अक्षय आज मुंबईला जाणार होता. मायाताईंची गडबड चालू होती. अक्षय हे घेतलंस का? अक्षय लाडवांचा डबा भरलास का? असं बडबडत त्यांची कामं चालूच होती. किरणराव ही अक्षयला मदत करत होते. अखेर अक्षयची जायची वेळ आली. मायाताई थोड्या भावनिक झाल्या. तस पहिल्यांदाच तो एकटा बाहेर जाणार होता नाहीतर लहान म्हणून त्या जायच्या बरोबर.
"काळजी घे रे बाळा."
"हो गं आई काळजी नको करुस."असं म्हणत तो बाहेर पडला.
मायाताई किरणरावांना म्हणाल्या, " खर सांगू तुम्हाला मी अशी मुली बघायची घाई का करत होते? त्याला कोणीतरी आपलं मिळावं जे त्याला समजून घेईल. बस नाहीतर मी कशाला त्याच्या करिअरच्या आड येईन? दिप्तीला तर त्याने नकार दिला शेवटी तिला तो आवडत नव्हता आणि त्याला ती असो आता कामात बिझी असेल अक्षय त्यामुळे त्याला काही त्रास होणार नाही "असं म्हणत त्या आत निघून गेल्या.
किरणरावांना त्यांना नेमकं काय बोलायचं होतं हेच कळलं नाही. काय माहित? असं म्हणत खांदे उडवत ते कामाला निघून गेले. इकडे अक्षय ट्रेनमध्ये होता तेव्हा त्याला दिप्तीचा मेसेज आला.
'थँक्यू ....सुयश पसंत पडलाय , मी आणि त्याने अगदी तू सांगितलस तसच बोललो.. सुयशनेही थँक्यू म्हणलंय तुला.'
अक्षयच्या चेहऱ्यावर हसू आलं. चला निदान कोणालातरी त्याच प्रेम मिळालं. हुह.. खरंतर अक्षयनेच दिप्तीला तयार केल होत आणि कसं बोलायचं हेही सांगितलं त्यामुळे दिप्तीला तिचा सुयश मिळाला होता. त्याने मस्त झोप काढायची ठरवली. खिडकीतून बाहेर बघताना कधीतरी त्याचा डोळा लागला.
इथे अमृताताई त्यांच्या मुलीला हाक मारत होत्या.
"हिमू ए हिमू कुठे आहेस गं तू? चल काम करायला आज आत्या येणारे तुझी मला काहीतरी स्पेशल डिश सुचव." त्या खोलीत येऊन बघतात तर मॅडम मस्त मोबाईल बघत एसीची हवा खात बेडवर बसल्या होत्या.
"हिमानी फोन माझ्याकडे दे.आता तुला रात्री मिळेल फोन." अस म्हणत त्यांनी फोन काढून घेतला. तस हिमानीने रागाने वर बघितलं.
गोरीपान, गुलाबी नाजूक ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्या, कुरळे केस आणि नकट्या नाकावर राग. चल काम करायला. असं म्हटल्यावर ती हो असं म्हणत निघाली. ती आत गेल्यावर मेजरिंग कपने काहीतरी मोजत होती.
"काय करतेस हे ?"
" आई योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन, शिवाय कॅलरीज किती इन्टेक करतोय ते बघायला नको का? "
"काय! अग बाई आपल्याला ६ माणसांच जेवण करायचं आहे ना की एकाच आणि एकालाही पुरणार नाही हे."
खरंतर हिमानी एक्सपेरिमेंट करून बघत होती. तिला तेच करायला मज्जा यायची. फूड सायन्सला होती त्यामुळे त्यांचं सगळं शिस्तशीर असायच. किती इन्टेक असायला हवा याच मेजरिंग असायच पण आपल्या बायकांचं भन्नाट मेजरिंग म्हणजे वाटी, चमचे, मुठी नी चिमटी. एकवेळ किती ग्रॅम काय टाकलं तर स्वाद किती वाढेल ह्याचा त्यांना अंदाज नसेल पण एक चिमूटभर मीठ, तिखट काय कमाल दाखवेल हे मात्र त्यांना पक्क माहीत असत.
