Difference between God and Constitution in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | देव व संविधान यातील फरक

Featured Books
Categories
Share

देव व संविधान यातील फरक

देव व संविधान यावरुन वाद नको?

दि. २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान बनलं. त्यानंतर सर्व जनता खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली. तसं पाहता ती जनता सन १४ ऑगस्ट १९४७ लाच स्वतंत्र झाली होती आणि त्याचा उत्सव १५ ऑगस्ट १९४७ ला घेण्यात आला. परंतु त्यावेळेस जरी जनता स्वतंत्र झाली असली तरी त्या जनतेला पूर्ण स्वरुपाचे स्वातंत्र्याचे अधिकार मिळाले नव्हते. जे संविधान बनल्यानंतर मिळाले.
संविधान जेव्हा बनलं, त्यानंतर मुक्त अर्थव्यवस्था आली व त्या मुक्त अर्थव्यवस्थेनुसार लोकं कमवायला लागले व आपल्या स्वतःचा विकास करायला लागले. याचाच अर्थ असा की संविधानानंच आपल्याला गाडी, बंगला, शिक्षण व सर्व काही दिलं हे नाकारता येत नाही. मग संविधान बनण्यापुर्वी आपल्याला गाडी, बंगला व सर्वकाही मिळत नव्हतं काय? तर याचं उत्तर नाही असंच येईल. कारण संविधान बनण्यापुर्वी एक वेगळाच वर्ग शिक्षण घेवू शकत होता. सर्वांना शिक्षण नव्हतं व सर्वांना स्वतंत्र्यपणे जगण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण घेण्याचाही अधिकार नव्हता. परंतु जसं संविधान बनलं. तसे या देशातील लोकं शिकायला लागले. ते एवढे शिकले की त्यांना आपले अधिकार कळायला लागले. शिक्षण सर्वांना मिळायला लागलं व आपल्या अन्यायाविरुद्ध दादही मागता येवू लागली. यातूनच कोणी कोणावर अत्याचार करु शकत नव्हते आणि कोणी कोणाला कमजोर समजू शकत नव्हते.
आज स्वतंत्र समाज शिकला. लहानाचा मोठा झाला. अधिकारी बनला. त्याला संविधानाचं महत्व कळलं. तो त्याचा फायदाही घेवू लागला. परंतु त्याच्यामध्ये तो जेवढा शिकला, त्यानुसार तेवढाच द्वेषही निर्माण झाला आणि त्या द्वेषातून त्यानं ते संविधान कोणाला माहीत होवू नये व संविधानातून पुढील व्यक्ती हा अतिशय हुशार बनू नये म्हणून त्यांच्यात देवादिकाच्या ज्या कल्पना संविधानापुर्वी होत्या, त्याच सुरु ठेवल्या व संविधानानंतर शिकलेला समाज आजही देवादिकातच गुरफटून राहिला. आजही तो देवादिकांना मानतो व त्यात गुरफटून राहतो.
देवाची पुजा करावी वा करु नये याबाबत बोलू नये वा बोलण्याचा आपल्याला तसा अधिकार नाही. कारण तसं बोलल्यास धार्मीक भावना दुखावल्या जातात आणि कोणीही कोणाच्या धार्मीक भावना दुखवू नये. परंतु वास्तविकताही लपवून ठेवू नये. वास्तविकता अशी की मला गाडी, बंगला, शिक्षण आणि सर्वकाही देवानंच दिला. खरंच यात किती वास्तविकता आहे. हे आपण जाणतो. देव अमूक करतो, देव तमूक करतो असं सर्वच म्हणतात. परंतु देव देतो का? नाही. देव काहीच देत नाही. सर्व काही माणसांचे प्रयत्न पुर्ण करीत असतात. मग देवाचं काम काय? देव कशासाठी? आपल्या वास्तविक गरजा खरंच पुर्ण करतो का देव? अन् त्यानं जर तसं केलं असतं तर संविधान निर्माण होण्यापुर्वी जो अस्पृश्य समाज देवाची पुजा करीत होता. त्या अस्पृश्यांवर त्या देवानं कोणतेच अत्याचार होवू दिले नसते.
