strange paradox in Marathi Moral Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | अजब विरोधाभास

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

अजब विरोधाभास

प्रसंग एक:-

सिग्नल चा लाल दिवा लागल्यामुळे सगळ्या गाड्या थांबल्या. एक आठ वर्षाचा मुलगा लगबगीने गारबेज बॅग्स घेऊन प्रत्येक गाडी जवळ जाऊन पाहिजे का म्हणून विचारू लागला.

"कितीला आहेत?",मी विचारले.

"१०० रुपयात ३ बॅग्स आहेत", त्या मुलाने सांगितले. मी त्याला १०० रुपये देऊन त्या ३ कचरा पिशव्यानच्या बॅग्स माझ्या 2 व्हिलर च्या डिक्कीत टाकून दिल्या. पिशव्यांवर खूप धूळ असल्यामुळे मी लगेच हात सॅनिटाईज्ड केले.

तो मुलगा पुढे असलेल्या पांढऱ्या स्विफ्ट कार जवळ गेला.
"साहेब, पिशव्या घ्या ना 100 रुपयात 3 बॅग्स", तो मुलगा

"नको", गाडी चालवणारा माणूस

"कुठुन-कुठून येतात ही पोरं किती अनहायजेनिक आहेत, त्यांच्याजवळच्या पिशव्यांना हात ही लावावा वाटत नाही", असं बाजूला बसलेल्या आपल्या मित्राला ऐकवून ड्राइवर सीट वर बसलेला माणूस गाडीचा काच खाली करून पचकन रस्त्यावर थुकला.

मी विचार करू लागली की रस्त्यावर थुंकणं कितपत हायजेनिक आहे? तेवढ्यात ग्रीन सिग्नल मिळाला आणि मी पुढे गाडी नेली. एक किलोमीटर झाला असेल की परत रेड सिग्नल लागला.सहज माझं लक्ष गेलं,सिग्नल वरून आधीच्या सिग्नलवर माझ्या पुढे असलेला पांढऱ्या स्विफ्ट कार वाला डावीकडे वळून एका टपरी जवळ मित्रासोबत उभा राहून चहा-वडापाव खात होता आणि टपरी जवळून मोठ्ठी नाली वहात होती.

आता त्या कारमधल्या माणसाची हायजीन कुठे गेली होती? फक्त हायजीन कचऱ्याच्या पिशव्या घेताना आठवली आणि आतातर आजुबाजुला माशा घोंगावताना, मिटक्या मारत वडापाव खाताना सगळी हायजीन त्याने धाब्यावर बसवली होती.

प्रसंग दोन:-

मकर संक्रांती निमित्त आमच्या सोसायटी च्या क्लब हाऊस मध्ये हळदी कुंकू होतं. शेजारच्या काकूं आणि मी सोबतच हळदी कुंकवाला गेलो. काकू बोलताना आज जास्तच हातवारे करत होत्या असं मला वाटलं.

मग सहजच माझं त्यांच्या हाताकडे लक्ष गेलं, ओह अच्छा काकूंनी नवीन सोन्याचे तोडे केले होते आणि ते त्यांना दाखवायचे होते म्हणून त्या हातवारे करून-करून इतर बायकांचं लक्ष वेधत होत्या. शेजारी म्हणून माझंही काही कर्तव्य आहे का नाही, त्यांना मदत म्हणून मी जरा मोठ्याने म्हंटलं,

" व्वा काकू फारच छान तोडे आहेत." हे ऐकल्यावर २-३ बायका काकुं जवळ गप्पा मारायला येऊन बसल्या.मग काय, झाल्या काकू सुरू.

" हो अग, नेहमी मी घालायची त्या सोन्याच्या बांगड्या खूप जुन्या झाल्या होत्या, त्याचं डिझाईन ही मला बोअर झालं होतं म्हणून हे नवीन डिझाईन चे तोडे केले 50 ग्राम चे आहेत", काकू

"फारच मस्त, आणि तुमची पैठणी ही खूपच सुरेख आहे काकू", मी

" हो , संक्रांती निमित्य घेतलीये, मी पैठणी शिवाय दुसऱ्या साड्या नेसतच नाही बाई सणावारी.", काकू ठसक्यात म्हणाल्या.