बर अमृताताई इंजिनिअर, मुळात त्यांना स्वयंपाकाची आवड नव्हती. त्यामुळे त्यांच्या आईने आणि सासूबाईंनी शिकवला तसा त्या स्वयंपाक करायच्या.
"अग थांब हळद थोडी जास्त टाक कळलं."
"" हो गं आई." असं म्हणत पुन्हा हिमानी काम करू लागली.
ती पुण्याला शिकायला होती पण आत्ता कोरोनामुळे ती रत्नागिरीला आली होती.कोरोना गेला तरी कॉलेज काही सुरु व्हायचं नाव घेत नव्हतं.त्यामुळे ही घरीच बर अजून पुढचं शिकवायला सुरुवात ही नव्हती केली. थोडाफार अभ्यास होता पण बाकीवेळ मोकळीच त्यामुळे सोशल मीडिया झिंदाबाद.
अमृताताईंच एकच म्हणणं होतं आता तेवीस वर्षांची आहे लवकर लग्न व्हायला हवं. स्त्री साठी ते योग्य आहे शिवाय शिकायला, नोकरी करायला देईल असच नवरा शोधायचा. आता एम.एस.सी झाली की तीच लग्न व्हावं अशी इच्छा होती त्यांची.
तेवढ्यात तिला कॉल आला अन अमृताताईंची तंद्री तुटली. रिंगटोन ऐकली तशी ती पळाली. अमृताताई हसतहसतच स्वयंपाकाच बघू लागल्या.
इकडे अक्षय स्टेशनवर पोचला आणि त्याने संकेतला कॉल लावला. हा संक्या पोचलोय मी येतो स्टेशनबाहेर. अस म्हणत तो चालू लागला. स्टेशनबाहेर संकेत उभाच होता. त्याला पाहिल्यावर अक्षय त्याच्याजवळ गेला आणि त्याला मिठी मारली.
"अरे सोड मी काय हिमानी वाटलो का तुला?"असं म्हणत हसू लागला.
"ए चूप रे तिच्याविषयी तर तू बोलूच नको काही मला नाही आवडत ती कळलं ना?"
"हो रे माहितेय काश्मीरमध्ये एकत्र फिरत होतात ते." ते चालता चालता बोलत होते.
"ए का उगाच चिडवतो. तो जस्ट कॉइन्सिडन्स होता हा ती तिच्या ग्रुपबरोबर मी माझ्या ग्रुपबरोबर आम्ही समोरसुद्धा आलो नाही कळलं ना? परत बोलू नकोस प्लिज मला नाही आवडत अगदी टाईमपास म्हणून चिडवलंस तरी. अरे ज्या नात्यात आदर, विश्वास नाही आणि मुळात ज्या नात्याचा ट्रॅकच क्लिअर नाहीये तर मी तरी काय करू?"
" काही म्हण अक्की पण नियती तुम्हाला एकत्र आणतेय ती तुझी बहीण तिची पण नातेवाईक लागते , काश्मीरच तुम्ही दोघ ट्रिपसाठी निवडता ट्रिपसाठी निवडता काय."
" तू गप रे....." असं म्हणत पाठीत धपाटा घातला अक्षयने.
तसा संकेत पुढे पळाला पण अक्षयच्या मनात सहजच विचार आला खरंच नियतीला एकत्र करायचं असेल आम्हाला? नो वे तिच्याशी लग्न? नाहीच.
फोनवर बोलता बोलता अचानक हिमानीला उचकी लागली तशी तिची मैत्रीण सावनी तिला चिडवायला लागली ," काय गं कोणी आठवण काढली असेल आ आ?"
" तुझ काहीतरीच हा तसंही माझी आई आणि तू माझ्या लग्नाच्या पाठी लागले आहात. आई तर आतापासून मुलगे शोधतेय कम ऑन यार जस्ट २२ वर्षांची आहे मी पण आईच म्हणणं आहे लग्न लवकर झालेलं बर वयाच्या एका टप्प्यानंतर बायकांना मुलांची जबाबदारी नाही झेपत. तेव्हा जर मुलं मोठी असतील तर आपण मोकळ्या राहतो असा सगळं लेक्चर देते माझी आई..."
