Service of my father in Marathi Biography by Ankush Shingade books and stories PDF | मायबापाची सेवा

Featured Books
Categories
Share

मायबापाची सेवा

मायबापाच्या सेवेतून परिणामकारक निष्पत्ती

मायबाप देवच असतात. ते आपल्याला जन्माला घालतात. म्हणूनच आपल्याला जग बघता येतं. त्यांनी जर जन्मच दिला नाहीतर आपल्याला जगही पाहता येणार नाही आणि त्याचबरोबर देव धर्मही हे निर्वीवाद सत्य आहे. मायबाप आहेत, म्हणून आपण आहोत. मायबाप नसते तर आपणही नसतो हेही तेवढंच खरं.
आज स्पर्धाकाळ आहे. या स्पर्धाकाळात आपल्याला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. तेही गलेलठ्ठ नोकरीची. कारण आजच्या परिस्थितीत तुटपुंज्या वेतनात काहीच भागत नाही. म्हणून आपण गलेलठ्ठ वेतनाची नोकरी शोधत असतो. मग अशी नोकरी जिथं मिळेल तिथं आपण जात असतो आणि आपले पोट भरीत असतो. मग त्यात आपला देश का असेना किंवा विदेश का असेना.
आपला देश असा की ज्या देशात माणूसकी आहे. माणूसकी आजही टिकून आहे. आजही आपल्या देशानं माणूसकी सोडलेली नसून आजही आपल्या देशातील लोकं आबालवृद्धांची सेवा करतात. त्यातच मायबापाचीही सेवा करतात. परंतू काही काही महाभाग आजही असे आहेत की जे मायबापांच्या पोटातून जन्म घेतात. त्यांचे उपकार घेतात. लहानाचे मोठे होतात. प्रसंगी सरकारी नोकरीवर लागतात. परंतू ते उपकार विसरतात व त्या उपकारावर कोणी काही बोलल्यास त्याला अपशब्द बोलतात वा अपमान करतात. आज बरेच असे महाभाग आहेत की जे सरकारी नोकरीवर मोठ्या पदावर आहेत. ते मोठ्या पदावर मायबापामुळंच गेलेले असून ते उपकार विसरल्याचे निदर्शनास येत आहे. जेव्हा त्यांचे मायबाप म्हातारे झाले, तेव्हा अशा ब-याच जणांनी माणूसकी विकून आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात टाकलेले आहे. हे वृद्धाश्रमातील भेटीदरम्यान दिसून येते. याबाबत एक प्रसंग सांगतो.
प्रसंग असा. यावेळेस अक्षयतृतीयाचा पर्व पार पडला. त्यात एक पोस्ट आली. कशाला आज मायबापांना पुजताय? मथितार्थ असा मायबाप जीवंत होते तेव्हा ज्यांनी सेवा केली नाही. त्यांना मायबापाचे पुजन करण्याचा अधिकार नाही. वास्तविक ही पोस्ट बरोबर होती. ज्यांनी मायबापाची सेवाच केली नाही आपल्या संबंध आयुष्यात. त्यांना सेवेचा अधिकार कशाला? परंतू या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात कशाला अशा पोस्ट करताय? असाच हेतू होता सा-या लोकांचा. बहुतेक तो नोकरीवर असलेल्यांचाच ग्रुप असावा. ज्यांचे मायबाप त्यांच्याजवळ नसावे आणि ज्यांनी आपल्या नोकरीसाठी आपल्याच मायबापांना वृद्धाश्रमात टाकलेलं असावं. होय नोकरी करणा-या मंडळींची हीच गत आहे. जिथं नोकरी करणारी मंडळी आपल्या मुलांनाच दाईकडं सोपवून त्या नोकरीवर जातात. तिथं ती दाई आपल्या मुलांसोबत कसला व्यवहार करते याकडेही ही मंडळी ढुंकून पाहात नाही. ती काय मायबापांना सांभाळणार उतार वयात. याबाबत एक बहात्तर वर्षाचा व्यक्तीला विचारलं,
काका, आपली मुलं दिसत नाहीत. कुठं आहेत?" त्यावर तो दुःखी अंतःकरणानं म्हणाला,
"मी विनाकारणच शिकवलं माझ्या मुलाला. माझी दोन्ही मुलं आज विदेशात स्थायीक झालेली आहेत. ते इथं येत नाहीत. जास्त पैसा कमवतात ना." त्यावर मी पुन्हा म्हटलं,
"तुम्ही त्यांच्याकडे का राहात नाही? पोषत नाहीत का ते?" त्यावर ते म्हणाले,
"पोषतात. परंतू आम्हास तिथं करमत नाही. आजारी पडतो आम्ही. तेथील वातावरण आम्हाला लाभदायक होत नाही. मग कशाला ओझं व्हायचं मुलांवर? मला वाटतं की मी फालतूच शिकवली मुलं. नसती शिकवली तर ती मुलं आजही माझ्याजवळच राहिली असती."
म्हातारपण मोठं भारी. म्हाता-यांची ही कैफियत. बरीच अशी म्हातारी मंडळी मिळतात आणि आपल्या आटलेल्या वेदना सांगत असतात. याबाबत अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. एका शेतक-यांची गोष्ट सांगतो. या शेतक-यानं आपल्या मुलाला शिकवलं. तो मोठा ऑफिसर बनला. त्यानंतर मुलगा ऑफिसर बनताच त्याचा शेतकरी बाप त्याला भेटायला गेला. जेव्हा तो भेटायला गेला. तेव्हा भेटीदरम्यान तिथं सभा चाललेली होती. विचारलं, 'कोण हे?' उत्तर मिळालं, 'माझ्या घरचा नोकर.'
