भाबड्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेश्याव्यवसाय करायलाही भाग पाडतात. बळजबरीनं वेश्याव्यवसायात ढकलतात.
हाच प्रेमविवाह. असा असतो प्रेमविवाह. आयुष्यभर काबाडकष्ट करुन मुलांना मोठं करणारे मायबाप. परंतु मुलं त्यांच्या कोणत्या अपेक्षा पुर्ण करतात? कोणत्याच नाही. शिवाय ते त्रास देत असतात मायबापांना. प्रेमविवाहानंतर एवढे भयंकर गंभीर परिणाम निघतात की जावे त्यांच्या वंशा त्याप्रमाणेच त्याचे परिणाम जेव्हा पाहायला व अनुभवायला मिळतात की मगच वाटतं की प्रेमविवाह हा बरा नाही. आम्ही प्रेमविवाह नसता केला तर बरं झालं असतं. असा प्रेमविवाह करणारे जेव्हा पश्चाताप करीत असतात व लोकांना मार्गदर्शन करीत असतात. तेव्हा त्यांचंही कोणी ऐकत नाही. कारण प्रत्येकाच्या मनावर प्रेमाचं भूत आरुढ झालेलं असतं. जे भूत पदोपदी सांगत असतं. प्रेमविवाह कर आणि फस. जेव्हा व्यक्ती प्रेमविवाह करुन फसतो. तेव्हा अशा प्रेमाच्या भुतांना अतिशय आनंद होत असतो. जो आनंद मुल्यात मोजताच येत नाही. मात्र प्रेमविवाह झाल्यानंतर जेव्हा त्याचे गंभीर परिणाम दिसायला लागतात. तेव्हाच हे भूत उतरतं. पश्चातापाची वेळ येते. परंतु तेव्हा आयुष्याच्या बनावटीची वेळ बरीच दूर निघून गेलेली असते. म्हणून प्रेमविरांनो, प्रेम करा. त्यानंतर प्रेमविवाहही करा. प्रेम करायला व प्रेमविवाह करायलाही कोणाचीच कोणतीच मनाई नाही. परंतु त्याचे गंभीर परिणाम लक्षात घ्या व होणाऱ्या नुकसानीपासून वाचा आणि तसं वाचायचंच असेल तर प्रेम वा प्रेमविवाह नक्कीच टाळा. त्या बदल्यात त्याच वयात आपल्या करीअरचा विचार करा. त्या करीअरला उध्वस्त होवू देवू नका. ते बनवा. ते बनवाल तर खरंच तुमचाच भाग्योदय होईल. तुमचंच आयुष्य घडेल आणि त्याचा फायदाही तुम्हालाच होईल. मग त्याचा फायदा समाज, मायबाप व इतरांनाही होवू शकेल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०