साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ९
जानकी तयारीला लागली होती.मध्ये अवघे सहा दिवस होते. चंद्रसेनाला सोडविण्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागणार होते.जानकीने दयाळ व दादू कोळी यांना
नक्र बेटावर बोलावले. सर्वानी एकत्र बसून खलबतं केली.जो दिवस चंद्रसेनाला बळी देण्यासाठी खड्गसिंगांने निवडला होता त्याच रात्री हल्ला करण्याचे निश्चित करण्यात आले.त्या दिवशी खड्गसिंगांची माणसे गाफिल असतील त्यामुळे काम थोडं सोपे होणार होते.
" त्या रात्री सभोवतालच्या टेहाळणी बेटावरचे चाचे पण
कर्ली द्विपावर जमा होणार आहेत. रात्री मोठी मेजवानी होणार आहे." शाम म्हणाला.
" तूला कसं समजलं?" प्रतापरावांनी विचारले.
" पिंगळ्याने त्यांचे संभाषण ऐकले होते."
" हे खरं असेल तर काम आणखीच सोपं होईल." दयाळ म्हणाले.
" मी, शाम व चरण गुहेतील मार्गाने आधी कर्लीद्विपावर जातो व बाबांना सुखरूप बाहेर काढतो." जान्हवीने सुचवले.
" मी येईन तुमच्यासोबत." चंद्रसेना ठामपणे म्हणाली.
" आई, तूझी तब्येत अजून..."
" शाम मी आता पूर्णपणे बरी आहे. मी देसाईंची सून आहे.... लढाऊ बाणा माझ्यातही आहे."
" ठिक आहे.आम्ही दोन तुकड्या करून चढाई करतो. एका तुकडीचे नेतृत्व दयाळ करेल तर दुसर्या तुकडीचे नेतृत्व मी व दादू करू." प्रतापराव म्हणाले.
दयाळ व दादू कोळ्यांने मान हलवून त्वरीत संमती दिली.
" आजोबा, आपल्याला शस्त्र लागतील. पण आता लागलीच ती मिळवायची कुठून?" जानकीने चिंतातूर होत प्रश्न केला.
" त्याची काळजी नको. शस्त्रे मिळतील. सप्तमीला सायंकाळी सर्वांनी आपल्या माणसांसहीत इथे जमा व्हायचे आहे." प्रतापराव म्हणाले.
दयाळ व दादू कोळी गेल्यावर प्रतापराव जानकी, चंद्रसेना व शामला घेऊन वाड्याच्या मागच्या भागात गेले. अंधाऱ्या अरूंद मार्गावरुन जात एका मोठ्या खोलीसमोर आले. जानकीने ही खोली सतत बंद असलेली पाहिली होती.प्रतापरावांनी त्या खोलीचे भलेमोठे कुलूप उघडले.
आत प्रवेश करताच जानकी चे डोळे विस्फारले. समोर विविध शस्त्रांचा साठा होता. रुंद पात्यांच्या तलवारी... भाले...चांगल्या प्रतीचे धनुष्यबाण.... धारदार खंजीर..बिचवे ... काही चिलखते व शिरस्त्राण...गोफणी
अशी शंभरावर शस्त्रे होती.
" आजोबा, हे काय आहे?" जानकी ने आश्चर्यचकित होत विचारले.
" हे आपले शस्त्रागार आहे. हे तुमच्या आजोबांच 'चक्रदेव ' यांचं शस्त्रागार आहे.मी लहान असतानाच काही घटनांमुळे ते संसारातून विरक्त झाले. त्यांनी सम्राटांनी दिलेली सरदारकी सोडली. लढाई ...हिंसा या पेक्षा शांती..समाधान महत्वाचे असे ते म्हणत. जप,तप यात ते रमू लागले.एके दिवशी अचानक ते कुणालाही काहीच न सांगता निघून गेले... आजपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही.त्यांनी हे शस्त्रागार बंद करताना सांगितले होते की अगदी गरज लागलीच तर हे शस्त्रागार उघडायचे.आज दुष्ट खड्गसिंगांच्या विनाशासाठी हे शस्त्रागार तुमच्या सर्वांच्या साक्षीने उघडले आहे."
