चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामांचा जन्म होतो. राजा दशरथ आणि देवी कौसल्या ह्यांचं इप्सित पूर्ण होते. त्यांचे हृदयं आनंदाने उचंबळून येतात. राजवाड्यात प्रत्येकजण आनंदात उत्साहात असतो. संपूर्ण अयोध्या आनंदोत्सवात मग्न असते.
हळूहळू दिसामासाने श्रीराम वाढू लागतो. कौसल्या देवींचा वेळ श्रीरामाचे लाड करण्यात,त्याला खाऊ पिऊ घालण्यात,त्याला न्हाऊ माखू घालण्यात,त्याचे कोडकौतुक करण्यात, त्याच्या बाळ लीला बघण्यात कसा निघून जातो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही.
चारही बालकांच्या वावरण्याने राज प्रासादात एक चैतन्याची लहर पसरलेली असते. देवी कौसल्या,देवी सुमित्रा व देवी कैकयी चारही मुलांच्या संगोपनात रमून गेलेल्या असतात.
कौसल्या देवी बाळ श्रीरामाला आपल्या मांडीवर पालथे निजवून सुगंधी तेल-उटण्याने अंघोळ घालत असतात. सावळ्या बाळ श्रीरामाचे छोटे छोटे तळपाय हे जणू निळ्या कमळा प्रमाणे भासतात. श्रीराम हे दैवी बालक असल्याने त्यांच्या पायांचा अष्टगंधांचा सुवास येतो.
न्हाऊ घातल्यावर कौसल्या माता बाळ श्रीरामांना चिऊ काऊंचा घास भरवत जेऊ घालतात. बाळ श्रीराम एवढे अलौकिक असतात की फक्त मानवा लाच नव्हे तर पक्ष्यांना सुद्धा त्यांचं आकर्षण वाटते त्यामुळे श्रीरामांच्या ताटलीतले उरलेले अन्न खाण्यासाठी पोपटांचा थवा थांबून वाट बघत राहतो.
जेवण झाल्यावर जेव्हा बाळ श्रीरामांना झोप येते तेव्हा कौसल्या देवी त्यांना त्यांच्या रत्नांनी सुशोभित असलेल्या पलंगावर निजवतात. निद्रावस्थेतील श्रीरामांचा ओजस्वी मुखचंद्रमा बघून चंद्र सुद्धा लाजतो व ढगाआड गुडूप होतो.
बाळ श्रीराम आपल्या तिन्ही भावांसोबत मिळून मिसळून प्रेमाने खेळतो. मोठ्या माणसांमध्ये सुद्धा जो बरेचदा आढळत नाही असा समजूतदारपणा एवढ्या लहानपणी ह्या निरागस बालकात कसा आला ह्याचं कौसल्या देवींना कौतुक वाटते. बाळ श्रीराम त्या तीन भावांमध्ये हिऱ्यांच्या समूहात जसा निलमणी उठून दिसतो त्याप्रमाणे शोभून दिसतो.
श्रीरामाचे बोबडे बोल ऐकून राजा दशरथ व राणी कौसल्या ह्यांचे कान तृप्त होतात. ते सगळे सुद्धा ह्या लहान बालकांशी त्यांच्याप्रमाणे बोबड्या भाषेतच बोलू लागतात. त्यांच्याप्रमाणे बोबडे बोलण्याची सगळ्यांना एवढी सवय होते की आपापसात बोलताना सुद्धा कधी कधी बोबडे उच्चार आपसूकच तोंडातून निघतात. वेदोच्चारण करताना सुद्धा बोबडे उच्चार यायला लागतात. एकंदरीत ह्या बाळ जीवांमुळे प्रत्येकजण आपला मोठेपणा विसरून लहान झाले होते. सगळेजण त्यांचे बालपण साजरे करीत होते.
( आपल्या कडे सुद्धा जर एखादे लहान मूल असेल तर आपोआपच दैनंदिन कामे करताना त्यांचे बालगीत आपण नकळतपणे गुणगुणायला लागतो.)
बाळ श्रीराम असामान्य बालक असल्याने त्याचे हट्ट ही असामान्य होते. सामान्य बालक एखादे खेळणे किंवा एखाद्या खाद्यपदार्थ हवा म्हणून हट्ट करेल पण बाळ श्रीरामांचा हट्ट काही औरच होता त्यांना आकाशातला चंद्र खेळायला हवा होता. त्यासाठी त्यांनी रडून रडून आकांत मांडला होता.
राजप्रासादातील सगळेजण श्रीरामाला शांत करण्यासाठी धडपडू लागले. शेवटी कोणीतरी स्वच्छ पाण्याने भरलेली थाळी बाळ श्रीरामापुढे आणून ठेवली आणि काय आश्चर्य बाळ श्रीराम रडायचा थांबला, एकदम शांत झाला व आनंदाने टाळ्या वाजवू लागला कारण थाळी मध्ये पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब पडले होते. श्रीरामाला चंद्र मिळाला होता.
देवी कौसल्या व राजा दशरथ झोपलेल्या बाळ श्रीरामाच्या जावळावरून हात फिरवत विचार करतात की बघता बघता श्रीराम मोठा होईल, त्याचे ओज,तेज आणखी वाढेल, तो पराक्रमी होईल. आपल्यावर देवकृपेचा वर्षाव होईल.
(रामायणात पुढे काय होईल ते बघू उद्याच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम🙏)
*****************************
सावळा ग रामचंद्र
माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास
निळ्या कमळांना येतो
सावळा ग रामचंद्र
माझ्या हातांनीं जेवतो
उरलेल्या घासासाठी
थवा राघूंचा थांबतो
सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहता लाजून
चंद्र आभाळी लोपतो
सावळा ग रामचंद्र
चार भावांत खेळतो
हीरकांच्या मेळाव्यात
नीलमणी उजळतो
सावळा ग रामचंद्र
करी भावंडांसी प्रीत
थोरथोरांनी शिकावी
बाळाची या बाळरीत
सावळा ग रामचंद्र
त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे
चार अखंड चरण
सावळा ग रामचंद्र
करी बोबडे भाषण
त्याशी करितां संवाद
झालों बोबडे आपण
सावळा ग रामचंद्र
करी बोबडे हें घर
वेद म्हणतां विप्रांचे
येती बोबडे उच्चार
सावळा ग रामचंद्र
चंद्र नभींचा मागतो
रात जागवितो बाई
सारा प्रासाद जागतो
सावळा ग रामचंद्र
उद्या होईल तरुण
मग पुरता वर्षेल
देवकृपेचा वरुण
*************************