दृढ इच्छाशक्ती म्हणजे कुठलेही ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा आणि त्यासोबत केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. मी अमुक अमुक होणारच, मी ह्या संकटातून सही सलामत सुटणारच, मी माझ्या आजारावर विजय मिळवणारच,मी वैज्ञानिक,वैमानिक,डॉक्टर,शिक्षक इत्यादी होणारच, अशी जी प्रबळ इच्छा असते ती त्या व्यक्तीला त्याच्या ध्येयापर्यंत निश्चित पोचवते. कितीही संकटं आले, कितीही अडथळे आले तरीही दृढ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्ती निराश होत नाही, प्रयत्न करणं सोडत नाही. काही पायाने अधू व्यक्तींनी दृढ इच्छाशक्तीच्या बळावर एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे, काही हातांनी अधू असलेल्या व्यक्तींनी पायाने कुंचला पकडून इतके अप्रतिम चित्र काढले आहेत ज्याला तोड नाही. अनेक थोर पुरुषांनी त्यांच्या बालपणी खूप कष्ट घेऊन, अनेक अडचणींवर मात करून स्वतः च ध्येय मिळवलं आहे, एपीजे अब्दुल कलाम लहानपणी ठिकठिकाणी वर्तमान पत्रं वाटायचे पण त्यांच्यात शिकण्याची,पुढे जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने ते पुढे वैज्ञानिक झाले. अनेक वैज्ञानिकांना वेगवेगळे वैज्ञानिक शोध लावताना खूप अडचणी,अपयश आले पण त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि संपूर्ण जगाला त्यांच्या शोधांचा फायदा झाला. एडिसन ला बल्ब चा शोध लावण्यात हजार पेक्षा जास्त वेळा प्रयोग करण्यात अपयश आले पण तो न निराश होता प्रयोग करतच राहिला आणि लाईट चा महत्वाचा शोध लागला. दृढ इच्छाशक्ती चे महत्व, ही खालील कथा वाचल्यावर लक्षात येईल:- एकदा एका आश्रमात एक गुरू आणि त्यांचे शिष्य राहत असत, एकदा गुरूंना आपल्या शिष्यांची परीक्षा बघायची इच्छा झाली, त्यांनी सगळ्यांना बोलावलं आणि एक एक चाळणी देऊन म्हंटल, "वत्सानो जा! ही चाळणी घेऊन पलीकडच्या नदीवरून पाणी आणायचं आणि ह्या रांजणातटाकायचं, असं करून हा रांजण भरून टाकायचा,मग कितीही वेळ लागला तरी चालेल पण रांजण भरला पाहिजे, लागा आता कामाला!" सगळे शिष्य पाणी आणायला गेले काही शिष्यांना गुरूंच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं, " चाळणीत पाणी राहणार आहे का? आणि त्याने रांजण भरणार आहे का? काहीही सांगतात आपले आचार्य", असं काही शिष्यांनी म्हंटल "काही नाही! आज आपल्या गुरूंना आपली गम्मत करायची लहर आलेली दिसतेय, थोडावेळ करू आपण मग तेच आपल्याला थांबवतील";, असं काही शिष्यांनी म्हंटल. सगळे शिष्य काही तास ही चाळणीतून पाणी आणायची ऍक्टिव्हिटी करत राहिले आणि मग कंटाळून सगळ्यांनी चालण्या ठेवून दिल्या, "माफ करा आचार्य! चाळणीतून पाणी आणणे हे केवळ अशक्य आहे ",असं सगळे शिष्य म्हणाले. पण एक शिष्य मात्र न थकता चाळणीतून पाणी आणण्याचा प्रयत्न करत राहिला,रोज सकाळी थोडावेळ, दुपारी थोडावेळ आणि संध्याकाळी थोडावेळ तो त्या चाळणीतून पाणी आणण्याचा प्रयत्न करत होता,काही महिन्यांनंतर त्याने तो रांजण पूर्ण भरला आणि हर्षोल्हासाने तो गुरूंना सांगायला आला. गुरूंनी तो भरलेला रांजण बघितला आणि त्याला शाबासकी दिली व सगळ्या शिष्यांना बोलावलं, "बघा वत्सांनो! ह्या भास्कर ने हा घडा भरला त्याच चाळणीने जी चाळणी तुम्ही काही महिन्यांपूर्वी निराश होऊन टाकली होती",गुरू म्हणाले "पण आचार्य! हे कसं शक्य झालं?",सगळे शिष्य म्हणाले. "भास्कर जा तुझी चाळणी आण बघू!",गुरुजी म्हणाले भास्करने चाळणी दाखवली. "बघा ह्या चाळणीचे सगळे छिद्र सतत त्यातून पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेवाळाने बंद झालेले आहेत, आणि म्हणून ह्याच चाळणीने ते रांजण भरले. भास्कर ची दृढ इच्छाशक्ती होती की आचार्यांनी सांगितलेली आज्ञा मी पूर्ण करणारच त्यामुळे कितीही अडचणी आल्या,वेळ लागला तरी त्याने प्रयत्न सोडले नाही,त्याच्या दृढ इच्छाशक्तीने त्याला प्रयत्न सोडू दिले नाही त्यामुळे तो त्याचं ध्येय गाठू शकला.",गुरू म्हणाले. सगळे शिष्य भारावून गेले. ही कथा इथेच संपते. आपल्या आयुष्यात ही जर आपण दृढ इच्छा शक्ती ठेवली आणि त्याबरोबरच अखंड प्रयत्न केले तर आपल्याला ही आपलं इप्सित साध्य करण्यपासून कोणीही रोकू शकणार नाही.
◆◆◆