प्रकरण ५
त्याच वेळी रिसेप्शानिस्ट गती ने इंटरकॉम वरून इन्स्पे.तारकर आत येत असल्याची बातमी दिली.
“ मला वाटत तुम्ही मिसेस रायबागी आहात.” आत घुसल्या घुसल्या रती कडे पहात तारकर म्हणाला.
“ ओह! तारकर, ये,ये. तिच्यावर दबाव टाकून तू जी माहिती तू काढून घेऊ इच्छित आहेस ती मीच तुला देतो.” पाणिनी थेट विषयाला हात घालत म्हणाला. “ तिला थोड्याच वेळापूर्वी तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर कडून फोन आला की तिच्या नवऱ्याचा खून झालाय. आणि या गोष्टीला काही का होऊन गेलाय. तो म्हणाला की या घटनेची माहिती तो पोलिसांना देणार आहे.रती ने त्याला सांगितलं की ती इथे माझ्या ऑफिसात असल्याचं त्याने पोलिसांना सांगावं.”
“ अरे वा ! म्हणून तू मला फोन करून हरवलेल्या हँड बॅग बद्दल आणि रिव्हॉल्व्हर बद्दल कळवलंस वाटत साळसूदपणे ! ” तारकरने सवाल केला.
“ मी तुला फोन केला तेव्हा तो मेल्याचा फोन आला नव्हता मला.” पाणिनी म्हणाला.
“ हे सिद्ध करणारा साक्षीदार आहे?” तारकरने आव्हान दिल.
“ तूच साक्षीदार आहेस.मी तुला फोन केल्याचं रेकोर्ड तुझ्याकडे असेलच.रती ला मॅनेजर चा फोन आल्याचं रेकोर्ड ही तिच्याकडे आहे.”
“ फारच चतुर आहेस तू.” तारकर म्हणाला. नंतर रती कडे वळून म्हणाला, “ तुझ्या नवऱ्याचा खून ज्या रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या घालून झालाय ते तुझ्या पर्स मधे होतं हे तुला माहिती आहे ना?”
“ नाही.” रती म्हणाली.
“ तुझी हँड बॅग चोरीला गेल्याचं तुला लक्षात कधी आलं?” –तारकर
“ मी घरी आले तेव्हा फ़्लॅट च लॅच उघडताना लक्षात आलं की किल्ली पर्स मधे असते आणि गाडीतून उतरताना पर्स घेतलीच नाही, म्हणून गाडीत पाहिलं तर मागच्या सीट वर टाकलेली हँड बॅग नव्हतीच.” रती उत्तरली.
“ हँड बॅग मधे काय वस्तू होत्या?”—तारकर
“ नेहेमीच्या, म्हणजे बायकी वस्तू, पैसे, नाणी, ड्रायव्हिंग लायसेन्स, लिपस्टिक, कंगवा अशा गोष्टी.”
“ पाणिनी,तू म्हणतोस तुला तुझ्या ऑफिसात पर्स मिळाली.त्यातल्या सामानाची यादी केलीस तू?”
“ हो केली ना. ”
“ तुझं म्हणणं काय आहे? चोर इथे तुझ्या ऑफिसात आला होता?” तारकर ने विचारलं.
“ हो.रती तेच सांगत्ये, की ती इथे आलीच नव्हती.” पाणिनी म्हणाला.
“ तू इथे किती वाजता आली होतीस रती?”
“ मी नव्हते आले.”
“ पाणिनी,तू जेवायला बाहेर गेला होतास?”
“ हो.”
“ तुझं काय सौम्या?”
“ मी पण जेवायला बाहेर गेले होते.” सौंम्या म्हणाली.
“ ऑफिसात कोण होतं? तुझी गती नामक रिसेप्शानिस्ट?” तारकर ने विचारलं.
“ हो.”
“ तिचं काय म्हणणे आहे?”
“ तिचं काम फक्त आलेल्या अशीलाची नावं नोंद करून घेणे एवढंच आहे. तिने फक्त आलेल्या स्त्रीचं साधारण वर्णन केलं. आणि तिचं नाव विचारलं.”
