साहित्यिकांचा पुरस्कार वल्डकपसारखाच?
साहित्यिक.......तसं पाहिल्यास देशाचे आधारस्तंभ असतात. परंतु त्यांनाही परिस्थितीनं सोडलेलं नाही. त्यांनाही कित्येक वेदनेतून जावं लागतं. तसा विचार केल्यास प्रत्येकच साहित्यीकाला भयंकर वेदनेतून जावं लागतं त्याशिवाय खरं साहित्यही जन्माला येत नाही.
साहित्यिक हा जसा देशाचा आधारस्तंभ आहे. तसाच तो जगाचाही आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर सृष्टीचाही निर्माता नव्हे तर भाग्यविधाता आहे. साहित्यिकाचे तसं पाहिल्यास दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे काल्पनिक साहित्य निर्माण करणारा तर दुसरा प्रकार म्हणजे वास्तविक साहित्य निर्माण करणारा. वास्तविक साहित्य तसं कल्पनेतूनही निर्माण होवू शकतं. कधीकधी एखादं साहित्य निर्माण होतं. ते वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होतं व त्यानंतर फोन येतात. त्या फोनवरुन पुढील व्यक्ती बोलतो. तो व्यक्ती सांगतो की संबंधीत लेख वा कथानक त्याच्या परिस्थितीशी जुळलेलं आहे. त्या कथानकात असलेली परिस्थिती त्यानं स्वतः भोगलेली आहे. हे साहित्य वास्तविक साहित्य असतं. परंतु या साहित्याला खऱ्या अर्थानं वास्तविक साहित्य म्हणता येत नाही. कारण खरं वास्तविक साहित्य हे संबंधीत लेखकानं आपल्या जीवनात ज्या वेदना भोगलेल्या असतात, त्या वेदनेतून निर्माण होत असतं. तेच वास्तविक साहित्य असतं. त्याला अजिबातच कल्पनेची जोड नसते.
साहित्य हे जन्माला येतं कधीकधी वेदनेतून. हे जरी खरं असलं तरी कल्पनेतूनही साहित्याची दर्जेदार निर्मीती होत असते. जशी छावा, संभाजी वा मृत्यूंजय वा इतर अनेक कादंबऱ्या. ज्यात लेखकांनी त्या कादंबऱ्या लिहितांना त्या काळाची परिस्थिती अनुभवली नाही. केवळ वाचनातून कल्पनाविस्तार करुन त्या कादंबऱ्या लिहिण्यात आल्या. मात्र अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी वास्तविक जीवनाचा बोध देते. तशीच माणूस म्हणून लिहिल्या गेलेली मनोहर तल्हार यांची कादंबरी, ही देखील त्यानं भोगलेलं वास्तविक जीवन दाखवते.
अलिकडील काळात वास्तविक कादबऱ्या कोणी लिहित नाही. कारण वास्तविक परिस्थिती भोगणारी मंडळी, हे काही लेखक नाही आणि जे वास्तविक परिस्थिती भोगतात. ते जर लेखक असले तर ते कादंबरी लिहित नाही. ते आत्मचरीत्र लिहितात. आत्मचरीत्र ही काही कादंबरी नसते. ते आत्मकथन असते. जे साहित्य लोकांना त्या लेखकाची स्तुती वाटते व ते आत्मचरीत्र लोकांच्या पचनी पडत नाही. म्हणूनच ते आत्मचरीत्र साहित्य जरी असलं तरी साहित्य होवू शकत नाही.
