ट्रिंग ट्रिंग ..... माझा गुप्तहेरतेच्या कामगिरीचे निरोप येणारा फोन वाजला.
"हॅलो गुप्तहेर राघव बोलतोय. "
"गुप्तहेर राघव लवकरात लवकर कुहू बीच वर ये.", असं म्हणून इन्स्पे. नाईकांनी फोन ठेवून दिला. इन्स्पे. नाईकांची आणि माझी छान ट्युनिंग जमली असल्याने बऱ्याच केसेस मध्ये ते मला मदतीला बोलावून घ्यायचे.
मी कुहू बीचवर पोहोचलो , तिथे इन्स्पेक्टर नाईक माझी वाट पहात होते. "काय झाले इंस्पेक्टर नाईक?", मी
इंस्पेक्टर नाईक, "हे बघ ह्या निळ्या कार मध्ये एका मुलीचा बहुतेक विषारी चॉकलेट खाऊन मृत्यू झाला आहे."
"काय ??? विषारी चॉकलेट ! फारच विचित्र !!", मी
"कोणीतरी तिला मुद्दाम ते चॉकलेट दिले असेल", इन्स्पेक्टर नाईक
"हो! ही कदाचित खुनाची घटना असू शकते, पुढील चौकशीसाठी मला तिची कार आणि मृतदेह कसून तपासू द्या.",मी
मी गाडीजवळ पोहोचलो आणि मृतदेह , विषारी चॉकलेट आणि आतील तसेच कारच्या बाहेरील बाजूची काळजीपूर्वक पाहणी केली. तीची मान स्टेअरिंग वर टेकलेली होती. तिच्या तोंडातून फेस आलेला होता. शरीर निळसर पडलं होतं.
"ती प्रसिद्ध व्यावसायिक रणधीर जहागीरदार ह्यांची मुलगी होती. तिचे नाव रिया आहे. काल रात्री 11 वाजता आम्हाला तिची हरवल्याची तक्रार मिळाली, म्हणून आम्ही जीपीएसच्या सहाय्याने तिच्या फोनचे स्थान शोधून काढले. आणि ती अशा अवस्थेत आढळली.", इन्स्पेक्टर नाईक
"तूम्ही तिच्या कुटूंबाला कळवलं का ?", मी
"हो नुकतीच माहिती दिली आहे, रुग्णवाहिका येत आहे", इन्स्पेक्टर नाईक
मी जागेचं निरीक्षण केले आणि माझ्या छोट्या डायरीत काही मुद्दे नोंदवले आणि तपासणीसाठी काही फोटोही घेतले आणि ड्रायविंग सीट च्या विरुद्ध बाजूच्या दारात मला एक बारीक वस्तू सापडली ती हि मी तूर्तास माझ्याजवळ नीट ठेवून दिली.
“या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर, मला कॉल करा, मला रणधीर जहागीरदार आणि कुटूंबाला काही प्रश्न विचारायचे आहेत.”, मी
"ठीक आहे", इन्स्पेक्टर नाईक इंस्पेक्टर नाईक यांनी जहागीरदारांच्या घरात त्यांची चौकशी करण्यासाठी मला बोलावले.
"नमस्कार श्री. जहागीरदार , मी गुप्तहेर राघव कल्याणी या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्यासाठी मला तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत ."
"नमस्कार गुप्तहेर राघव कल्याणी! तुम्ही तुमची चौकशी सुरु करू शकता. " श्री.रणधीर जहागीरदार
"तुम्हाला माहित आहे का की काल रिया घराबाहेर केव्हा निघाली होती?", मी
"ती संध्याकाळी 6 वाजता गेली होती, तिने आपल्या आईला सांगितले होते की ती आपल्या मित्रासमवेत जात आहे आणि एका तासाच्या आत येईल , परंतु रात्री १०
नंतरही ती आली नाही तेव्हा मी पोलिसांना फोन केला आणि तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली", श्री. जहागीरदार जड आवाजात म्हणाले.
"कोणी तिला ब्लॅकमेल करत होतं का ? किंवा कोणी तिच्या वाईटावर आहे ,याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?", मी विचारलं.
"नाही सर मला असं वाटत नाही की कोणी तिला ब्लॅकमेल करत असेल कारण तसं असतं तर तिने मला सांगितलं असतं. तिचा कोणी शत्रूही नव्हता. तिचे प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते .", श्री. जहागीरदार
"जहागीरदार साहेब तुम्ही एक यशस्वी आणि श्रीमंत उद्योगपती आहात त्यामुळे तुमचे अनेक शत्रू असू शकतात जे अशक्य नाही, बरोबर? हे कृत्य तुमच्या एखाद्या स्पर्धकाने किंवा हितशत्रूने केले असू शकते . तुम्हाला कोणावर संशय आहे का? ", मी
"तुमचं बरोबर आहे गुप्तहेर राघव. माझे बरेच शत्रू आणि प्रतिस्पर्धी आहेत, त्यांच्यापैकी एखाद्याने हे केले असावे, परंतु या विशिष्ट शत्रूने हे केले असेल असा मी कसा काय अंदाज लावू शकेन? मला ते माहित नाही, मला कोणावरही संशय नाही, ते तुमचे काम आहे तेव्हा कृपया लवकरात लवकर माझ्या मुलीचा मारेकरी शोधा ”, रणधीर जहागीरदारांचे डोळे अश्रूंनी भरले होते.
"माफ करा श्री.जहागीरदार मी खरोखर तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही . एक शेवटचा प्रश्न सर, जर आपणास हरकत नसेल तर मी अधिक माहिती साठी तुमच्या मुलीचा फोन माझ्याकडे ठेवू शकतो का ?", मी
"नक्कीच, श्री राघव ", जहागीरदार
त्यानंतर मी रियाच्या आईला काही प्रश्न विचारले
"नमस्कार मॅडम , मी तुम्हाला फार त्रास देणार नाही, मला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत जर आपल्याला काही हरकत नसेल तर", मी
"नक्की डिटेक्टिव्ह राघव , कृपया विचारा , मी माझ्या माहितीनुसार नक्कीच उत्तर देईन.", श्रीमती जहागीरदार
"गेल्या काही दिवसांपासून काही कारणास्तव रिया डिस्टर्ब् असल्याचे आपल्याला आढळले का ?", मी विचारले.
"नाही, अजिबात नाही, ती एकदम ठीक होती", श्रीमती जहागीरदार
"तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींची माहिती तुम्ही देऊ शकाल का ?", मी
"मला सर्व मित्र-मैत्रिणींचे नावे माहित नाहीत पण बहुतेक वेळा तिचे तीन मित्र रुतुजा, मोना आणि मोहन घरी यायचे", श्रीमती जहागीरदार
"ओके मॅम, एक शेवटचा प्रश्न, रियाला कोणत्या ब्रँड चं चॉकलेट आवडत होते ?", मी
"ती बहुतेक वेळा कॅडबो कंपनीचे चॉकलेट खात असे", श्रीमती जहागीरदार
"ओके मॅम, सहकार्याबद्दल धन्यवाद", मी
तिथे श्री जहागीरदार यांची मोठी मुलगी आणि जावई सुद्धा उपस्थित होते त्यांची सुद्धा मी चौकशी केली पण फारशी माहिती मिळाली नाही.
मी त्यांच्या घरातून पोलिस स्टेशनला रवाना झालो.
क्रमशः