“ आणि आलेल्या बाईने काय नाव सांगितलं स्वत:चं?” तारकर ने विचारलं.
“ मिसेस रायबागी.” पाणिनी म्हणाला.
“ गती ला बोलाव आत.” तारकर म्हणाला.
“ एक मिनिट,तारकर, गती ने रती रायबागी ला बघितलेलं नाहीये, कारण रती डायरेक्ट माझ्या केबिन मधे आल्ये दुसऱ्या दाराने, म्हणजे ती रिसेप्शन मधून आली नाहीये.” पाणिनी म्हणाला.
“ ते काहीही असू दे, मला बोलायचं आहे तिच्याशी. रती बद्दल तिला काय म्हणायचं आहे ते बघू.”
“ रती ची ओळख पटवण्याचा रायबागी प्रकार बरोबर नाही तारकर.” पाणिनी म्हणाला.
“ का?”
“ कारण गती म्हणते की ती बाई आत आली तेव्हा तिने तिच्या डोळ्यावर मोठ्ठा गॉगल लावला होता.”
अचानक तारकर च्या डोक्यात कल्पना आली. “ रती, तुझ्याकडे अत्ता गॉगल आहे? ”
“ आहे.”
“ तो तुझ्या डोळ्यावर चढव, आणि उठून उभी रहा, माझ्या बरोबर रिसेप्शन मधे चल, बघूया आपण तुला बघून गती काय म्हणते ते.”
सर्व काही पाणिनीच्या मनाप्रमाणे घडत होतं. त्याने सौंम्याला खूण केली.तिने कनकला इंटरकॉम लावला.आणि कट केला. तारकर रती कडे बघण्यात एवढा गुंतला होता की त्याला सौंम्याची हालचाल लक्षात आली नाही.
“ हिला बघितल्यावर गती जर म्हणाली की रती, तू तुझी पर्स इथे विसरून गेलीस रती, किंवा अशा आशयाचं काहीतरी वाक्य, तर आपण समजू शकतो की गती ने रती ची ओळख पटवली आहे.” तारकर म्हणाला.
“ ओळख पटवण्याची का अत्यंत चुकीची पद्धत आहे तारकर.कारण आपल्याला कुणाला ओळखायचं आहे याची गती ला बिलकुल कल्पना नाहीये.मोठे गॉगल घालून कोणीही बाई आत आली तर ते उठून उभी राहील आणि एकदम निर्णयाप्रत येईल की.....” पाणिनी म्हणाला.
“ थोडक्यात तू तुझ्या अशिलाला अशा प्रकारे ओळख पटवण्याच्या क्रियेला विरोध करतो आहेस?” तारकर कडाडला. “ तू काय करतोस याला मी महत्व देत नाहीये. रती, चल माझ्यासोबत बाहेर पड. पाणिनी, तू सुद्धा आमच्या बरोबरच ये बाहेर. सौंम्या, तू पण मागे राहू नको.बाहेरच ये कारण तुम्ही एकमेकांना खाणाखुणा करून काही संदेश द्यायचा प्रयत्न करत नाही याची मला खात्री करायच्ये. इथे थांबू नका, चला बाहेर. ”
ते सगळे बाहेर रिसेप्शन कडे जायला निघाले तेवढ्यात सहा सात मुलींचा घोळका त्यांना रिसेप्शन मधून आत जायचा प्रयत्न करत असतांना दिसला.त्या सगळ्यांनी आपल्या डोळ्यांवर गॉगल घातले होते. पाणिनीने हलक्या आवाजात रती च्या कानात सांगितलं, “ त्या मुलीच्या घोळक्याबरोबर आत घूस. ”
तारकर वैतागला. “ ए ! काय आहे हे सर्व? आधी रती ला आत जाऊ दे.” तो हे वाक्य बोले पर्यंत गॉगल वाली दुसरी मुलगी आधी आत घुसली तिला बघताच गती उठून उभी राहिली आणि त्या मुलीला बघून उद्गारली “ अग, तू तुझी पर्स....” तारकर ने हे वाक्य आत शिरतानाच ऐकलं तेवढ्याच इतरही मुली आत शिरल्या.त्यांच्यात रती ही होती. गती पुन्हा काहीतरी बोलायला गेली. पण तारकर ने तिला थांबवलं.
