Murder Weapon - 11 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | मर्डर वेपन - प्रकरण 11

Featured Books
Categories
Share

मर्डर वेपन - प्रकरण 11

मर्डर वेपन.
प्रकरण ११
सरकार पक्ष विरुद्ध रती रायबागी खटला चालू झाला.न्या. ऋतुराज फडणीस यांनी हातातला हातोडा आपटून कोर्टात जमलेल्या गर्दीला शांत करून विचारलं, “ दोन्ही बाजू तयार आहेत?”
खांडेकरांचा सहाय्यक प्रियमेध चंद्रचूड उभा राहिला “ आम्ही तयार आहोत.” तो म्हणाला.
“ आम्ही पण ” पाणिनी म्हणाला.
“ खटला चालू करण्यापूर्वी काही गोष्टी मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. वर्तमान पत्रातल्या बातम्यावरून मला समजलंय की मैथिली ने रायबागी च्या मालमत्तेवर विल नुसार हक्क सांगितला आहे तर रती ने रायबागी ची विधवा पत्नी या नात्याने हक्क सांगितला आहे. याचा निर्णय संबंधित कोर्ट घेईल,माझ्या कोर्टात रायबागी विषय चर्चिला जाता कामा नये.अर्थात खुनाचा हेतू दाखवतांना याचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे पण मी ते तेवढ्या पुरतेच मान्य करीन. चालू करा ”
न्यायाधीश म्हणाले.
प्रियमेध चंद्रचूड ने सर्वेअर ला बोलावून घेतलं आणि रायबागी च्या घराचा आतला आणि बाहेरचा नकाशा सादर केला.त्या नंतर बंदुकीच्या तज्ज्ञाने सांगितलं की पोइंट ३८ च्या रिव्हॉल्व्हर मधून दोन गोळ्या डोक्यात झाडल्या गेल्यामुळे तात्काळ मृत्यू आला.प्रेत अंथरुणावर पडलं होतं. सकृत दर्शनी झोपेत असतांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.मृत्यूची वेळ सोमवारी चार तारखेला रात्री १ ते सकाळी ८ च्या दरम्यान असावी.मृत्यू झाल्यापासून प्रेत सापडे पर्यंत ते हलवलं गेलं नव्हतं.
पाणिनीने त्यांना कोणतेही प्रश्न उलटतपासणीत विचारले नाहीत.
“ माझा पुढचा साक्षीदार आहे, इन्स्पे.तारकर.” चंद्रचूड म्हणाला.
तारकर ने शपथ घेतली.प्रेत कुठे आणि कसं सापडलं याची माहिती दिली.नंतर दोन बुलेट सादर केल्या आणि सांगितलं की यापैकी एक डोक्यातून आरपार जाऊन अंथरुणावरच्या चादरीवर सापडली आणि एक कवटीत सापडली.
“ तू पाणिनी पटवर्धन शी परिचित आहेस? या खटल्यातील वकील?” चंद्रचूड ने विचारलं.
“ आहे.”
“ तू अनेकदा फोनवर आणि समक्ष बोलला आहेस त्याच्याशी?”
“ अनेकदा.”
“ त्यांचा आवाज ओळखता येतो ? ”
“ हो.”
“ पाच तारखेला, मंगळवारच्या, तुझं आणि पाणिनी पटवर्धनच बोलणं झालं होतं? ” चंद्रचूड ने विचारलं.
“ हो,झालं होतं”
“ कशा बद्दल बोलणं झालं तुमच्यात?”—चंद्रचूड
“ पाणिनी ने मला फोनवर सांगितलं की त्याच्या ऑफिसात काल कोणीतरी आलं होतं.” तारकर म्हणाला.
“ म्हणजे सोमवारी, चार तारखेला?”-चंद्रचूड
“ हो.”
“ आणखी काय सांगितलं पाणिनी ने?”
