आज तिला वडापावची गाडी बंद करायला अंमळ उशीरच झाला ..
घरी जाताना मनात विचारांचा कल्लोळ माजला.
हल्ली रोज उशीर होतोय आपल्याला . काय करणार?, राहाटगाडं चालवायला रोजचा पुरेसा गल्ला तरी जमला पाहिजे ना?. कमावणारे आपण एकटे अन् खाणारी तोंड चार!. त्यात ही महागाई. महिन्याचे रेशनपाणी ,मुलांच्या शाळेची फी , सासूची औषधे.... आणि त्यात हप्ता घेणारे वेगळेच!!
नवरा होता तेंव्हा अगदी राणीसारखं सुखात राहिलो आपण. श्रीमंती नव्हती पण कसली आबाळही नाही झाली.
अचानक एक दिवस तिकडे काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीर मरण आलं काय आणि आपली ओढाताण सुरू झाली काय.. !!
नाही म्हटले तर त्याची पेन्शन मिळते पण आजकाल महागाईच्या काळात कुठं पुरणार ती.?.
घरात होता नव्हता तो पैसाही हळू हळू संपायला लागलाय. त्यात सासूबाईंनी हे गेल्यापासून जे अंथरूण धरले ते धरलेच. मला शेवटी डोक्यावरचा पदर कंबरेला खोचून संसारासाठी घराबाहेर पडावं लागलं.
थोडं फार शिक्षण असल्याने छोटी मोठी नोकरी मिळत होती पण जाईल तिथे मेल्यांची घाणेरडी नजर बघून हिम्मतच होईना कुठं काम करायची.
अशीच एक दिवस संचित नजरेने घरात बसलेले असताना शेजारची मैत्रीण आली.
"काय ग ?काय झालं? कशाला एवढी काळजीत बसलीयेस?."
"काय सांगू बाई तुला . हे होते तोपर्यंत सगळं नीट होतं. आता पैशाच्या तंगीमुळे नोकरी करावी म्हटलं तर जिथे जाईन तिथे लोकांच्या घाणेरड्या नजरा बघून हिंमतच होत नाही ग नोकरी करायची,सगळी सोंग आणता येतात बघ ,पण पैशाचं सोंग नाही आणता येत ना.
याच यक्षप्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतेय...
मलाच काहीतरी करावं लागेल...दुसरा पर्याय सध्यातरी समोर दिसत नाहीये..
"अग,सुरुवात च करायचीय ना?टाक की एखादी वडापाव ची गाडी,मेहनतही आपली आणि पैसाही आपलाच की.. उत्तम चव आहे तुझ्या हाताला,छान चालेल तुझा धंदा!
एखादा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मैत्रिणीचे बोल ऐकून फरक एवढाच पडतो की विचारांना आता एक दिशा मिळते,विचार प्रत्यक्षात आणायची वेळ जवळ येते.एक उर्मी तिला स्वबळावर लढण्यासाठी प्रवृत्त करते.
गाठीशी असलेली शिल्लक वापरून छोटीशी वडापावची गाडी सुरू करते. देवाच्या कृपेने म्हणा किंवा तिच्या हाताला असणाऱ्या चवीने म्हणा तिची गाडी बऱ्यापैकी चांगली चालायला लागते..
कधी कधी काही लोक त्रास द्यायचे , हप्ता गोळा करायला यायचे तरीही होणाऱ्या मिळकतीतून तिचा दिवसभराचा खर्च निघून जायचा.. घरी जायला मात्र थोडा उशीर व्हायचा. आजही तेच..
पण सवय झाली होती आता याची.तसं पाहिलं तर बरं चाललं होतं तिचं..
अचानक एक दिवस एक माणूस , (माणूस कसला गुंडच तो )येऊन तिला दम देतो की " तुझी गाडी इथून काढ. मला माझा धंदा इथे लावायचा आहे. "
तशी ती सहज कोणाला घाबरणारी नव्हती.. पण हळूहळू रोजच्या दमदाटीने काही फरक पडत नाहीये हे लक्षात आल्यावर मात्र त्याने भाड्याचे तट्टू बोलवून तिच्या गाडीवरचे सर्व सामान फेकून दिले.
पै पै जोडून आपण जमवलेल्या गाडीचे नुकसान झालेलं बघून तिच्या डोळ्यात पाणी तरळले . पण दाद तरी मागायची कोणाकडे ? सांगायचं तरी?
आजूबाजूचे लोक मनात असूनही काही करू शकत नव्हते. त्या गुंडांच्या कोण नादी लागणार?
आज घरी जाताना रस्ता रोजचाच पण पावलं जड झालेली . आता पुढं काय?
घरी काय सांगू?काय रांधू आणि काय वाढू?
जडावलेल्या पावलांनी चालत असताना अचानक तिच्या नाकामध्ये एक उग्र दर्प शिरतो, उग्र तरीही धुंद करणारा!!
सहज आजूबाजूला पाहते तर तिच्या व्यतिरिक्त कोणीच नसतं तिथं. रात्रीची वेळ असल्याने काहीच दिसत नव्हतं. डोळे फाडून बघूनही रस्त्यावर दिवे नसल्याने काहीच दिसत नव्हतं.
तिच्या ह्या सर्च वॉरंट मुळे रस्त्यावरचे गर्दुल्ले मात्र संशयित नजरेने बघू लागले,मग मात्र काढता पाय घेण्याशिवाय पर्याय नव्हता.