" बरोबर आहे काकूंचं सो तू लग्न कर आणि आम्हाला स्पेशली मला जेवायला बोलाव बाकी कशाला नको बोलावू हवंतर चालेल ना? "
"हं.... तू फक्त खायचं काम कर हा मध्ये आपण सॅलड्स विकत होतो तेव्हा अर्ध पातेलं तूच संपवायचीस हा त्यामुळे आपली विक्री कमी झाली कळतंय का आणि हेल्दी असलं तरी काही लिमिट?"
" ए पातेलं काय पातेलं? छोटा कुंडा किंवा सरळ डबा असायचा गं राणी पातेलं म्हणजे ते मिसळीला असत ना हॉटेलमध्ये तेच येत बघ समोर."असं म्हणत हसू लागली
तस हिमानीही कठीण आहे तुझं म्हणत हसत सुटली. बरीच रात्र झाली होती आणि तरी हिमानी जागीच होती. नवीन मूवी बघत होती. जोडीला तिचे बाबा राजेंद्र
"अरे झोपा आतातरी....." असं म्हणत अमृताताई वैतागून तिथून निघून गेल्या. कारण मगाचपासून पाचवेळा त्यांनी ह्या दोघांना सांगितलं होतं. पण राजेंद्ररावांचा त्यांच्या माऊला फुल सपोर्ट होता त्यामुळे हिमानी निर्धास्त होती. मूवी संपली तसे सगळे झोपायला निघाले.
अमृताताई आधीच आडव्या झाल्या होत्या. त्यामुळे हिमानीने आजच्या दिवस मोबाईल तिच्याजवळ ठेवून घ्यायची परवानगी मागितली होती आणि आपल्या लाडक्या लेकीला राजेंद्ररावांनी ती दिलीही. ती आपल्या खोलीत जाऊन सहजच व्हाट्सअप चेक करत होती. सगळ्यांचे स्टेटस बघता बघता एका फोटोवर मात्र तिचे डोळे थबकले तो स्टेटस तिच्या बहिणीचा अनन्याचा होता.
अनन्या तिच्या मावशीची मुलगी. हिच्या स्टेटसला अक्षयचा फोटो? तोही हॅपी बर्थडे डिअर म्हणून? आज त्याचा बर्थडे आहे? तिने पटकन तारीख बघितली तर १४ जून सव्वा बारा वाजलेले.तिला विचारावंसं वाटलं कारण तिच्या मावशीचाही तोच स्टेटस होता पण काय अर्थ काढतील? आणि कसं विचारायचं? तिने सरळ अनन्याला विचारायचं ठरवलं तसा मेसेज टाकून तिने फोन बाजूला ठेवला खरा पण फोटो बघून तिला सारं काही आठवत होतं तिला काहीतरी वेगळंच वाटलं आणि आपण तेव्हा असं का वागलो हे तीच तिलाच कळलं नाही.
आपण काहीच रिप्लाय दिला नाही वर अपमानही केला हं...खरंच आवडत नाही म्हणून की आणि काही ? नाही नाही तो आणि आपल्याला आवडणार? इंपोस्सीबल तसही आपल्याला ह्या गोष्टीत अडकायचं नव्हतंच त्यामुळे विषय क्लोज केलेला बरा पण अनन्याचा आणि त्याचा नेमका संबंध काय? काय करत असेल आता?
खरंतर ती त्याला कोणीच मानत नव्हती ना शत्रू ना मित्र जस्ट त्याने प्रपोज केल होतं सो प्रपोज केलेल्यापैकी एक असाच तो तिच्यालेखी होता. पण काहीतरी सलत होत मनाला काय तेच कळत नव्हत.
शेवटी जास्त विचार करायचा नाही असं ठरवत ती झोपली खरी पण तिच्या स्वप्नात मात्र घडून गेलेल्या सगळ्या घटनाच येत होत्या आणि झोपेतल्या झोपेत काहीतरी पुटपुटणं चालूच होतं.
क्रमशः