जन्म दिलेला बाप. त्या मुलांना वाढवतांना भोगलेल्या वेदना. उन्हातून सावलीत नेतांना झालेल्या अडचणी. कधी पीक होईना, तरीही शिक्षणात खंड पडू दिला नाही. सारेच प्रॉब्लेम. तरीही त्या शेतक-यानं आपल्या मुलाला शिकवलं. त्या शेतक-याचा तो अपमानच होत होता. अतिशय लाज वाटत होती आपल्या लेकराची. परंतू काय करणार. उपाय नव्हताच. शेवटी तो निराश होवून घरी परत आला. पुन्हा मुलाच्या घरी कधीही न जाण्यासाठी.
खरी परीक्षा मुलांची असते मायबापाच्या म्हातारपणीच. ती कशी वागतात? आपल्याला सांभाळतात का? की आपल्या दुर्दशा करतात. ती चांगली जर निपजली तर सारंच मिळवलं व ती चांगली निघाली नाही तर सारंच गमावलं. याबाबत एक प्रसंग पुन्हा आहे. त्या शेतकऱ्यासारखाच तो प्रसंग. परंतू अपमान करणारा नाही. अलिकडेच एक पोस्ट व्हायरल होत आहे. फरक एवढाच की तो शेतकरी नाही. तो मजूर आहे. तो मजूरही तसाच त्या मुलाला भेटायला गेला. तेव्हा त्याच्या जिल्हाधिकारी पदावर असलेल्या मुलानं त्याला आपल्या खुर्चीवर बसवलं व त्याचा आदरसत्कार करुन त्याचं स्वागत केलं. त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला.
असे असावेत ऑफिसर. आपल्या मायबापांना न विसरणारे. आपल्या मायबापांचा यथोचीत सन्मान करणारे अन् आपल्या मायबापाच्या उपकारांची जाणीव ठेवणारे. अलिकडे याच प्रकाराची वानवा आहे. लोकं आपल्या मुलांना शिकवतात. त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून. ते आपल्या पायावर उभे राहतातच. परंतू ज्यावेळेस ते आपल्या पायावर उभे राहतात. तेव्हा ते केलेले उपकार विसरुन गेलेले असतात.
आज मुलांनी असला व्यवहार करु नये मायबापासोबत. ते होते, म्हणून आपल्याला जग पाहता आलं. ते तेवढंच सत्य आहे. त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करुन शिकवलं आपल्याला आणि आपण आज ते रक्तच विसरलो तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. तसंच त्यांची सेवा न करता आपण देवधर्म कितीही पुजले तरी ते पुण्य ठरत नाही. मायबापाची सेवा हीच इश्वरसेवा आहे. ते होते म्हणून आपल्या देव कळला. देवाचा आकार कळला. ते जर नसते तर आपला जन्मही झाला नसता, आपल्याला देवही कळला नसता व देवाचा आकारही.
बरेचशी अशी लेकरं आहेत की मायबाप जीवंत असतात, तेव्हा किंचीतही सेवा करीत नाहीत आणि ते नसल्यावर त्यांची सोनेरी रंगात भव्यदिव्य फोटो बनवतात. अशी फोटो बनवतात की जी सुबक व सुंदर असते. सारखी पाहाविशी वाटते. तसेच ते महाभाग आपल्या मायबापाला आपल्या मायबापाची सेवा न करता ते मरण पावल्यावर त्यांची दरवर्षी नित्यनेमानं पितृमोक्ष अमावस्या व अक्षयतृतीयेला पुजा करीत असतात. खरंच याला काय म्हणावे? दिखाऊपणा की आत्मीयता. याबाबत काही बोलल्यास नक्कीच राग येतो अशा उभययंतांना. हा दिखावाच असतो. त्यात आत्मीयता नसतेच. लोकांनी आपल्याला नावबोटं ठेवू नये म्हणून. म्हणतात की ती प्रथा आहे. मग मायबापाची सेवा करणं ही प्रथा नाही का? काही काही मायबाप तर मायबापाच्या मृत्यूनंतर भिंतीवर त्यांची आठवण म्हणून फोटोही लावत नाहीत.
महत्वाचं म्हणजे काही काही लोकं असेही असतात की जे आपल्या स्वतःच्या मायबापाची सेवा करीत नाहीत. परंतू इतरांची जास्त सेवा करतात. परंतू कोणाची वा इतरांची सेवा नाही केली एकदाची तरी चालेल, ज्यानं जन्म दिला. त्या मायबापाची सेवा करावी. त्यांच्या सेवेनच सातजन्माचं पुण्य लाभतं. जो सेवा करेल, तो मेवा खाईल या वृत्तीप्रमाणे ती सेवा केल्यास असं पुण्य लाभतं की त्या पुण्यातून आपण सदैव सुखी होतो. आपलं आयुष्यही सुखदायक होतं आणि आपल्याला आजार पाजार होत नाहीत. पर्यायानं सांगायचं झाल्यास आपण आपलं व आपल्या मुलाबाळाचं आयुष्य त्या पुण्यानं मंगलमय बनवू शकतो हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०