"व्वा काकू काय पाहावं लागते, एक नंबर",असं म्हणून 'सुंदर' अशी हाताने मी खूण केली. एवढ्यात मला कोणीतरी ओळखीच्या स्त्रीने बोलावलं म्हणून मी तिकडे गेली.

समारंभ आटोपल्यावर मी व काकू आपापल्या घरी आलो.२-३ दिवसांनी सकाळी काकुंचा कोणाशी तरी मोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता, मी थोडं बाहेर जाऊन बघितलं तर मोलकरणीशी त्या बोलत होत्या त्या अशा:

"एक बादलीभर च तो कपडे धोने के है, इसके 50 रुपये जास्त बोल रही हो तुम", काकू

" आवो काकू बादली लयच मोठी हाय ना, एक घंटा लागते मले एव्हडे कपडे धुवायले पन्नास रुपये बराबर सांगतले म्या, अन मऱ्हाटी तच बोला ना म्या मऱ्हाटी च हावो", मोलकरीण

" अगं बाई मी नेहमीच 25 रुपये देते एक बादलीभर धुण्याचे" , काकू

"हाव ना म्याच धून देलते ना एक डाव पन तवा बादली ल्हान व्हती आता हे बंपर बादली हाये", मोलकरीण

" पहा बाई 25 रुपयात धुवून देशील तर दे नाहीतर राहू दे", काकू

"माफी द्या काकू, जमनार न्हाई, येतो म्या", असं म्हणून मोलकरीण चालती झाली.काकूंनी दार लावून घेतलं, दार लावता-लावता
" फारच शेफारल्या बाई कामवाल्या बायका" हे त्यांचं वाक्य माझ्या कानावर आदळलंच. मनात विचार आला,कुठे त्या हळदी कुंकवाच्या समारंभात मिरवणाऱ्या रॉयल काकू आणि कुठे 25 रुपयांसाठी मोलकरणीशी हुज्जत घालणाऱ्या काकू, काकूंच्या रॉयल पणाला हे मुळीच शोभलं नाही,नाही का? तुम्हाला काय वाटते?

प्रसंग तीन:-

एकदा टी व्ही वर मराठी विनोदी रिऍलिटी शो सुरू होता त्यात एका मालिकेतील अभिनेत्री ची मुलाखत सुरू होती,
"हो मला प्राण्याचं फार वेड आहे. कुठल्याही प्राण्यांना त्रास झालेला मला सहनच होत नाही.माझ्याकडे एक डॉगी आहे आणि एक कॅट आहे फारss च क्युट आहेत दोघे, मला माझ्या मुलांसारखेच वाटतात ते.", अभिनेत्री त्यावर तिच्यासोबत आलेल्या अभिनेत्याने सांगितले,
"एकदा आम्ही शूटिंग ला एका खेड्यात गेलो असता तिथे हिला एक वासरू बांधलेलं दिसलं व बाजूलाच गाय होती. वासराला गाईचं दूध प्यायचं होतं पण तो शेतकरी त्याला दूध विकायचं असल्यामुळे वासराला पुरेसं दूध पिऊ देत नव्हता. तर ही तिथे गेली आणि तिने वासराला सोडून दिलं वासरू गाईजवळ जाऊन दूध पिऊ लागलं,ही मध्येत पडल्यामुळे शेतकऱ्याला विरोध करता येईना म्हणून त्याने डोक्यावर हात मारून घेतला.", अभिनेता

"मग, मुके प्राणी बिचारे त्यांना बोलता येत नाही म्हणून आपण काय त्यांचा गैरफायदा घ्यायचा का, मला नाही पटत, त्यांच्यातही जीव असतो, थोडी माणुसकी दाखवायला नको का?", अभिनेत्री फणकाऱ्याने म्हणाली.