“ एक मिनिट, गती, या मुलींपैकी तू कुणाला यापूर्वी पाहिलंयस?”
“ का? मी... मला... म्हणजे... मला वाटलं की...नाही, मला नाही सांगता येणार.”
“ ए, तुम्ही सगळ्या भिंतीपाशी उभ्या रहा रांगेत.” तारकर ओरडला.
त्यांना बसलेला धक्का जरा कमी करण्यासाठी पाणिनीने खुलासा केला, “ मी ओळख करून देतो.हे इन्स्पे.तारकर आहेत, तुम्ही सर्वजणी त्याचं ऐका, म्हणजे तुम्हाला इथे जास्त वेळ थांबावं लागणार नाही.”
त्या सगळ्या मुली भिंतीलगत रांगेत उभ्या राहिल्या.
“ कोण आहे यातली?” तारकरने गतीला विचारलं.
“ मला आधी वाटलं की जी पहिली आत आली तीच आहे, पण आता इतक्या मुली पाहिल्यावर मला नाही सांगता येणार.” गती म्हणाली.
“ ठीक आहे, तुम्ही निघा सगळ्याजणी” तारकर वैतागून म्हणाला.
पाणिनी मुद्दाम रती कडे बघून सूचकपणे म्हणाला,“ जा तुम्ही, सगळ्याजणी जा.”
तारकरच्या लक्षात आला पाणिनीचा डाव. “ ए, रती, तू थांब इथेच.” तो ओरडला.
“ ठीक आहे, पण यापैकी मिसेस रती रायबागी कोण नेमकी?” पाणिनी ने विचारलं.
“ माझ्याशी असली नाटकं करू नको पाणिनी ” तारकर म्हणाला.
“ मी एवढंच म्हणालो की तुला रती शी बोलायचं असेल तर या मुलीतून तिला बाजूला कर. ”
तारकर ने बरोब्बर रती च्या कोपराला धरून तिला बाजूला घेतलं, “ थांब तू.”
“तिला ओळखायला तुला काहीच त्रास पडला नाही.मला न्यायाधीशांना एवढंच पटवायला लागेल आता की ओळख परेड एकदम योग्य झाली. ” पाणिनी म्हणाला.
“ एवढ होतं तर पोलीस स्टेशन मधे ओळख परेड घेई पर्यंत थांबला का नाहीस? ” तारकर म्हणाला.
“ कारण पोलीस स्टेशनात तू ओळख परेड घेतली नसतीस, तर आमच्या गतीला तू गोंधळात टाकायचा प्रयत्न केला असतास.” पाणिनी म्हणाला.
“ माझंच चुकलं, आत शिरणाऱ्या पहिल्याच मुलीला गती रती म्हणून ओळखेल रायबागी अंदाज मला आधीच आला असता तर मी रतीला सर्वात प्रथम आत जायला सांगितलं असतं.” तारकर म्हणाला.
“ पण मी कुणालाच प्रथम आत जा म्हणून सांगितलं नाही.रतीला नाही आणि दुसऱ्या कुठल्याच मुलीला नाही.त्यामुळे गतीची खऱ्या अर्थाने प्रामाणिक ओळखपरेड झाली. ” पाणिनी म्हणाला.
तारकर या सर्व प्रकाराने थकल्यासारखा झाला. “ बर,ते असू दे, तर मग त्या पर्स मधे रिव्हॉल्व्हर होतं तर.” तो म्हणाला.
“ हँड बॅग मधे रिव्हॉल्व्हर होतं.” पाणिनीने सुधारणा केली.
“ अत्ता कुठे आहे रिव्हॉल्व्हर?” तारकर ने विचारलं
“ माझ्या टेबलाच्या वरच्या ड्रॉवर मधे.” पाणिनी म्हणाला.
“ आण ते इकडे.” तारकर म्हणाला. “ थांब,थांब, पाणिनी, मला दाखव फक्त तू मी स्वत: ताब्यात घेतो ते.”
