Students are not learning, whose fault is it? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | विद्यार्थी शिकत नाहीत, दोष कोणाचा?

Featured Books
Categories
Share

विद्यार्थी शिकत नाहीत, दोष कोणाचा?

विद्यार्थी शिकत नाहीत? दोष कोणाचा?
शिक्षक हा शिकवायचे काम करीत असतो. तो शिकवतोच. कारण त्याचा त्याला मोबदला मिळत असतो. तो आपल्या शिकविण्यात तसूभरही कसर सोडत नाही. तो इमानदारीनंच शिकवतो. तरीही शासन म्हणतं की तो शिकवीत नाही. त्याचेवर ताशेरे ओढले जातात. त्याला डाग लावण्याचे प्रयत्न केले जातात नव्हे तर त्याला अपात्र ठरविण्याच्या गोष्टी केल्या जातात.
शिक्षक शिकवीत असून व आपली सेवा इमानदारीनंच करीत असून त्याला काही लोकं काहीबाही बोलतात. त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढतात. त्याला वाईट लेखतात. त्याच्यावर कारवाई करु म्हणतात. परंतु असे बोलणे वा त्यांची धिंड काढणे बरोबर नाही. त्याला वाईट लेखणंही बरोबर नाही. कारण तो शिकवीत असलेले विद्यार्थी त्याचे काही शत्रू नसतातच. कारण त्यांचं हे शिकविणं. त्या शिकविण्यातून देशाचे राष्ट्रपती घडतात, पंतप्रधान घडतात नव्हे तर जो अशाप्रकारची बोलणी बोलत असतात, तेही घडत असतात असे म्हणायला काहीही हरकत नाही. त्याचं एक साधं उदाहरण देतो.
आपण जेव्हा लहान असतो. तेव्हा आपल्याला बोट धरुन कोण शिकवतो? आपला गुरुच ना. मग आपण अशा गुरुबाबत असे बोलणे. हे बरोबर तरी आहे का? परंतु तरीही आपण बोलतो. कारण आपल्यामध्ये असलेलं अज्ञान. आपल्याला साधं वाचता वा लिहिता जरी येत असेल. तरी ते लिहिता वाचता येणं काही आपण स्वतःच स्वतः शिकत नाही. शिकवावं लागतं कोणीतरी आणि जो तसे करतो. त्याला शिक्षक अशी उपमा देता येईल. यात आपली आई जर शिकवीत असेल तर तिही आपली शिक्षीकाच झाली. मग आपण आपल्या आईबद्दल अपशब्द बोलतो काय? नाही ना. मग शिक्षकांवरच का रोष? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
आजचा काळ तंत्रज्ञानाचा काळ आहे. या काळात कोणी म्हणतात की काही काही शिक्षक हे शिकवीत नाही. तसं पाहता शिक्षकांच्या पेशाबाबत सर्वांनाच अलीकडील काळात तिटकारा आलाय. त्यातच शासन त्यांचा पदोपदी अपमानच करीत आहे. अपमानच करीत आला आहे, याला इतिहास साक्षीदार आहे. जरी त्या शिक्षकांनी सर्वांनाच साक्षर केलं असलं तरी. परंतु याबाबत मला आवर्जून सांगावसं वाटते की सर्वच शिक्षक हे हिरीरीनं डोळ्यात अगदी तेल ओतून शिकवीत असतातच. तरीही त्यांची थट्टा शासनदरबारी का म्हणून चालते ते कळत नाही.
थट्टा अशी की त्याची नियुक्ती शिक्षणसेवक म्हणून करणे व इतर शिक्षकाएवढे त्याला वेतन न देणे. वेतन तेवढेच देणे. जेवढे वेतन एखाद्या वेठमजूराला मिळत असते. अर्थातच आठ ते दहा हजार. अलीकडे वेठमजूरही तो शिकलेला नसतांना पंधरा ते वीस हजार रुपये कमवतो. मग या शिक्षकांचा शिकून काय उपयोग? शिवाय अलीकडेच एक निर्णय आला होता की वीस हजार रुपये वेतनावर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी शिकवायचं. अर्थातच त्यांनी नकार दिल्यामुळेच अनर्थ टळला. कारण ही कृती शिक्षक म्हणून पदवी घेणा-या लोकांना बेरोजगारच ठरविण्याची होती.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सरकारला शिक्षक तयार तर करायचे आहेत. परंतु त्यांना नोकरी द्यायची नाही. केवळ याबाबत त्यांचा नाही तर त्यांच्या पेशाचा खेळखंडोबा करायचा आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. यासाठीच की काय, त्यांनी शिक्षकांच्या नोकरीत खाजगीकरण आणलं. खाजगीकरण यासाठी की अशा खाजगी शिक्षकाने शाळेत शिकवूच नये व गरिबांची मुलं शिकूच नये. कारण उपाशी पोटी कोणीच ज्ञानाला पाजळवू शकत नाही. तशीच गोष्ट होत आहे शिक्षकांबद्दल.
आता मुळ मुद्दा हा आहे की शिक्षक शिकवतो. परंतु विद्यार्थी शिकत नाहीत. यात दोष कोणाचा? त्या शिक्षकांचा की विद्यार्थ्यांचा की इतर घटकांचा. इतर घटकात पालक, परीसर आणि सामाजीक व कौटुंबिक वातावरण यांचा समावेश होतो.
