तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होती. माझ्या कॉलेजमध्ये आमची प्रॅक्टिकल ची exam सुरू होती त्यामुळे नात्यातल्या एका लग्नसमारंभात मला माझ्या कुटूंबियांसोबत जाता आले नाही. मला दोन दिवस घरीच राहायचं होतं. नाही म्हणायला माझी मावशी जवळ राहायची. रात्री तिथे झोपायला जा असं माझ्या आईवडिलांनी मला सांगून ठेवलं होतं.
मावशीने सुद्धा मला आवर्जून ये असं सांगितलं होतं परंतु माझ्या मनात एकटंच घरी राहून पाहू, आपण काय आता लहान थोडीच आहोत त्यामुळे एकटं राहायला काय हरकत आहे असा विचार करून मी घरी रात्री एकटंच झोपायचं ठरवलं आणि मावशीला खोटं सांगितलं की माझी मैत्रीण येणार आहे आज माझ्या सोबतीला त्यामुळे ती निःचिंत होती.
दिवस तर कॉलेज, प्रॅक्टिकल्स, ट्युशन्स मध्ये गेला. संध्याकाळी घरी आल्यावर थोडावेळ टीव्ही बघण्यात नंतर दुसर्यादिवशीच्या परीक्षेचा अभ्यास करण्यात निघून गेला. हळू हळू रात्र होऊ लागली. त्याकाळी आमच्याकडे लोडशेडिंग असायचं त्यामुळे मी हाताशी टॉर्च, आगपेटी मेणबत्ती असं सगळं आणून ठेवलं होतं.
रात्री दहा वाजेपर्यंत मी टीव्ही वर मराठी सिरिअल्स पाहत बसली. त्यानंतर मी झोपण्याचा प्रयत्न केला. एकदा उठून सगळे दारं खिडक्या नीट लावल्या आहेत न ह्याची मी खात्री करून घेतली.
पुन्हा मी झोपण्याचा प्रयत्न करू लागली. खोलीत मोठा लाईट लावूनच मी झोपली होती. पण काही वेळातच लोडशेडिंग ची वेळ नसून लाईन(वीज) गेली आणि मी खडबडून जागी झाली. घड्याळात रात्रीचे बारा वाजले होते.
सगळीकडची लाईन गेली असल्याने सर्वत्र मिट्ट काळोख दाटला होता. रातकिड्यांची तेवढी किर्रर्रर्र किर्रर्रर्र ऐकू येत होती. मी माझ्या जवळचा टॉर्च लावला पण दुर्दैवाने तो सेल(बॅटरी) गेले असल्याने अवघ्या पाच मिनिटांतच बंद पडला. इकडे माझ्या हृदयाचे ठोके भीतीने वाढू लागले.
मी चाचपडून जवळची मेणबत्ती घेतली आणि आगपेटीच्या काडीने ती लावण्याचा प्रयत्न करू लागली. खिडक्या लावल्या असूनही दारांच्या गॅप मधून हवा येत होती त्यामुळे पेटलेली काडी सारखी विझत होती. इकडे माझ्या घशाला कोरड पडली होती. आता काय करावं असा प्रश्न मला पडला.
एवढ्या रात्री मी मावशीकडे सुद्धा जाऊ शकत नव्हती आणि आईबाबांना फोन करूनही फायदा नव्हता कारण ते परगावी गेले होते. मावशीला फोन करावा तर मैत्रीण सोबतीला आहे असं मी खोटं सांगितलं हे तिला कळलं असतं आणि तसंही त्यांची झोप कुठे डिस्टर्ब करा असं मला वाटलं त्यामुळे मी पुन्हा पुन्हा मेणबत्ती लावण्याचा प्रयत्न करू लागली.
तेवढ्यात पाऊसाची रिपरिप ऐकू येऊ लागली. विजा कडकडायला लागल्या. सोसाट्याचा वारा सुटला. खिडकीच्या दाराच्या गॅपमधून वारा आत शिरू लागला. तेवढ्यात स्वयंपाकघरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. मला फारच भीती वाटू लागली. नेमके त्याच वेळेस काही वर्षांपूर्वी बघितलेले हॉरर शो मधील प्रसंग हटकून आठवू लागले त्यामुळे मनात चित्रविचित्र विचार यायला लागले.
अखेर मेणबत्ती पेटल्या गेली आणि ती घेऊन मी हळूहळू चालत स्वयंपाकघरात गेली. तिथे प्लास्टिक ची रिकामी कॅन हवेने पडली होती. मला एकदम हायसं वाटलं. मी मागे वळणार तेवढ्यात मोठ्ठी लांबच लांब सावली बघून माझी दातखीळच बसली. मग लक्षात आलं ती माझीच सावली होती, हातात मेणबत्ती असल्याने लांब सावली पडली होती.
पुन्हा मी बेडरूममध्ये झोपायला आली आणि दचकलीच, आरशात मेणबत्ती घेतलेलं माझं प्रतिबिंब आणि त्या मागच्या सावलीचं प्रतिबिंब विचित्र दिसत होतं. पटकन अरशासमोरून मी दूर झाली आणि पलंगावर बसली तर जवळच्या खिडकीच्या तावदानावर एक विचित्र आकृती हलत होती. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. नीट बघितल्यावर कळलं की ती फांदी होती ज्याच्यात बऱ्याच महिन्यांपासून एक पतंग अटकलेला होता जो अंधारात भयानक दिसत होता.
तेवढ्यात छतावरून धपधप कोणाचातरी चालण्याचा आवाज आला. बराच वेळ कोणीतरी चालण्याचा उड्या मारण्याचा आवाज छतावर येत राहिला. मी भीतीने एकदम स्तब्ध झाली होती. बराच वेळ मी बसूनच होती. कोण असेल ह्यावेळी छतावर? चोर तर नसेल? की भूत? बापरे! मला दरदरून घाम फुटला. काही वेळाने हुपप्प! हुपप्प! असा आवाज आला आणि छतावर कोण आहे हे मला कळलं आणि माझा जीव भांड्यात पडला.
बसल्या बसल्याच मला कधी झोप लागून गेली मला कळलं ही नाही. मी झोपेत असताना कधीतरी वीज आली होती.
सकाळी मला सगळीकडे उजेड असल्याने फारच फ्रेश वाटत होतं. कालची रात्र होती सर्व रात्रींसारखीच पण माझ्या मनात भीती असल्याने मला ती फारच भयानक वाटली. दुसऱ्या दिवशीच्या रात्री मी निमूटपणे मावशीकडे गेली.
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★