Choriche Rahashy - 1 in Marathi Detective stories by Kalyani Deshpande books and stories PDF | चोरीचे रहस्य - भाग 1

Featured Books
Categories
Share

चोरीचे रहस्य - भाग 1

उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विदर्भात माझ्या काकांच्या गावी गेलो होतो. काकांना दोन अपत्ये आहेत. माझा चुलतभाऊ माझ्याच वयाचा आहे आणि माझी चुलतबहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.

तिचे लग्न झाले आहे, तिला एक मुलगा आहे. सुट्टीमध्ये ती पण मुलाला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे काकांकडे आली होती. रोज आमचा वेळ गप्पांमध्ये,आंबे,आईस्क्रिम, कुल्फ्या खाण्यात कसा जात असे कळतही नसे.

त्या दिवशी असेच आम्ही सगळे आमरस-पुरी खाऊन दुपारी कुलर च्या गार हवेत झोपलो होतो. जेमतेम तासभर झाला असेल की मला काका-काकूंच्या बोलण्याच्या आवाजामुळे जाग आली. काकू,काकांना सांगत होती
"अहो ऐकलं का! पांडे काकूंकडे चोरी झाली!"

"ककाय!! कधी??",काका

"अहो आत्ता भरदुपारी झाली. ते तासभरासाठी बाहेर गेले होते तेव्हा कशी कोण जाणे पण चोरी झाली.",काकू

"आपण तर घरीच आहोत आपल्याला तर कोणी आलेलं दिसलं नाही किंवा काही आवाजही आला नाही.",काका

"कुलर च्या आवाजात काही कळलं नसेल आपल्याला पण आश्चर्य आहे असं कसं काय कोणी एका तासात येऊन चोरी करून जाऊ शकते? चोराला कसं काय माहीत की ते बाहेर जाणार आहे म्हणून",काकू

"लक्ष ठेवले असेल कोणीतरी",काका

अपार्टमेंट मध्ये सगळ्यात तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पांडे काकूंकडे चोरी झाली.एका तासासाठी पांडे काका व काकू बाहेर गेले असताना भरदुपारी त्यांच्या घरात चोरी झाली. मला वाटलं,कमाल आहे,दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या. एका तासात चोरी करून चोर पसार, फारच फास्ट दिसतो चोर.

तेवढ्यात आमच्या वरच्या फ्लॅटमधील कुळकर्णी काकू घाईघाईने घरात शिरल्या आणि काकूंना म्हणाल्या

"बघा बाई! पांडे काकू रोज बाहेर जाताना माझ्याकडे किल्ली ठेवतात पण आज तासभरासाठीच जायचं होतं म्हणून त्यांनी किल्ली ठेवली नाही. पण त्यांना तर माझ्यावरच संशय येईल न "

"का बरं? तुमच्यावर का म्हणून संशय येईल?

"अहो म्हणजे तुम्हाला माहीत नाही का? चोराने कुलूप न फोडता चोरी केलेली आहे. बाहेरच्या दाराचे कुलूप जसे च्या तसे आहे.",कुलकर्णी काकू

"ककाय?? कमाल आहे बाई! म्हणजे चोराजवळ डुप्लिकेट किल्ली असणार!",काकू

"म्हणून तर म्हणते त्यांना असं न वाटावं की मीच चोरी केली",कुळकर्णी काकू

"नाही हो त्यांना असं कसं काय वाटेल? पांढरपेशे लोकं आपण. आपण असं करणं शक्यच नाही. तुम्ही उगीच काळजी करू नका. पोलीस काय तो तपास लावतीलच",काकू

पांडे काकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी जागेची तपासणी केली. घराच्या मुख्य दाराचे कुलूप जसे च्या तसे होते.

कुलूप न फोडता चोराने चोरी केली होती. आतलं लाकडी कपाट फोडलं होतं,एक सोन्याचा नेकलेस सेट,दोन गोफ ,२ अंगठ्या ,२ पाटल्या असा जवळपास १५० ग्राम सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.

पांडे काकुंच्या नात्यात लग्न होतं दोन दिवसानंतर म्हणून लॉकर मधून त्यांनी दागिने आणून ठेवले होते. पोलीस विचारात पडले. पांडे काका-काकू डोक्याला हात लावून बसले.

"कुलूप जसं च्या तसं आहे म्हणजे चोराजवळ घराची डुप्लिकेट किल्ली होती, असं वाटते. तुमचा कोणावर संशय आहे? तुम्ही कोणाकडे बाहेर जाताना किल्ली ठेवता का ?",पोलीस

थोडा वेळ विचार करून पांडे काका म्हणाले,"असं काही सांगता येणार नाही साहेब,कोणावर संशय घेणार,काही कळत नाही,बरं एवढे दागिने आमच्या कडे आहेत हे आम्ही कुठे बोललो पण नाही मग असं एकदम कसं झालं माझी तर बुद्धीच कुंठित झाली.

आम्ही रोज आमच्या खालच्या फ्लॅट मधील कुलकर्णींकडे किल्ली ठेवतो पण आज एक तासासाठीच जायचं होतं म्हणून आम्ही तिथेही किल्ली ठेवली नव्हती. आणि तसंही कुलकर्णी असं काही कशाला करतील?",पांडे काका

"बरं मला एक सांगा तुमच्याकडे कोण-कोण असते,घरी नेहमी कोण-कोण येते ?",पोलीस

"तसं तर कोणी फारसं येत नाही साहेब,आमच्या घरात आम्ही दोघचं राहतो,मी व माझी बायको कारण माझा मुलगा मुंबईला शिकायला आहे.",पांडे काका.

"आमच्याकडे रोज फक्त एक मोलकरीण येते भांडे घासायला आणि झाडूपोछा करायला, पण ती दोन दिवस झाले आली नाही,आजारी आहे म्हणून. ",पांडे काकू

थोड्या वेळाने पांडे काका म्हणाले,
"आम्ही मधून मधून आमच्या मुलाजवळ मुंबईला जातो तेव्हा एक माणूस आहे खंडूभाऊ म्हणून त्याला आम्ही आमच्या घराचं रक्षण करण्यासाठी हॉल मध्ये झोपायला सांगतो,तेव्हा फक्त बैठकीची खोलीच तो वापरू शकतो बाकीच्या खोल्या कुलूपबंद असतात.तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे,इलेक्ट्रिक कामांसाठी आम्ही त्याला बोलावतो,गेले चार वर्षं मी त्याला ओळखतो."

"म्हणजे तुम्हाला मोलकरीण आणि खंडूभाऊ वर संशय आहे का?",पोलीस

"तसंच काही नक्की सांगता येणार नाही",पांडे काका

"काही तरी सूत्र मिळाल्या शिवाय कसा तपास करता येणार? माझ्या मते हा खंडूभाऊ किंवा तुमच्याकडे येणारी मोलकरीण त्यांच्यापैकीच कोणीतरी चोरी केल्याची शक्यता आहे. पांडे साहेब ,त्यामुळे तुम्ही मला त्या तुमच्या खंडूभाऊ चा आणि तुमच्या कडे येणाऱ्या मोलकर्णीचा पत्ता द्या तिथे झडती घ्यावी लागेल मला,फक्त याबद्दल कुठे बोलू नका",पोलीस

पांडे काकांनी खंडूभाऊ आणि सखुबाई चा पत्ता आणि फोन नंबर पोलिसांना दिला. तो घेऊन ते पुढील तपासासाठी गेले.

क्रमशः