साहित्याच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास लोकांना कादंबऱ्या जास्त अवडतात. त्याही वास्तविक कादंबऱ्या आवडत नाहीत. कारण त्यात कादंबरी रुपात का असेना, वास्तविक जीवन साकारलं असतं लेखकाचं. त्या कादंबऱ्या खऱ्या असल्या आणि त्याला वास्तवाची जोड असली तरीही. लोकांना आवडतात कल्पना करुन लिहिलेल्या कादंबऱ्या. ज्यात पाल्हाळ असते व कल्पनेचा विस्तार असतो. खरी परिस्थिती नसते. जशी 'सुर्य मावळलेला. त्यातच सांजवात झालेली. अशातच कुत्रीही भुंकायला लागलेली.' आता यात सुर्य मावळताच कुत्र भुंकतं का कधी? नाही. परंतु तो कल्पनेचा विस्तार आहे आणि हा विस्तार करीत असतांना लेखकाला आपण काय लिहितो, याचं भानच नसतं. परंतु वाचणाऱ्याला काय? ती कादंबरी सरस वाटते. अव्वल व दर्जेदार वाटते. जीवंत अनुभूती देते. वाचनाऱ्यांचं मनोरंजन करते. मग ती कादंबरी सरस वाटणार नाही तर काय? शेवटी अशाच कादंबऱ्यांना पुरस्कार मिळतात. काही पुरस्कार तर लेखक विकत सुद्धा घेत असतात.
पुस्तक लेखनात निर्देशित करीत असतांना समजा एखादा शेतकरी असेल आणि त्यानं शेतीवर कादंबरी लिहिली तर ती कादंबरी पुरस्कारासाठी योग्य ठरु शकते. कारण त्या लेखकानं ती परिस्थिती स्वयं भोगलेली असते. परंतु त्या शेतकऱ्यांच्या त्या शेतीविषयक कादंबरीला अलिकडे पुरस्कार मिळत नाही. पुरस्कार मिळतो, ज्यानं कधीच शेतीचं जीवन अनुभवलं नाही. तरीही इतरांचं साहित्य वाचून वा इतरांकडून तसे बोल ऐकून ती पुस्तक लिहिली. त्याला पुरस्कार देण्यात येतो की जी वास्तविक जीवनाची अनुभूती नसते. केवळ कल्पनेचा जोड असतो.
वास्तविक कादंबऱ्यात गारंभीचा बापू व गारंभीचा बापू नावाची कादंबरी साकारणाऱ्या लेखकाच्या सर्वच कादंबऱ्यांचा समावेश होवू शकतो. कारण त्यांच्या सर्वच कादंबऱ्यात त्यांच्या गावाकडील वर्णन येतं. परंतु पुरस्कार त्यांना मिळत नाहीत. पुरस्कार हे ठरलेले असल्यानं केवळ लेखकांचा चेहरामोहराच पाहून मिळत असतात. तो लेखक किती प्रसिद्ध आहे? त्याचे कपडे भरजरी आहेत की खेडवळ स्वरुपाचे आहेत? तो किती रुपये संस्थेला दान देतो? तो कुठे राहतो? त्याचं घर कसं आहे? जर तो शहरात वा खेड्यात चांगल्या टुमजली घरात राहात असेल तर पुरस्कार पक्का. जर तो भरजरी कपड्यात वावरत असेल तर पुरस्कार पक्का आणि तो जर पुरस्कार देणाऱ्या संस्थेला जास्तीतजास्त रक्कम दान देत असेल तर पुरस्कार पक्का. मग ती कादंबरी कल्पनाविस्तार करुन लिहिलेली जरी असली तरी, त्या लेखकानं ती परिस्थिती भोगलेली जरी नसली तरी, ती कादंबरी वास्तविक जीवनाचं अनुमोदन करीत आहे. असा देखावा केला जातो व पुरस्कार दिला जातो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज साहित्य लेखनात कल्पनाविस्तार करुन जर साहित्य निर्माण केलं गेलं असलं तरी ते साहित्य सरस ठरु शकेल काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. परंतु ते कोण लक्षात घेणार. कारण आजचं जग भपकेबाज स्वरुपाचं आहे. पैसे फेक तमाशा देख या स्वरुपाचं आहे. तसंच भरजरी पोशाखात वावरणाऱ्यांचं जग आहे. त्यातच त्याचं घरही भपकेबाज स्वरुपाचं असावं वरील प्रकारानुसार आजच्या काळात चांगल्या लेखकाला व त्याच्या कसदार लेखनाला किंमत नाही. जो पैसे फेकतो वा तशा स्वरुपात लोकांना दिसतो. तोच पुरस्कार मिळवतो व त्याचं साहित्यही दर्जेदार गणतीत येतं. त्यालाच पुरस्कार मिळतात. परंतु जो लेखक गबाळ राहतो, परिस्थितीनं गरीब असतं. घरही झोपडपट्टीत असतं वा घरही झोपडीच असतं. अशा साहित्यीकाला त्याचं साहित्य दर्जेदार जरी असलं तरी पुरस्कार मिळत नाही. तसंच पुरस्कार जर संस्था देणगी घेवून देत नसेल तर ती संस्था असा विना देणगीनं पुरस्कार देतांना त्या पुस्तकाचा दर्जा (कागद, प्रिंटींग व इतर गोष्टी), त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ, त्या पुस्तकाचा आय एस बी एन क्रमांक पाहते. त्यानंतरच पुरस्कार प्रदान करते व या गोष्टी सामान्य लेखकाला जमत नाहीत. सामान्य लेखकाला आय एस बी एन क्रमांकही समजत नाही. त्याला फक्त कळतं लिहिणं व कसंतरी प्रसिद्ध करणं. ज्या लेखनात त्यानं आपला जीव ओतलेला असतो व जे लेखन खरंच कसदार स्वरुपाचंच असतं.