पाणिनी पटवर्धन ने ड्रॉवर उघडला. आता आश्चर्य करायची पाळी त्याची होती.आत रिव्हॉल्व्हर नव्हतं.त्याने ड्रॉवर जोरात बाहेर ओढला.पूर्ण रिकामा ड्रॉवर पाहून त्याचे डोळे विस्फारले.
“आता पुन्हा माझ्याशी खेळी करायचा प्रयत्न करू नकोस पाणिनी.मी अधिकृत पणे सांगतोय.मला रिव्हॉल्व्हर हव्ये ती. ” तारकर म्हणाला.
पाणिनीने सौंम्या कडे पाहिलं.तिने नकारार्थी मान हलवली. पाणिनीने बाहेर गतीला फोन लावला. “ तू माझ्या ड्रॉवर मधे ठेवलेली रिव्हॉल्व्हर घेतलीस का?”
“ नाही हो सर, मी का घेऊ? मी तर तुमच्या केबिन मधे आले पण नाही.”
“ ठीक आहे, ” पाणिनी म्हणाला.
“ तारकर, कोणीतरी माझ्या ड्रॉवर मधून रिव्हॉल्व्हर घेतलंय आणि त्यात रती रायबागी ला अडकवण्याचा प्रयत्न करतंय.”
“ हरवलेली ही रिव्हॉल्व्हर म्हणजे खुनात वापरलेली आहे? ” तारकर ने विचारलं
“ मला नाही माहित.” पाणिनी म्हणाला.
“ जर ती खुनात वापरलेली नसेल तर ती गायब करण्याचं कारण नव्हतं ”
“ नाही कसं? उलट त्यामुळे रती आणखीनच अडचणीत आल्ये. कारण ते रिव्हॉल्व्हर मिळत नाही तो पर्यंत रती निर्दोष आहे हे आपल्याला सिद्ध नाही करता येणार.” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे तुला याचीही खात्री आहे की रिव्हॉल्व्हर मिळेपर्यंत आपण तिला दोषी आहे असंही सिद्ध नाही करू शकणार.”
“ तुझ्या म्हणण्यातला खडूसपणा कळला मला तारकर.तुला काय वाटतंय, पुराव्याशी छेडछाड करायचा मूर्खपणा मी करेन?” पाणिनी ने विचारलं
“ आपल्या अशीलासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतोस पाणिनी. त्या रिव्हॉल्व्हर चा नंबर नोंदवून ठेवला असशील ना तू?” तारकर ने विचारलं
पाणिनीने मान हलवली. “ मला जेव्हा लक्षात आलं की त्यातून दोन गोळ्या झाडल्या गेल्या आहेत,तेव्हा तातडीने मी ते माझ्या ड्रॉवर मधे ठेवून दिलं.मी हाताला रुमाल गुंडाळूनच ते हाताळलय अर्थात.स्मिथ कंपनीचं होतं ते.” पाणिनी म्हणाला.
“ आपण आता तुझं कथा-कथन ऐकू, रती. पहिल्यापासून सांग सगळं. तुझ्या नवऱ्याला तू शेवटचं कधी पाहिलंस? ”
“ मी त्याच्या सोबत राहिले परवा रात्री.” रती म्हणाली.
“ तू जर त्याच्याशी घटस्फोट घेणार होतीस आणि केरशी मधे दुसरं घर घेतलं होतंस तर त्याच्या बरोबर काय करत होतीस?”
“ आम्ही परस्पर संमतीने आणि आनंदाने घटस्फोटाच्या निर्णयाप्रत आलो होतो, म्हणजे यावं लागल होतं आम्हाला. माझा नवरा खूपच प्रेमळ होता,मला त्यानेच घर मिळवून दिलं होतं, म्हणजे त्यासाठी आर्थिक मदत केली होती. काही लोकांनी आमच्या आयुष्यात ढवळा ढवळ केली नसती तर आम्ही सुखी आणि यशस्वी संसार केला असता. घटस्फोटाची वेळ आली नसती. ” रती म्हणाली.