संविधान व देव या संकल्पना पुर्णच स्वरुपात अभिन्न आहेत. परंतु त्या कल्पना परस्पर विरोधी नाहीत. संविधान हे देव मानू नये असं म्हणत नाही. फक्त म्हणतं की सर्वांनी संविधानातील कलमानुसार चाला. याचाच अर्थ असा की नियमानुसार चाला. काही लोकं संविधानाला मानत नाहीत. ते देवाला मानतात. तसंच देव हा गाडी, बंगला देतो असेही मानतात. आता एक गोष्ट अशी की प्रत्येक व्यक्ती मंदिरातच जप करीत दिवसभर, रात्रभर, अनादीकाल तपश्चर्या केली आणि देवाला मागीतलं की बाबा रे, मला गाडी, बंगला दे. शिक्षण दे. तर देव देतो का? नाही देत. कारण त्यानं गाडी बंगल्यासाठी लागणारे पैसे कमविण्यासाठी मेहनतच केलेली नसते. मग गाडी, बंगला कुठून मिळणार? तसं जर झालं असतं तर संविधान निर्माण होण्यापुर्वीच अस्पृश्य व इतर समाजाला मिळालं असतं. कारण त्यावेळेस देवाला मानणारा वर्ग हा तेव्हा जास्त प्रमाणात होता.
महत्वाचं सांगायचं झाल्यास शिक्षण, गाडी, बंगला देव देत नाही. देव काहीच देत नाही. कारण देव हा पाषाणाचा बनलेला असतो आणि जेव्हा पूर येतो वा भुकंप येतो, तो तो पाषाणरुपी देव त्या पुराच्या पाण्यात वाहून जातो. तो देव भुकंपात जमीनीत गाडला जातो. मग देव नाही का? अन् आहे तर तो कुठे आहे?
देव हा आहे. तो पाषाणात नाही. तो माणूसकीत आहे. माणसाच्या ह्रृदयात आहे. जो गरीबांची सेवा करतो. त्यांच्यात आहे. मग लोकं पाषाणाला देव का मानतात?
पाषाणाला देव यासाठी मानतात. कारण पाषाणरुपी देव जिथं असतो. तिथं महाप्रसाद चालतो व त्या महाप्रसादात लाखो लोकं जेवन करतात. त्यांचं मन तृप्त होतं. आनंदीत होतात ते लोकं. त्यांच्या मनातून चांगुलपणा निघतो. तोच देव. देव पाषाण नाहीच. मग देव म्हणून पाषाणाला का बरं पुजतात. ते यासाठीच. शिवाय याच पाषाणरुपी देवाच्या गाभाऱ्यात गेल्यास तिथं मनाला शांत वाटतं. म्हणूनच त्या पाषाणाला देव मानण्यात येतं व आलं आहे. याचा अर्थ संविधानाची काहीच किंमत नाही का?
संविधानालाही महत्वपुर्ण किंमत आहे. कारण संविधान नसतं तर आज शिक्षण, आरोग्य, सुग्रास अन्न, वस्र, निवारा व गाड्या तशाच इतरही गोष्टी लोकांना मिळाल्या नसत्या. मग त्या गोष्टी संविधान निर्मीती पुर्वी लोकांना मिळत नव्हत्या का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण संविधान निर्माण होण्यापुर्वी देशात विटाळ होता. भेदभाव होता व त्या भेदभावानं अस्पृश्य व स्पृश्य अशी वर्णव्यवस्था निर्माण झाली होती. यानुसार अस्पृश्य लोकांना सुग्रास अन्न मिळत नव्हतं. मोठ्या इमारतीही बांधता येत नव्हत्या. गाडी तर घेताच येत नव्हती व्यतिरिक्त त्यांच्या जीवनात चाकोरीबद्ध शिक्षण नव्हतंच. ते सगळं संविधानानं दिलं. मग ते देव मानत नव्हते काय?
