ते दहा ही सांगाडे आज्ञा मिळल्याप्रमाणे त्या राखेच्या वर्तुळाभोवती बसले.
"ती दुसरी मुलगी कुठे आहे?",मांत्रिक बाबांनी मला पुन्हा विचारलं.
"त्यासाठी आपल्याला त्या कपाटात जावं लागेल.",मी म्हंटल
मी माझे बाबा रक्षाचे बाबा आणि मांत्रिक बाबा त्या कपाटात कसेबसे उभे राहिलो आणि मी कपाटाच्या भिंतींवर मागच्या बाजूने जोर देताच गुप्त मार्ग खुला झाला आणि आम्ही बोगद्यात घसरलो आणि घसरत घसरत त्या तळघरात पोचलो. तिथल्या सापांना चुकवत चुकवत आम्ही त्या फरशी वर उभे राहिलो आणि लगेच फरशी बाजूला होऊन तिथला गुप्तमार्ग खुला झाला. त्या बोगद्यातून चढत चढत आम्ही त्या दोन लोखंडी कड्यां पर्यंत आलो.
"त्या उजव्या कडीला चुकूनही हात लावू नका",मी जोरात ओरडली. माझा आवाज घुमल्यामुळे खूप विचित्र वाटला. माझ्या आवाजाने मीच दचकली. "रक्षाने डाव्या कडीला हात लावला होता." मांत्रिक बाबांनी डाव्या कडीला धरून ओढलं आणि तिथला भुयारी मार्ग खुला झाला.
"रक्षा इथूनच गेली असावी.",मी म्हंटल.
आम्ही त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो. तो भुयारी मार्ग खूप धुळीने भरलेला होता. त्यामुळे आम्हाला श्वास घेणं कठीण होत होतं.
"बापरे तुम्ही दोघी जणी किती भीषण संकटात सापडला होतात",माझे आणि रक्षाचे बाबा म्हणाले.
मांत्रिक बाबांनी खुणेने सगळ्यांना शांत राहण्यास सांगितले. जसजसे आम्ही पुढे पुढे जात होतो तसतसे आम्हाला फुत्कारण्याचे मोठमोठ्याने आवाज येऊ लागले.
"बापरे माझी मुलगी कोणत्या अवस्थेत असेल काय माहीत",रक्षाचे बाबा चिंतायुक्त स्वरात म्हणाले.
"फारच भीषण आहे हे सगळं मला तर विश्वासच बसत नाही",माझे बाबा म्हणाले.
हळूहळू त्या भुयारी मार्गातून आम्ही एका खोलीत पोचलो.
ती खोली सुद्धा खूप अंधारी होती पण खोलीच्या एका टोकाकडून एक निळसर प्रकाश येत होता. आम्ही सगळ्यांनी तिकडे बघितलं आणि आमचे डोळे आश्चर्याने उघडे ते उघडेच राहिले.
खोलीच्या डाव्या टोकाला एक मोठी सहा फूट बाय चारफुट लांबी रुंदीची एक संदुक ठेवलेली होती. आणि त्या संदुक वर एक अजस्त्र नाग फणा काढून वेटोळे घालून बसला होता. त्याच्या डोक्यावर एक निळसर प्रकाशणारा मणी होता. तो नाग डोलत होता. भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून गेली. मी खोलीत रक्षा कुठे आहे ते बघितलं तर ती उजव्या टोकाला निपचित पडलेली होती.
"ती तिकडे आहे रक्षा",मी हळू आवाजात म्हंटल.
सगळ्यांनी तिकडे बघितलं आम्ही रक्षाजवळ गेलो. ती बेशुद्धावस्थेत होती. तिला हलवून आणि तिच्या चेहऱ्याला थोपटून मी तिला जागं करण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने ती शुद्धीवर आली. ती खूप घाबरलेली होती आणि आम्हा सगळ्यांना बघून ती खूप आनंदित झाली आणि सद्गदित झाली.
"तुम्ही इथेच थांबा",मांत्रिक आम्हाला म्हणाले आणि ते त्या नागाजवळ जाऊ लागले.
त्यांनी त्यांच्या कफनीमधून एक लांब पिशवी काढली आणि हलकेच ते त्या नागाजवळ गेले. तो नाग त्यांच्या कडे फणा वळवत जोरजोरात फुत्कारू लागला. मांत्रिक बाबांनी त्याचा अंदाज घेत हळूहळू त्याच्या मागे जाऊन त्याच्या फण्यावर ती पिशवी टाकली आणि त्या पिशवीला असलेल्या कस्याने नागाचे तोंड बांधून घेतले.
आम्ही चौघे विस्फारलेल्या डोळ्याने ते दृश्य बघत होतो. त्यांनी त्या नागाला बांधलेली पिशवी एका खुंटीला लटकावून ठेवली आणि ती संदुक उघडण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्याचे झाकण एवढे जड होते की त्यांनी माझ्या आणि रक्षाच्या बाबांना मदतीला बोलावून घेतले. त्या तिघांनी मिळून ते झाकण उघडले आणि त्या संदुक मधील उजेडाने तिघांचे चेहरे उजळून निघाले.
रक्षा उठण्याच्या अवस्थेत नव्हती तिला खूप अशक्तपणा आला होता पण माझे औत्सुक्य मला स्वस्थ बसू देईना म्हणून रक्षाला तिथेच बसायला सांगून मी त्या संदुक च्या थोडं जवळ जाऊन बघितलं आणि अवाक झाली. ती संदुक नसून जडजवाहिरांचा एक मोठ्ठा खजिनाच होता.
क्रमशः