Geet Ramayana Varil Vivechan - 8 in Marathi Mythological Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | गीत रामायणा वरील विवेचन - 8 - ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा

Featured Books
Categories
Share

गीत रामायणा वरील विवेचन - 8 - ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा

हळूहळू श्रीराम व त्यांचे तीनही अनुज दिसामासाने वाढू लागले. पाहता पाहता श्रीराम आठ वर्षांचे झाले. त्यांचा मौन्ज विधी झाला आणि त्यांना व त्यांच्या भावांना वसिष्ठ ऋषींच्या आश्रमी विद्याअध्ययन करण्यास पाठविण्यात आले.


तिथे गुरुकुलात गुरु वसिष्ठ व गुरुमाता अरुंधती ह्यांच्या छत्र छायेखाली सगळ्या विद्या श्रीरामांनी व त्यांच्या तीनही भावांनी आत्मसात केल्या. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रीरामांचे बुद्धीचे तेज वेळोवेळी सगळ्यांना दिसून आले. वसिष्ठ ऋषींनी घेतलेल्या अनेक कसोट्यांमधून श्रीराम सदैव उत्तीर्ण झाले. आणि वेदाभ्यास, युद्धनीती,राजनीती आदी सगळे शिक्षण घेऊन गुरूंना यथायोग्य गुरुदक्षिणा देऊन गुरू व गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन श्रीराम व त्यांचे बंधू स्वगृही परततात.


आता श्रीराम किशोरवस्थेत असतात. स्वगृही परतल्यावर काही काळाने ऋषी विश्वामित्र राजा दशरथकडे येतात. राजा त्यांचे स्वागत करतो,आदरातिथ्य करतो.


ऋषी विश्वामित्र राजाला आपल्या येण्याचे प्रयोजन सांगतात.


"हे राजा मी एक महायज्ञास आरंभ केला आहे. त्यात एकदा बसल्यावर मला अर्धवट यज्ञ टाकून उठता येत नाही. तसेच यज्ञास सुरुवात झाल्यावर मला हिंसा करणं जमू शकत नाही. जिथंही मी यज्ञ सुरू करतो तिथे मारीच सुबाहु आणि असे अनेक राक्षस येऊन त्यात विघ्न आणतात. यज्ञ वेदीवर मांस रक्त आणून यज्ञ कार्यात व्यत्यय आणतात. यज्ञ सुरू असताना मी हिंसा ही करू शकत नाही आणि श्राप ही देऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस यज्ञात विघ्न आलं की मी तो प्रदेश सोडून दुसऱ्या स्थळी यज्ञ प्रस्थापित करतो परंतु यज्ञ पूर्ण व्हायला आलाच असतो की कुठून तरी हे दैत्य तिथे प्रकट होतात आणि तिथे स्वैर नाचून अक्राळ विक्राळ चाळे करून यज्ञात अडथळा आणतात व यज्ञ काही केल्या पूर्ण होऊ देत नाही.",विश्वामित्र ऋषी


"हे मुनिवर मला आपली अडचण लक्षात आली आहे त्यासाठी माझ्याकडून जी ही मदत आपणास लागेल ती करायला मी सार्थ तयार आहे. मी त्यासाठी माझ्याकडील सैन्यदळ पाठवण्यास तयार आहे जेणेकरून सैन्य राक्षसांना मारून कायमची अडचण दूर करतील.",राजा दशरथ


"राजन ह्या कामासाठी तुझ्या सैन्याची काहिहि आवश्यकता नाही. त्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र श्रीराम एकटाच पुरेसा आहे. त्याला तू माझ्यासोबत पाठव हेच सांगण्या करीता मी इथे आलो आहे.", ऋषी विश्वामित्र


"हे मुनिवर हे आपण काय म्हणत आहात? श्रीराम अजून फार लहान आहे त्यापेक्षा हवं तर मी आपल्या सोबत येतो.",राजा दशरथ


"दशरथा तू तुझ्या मुलाला कमजोर समजत असशील तर तू चुकतोय! तुझा मुलगा वयाने जरी लहान असला तरी पराक्रमामध्ये तो त्रैलोक्यात अग्रेसर आहे. तेव्हा त्याबाबतीत तू निश्चिन्त राहा. तुझा पुत्र श्रीराम माझ्यासोबत आला तर काळजी करण्याची पाळी राक्षसांवर येईल तुझ्यावर नव्हे ह्याची तू खात्री बाळग.",ऋषी विश्वामित्र


हे ऐकताच राजा दशरथ चिंतीत होतो. देवी कौसल्या सुद्धा ऋषींना नमस्कार करण्यासाठी तिचे आल्या असता त्यांना ही वार्ता कळते आणि त्यांना रडू कोसळते. आपला किशोरवयीन पुत्र विश्वामित्र ऋषी एवढ्या मोठ्या राक्षसांशी लढण्यास मागत आहेत आता काय करावे. हो म्हणवत नाही आणि नाही म्हणता येत नाही अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. अश्या विचारात राजा दशरथ व राणी कौसल्या असतात.