देवादिकांचा त्यांचा इतिहास जर पाहिला तर संविधान निर्माण होण्यापुर्वी अस्पृश्य मंडळी देव मानतच होती. तिही पाषाणरुपी देवाला पुजत होती. परंतु देव त्यांच्यासाठी धावून आला नाही. त्या देवानं त्यांना सुग्रास अन्न दिलं नाही. उष्ट्या पत्रावळी चाटायला लावल्या. चांगलं वस्र आणि गाडी बंगला दूरच राहिला. शिक्षण दूरच राहिलं. माणसाला माणूसपण नव्हतं व माणसाला एखाद्या पशुगत वागवलं जात होतं. म्हणूनच त्यांनी संविधान निर्मीतीनंतर पाषाणरुपी देव सोडला व संविधानाला देव मानलं व ते बरोबरच ठरलं. कारण या संविधानानं त्यांना जगण्याचे अधिकार प्रदान केले. माणूसकी शिकवली. गाडी, बंगला दिला. शिक्षण दिलं. याचाच अर्थ असा की गाडी, बंगला, शिक्षण यासारख्या गोष्टी ज्या संविधान निर्मीती पुर्वी देवाची या अस्पृश्य समाजानं पुजा करुनही देवानं दिलं नाही. ते संविधान निर्मीतीनंतर मिळालं. मग ते पाषाणाला देव कशाला मानतील व दोन गट पडले. एक देव मानणारा व दुसरा देव न मानणारा. देव मानणाऱ्या समाजाला संविधान निर्माण होण्यापुर्वीही काहीच इजा झाली नाही. मग तो देव मानणार नाही तर काय?
आज या देव अस्तित्वावरुन वाद आहेत. पाषाणाला देव न मानणारी मंडळी संविधानाला मानतात व ते देवाला हिन समजून वात्रट बोलत असतात. तर देवाला मानणारी मंडळी ही संविधानाला वात्रट बोलत असतात. यातूनच वाद होतात व ते वाद एवढे विकोपाला पोहोचतात की त्या वादातून खून, बलात्कार, कापाकापी सारंच घडत असतं.
महत्वाचं म्हणजे आज जे देवादिक व संविधान यावरुन वाद होत असतात. ते वाद होवू नये. कारण त्यातून धार्मीक भावना दुखावल्या जातात व वाद होतात. त्यातून आंदोलन व तोडफोड होते व आपलं नुकसान होतं. त्याचबरोबर आपलूया देशाचंही नुकसान होतं. असं होवू नये म्हणून देव मानणे वा संविधान मानणे ही ज्याची त्याची इच्छा आहे. त्या त्या इच्छेनुसार त्यांनी त्यांनी कसं वागावं याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं आहे. संविधानानं माणसांना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मत प्रदर्शीत करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. तेव्हा तोच अधिकार मानून जर कोणी आपल्या वाणीतून वात्रट बोलत असेल तर ते ऐकू नये. त्यातूनच राग व्यक्त करु नये. शांती ठेवावी. याबद्दल आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांची एक कथा माहीत असेल. अंगूलीमालनं गौतम बुद्धांना खुप शिव्या दिल्या. परंतु त्या सिद्धार्थांनी ऐकल्या नाहीत. त्यानंतर अंगूलीमालनं स्वतः विचारलं की मी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्यात. तरीही तुम्ही का रागवले नाहीत? त्यावर तथागत भगवान गौतम बुद्ध अतिशय शांतपणे म्हणाले,
"मी तुझ्याकडील शिव्या ऐकल्याच नाही व घेतल्याच नाही. त्या तुझ्याजवळच राहिल्या."
असं म्हटल्याबरोबर अंगुलीमालमध्ये परीवर्तन झालं. तीच गोष्ट संत एकनाथबाबत घडली. ते अंघोळ करुन नदीतून निघत होते. तेव्हा एक व्यक्ती त्याच्या अंगावर थुंकत होता व संत एकनाथ पुन्हा अंघोळीला जात होते. हे वारंवार म्हणजे एकशे एक वेळा घडलं. एक आणखी प्रसंग. एक विंचू पाण्यात पडला होता. एका साधूनं तो पाण्यात पडलेला पाहिला होता व त्या विंचवाला वाचविण्यासाठी तो साधू प्रयत्न करीत होता. असं करीत असतांना विंचू सारखा चावत होता. तरी साधूनं आपला प्रयत्न सोडला नाही व विंचूला वाचवलं.
हे तिन्ही प्रसंग. या तिन्ही प्रसंगावरुन हेच कळतं की बोलणार्‍याला बोलू द्यावं. अडवू नये. शांत राहावं. शांत राहाणं हे महान व शहाण्या माणसांचं लक्षण आहे. वाद करणं हे अडाणी, निरक्षर व मुर्ख माणसांचं लक्षण आहे. म्हणून बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ना. तो बोलणारच. त्याला बोलू द्यावं व आपण आपलं कार्य करावं. वाद मिटवावा. जेणेकरुन देव व संविधानाच्या महत्वावरुन वाद होणार नाही. तसंच आपलं आणि आपल्या देशाचं नुकसान होणार नाही यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०