**********
'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके।'
ही ओवी ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की माझ्या मराठीचे मी काय आणि किती कौतुक सांगू? माझी मराठी ही इतकी मधुर आहे की अमृताला सुध्धा पैजेने जिंकेल म्हणजे अमृताहूनही गोड अशी माझी मराठी आहे.
मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला.
मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेपासून झाला असल्याचं मानलं जातं. पैठण प्रतिष्ठानच्या सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात प्रथम वापर केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली.
सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्याखोर्यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस.
आपण काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आपण मराठी म्हणून जन्माला आलो आहे असे मला वाटते. मी मराठी आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.
महाराष्ट्रात दर शंभर किलोमीटर वर मराठी भाषा बदलताना दिसते. विदर्भाची वेगळी धाटणी असलेली मराठी,मराठवाड्यातील वेगळी मराठी,पश्चिम महाराष्ट्रातील वेगळ्या पद्धतीची मराठी, पुणे मुंबई मधील वेगळी मराठी.
असं असलं तरी सगळ्या मराठी भाषांचा भाव एकच आहे.
विदर्भातील मराठी माणूस बोलेल,"तू काय करून राहिला बे?"
मराठवाड्यातील मराठी माणूस बोलेल,"तू काय करायलास रे?"
पश्चिम महाराष्ट्रातील मराठी माणूस बोलेल,"तू काय करतो रे?"
पुण्या मुंबईतील मराठी माणूस बोलेल,"तू काय करतोयेस रे?"
भाषेची धाटणी जरी वेगवेगळी असली तरी अर्थ एकच आहे.
आजकाल मात्र इंग्रजी चे फॅड आल्यामुळे मराठी असलेले मोठे तर एकमेकांशी इंग्रजीत बोलतातच पण मराठी लहान मुलं सुद्धा आपापसात मराठी बोलण्या ऐवजी इंग्रजी मध्ये बोलण्यातच धन्यता मानतात.
आजकाल मराठी शाळांची संख्या बोटावर मोजण्या इतकी झाली आहे. अनेकांना मराठी बोलण्याची लाज वाटते. अनेक लोकांना मराठी सिनेमे, मराठी मालिका, मराठी भाषेतील पुस्तके कमी दर्जाचे वाटतात पण वास्तवात असं काहीच नाहीये. मराठी सिनेमे, मालिका, पुस्तके दर्जेदार च आहेत.
महाराष्ट्रातच मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या कमी होताना दिसतेय.
माझ्या मते मराठी भाषेचा जर आपल्याला मान ठेवायचा असेल तर महाराष्ट्रात मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे असा दंडक केला पाहिजे. प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात मराठी भाषा आवर्जून शिकवली गेली पाहिजे.
प्रत्येक मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाशी मराठीतच बोलायला हवे.
मराठी खाद्यपदार्थ,मराठी राहणीमान, मराठी साहित्य सगळं सर्वगुणसंपन्न आहे. आपली मराठी संस्कृती एवढी समृद्ध आहे की एकमेकांशी बोलायला आपल्याला इतर भाषेची गरज न पडावी.
सरते शेवटी मराठी भाषेची समृध्दी सांगण्या साठी मी खाली एक कोडं दिलंय ' अलीकुल वहनाचे वहन आणित होते, शशिधर वहनाने ताडीले मार्ग पंथे, नदिपती रिपु ज्याचा तात भंगोनी गेला,
रविसुत महिसंगे फार दुःखित झाला.'
ह्याचं उत्तर खालील प्रमाणे दिलेलं आहे:-
अली म्हणजे भुंगा, कुल म्हणजे समूह
भुंग्यांच्या समूहाचे वहन काय असेल तर कमळ
वहनाचे वहन म्हणजे कमळाचे वहन आहे पाणी
अलिकुल वाहनाचे वहन आणीत होते म्हणजे एक स्त्री पाणी आणीत होती.
आता शशिधर म्हणजे कोण तर शशी म्हणजे चंद्र आणि चंद्राला धारण करणारा कोण तर महादेव
शशिधर वहन म्हणजे नंदीबैल.
ताडीले मार्ग पंथे म्हणजे पाणी आणत असता बैलाने त्या स्त्रीला धक्का दिला.
नदीपती म्हणजे समुद्र, रिपु म्हणजे शत्रू. समुद्राचा शत्रू म्हणजे अगस्ती ऋषी ज्यांनी संपूर्ण समुद्र प्राशन केला होता.
आता नदिपटी रिपु ज्याचा तात(वडील)भांगोनी(फुटून) गेला. अगस्ती ऋषींचा तात म्हणजे कुंभ(मडके)
म्हणजेच
एक स्त्री मडक्या मध्ये पाणी घेऊन जात असता तिला बैलाने धक्का दिल्यामुळे तिच्याजवल चे मडके फुटून गेले.
आता रविसूत म्हणजे सुर्यपुत्र. सुर्यपुत्र कोण आहे तर कर्ण.
कानाला कर्ण सुद्धा म्हणतात.
महीसंगे म्हणजे जमीनीसोबत, दुःखीत झाला म्हणजे धक्का दिल्याने ती स्त्री खाली पडली आणि तिचा कान जमिनीवर आपटल्या मुळे दुखावल्या गेला.
एवढा सगळा त्या कोड्याचा अर्थ आहे. एवढी मराठी समृद्ध आहे. अश्या मराठीला माझा मानाचा दंडवत.
*****************