“ काही लोक म्हणजे? उदाहरणार्थ?” तारकर ने विचारलं.
“ उदाहरणार्थ भोपटकर, नवऱ्याचा वकील. माझ्या घटस्फोटात आणि नवऱ्याच्या सगळ्याच प्रकरणातला.” रती म्हणाली.
“ तू अजून घटस्फोटाची कागदपत्र दखल नाही केलीत?” तारकर ने विचारलं.
“ नाही.”
“ तू नवऱ्याबरोबर कशी काय राहिलीस पुन्हा?”
“ त्याला आमच्यात होणाऱ्या तडजोडीबाबत बोलायचं होतं.तो म्हणाला की भोपटकरच्या मनात तडजोडीबाबत वेगळ्याच कल्पना होत्या पण त्याला स्वत:ला त्या जाचक वाटत होत्या.त्याला माझ्यावर अन्याय करायचा नव्हता.”
“ हे सगळं बोलायला तुम्ही एकत्र राहिलात?”
“ हो.”
“ एकाच खोलीत झोपलात?” तारकर ने विचारलं.
“ नाही वेगळ्या खोल्यात. चार बेडरूम आहेत घरात.”
“ सकाळी उठल्यावर तो भेटला तुम्हाला?”
“ नाही.” रती म्हणाली.
“ याचा अर्थ तुम्ही तुमच्या खोलीत झोपायला गेलात तेव्हा तुम्ही त्याला पाहिलंत ते शेवटच?”
“ हो.सकाळी मी उठले तेव्हा तो मला भेटला नाही.मी पटकन बाहेर पडले आणि गाडीत बसून निघून गेले.”
“ विलासपूर?” तारकर ने विचारलं.
“ नाही.”
“ मग कुठे?”
“ ते मी सांगणार नाही.” रती म्हणाली.
“ मला ते समजलं पाहिजे ”
“ मी पटवर्धन वकिलांशी बोलल्या शिवाय या बाबत काही नाही सांगणार.”
“ हे बघ रती, मी काही तुझ्यावर अत्ता कुठला आरोप ठेवलेला नाही. पण तुला माझ्यापरवानगी शिवाय हे शहर सोडता येणार नाही. पाणिनी, आपण एक करार करू, हिला पोलीस स्टेशन मधे सुद्धा मी नेणार नाही.पण तू मला हमी दे की मी सांगेन तेव्हा तू हिला उपलब्ध करून देशील.” तारकर म्हणाला.
“ याचा अर्थ रती, तुला विलासपूर ला जाता येणार नाही.” पाणिनी म्हणाला.
“ किती काळ? ”
“ अठ्ठेचालीस तास.” तारकर म्हणाला.
“ ठीक आहे , चालेल. मी राहीन इथे एखाद्या हॉटेलात.”
“ पाणिनी पटवर्धन शी संपर्कात राहशील?”
“ हो.” रती म्हणाली.
“ पाणिनी, तू सांगतोस त्यावर मी एकवेळ विश्वास ठेवीन, की तू खरंच तुझ्या ड्रॉवर मधे रिव्हॉल्व्हर ठेवलं होतंस आणि आता ते तिथून गायब झालंय, आणि तुलाही त्याची कल्पना नव्हती. मला तू दाखवायला गेलास आणि तुलाच तो धक्का होता. पण अॅडव्होकेट खांडेकर, सरकारी वकील यावर कसा काय विश्वास ठेवणार? ते म्हणतील की एक तर माझ्या समोर ते रिव्हॉल्व्हर सादर कर नाहीतर कोर्टात काय ते सांग.” तारकर म्हणाला.
कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते.वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. अनेकदा तो आणि पाणिनी एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकले पण मैत्री आणि व्यवसाय ,यात त्यांनी कधी गल्लत केली नाही.मैत्रीत कधीच गैरसमजाला थारा दिला नाही.
“ तारकर, खांडेकरांना मी काडी एवढीही किंमत देत नाही.”