कौसल्या देवींना रडताना बघून विश्वामित्र म्हणतात,


"कौसल्या देवि आपण एका शूरवीर पुत्राची माता आहात आपल्याला असे दुर्बलप्रमाणे रडणे शोभत नाही. तुमचा पुत्र असा पराक्रम दाखवेल की ज्या वंशातून राजा दशरथ जन्मास आला तो वंश व त्यातून आपण जन्मास आल्या तो वंश असे दोन्ही वंश धन्य धन्य होतील. तुझा पुत्र एवढा वीर आहे की त्याची वीरता बघून सुबाहु मारीच सारखे राक्षस घाबरून त्यांचे शस्त्र खाली ठेवून देतील.", राजा दशरथ अजूनही चिंतेत आहे हे बघून ऋषी त्यांना म्हणतात,"हे राजा तुमच्या घराण्याची रीत आहे प्राण गेला तरी बेहत्तर पण वचनभंग होता कामा नये. मला मदत करण्याचे तू वचन दिले आहे. आता तुला मागे फिरता येणार नाही. ऋषिमुनींना मदत करणे हे प्रत्येक राजाचे कर्तव्य आहे हे तू कदापिही विसरू नको"


विश्वामित्र ऋषींना वंदन करण्यास परिवारातील सगळे जण दरबारात उपस्थित असतात. त्यात श्रीराम सुद्धा उपस्थित असतात तेव्हा ऋषी विश्वामित्र श्रीरामांनाच म्हणतात की


" हे श्रीरामा जास्त विलंब न करता तुझा धनुष्यबाण घेऊन माझ्यासोबत चलण्यास तयार हो वाटल्यास तुझ्या भावाला लक्ष्मणास सुद्धा तू सोबत घेऊ शकतो."


ऋषींनी आज्ञा केल्यामुळे राजा दशरथास श्रीराम व लक्ष्मण यांना ऋषी विश्वामित्र यांच्यासोबत जाण्याची परवानगी द्यावीच लागते. श्रीराम आपल्या माता पित्यांना आश्वस्त करतात


"हे पिताश्री मातोश्री आपण निश्चिन्त राहा ज्याअर्थी ऋषींनि माझ्यावर हे कार्य करण्यास विश्वास दाखवला आहे त्याअर्थी मी हे कार्य यशस्वी करेनच तेव्हा आपण माझी व लक्ष्मणाची काळजी करू नये. आम्ही लवकरच दैत्यांचा संहार करून स्वगृही परतू. आता आज्ञा द्यावी",असे म्हणून श्रीराम व लक्ष्मण आपल्या माता पित्यांना नमन करून ऋषी विश्वामित्रांसोबत प्रस्थान करतात.


(पुढे रामायणात काय होते हे बघू उद्याच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम🙏)


****************************


ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा


यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा


मायावी रात्रिंचर


कष्टविती मजसि फार


कैकवार करुन यज्ञ नाहि सांगता


शाप कसा देऊं मी?


दीक्षित तो नित्य क्षमी


सोडतोच तो प्रदेश याग मोडता


आरंभितां फिरुन यज्ञ


आणिति ते सतत विघ्न प्रकटतात मंडपात कुंड पेटता


वेदीवर रक्तमांस


फेंकतात ते नृशंस


नाचतात स्वैर सुखें मंत्र थांबता


बालवीर राम तुझा


देवो त्यां घोर सजा


सान जरी बाळ तुझा थोर योग्यता


शंकित कां होसि नृपा?


मुनि मागे राजकृपा


बावरसी काय असा शब्द पाळता?


प्राणाहुन वचनि प्रीत


रघुवंशी हीच रीत


दाखवि बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता


कौसल्ये, रडसि काय?


भीरु कशी वीरमाय?


उभय वंश धन्य रणीं पुत्र रंगता


मारिच तो, तो सुबाहु


राक्षस ते दीर्घबाहु


ठेवतील शस्‍त्र पुढे राम पाहता


श्रीरामा, तूच मान


घेइ तुझे चापबाण


येतो तर येऊ दे अनुज मागुता


★★★★★★★★★★★★★★★★★★★★