“ तो म्हणाला की त्या व्यक्तीने त्याची हँड बॅग ऑफिसातच ठेवली आणि ते व्यक्ती निघून गेली.त्या बॅग मधे रिव्हॉल्व्हर होतं आणि त्यातून दोन गोळ्या झाडल्या गेल्या होत्या.त्याने असंही सांगितलं की ती बॅग रती रायबागी च्या मालकीची असल्याचं नंतर कळलं.त्याने पुढे असं सुचवलं की मी ते रिव्हॉल्व्हर तपासून घ्यावं.”
“ पुढे काय केलं नंतर?” –चंद्रचूड
“ मी माझ्या सहाय्यकाला सांगितलं की पद्मराग रायबागी ला फोन लाव.नंतर मला कळवण्यात आलं की रायबागी फोन घेत नव्हता म्हणून त्याच्या ऑफिसातल्या एका कर्मचाऱ्याने काय झालं ते पाहायला घरी माणूस पाठवला आणि त्याला रायबागी मेलेला आढळला.”-तारकर
“ तुम्ही काय केलात मग?”
“ मी पटवर्धन च्या ऑफिसात गेलो.तिथे मला आरोपी रती आलेली दिसली.”
“ ज्या रिव्हॉल्व्हर चा पटवर्धन पटवर्धन उल्लेख करत होता ते रिव्हॉल्व्हर तिथे आढळल?” –चंद्रचूड
“ त्या वेळी नाही.”-तारकर
“ तुम्ही नंतर शोधून काढलं? ”
“ एक मिनिट, एक मिनिट....” पाणिनी म्हणाला. “ माझा आक्षेप आहे या प्रश्नाला.साक्षीदाराचा अंदाज आहे हा, या कारणास्तव ”
“ यात अंदाज कसला आलाय? साक्षीदार सांगू शकतो की ते रिव्हॉल्व्हर त्याने नंतर शोधून काढलं की नाही.” चंद्रचूड म्हणाला.
“ नाही सांगू शकत.” पाणिनी म्हणाला. “ तारकर ने नंतर शोधून काढलेलं रिव्हॉल्व्हर हे मी फोन वर ज्या रिव्हॉल्व्हर बद्दल बोलत होतो किंवा जे माझ्या ऑफिसात होतं तेच होतं की नाही या बद्दल तारकर ला माहित असायचं कारण नव्हतं.”
“ ओह! मुद्दामून गोंधळात टाकायचा प्रयत्न आहे हा. आपण या रिव्हॉल्व्हरच्या प्रवासाचा सहज मागोवा घेऊ शकतो. त्या स्त्रीच्या बॅग मधून पटवर्धन यांच्या टेबलावर, तिथून पद्मराग रायबागी च्या ऑफिसात, म्हणजे ज्या तिजोरीत खासनीस ने लपवलं होतं तिथे, तिथून थेट तारकर च्या ताब्यात.”
“ तुम्हाला तसं करायचं तर खुशाल करा,” मिश्कील पणे हसत पाणिनी म्हणाला. “ या साक्षीदाराला थेट प्रश्न विचारा की त्याने जे रिव्हॉल्व्हर नंतर ताब्यात घेतलं ते रिव्हॉल्व्हर म्हणजे माझ्या ताब्यात असलेलं रिव्हॉल्व्हरच होतं का? साक्षीदारच सांगेल की खात्री देता येत नाही म्हणून.”
तारकर जरा चुळबुळला तो काहीतरी बोलणार तेवढ्यात चंद्रचूड पटकन म्हणाला, “ मी माझा प्रश्न मागे घेतो, मी आता असं विचारतो,तारकर, तुम्ही पटवर्धन यांच्या ऑफिसात गेल्यावर रिव्हॉल्व्हर ची चौकशी केली होती का?”
“ हो.”
“ ते रिव्हॉल्व्हर तुमच्या समोर हजर करावं म्हणून तुम्ही पटवर्धन यांना सांगितलं होतं?”-चंद्रचूड
“ हो.”
“ त्यावर पटवर्धन पटवर्धन यांचं म्हणणं काय होतं?”