" मामंजी हे विलक्षण आहे.पण ' चक्रदेवांना' शोधण्याचा प्रयत्न कुणी केलाच नाही का?" चंद्रावतीने विचारले.
" मी तेव्हा चौदा - पंधरा वर्षांचा होतो... आम्ही खूप प्रयत्न केले...पण काही उपयोग झाला नाही. आईने या घटनेमुळे अन्न- पाण्याचा त्याग केला व ती पण मला सोडून गेली."
या सगळ्या आठवणींनी प्रतापरावांचे डोळे ओलावले.
" मुलांनो, भूतकाळ विसरून आता आपल्याला वर्तमान
स्थितीचा विचार करावयाचा आहे.ही शस्त्र घासून- पुसून त्यांना तेलपाणी करून धार काढायची आहे .हे काम चरण व शाम येत्या तीन दिवसांत करतील."
प्रतापरावांनी सूचना केली.
----------****----------*****------****------
नक्र बेटावर ही सगळी तयारी सुरू असताना तिथून दूर अरबी समुद्रात जहाजांचा एक काफिला पूर्वेकडे म्हणजेच
कर्ली द्विपाच्या दिशेने सरकत होता.तीन मध्यम आकाराची
जहाजे व एक थोड मोठं जहाज वेगाने पाणी कापत होते.
जहाजाच्या कडेला टेकून दोन तरूण उभे होते.
" श़शांक, आपल्याला सहा दिवसाच्या आत इच्छित स्थळी पोहचायचे आहे." भरजरी वस्त्रे घातलेल्या राजबिंड्या तरूणाने बरोबरच्या तरूणाला सांगितले.
" होय, आपण निश्चितच त्या दिवशी सायंकाळ पर्यंत
तिथे पोहचू, आपण निश्चिंत असावे." शशांक म्हणाला.
" मित्रा, गेले तिनं दिवस आपण प्रवास करत आहोत. वार्याची आपल्याला उत्तम साथ मिळाली आहे. वातावरण असंच राहिलं तर काहीच अडचण येणार नाही."
वर निळ आकाश...सभोवार..निळे पाणी मध्येच उठणार्या लहान मोठ्या फेसाळत्या लाटा...फडफडता वारा अस उत्साह वाढवणारे वातावरण होतं.
" मित्रा, तू मोहिमेवरून आल्यावर खूपच अस्वस्थ वाटतो आहेस.कुठेतरी हरवल्यासारखा...धड बोलतही नाहिस.,
नेमकं झालंय काय? कुणाच्या प्रेमात वैगेरे पडलास तर नाही ना? बाकी लक्षण तशीच दिसताहेत." शशांक हसत म्हणाला.
" अगदी तसंच नाही पण कुणाची तरी काळजी वाटतेय...दुसरं म्हणजे मला माझं कर्तव्यही पार पाडायच आहे."
" त्याची काळजी नको करूस. ठरलेल्या योजनेप्रमाणे आपण यशस्वी होऊच.पण ती भाग्यवंत तरूणी कोन आहे....जिने तूझ ह्रदय चोरलय?" श़़शांकने विचारले.
" वेळ आल्यावर कळेल.पण तिला याची कल्पना नाही किंवा तिच्या मनात काय आहे हे ही मला माहीत नाही."
तो तरूण म्हणाला.
एवढ्यात सर्वात पुढे असलेल्या गलबतावरील खलाशी व सैनिक आरडा ओरडा करू लागले.
" शशांक,काय झालं ? एवडा गोंधळ का माजलाय?"
दोघांनीही समोर बघितल आणि दोघेही हादरले.
" काय आहे ते?" शशांकने विचारले.
दूरवर एक विचित्र प्राणी दिसत होता. तो गलबतांच्या दिशेनेच येत होता. पाण्यावर त्याचे तोंड दिसत होते.तोंडांने फूत्कार टाकत तो पुढे सरकत होता. यांच्या तोंडातून ज्वालाबाहेर पडत होत्या.त्या ज्वालांनी समोरच्या पाण्याची क्षणात वाफ होऊन वाफेचे छोटे ढग बनत होते.