झालं , मी हे बघितलं आणि एकदम प्रभावित झाली. मनात आलं, व्वा ही फक्त अभिनेत्रीच नाही तर एक चांगली माणूस देखील आहे. असा मी विचार करते न करते की पुढचंच वाक्य तिने म्हंटल आणि ओम फट स्वाहा झालं , जशी ती माझ्या नजरेत चढली तशीच भरभर उतरली सुध्दा. मालिकेत काम करणाऱ्या अजून एका अभिनेत्याबद्दल ती सांगत होती. तिचं वाक्य असं होतं,

" तो दादा आहे न इतका छान मासे आणि चिकन बनवतो, मला आवडतात म्हणून तो आवर्जून सेट वर घेऊन येतो."
त्यांच्या सोशल मीडिया अकौंट वर मी लिहिलं सुद्धा मॅडम तुम्हाला प्राण्यांची कळकळ वाटते न मग मासे आणि चिकन ज्या पासून बनवतात ती कोंबडी हे सुद्धा प्राणीच नाहीत काय? त्यांच्यात ही जीव असतोच न! कोंबडी मारून आणि मासे मारून त्यांचे मृतदेह मीठ मसाला लावून तुम्ही मिटक्या मारत खाता, कमीतकमी मला भूतदया आहे असा दांभिकपणा तरी कृपया दाखवू नका. अभिनेत्री असल्याने त्याकडे माझं लक्ष लगेच वेधल्या गेलं पण अनेक सामान्य व्यक्तीही अशाच विचारांच्या आहेत ते बघितलं की खेद वाटतो. कुत्र्या मांजरात जसा जीव आहे तसा कोंबड्या बकऱ्या यांच्यामध्ये सुद्धा जीव आहेच.

प्रसंग चार:-

लहानपणी आमच्या घराजवळच असलेल्या केशव लाल यांच्या किराणा दुकानातून आम्ही महिन्याचं वाण सामान आणायचो. दुकान खूप मोठं होतं,पुढे दुकान आणि मागे त्यांचं राहतं घर होतं पण दुकानाचे मालक केशवलाल फारच कंजूस होते दुकानातल्या नोकरांना तुटपुंज्या पगारात दिवसभर राबवायचे. एखाद्यावेळेस दुकानात कमी काम असेल तर घरचे कामं सांगायचे.

वर्षानुवर्षे झाले तरी एक दमडी वाढवून दिली नव्हती त्यांनी नोकरांना. हे सगळं मला माहित असण्याचं कारण म्हणजे त्यांच्या दुकानातील एका नोकराची बायको आमच्या कडे भांडे घासायला येत असे.

केशवलाल कडे, घरी काही उरलं सुरलं अन्न नोकरांना न देता खुशाल फेकून देत असत. का ? कारण नोकर लोकं चांगलं-चुंगलं खाल्लं की माजतात म्हणे असं केशवलाल चं म्हणणं होतं.

एकदा दुकानात काही सामान आणायला जायचं काम पडलं तेव्हा मी बघितलं की दुकाना समोर वाहनांची खूप गर्दी होती आणि बरेच लोकं केशवलालच्या घरातून ये-जा करत होते, मी गल्ल्यावर बसलेल्या माणसाला विचारलं, तर त्याने सांगितलं की केशवलाल कडे 21 जोडप्यांना जेवणाचं आमंत्रण आहे आणि जवळच गाईला केशवलाल एक परातभर बुंदीचे लाडू खाऊ घालताना दिसले.

क्षणभर मला दुकानातून कोणती वस्तू घ्यायची होती याचं विस्मरण झालं.केवढं विरोधाभासी वागणं होतं केशवलाल च एकीकडे भरलेल्या पोटांना आग्रह करकरून जेवायला घालायचं आणि दुसरीकडे ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना न देता ते खुशाल फेकून द्यायचं, एकीकडे आधीच श्रीमंत लोकांना अन्नदान,वस्त्रदान, धनदान करायचं आणि ज्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे त्यांचे वर्षानुवर्षे पगारही वाढवायचे नाही.

गाईला खाऊ घालणं चांगलंच होतं पण गाईला चारा ही चालू शकतो, हिरवा भाजीपाला खाऊन गाय खुश राहते तिला बुंदीच्या लाडवाची काय गरज? बरं एकवेळ गाईला लाडू द्या पण उरलेलं अन्न नोकरांना न देता फेकून देणं यात काय तथ्य आहे?हा केवळ अन्नाचा व माणुसकीचा अपमान आहे असं मला वाटते. असे अनेक प्रसंग दैनंदिन आयुष्यात अनुभवायला मिळतात त्यांचा विषाद वाटतो पण इलाज नसतो. असो.
★★★★★★★★★★★★★★★★★★