“ ते रिव्हॉल्व्हर देण्यासाठी पाणिनी ने आपल्या टेबलाच्या ड्रॉवर मधे हात घातला आणि त्याला धक्का बसला जेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिथे रिव्हॉल्व्हर नव्हतं.”
“ मी तुम्हाला जरा वेगळा प्रश्न विचारतो, ज्याने हे रिव्हॉल्व्हर पद्मराग रायबागी ला विकल, त्या व्यवहाराची अधिकृत पावतीची प्रत तुमच्याकडे आहे? ” –चंद्रचूड
“ आहे.” तारकर म्हणाला.त्याने आपल्या जवळच्या दोन पावत्या चंद्रचूड कडे दिल्या.
“ काय आहे या पावत्यात लिहिलेलं?”
“ स्मिथ कंपनीच्या पॉइंट अडतीस कॅलिबर च्या दोन सारख्या दिसणाऱ्या, अडीच इंच लांबीच्या नळीच्या रिव्हॉल्व्हर वेगवेगळ्या दिवशी खरेदी केल्या गेल्या होत्या.खरेदीची तारीख त्या-त्या पावत्यावर आहे.एकाचा नंबर सी-४८८०९, दुसरा सी २३२७२१ ” –तारकर
“ पाणिनी पटवर्धन तुला ते रिव्हॉल्व्हर ड्रॉवर मधे न सापडण्याबाबत काय म्हणाले? ” –चंद्रचूड
“ ते म्हणाले की त्यांच्या ऑफिसात ठेवण्यात आलेल्या आरोपीच्या बॅग मधून ते रिव्हॉल्व्हर काढून त्यांनी ते त्यांच्या टेबलाच्या उजव्या ड्रॉवर मधे ठेवलं होतं.तिथे आता ते सापडत नाहीये. ” –तारकर
“ हा संवाद कधी झाला?”
“ मंगळवारी.पाच तारखेला.”
“ ते रिव्हॉल्व्हर शोधण्याबद्दल त्याने काय केलं ते तुम्हाला सांगितलं?”
“ त्यावेळी नाही, नंतर.”
“ काय सांगितलं नेमकं?” –चंद्रचूड
“ त्याने सांगितलं की कनक ओजस या त्याच्या गुप्तहेराच्या मदतीने तो चोराला शोधून काढू शकला.मंगळवारी सकाळी रायबागी चोर पटवर्धन याच्या ऑफिसात आला त्यावेळी ऑफिस झाडलोट करणाऱ्या बाई काम करत होत्या.हातात ब्रीफ केस घेऊन आणि आपण स्वत: पाणिनी पटवर्धन असल्याचे त्या बाईंना भासवून तो ऑफिसात आला.तिथे सुमारे दहा मिनिटे थांबला.नंतर निघून गेला.कनक ओजस च्या मदतीने त्या चोराला शोधून काढला. तो अंगिरस खासनीस होता.रायबागी एन्टरप्रायझेस चा मॅनेजर.”-तारकर
“ आणखी काय तपशील सांगितला पटवर्धन यांनी?” –चंद्रचूड
“ खासनीस ने चोरी केल्याचं कबूल केलं, त्याने ते रिव्हॉल्व्हर पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसातून घेतलं, कागदात गुंडाळलं,पाकिटात सील केलं.नंतर एका पिशवीत भरून ऑफिसातल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवलं.नंतर खासनीस ने पटवर्धन यांच्या समोरच त्याच्या सेक्रेटरीला फोन लावला आणि तिला ते रिव्हॉल्व्हर कुठे आहे ते सांगून पटवर्धन यांच्या ऑफिसात घेऊन यायला सांगितलं.जेव्हा ती ते रिव्हॉल्व्हर असलेलं पाकीट घेऊन आली, तेव्हा असं लक्षात आलं की रिव्हॉल्व्हर ला गुंडाळलेल्या वेष्टनाशी छेडछाड झाली होती.” तारकर ने उत्तरं दिलं.