“ बर आहे, मी निघतो.खांडेकरांना तू तोंड दे.पण हरवलेलं रिव्हॉल्व्हर चा मामला गंभीर आहे.ते पहिल्यांदा शोध.आणि मी बोलवीन तेव्हा रती ला हजर करायची जबाबदारी तुझी आहे हे लक्षात ठेव.” तारकर म्हणाला आणि निघून गेला.
“ रती, तू मारलास त्याला?” पाणिनीनं विचारलं
“ नाही.”
“ मग कसं घडलं हे?”
“ ज्या कोणी माझी बॅग घेतली, त्यातली किल्ली काढून ती व्यक्ती माझ्या घरात गेली तिथून माझी रिव्हॉल्व्हर घेतली आणि माझ्या नवऱ्याला मारलं.”
“ वरकरणी तसं दिसतंय.” पाणिनी सावधपणे म्हणाला, “ पण लक्षात ठेव तुझा नवरा रात्री झोपेत असताना मारला गेलाय,याचा अर्थ असा की ज्याने तुझी रिव्हॉल्व्हर चोरली ती व्यक्ती तुम्ही दोघे ज्या घरात राहिला होतात त्या घरात आधीच आलेली होती.म्हणजे ती व्यक्ती नवऱ्याच्या विश्वासातील असणार.”
“ किंवा त्या व्यक्तीकडे माझ्या नवऱ्याच्या घराची किल्ली असणार.” रती म्हणाली.
“ तर्क म्हणून चूक नाही तुझं. तू मगाशी म्हणालीस की कधी अचानक गरज लागली तर गैरसोय होवू नये म्हणून तुझा नवरा घराची एक किल्ली आपल्या ऑफिसात ठेवायचा? ” पाणिनीनं विचारलं तिने मन डोलावली.
“ किती माणसे आहेत ऑफिसात?” पाणिनीनं विचारलं
“ पंचवीस-तीस असतील. ”
“ त्यापैकी कोणीही किल्ली घेऊन घरी जाऊ शकत होता?” पाणिनीनं विचारलं
“ नाही,नाही.किल्ल्या सेफ मध्ये असत.सेफ ची किल्ली मॅनेजर कडे असते.”
“ म्हणजे घरातून काही कागदपत्रं आणायची झाली तर मॅनेजरला जायला लागायचे?”
“ तसं नाही.” ती घाईत म्हणाली. “मॅनेजर सेफ मधून किल्ली काढून एखाद्या शिपायाला, सेक्रेटरी ला, किंवा तत्सम माणसाला पाठवायचा.”
“ जो माणूस जायचा, त्याला डुप्लीकेट किल्ली बनवून घेणं सहज होतं नाही का? ” पाणिनीनं विचारलं
“ बरोबर आहे.पण ऑफिसातली माणसं माझ्या नवऱ्याच्या विश्वासातील होती.”
“ तू स्वत: सेक्रेटरी म्हणून काम केलं आहेस तिथे. बरोबर ना?”
“ हो.”
“ तेव्हा तो अविवाहित होता?”
“ नाही.लग्न झालं होतं त्याच पण घटस्फोट झाला होता. ”
“ पहिल्या बायकोचं काय झालं?” पाणिनीनं विचारलं
“ जिच्याशी घटस्फोट झाला ती खरं तर त्याची दुसरी बायको होती.पहिली वारली म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं. ” रती म्हणाली.
“या दुसऱ्या बायकोने घटस्फोट दिल्यावर तू लगेच रायबागी शी लग्न केलंस?”
“ हो.साधारण अठरा-एकोणीस महिने झाले आमच्या लग्नाला.”
“ दुसऱ्या बायकोने सहज स्वीकारलं तुमचं लग्न?” पाणिनीनं विचारलं
“ अजिबातच नाही पटवर्धन, माझ्यावर प्रचंड खार खावून आहे ती. मला त्रास देण्यासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते ती करते आणि करेल.माझ्या रिव्हॉल्व्हर ची ही भानगड झाली तेव्हापासून मला तिच्या बद्दल.....”
“ ती कुठे राहते सध्या?”
“ नाही माहित मला.” रती म्हणाली.
“ तिचं नाव काय आहे?”