शिक्षकांचा दोष नाही. याबाबत सांगताना मी एवढंच सांगेन की एका वर्गात जर दहा मुलं असतील आणि त्यातून पाच शिकत असतील व पाच शिकत नसतील तर याला शिक्षकांचा कसा दोष म्हणता येईल? ते पाच कसे शिकले? कोणी शिकवले? याचा कोणी विचार तरी करतंय का? तर याचा कोणी विचारच करीत नाहीत. यावरुन हमखास म्हणता येईल की शिक्षकांचा विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना तसूभरही दोष नाही. मग दोष पालकांचा असतो का? होय, राहू शकतो. कारण काहींची मुलं निश्चीतच हुशार असतात. परंतु त्या पालकांचं घरचं वागणं मुलं पाहात असतात. त्यांच्या मायबापाचे वारंवार घरात होणारी भांडणं ती मुलं नेहमी पाहात असतात. काहींच्या घरी तर त्याच्या वडीलाला दोन बायका असतात. काहींच्या आईला दोन पती. काहींचे न्यायालयात घटस्फोटाचे खटले चालतात. या सर्व गोष्टींचा परीणाम मुलांच्या शिकण्यावर होतो. परंतु या गोष्टीचा कोणीच विचारच करीत नाही. तसाच दुसरा परीणाम म्हणजे काहींचे मायबाप मरण पावतात. मुलं आजीकडे राहतात. काहींची आई मरण पावते. बाबा दुसरा विवाह करतात. काहींचे बाबा मरण पावतात. आई दुसरा विवाह करते. त्यानंतर त्या बाळांना अशा आईवडिलांकडे योग्य फिडबॅक मिळू शकते का? तर याचंही उत्तर नाही असंच येतं. अशा मुलांना शिक्षकानं कितीही शिकवलं तरी त्यांचं मनच शाळेत लागत नाही व ती कितीही शिक्षकानं शिकवलं तरी पाहिजे त्या प्रमाणात शिकत नाहीत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजीकरण अर्थातच परीसर म्हणता येईल. काही झोपडपट्ट्या जर सोडल्या, तर झोपडपट्टीत राहणारी मुलं ही हमखास काही दिवसांनी शाळा सोडून जातात. ती शिकत नाहीत किंवा अशी झोपडपट्टीतील मुलं वारंवार शाळेत सतत गैरहजर राहात असतात. ही झाली शहरातील गोष्ट. ग्रामीण भागात तर चित्र वेगळंच आहे. मुलं ऐन परीक्षेच्या काळात शेतावर कामाला जात असतात. ऐन शेतातील हंगामाच्या काळात मुलांच्या परीक्षा असतात व शेतात मजूर मिळत नाहीत. शिवाय वरचं निसर्गी वातावरण असं असतं की तो पाऊस केव्हा पडेल याचा नेम नसतो. तो असा येतो की त्याच्या येण्यानं उभ्या पिकांचे नुकसान होते. असे होवू नये म्हणून मायबाप त्याला शेतावर नेतात. अशावेळेस त्या मुलाचं शाळेत मन रमत नाही. मग ती मुलं शाळेत शिकवलं जाणारं शिक्षण शिकणार कशी? शिवाय शासनाला हे माहीत असूनही ते त्या मुलांना जबरदस्तीनं शिकवा म्हणतं व त्याची जबरदस्ती शिक्षकांवरच करतं. त्यातूनच त्याला अर्धाच पगार देवू म्हणतं. या कृतीला काय म्हणावे? यातूनच प्रत्यक्षदर्शी दिसतं की सरकारसाठी शिक्षक नावाचा घटक जड झालाय हे निर्विवाद सत्य आहे. त्यातच सरकारला विद्यार्थी शिकू नयेत व त्यातून शिक्षक घडू नयेत असंही वाटत असावं. याला कारणीभूत आहेत वरील सर्व कारणं.
महत्वाचं म्हणजे पुर्वी मुलं शिक्षकांची सरकारी नोकरी मिळेल म्हणून शिकत होती. आता ती खाजगी झाली. आता नोकरीत खाजगीकरण. वेतनही तुटकं फुटकं. शिवाय शिक्षकांवर विद्यार्थी शिकवीत नाहीत हे लांच्छन. त्यातच त्यांच्यावर असा आरोप लावून त्यांना अर्धे वेतन करु इच्छीणं. शिक्षकांची अर्हता प्राप्त झाल्यानंतरही त्याला नोकरीला न लावणं. त्यातच त्याचे जागेवर सेवानिवृत्त शिक्षकांचा विचार करणं. शिक्षकांची बेरोजगारी वाढवणं. या गोष्टी मनाला न पटणा-या आहेत. त्यामुळंच असं वाटायला लागलंय की आपण साक्षरतेकडे प्रवास करीत आहोत की निरक्षरतेकडे? त्यातच विद्यार्थी शिकत नसेल तर दोष कोणाचा? हेही प्रश्न काहीसे अनाकलनीय आहेत. महत्वपुर्ण गोष्ट अशी की शासनाचं असंच धोरण सुरु राहिलं तर उद्या कोणीच शिक्षक बनायला धजणार नाही. त्यामुळंच देशातील मुलांना शिकवायला एकही शिक्षक मिळणार नाही व देश पुर्ण स्वरुपात अज्ञानाच्या अंधकारात बुडेल. म्हणूनच आजच आणि आताच सर्वांनी जागं व्हायला हवं व शिक्षकांना दोष न देता होत असलेल्या चुकांची वेळीच सुधारणा करायला हवी म्हणजे पावलं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०