“ पाणिनी पटवर्धन यांनी तुम्हाला त्या रिव्हॉल्व्हर संदर्भात त्यांनी काय केलं ते सांगितलं?” –चंद्रचूड
“ त्याने फोन करून सांगितलं की त्याच्या ताब्यात मला देण्यासाठी रिव्हॉल्व्हर आलंय.नंतर असंही सांगितलं की त्या रिव्हॉल्व्हर ला गुंडाळलेले वेष्टन पण त्याने ठेवले आहे.ठसे मिळण्याच्या दृष्टीने मी ते तपासू शकतो. ”
“ बर मग?”
“ मी नंतर पटवर्धन च्या ऑफिसात गेलो रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं, ते मी तज्ज्ञ माणसाकडे दिलं, त्याने त्या रिव्हॉल्व्हर मधून एक गोळी कापसाच्या उशीत मारली आणि त्या गोळीवर उठलेले चरे आणि खुनाच्या ठिकाणी सापडलेल्या गोळीवर उठलेले चरे याची तुलना केली. ”—तारकर.
“ काय निष्कर्ष निघतो या तपासणीचा?”
“ दोन्ही गोळ्यावर उमटलेले चरे सारखे होते, म्हणजेच पटवर्धन यांनी मला दिलेलं रिव्हॉल्व्हर हेच खुनी हत्यार होतं.”-तारकर म्हणाला.
“ मी तुम्हाला आता स्मिथ कंपनीचं एक रिव्हॉल्व्हर दाखवतो,त्याचा नंबर आहे सी-४८८०९. तुम्ही ओळखता का हे?” –चंद्रचूड
“ हेच रिव्हॉल्व्हर मला पटवर्धन यांनी दिलं होतं, आणि हेच खुनात वापरलं होतं.मी या रिव्हॉल्व्हर वर माझी एक खूण करून ठेवली होती आणि त्याचा नंबरही लिहून ठेवला होता.”—तारकर
“ त्यावर ठसे मिळाले?”
“विशिष्ठ पावडर टाकून आम्ही ठसे उचलण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा आम्हाला नाही मिळाले ठसे, पण बारकाईने पाहिलं तेव्हा मला एक वाळलेला ठसा उमटलेला दिसला.त्यावर पावडर चिकटली नाही कारण त्यावर दमटपणा नव्हता.ज्याने ते रिव्हॉल्व्हर हाताळल, त्याच्या बोटाला काहीतरी चिकट पदार्थ लागला असावा, म्हणजे गोड लाळ किंवा ओलसर तंबाखू वगैरे.तेच चिकट बोट रिव्हॉल्व्हरला लागलं. ”—तारकर
“ त्या ठशाचा फोटो काढलास ?”
“ अर्थात.”
“ आणि त्याची इतर ठशांशी तुलना केलीस?”
“ हो.”
“ कुणाचा ठसा आहे?”
“ आरोपी रती रायबागी च्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा.”
“ मला हे रिव्हॉल्व्हर सरकार पक्षाचा पुरावा क्रमांक ब-१२ म्हणून,नोंदवून घ्यायचंय. ” –चंद्रचूड म्हणाला.
“ एक मिनिट, एक मिनिट.” पाणिनी म्हणाला. “ मी यासाठी संमती द्यायची की हरकत घ्यायची हे ठरवण्यासाठी मला या साक्षीदाराला काही प्राथमिक प्रश्न विचारायचे आहेत.”
“ ठीक आहे.” न्यायाधीश म्हणाले.
“ माझ्या ड्रॉवर मधून जे रिव्हॉल्व्हर हरवलं होतं ते मला मिळालंय असं मी तुला फोन वर म्हणालो होतो?” पाणिनीने विचारलं.
“ माझी तशी समजूत झाली.” –तारकर
“ मी तुला असं सांगितलं का, की ते रिव्हॉल्व्हर आरोपीच्या हँड बॅग मधून मिळालेलं रिव्हॉल्व्हर होतं म्हणून?” पाणिनीने विचारलं.
“ तुझ्या सेक्रेटरीने मला फोन वर सांगितलं की जे रिव्हॉल्व्हर हरवलं होतं ते आता सापडलं आहे.”