“ मैथिली रायबागी, ती अजून पद्मरागचेच आडनाव लावते. ”
“ तिचं आणि पद्मराग चं प्रेम होतं एकमेकांवर?”
“ ती अत्यंत नीच, स्वार्थी आणि फक्त पैशावर प्रेम करणारी बाई आहे.कुणा माणसावर ती प्रेम नाही करू शकत.ती पद्मराग वर प्रेम करत असेल तर ते नाटक होतं, त्याच्या पैशासाठी केलेलं.” रती म्हणाली.
“ तिला किती पैसे मिळाले असतील पद्मराग कडून? घटस्फोट देतानाची तडजोड म्हणून?”
“ पंचवीस लाख एक रकमी,रोख. ” रती म्हणाली.
“ तिला जर एवढी रक्कम मिळाली तर तुझ्यावर जळण्याचे काहीच कारण नाहीये तिला.”
“ तिची लालच कधीच संपणारी नाही पटवर्धन, मी पद्मराग च्या मागे ठामपणे उभी नसते तर त्याची एकूण एक संपत्ती तिने घशात घातली असती. ”
“ म्हणजे तुला असं सुचवायचं आहे का की तुला त्याच्या खुनात अडकवून तुझा काटा दूर करणे आणि त्याची संपत्ती लाटणे असा तिचा डाव होता?”
तिने मान डोलावली.
“ तिच्याशी पद्मराग चं लग्न झालेलं असतांना त्याने इच्छापत्र केलं होतं का? त्यात तिच्या नावाने सर्व काही केलं होतं ? ” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“नंतर नवीन इच्छापत्र करून त्याने आधीचं अपोआप रद्द केलं? ”
“ तसं करणार होता तो. आमच्या लग्नानंतर ” रती म्हणाली.
“अॅडव्होकेट भोपटकर ने मला दिलेल्या प्रस्तावानुसार त्या इच्छापत्रात तुला पाच लाख रुपये मिळावेत अशी तरतूद करण्यात येणार होती.”
तिने मान डोलावली.
“ पण पटवर्धन साहेब, मी त्याला घटस्फोट दिल्यावर मी काही त्यात एकमेव लाभार्थी राहणार नव्हते.”
“ ते काहीही असाल तरी तुमचं लग्न होणे म्हणजेच हे दुसरे इच्छापत्र रद्द झाल्यासारखे आहे. पण रती तुमचं हे लग्न घटस्फोटाच्या वाटेवर का गेलं?”
“ तो माझ्यापेक्षा बराच म्हणजे पंधरा वर्षांनी मोठा होता.”
“ हो, पण लग्न करताना याचा विचार नाही केलास?”
“ कसं झालं पटवर्धन, की मी पद्मराग ची खाजगी सेक्रेटरी होते.सतत त्याच्या बरोबर असायचे.त्याच लग्न मैथिली शी झालं.तिने त्याला ओरबाडायला सुरवात केली.ऑफिसात तो सतत निराश दिसायचा.मला सहानुभूती वाटायची.मी त्याला ऑफिसचे कामा व्यतिरिक्त वैयक्तिक मदत करू लागले.त्यातून आमच्यात जवळीक निर्माण झाली.प्रेम बसलं एकमेकांवर.पण आता ते प्रकरण माझ्या आयुष्यातून संपलंय.”
“ पण या खुनामुळे ते पुन्हा उघडलं जाऊ शकत.” पाणिनी म्हणाला.
“ मी आता माझ्या हॉटेलात जाऊन आराम करते.मी कळवीन तुम्हाला मी कुठे आहे ते.” रती म्हणाली.
“ पण तारकर काय म्हणालाय ते लक्षात ठेव हे शहर सोडून बाहेर जाऊ नको. पळून जायचा प्रयत्न करणं म्हणजे गुन्हा केल्याचा पुरावा असतो.” पाणिनी म्हणाला.
“ मी हमी देते पाणिनी पटवर्धन तुम्हाला.मी जाणार नाही ” रती म्हणाली आणि बाहेर निघाली.
प्रकरण ५ समाप्त