साधारण तीस ते चाळीस हात त्याची लांबी असावी.त्याच्या शेपटीजवळ पाच ते सहा हात रूंद फावड्यासारखा भाग होता. त्याच्या शेपटीच्या फटकार्याने पाण्यावर लाटा उसळत होत्या.
"याला, फावड्या साप म्हणतात.पण एवढा अवाढव्य फावड्या साप मी प्रथमच बघत आहे. त्याची धडक बसली तर जहाजांचा काही खरं नाही." जहाजाचा कप्तान धावतच त्यांच्या जवळ येत म्हणाला.
" कप्तान, लवकर कर्णा आणा. त्या विशाल सापाच्या मार्गातून जहाजं बाजूला घेण्याची सूचना द्या. सैनिकांना धनुष्यबाण सज्ज ठेवायला सांगा. सर्वांनी एकाच वेळी
बाण सोडायचे आहेत. तसेच जहाजांच्या खाली दोन्ही
बाजूंना बसवलेले टोकदार भाल्यांच जाळ बाहेर काढा.म्हणजे तो साप जवळ येणार नाही."
त्या तरूणाने घडाधड सूचना दिल्या. तो साप पाणी खळबळवत जवळ येत होता.आता तो अधिकच भयावह वाटत होता. त्यांचा रंग पिवळा होता...त्यावर भलेमोठे
भडक लाल रंगाचे पट्टे होते.
खलाशांनी झपाझप गलबत बाजूला गेली. दोन्ही बाजूला दोन दोन गलबत घेतली. सैनिक जहाजाच्या कडेला उभे होते.सर्वांनी धनुष्यावर बाण चढवून प्रत्यंचा ताणली होती.प्रत्येकाच्या चेहर्यावर भिती दिसत होती.बघता - बघता तो साप जहाजांच्या मधल्या भागात आला. अचानक वळवळत त्याने आपल्या शेपटीचा फटकारा पाण्यावर मारला. भली मोठी लाट उसळली.त्या फटकार्याने पुढचं जहाज हेलकावे खात दूर भरकटत गेल काही खलाशी व सैनिक पाण्यात फेकले गेले. एकच आरडाओरडा सुरु झाला.
सैनिकांनी एकाच वेळी बाण सोडले.पण ते बाण त्या सापाच्या जाड चामडीत घुसत नव्हते.
फावड्यासाप
त्या राजबिंड्या तरूणाने चेहर्यावर शाल गुंडाळली.हातात तलवार घेऊन तो म्हणाला ..
" शशांक मी पाण्यात उतरतो.त्या सापाच्या पोटाकडील
मऊ भागावर वार केला पाहिजे."
बोलता बोलता त्या तरूणाने पाण्यात उडी मारली. त्यापाठोपाठ शशांक ने तलवारी सहित पाण्यात सूर मारला .
" तू पाठीमागे जा...मी पुढून हल्ला करतो." तो तरूण शशांकला म्हणाला.
दोघेही पाण्याखाली जात दिसेनासे झाले.सारे आरडाओरडा करत त्यांना प्रोत्साहन देत होते.दोघांनींही
आपापल्या तलवारी त्या सापाच्या पोटात खुपसल्या.तो साप जोराने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होता... त्यामुळे आपोआपच त्याच पोट चिरल जात होतं... वेदनेमुळे तो अधिकच जोरदार वळसे घेवू लागला.त्याच्या शेपटीच्या फटकार्याने उंच लाटा उसळू लागल्या.एकवेळ तर श़शांक व तो तरूण बाजूला फेकले गेले.पण जिद्दीने त्यांनी पुन्हा हल्ला केला.साप आडवा तिडवा वळवळत होता.त्याच्या विषारी फुत्काराच्या विषाने पाणी निळसर झाले होते.पोट फाटले गेल्यामुळे तो तळमळत होता.बघता बघता त्याची वळवळ कमी होत गेली.त्याचे फूत्कार थांबले.त्याचे मृत शरीर पाण्यावर तरंगू लागले.
दोन वीर मत्त हत्ती सारखे डोक झटकत पाण्यावर आले.
सगळ्या सैनिकांनी आनंदाने एकच जयघोष केला.
-----*****-------*****--------****-----
बाळकृष्ण सखाराम राणे.