“ नीट आठव मी तुला सांगितलं होतं की नाही की अंगिरस खासनीस याने माझ्या ऑफिसातून रिव्हॉल्व्हर नेलं, ते कागदात गुंडाळून आणि पाकिटात घालून सील केलं,आणि माझ्या ऑफिसात ते पुन्हा जेव्हा आणलं गेलं, तेव्हा त्यावरच वेष्टन आणि सील धारदार पात्याने कापलेलं आढळलं.आता तेच रिव्हॉल्व्हर आरोपीच्या हँड बॅग मधून मिळालेलं रिव्हॉल्व्हर होतं किंवा नाही हे ठरवण्याचा कुठलाच मार्ग शिल्लक नाही म्हणून?”
“ आमचा आक्षेप आहे या प्रश्नाला. ऐकीव पुरावा आहे हा.” चंद्रचूड ओरडला.
“ ऐकीव कसा काय?” पाणिनीने विचारलं. “ मी तारकर ला काय सांगितलं या बद्दल तारकरने आधीच सरतपासणीत साक्ष देताना सांगितलं आहे. मी फक्त त्याची स्मरणशक्ती तपासून बघतोय की तारकर ला संपूर्ण संवाद लक्षात आहेत का.”
“ ओव्हर रूल्ड.” न्यायाधीश म्हणाले.
“ हो. बरोबर आहे पटवर्धन म्हणतात ते.” तारकर म्हणाला.
“ माझं बरोबर असेल तर हे रिव्हॉल्व्हर म्हणजे खासनीस ने माझ्या ऑफिसातून नेलेलं रिव्हॉल्व्हर होतं की आरोपीच्या हँड बॅग मधून मिळालेलं रिव्हॉल्व्हर होतं हे समजायला काहीच मार्ग नाही, खरं की नाही?” पाणिनीने विचारलं.
“आमचा आक्षेप आहे या प्रश्नाला. साक्षीदाराचा अंदाज आहे हा. ” चंद्रचूड म्हणाला.
“ मान्य आहे.आक्षेप.” न्यायाधीश म्हणाले.
पाणिनी मिश्कील हसला. “ तारकर, हे रिव्हॉल्व्हर तू खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर म्हणून ओळखलं आहेस.बरोबर? ” पाणिनीने विचारलं.
“ हो.”-तारकर.
“ आणि हे रिव्हॉल्व्हर तू कधीही आरोपी रती च्या ताब्यात असलेलं बघितलं नाहीयेस. बरोबर?” पाणिनीने विचारलं.
“ नाही पाहिलं, तिच्या ताब्यात असलेलं.” –तारकर”
“ आणि आता नीट ऐक माझा प्रश्न, तारकर, तुझं आणि माझं जे बोलण झालं या रिव्हॉल्व्हर बद्दल, जे तू कोर्टात शपथेवर बरोबर म्हणून सांगितलं आहेस अत्ता थोड्याच वेळापूर्वी, त्या आधारे तू हे शपथेवर सांगू शकतोस का ,की अंगिरस खासनीस ने माझ्या ऑफिसातून नेलेल्या आणि सील करून ठेवलेल्या रिव्हॉल्व्हर चे पाकीट कापलेलं आढळल्यामुळे, कोणीतरी त्यातून रिव्हॉल्व्हर काढली नसेल आणि त्याजागी दुसरी ठेवली नसेल ?” पाणिनीने विचारलं.
“ मागचाच आक्षेप आहे. साक्षीदाराचा अंदाज आहे हा. ” चंद्रचूड म्हणाला.
“ नाही युवर ओनर,” पाणिनी घाई घाईत म्हणाला. “ माझा प्रश्न वेगळा आहे. माझ्याशी झालेल्या संवादाच्या आधारे तारकर या रिव्हॉल्व्हरचा संबंध आरोपीशी लावू शकतो का? असा माझ्या प्रश्नाचा अर्थ आहे.”