विशेष सांगायचं झाल्यास 'आम्हालाही पुरस्कार द्यावा' त्या लेखकाचं म्हणणं असतं. परंतु त्यांना पुरस्कार कोण देणार? जरी त्यांचं साहित्यलेखन कसदार स्वरुपाचं असलं तरी. कशीतरी ते, आपल्याही साहित्याचं पुस्तक निघावं म्हणून आय एस बी एन क्रमांक न टाकता पुस्तक काढत असतात आणि प्रसिद्ध करीत असतात. खरं तर त्या पुस्तका कसदारच असतात. परंतु आजच्या भपकेबाज काळात त्या साहित्याकडे पुरस्कार देणाऱ्या संस्थेचं दुर्लक्ष होतं. त्याचबरोबर दुर्लक्ष होतं सरकारचंही. ज्या सरकारकडे अशी लेखक मंडळी आपलं साहित्य पाठवीत नसतात. कारण त्यांना तशी पुस्तक सरकारचा पुरस्कार मिळविण्यासाठी पाठवावं लागतं हेही माहीत नसतं. तसंच ते कसं पाठवायचं? याचाही मार्ग माहीत नसतो. तसा मार्ग कोणी सांगतही नाही. मग त्या साहित्यात कितीही मुल्य असलं तरी ते साहित्य आपोआपच मागं पडतं. त्यात कितीही दर्जेदारपणा असला तरी तो दर्जेदारपणा आपोआपच फोल ठरतो व त्या लेखनाची गणती दर्जेदार लेखनात होत नाही. असं साहित्य व असा लेखक हा प्रभावशाली ठरत नाही. तो आपोआपच काळाच्या ओघात मागचा मागंच राहतो. त्याचं साहित्य कितीही दर्जेदार असलं तरी. हे तेवढंच खरं आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की पुरस्कार त्यांनाही द्यावा. ज्यांचं साहित्य चांगलं आहे. परंतु ज्यांचं साहित्य उजेडात येत नाही. जे वास्तविक जीवन भोगत आहेत व वास्तविक साहित्य निर्माण करीत आहेत, परंतु वास्तविक जीवनाशी लढत असतांना ज्यांना कल्पनेच्या जीवनाचा प्रवास करता येत नाही. कारण त्यांना वास्तविक जीवनाशी लढत असतांना वेळच मिळत नाही. अशाच साहित्यिकांचं लेखन कसदार असतं. दर्जेदारही असतं. त्यांना पुरस्कार नाही मिळाला तरी, ते पुरस्काराचा विचार करीत नाहीत. ते लिहित असतात सतत आणि तसं जीवन भोगतही असतात सतत. जेव्हा एखाद्या वेळेस त्यांचं साहित्य एखाद्या सामान्य वाचकांच्या हातात गवसतं व ते वाचून त्या लेखकांना छान साहित्य असल्याबाबत फोन करतात. तोच त्यांच्यासाठी मानाचा वा अभिमानाचा पुरस्कार असतो. जो पुरस्कार भारतरत्न पुरस्कारपेक्षाही मोठा असतो. तो पुरस्कार एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा वल्डकप मिळविल्यासारखाच असतो. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०