“ ओव्हर रूल्ड.हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे.पटवर्धन आणि तारकर यांचं जे संभाषण झालं, त्यातलाच तो भाग आहे. तारकर उत्तरं द्या. ” न्या.फडणीस म्हणाले.
“ नाही सर. मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकणार की अंगिरस खासनीस च्या ताब्यात ते रिव्हॉल्व्हर आल्यानंतर ते बदलले गेले नसेलच म्हणून. मी हे सुद्धा खात्रीपूर्वक नाही सांगू शकणार की तुम्ही मला दिलेले रिव्हॉल्व्हर हे तुम्ही त्या स्त्रीच्या बॅग मधून काढलेलं रिव्हॉल्व्हर होतं म्हणून आणि हे ही नाही सांगू शकणार की अगदी तशाचच दिसणाऱ्या रिव्हॉल्व्हरचा आरोपीशी संबंध असेल म्हणून.” तारकर उत्तरला. “ पण हे सर्व तुमच्या व माझ्यात झालेल्या संभाषणाच्या आधारे म्हणतोय मी.पण रिव्हॉल्व्हर वरच्या ठशा वरून हे मी ठाम पणाने आणि शपथेवर सांगू शकतो की हे रिव्हॉल्व्हर आरोपीने हाताळलं आहे, ज्यावेळी तिच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला काहीतरी चिकट आणि दमट पदार्थ लागला होता. ”
“ तो पदार्थ म्हणजे साखर असू शकेल?” पाणिनीने विचारलं.
“ शकेल.नेलपेंट, ओलसर सिमेंट, असे काहीही.”—तारकर
“ आणि, तो पदार्थ वाळून कोरडा झाला होता?” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ आणि त्यावर तुम्ही ठसे उचलण्यासाठी वापरता ती पावडर चिकटू शकत नव्हती?” पाणिनीने विचारलं.
“ नव्हती.”
“ आणि तारकर,त्यावर जो ठसा होता तो इतर सर्व साधारण ठसे असतात त्यापेक्षा जास्त टिकाऊ होता?” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ म्हणजे मागच्या दिवाळीत आरोपी आपल्या नवऱ्या बरोबर असतांना आणि त्याच्या बाजूला रिव्हॉल्व्हर ठेवलेलं असतांना जिलबी, गुलाबजाम किंवा तत्सम पक्वान्न खाताना तिच्या हातातून त्याचा पाक रिव्हॉल्व्हरवर गळला, म्हणून पटकन तो पुसायला गेली तेव्हा तिचा ठसा रिव्हॉल्व्हर वर उमटला असू शकतो? ” पाणिनीने विचारलं.
तारकर हसला. “ तुम्ही कोणतीही कल्पना करू शकता पटवर्धन, तिच्या हातून अगदी दोन तीन दिवसापूर्वी नेलपेंट लावताना सुद्धा रिव्हॉल्व्हर पडलं म्हणून ते पुसताना डाग पडला असू शकतो किंवा नेलपेंट ओलं असतांना हातात रिव्हॉल्व्हर धरली तेव्हा हा ठसा उठू शकतो.”
“ पण हा ठसा किती काळापूर्वी पडला ते तू सांगू शकत नाहीस?” पाणिनीने विचारलं.
“ नाही.”—तारकर म्हणाला. “ काल परवा चा असू शकतो.”
“ किंवा मागच्या दिवाळीतला?” पाणिनी ने पुन्हा खडूस पणे विचारलं.
“ हो.” तारकर वैतागून म्हणाला.
“ मला विचारायचे होते ते प्रश्न संपले. आता हे रिव्हॉल्व्हर पुरावा म्हणून दाखल करायला मी आक्षेप नोंदवतो. कारण हा पुरावा गैर लागू आहे पुरेसा बळकट नाही आणि त्यासाठी पुरेसं सबळ कारण नाही.” पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन यांच्या म्हणण्याशी मी सहमत नाही. हे रिव्हॉल्व्हर सरकार पक्षाचा पुरावा म्हणून दखल करण्यात यावं.” न्यायाधीशांनी आज्ञा दिली.
(प्रकरण ११ समाप्त.)