पंधरा ऑक्टोंबर …वाचन प्रेरणा दिन...
या निमित्ताने माझा एक जुना लेख नव्या नजरेतून..
वाचले म्हणून वाचलो!
वय वर्षे सहा झाल्यावर मी माझ्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जायला लागलो आणि पाटीपेन्सिलच्या माध्यमातून पहिल्यांदा अक्षर ओळख झाली.
लिहावाचायला शिकलो तेंव्हापासून ते आजतागायत टप्प्याटप्प्याने माझी शब्दांशी दोस्ती वाढतच गेली.
अगदी सुरुवातीला दुकानातून वाणसामान बांधून आलेल्या कागदावर एक एक शब्द जुळवत वाचायला लागलो आणि मग वाचायचा चाळाच लागला!
जेथे कुठे मराठीत काही लिहिलेले आढळेल ते वाचायचा छंदच जडला!
साधारण तिसरी चौथीत असताना कुणीतरी रद्दीत फेकून दिलेले ‘चांदोबा’ मासिक हातात मिळाले आणि त्याच्या वाचनात हरवून गेलो.त्यातली विक्रम वेताळाची,परोपकारी गंपूची गोष्ट पुन्हा पुन्हा वाचत रहायचो. माझे गाव आडवळणी खेडेगाव असल्याने त्याकाळी इत्तर काही वाचायला मिळणे अगदीच दुरापास्त होते, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातली पुस्तकेच पुन्हा पुन्हा वाचत रहायचो त्यामुळे शाळेत वेगळा अभ्यास करायची कधी गरजच पडायची नाही!
वाचनाचा छंद(व्यसन म्हणा हवं तर!) असा काही जडला की, हातात येईल ते अधाशासारखे वाचून काढायचो.गावात लायब्ररी वगैरे असायचा प्रश्नच नव्हता, गावात एक दोन घरी ’सकाळ’ यायचा पण त्याचे लांबूनच दर्शन व्हायचे त्यामुळे अर्थातच वाचनाच्या आवडीवर मर्यादा पडायच्या.
हातात येईल ते वाचायच्या या सवयीमुळे चांगले सकस साहित्य वाचलेच,पण हातात आले म्हणून त्या वयात वाचायला नको असे पिवळ्या वेष्टनात येणारे साहित्यही त्यातले कळत नव्हते तरी मी वाचले! याशिवाय कुठेतरी मिळालेली काकोडकरांची,बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकेही मी मन लावून वाचली.
आठवीत हायस्कूलमध्ये शिकायला गेलो.शाळेची लायब्ररी होती;पण तेथे कथा कादंबऱ्या फारशा नव्हत्या.
दरम्यानच्या काळात माझ्यापेक्षा दोन वर्ग पुढे असणारा मुलगा भास्कर मुंबईहून शिक्षणासाठी गावी आला.त्यालाही वाचनाची प्रचंड आवड होती शिवाय त्या काळी माझ्यासाठी दुर्मिळ असणारी वि.स.खांडेकर,शिवाजी सावंत,रणजीत देसाई,अत्रे,पुलं,सुहास शिरवळकर इत्यादी प्रसिध्द लेखकांची अनेक पुस्तके त्याच्याकडे होती.त्याने हा सगळा खजिना मला उपलब्ध करून दिला आणि मी अक्षरश: तहानभूक विसरून वाचायला लागलो.त्याच्याकडची सगळी पुस्तके अधाशासारखी वाचून काढली!
या वाचनामुळे माझ्यावर नकळत चांगले संस्कार होत गेले.ईश्वरी आशिर्वाद होते त्यामुळे मुळातच प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायची आंतरिक सवय होती,चांगल्या वाईटातला फरक करता यायचा,त्यामुळे जरी वाईट काही वाचले तरी त्याचा आयुष्यावर दुष्परिणाम झाला नाही ही केवळ ईश्वरी कृपाच होती असे मी मानतो...
दहावीपर्यंत घरीच होतो त्यामुळे आईचे चांगले संस्कार व वचकही होता,पण पुढे एकटा घराबाहेर राहायला लागल्यावर कोणाचाही धाक नव्हता.त्या वयात वाईट संगतीचा परिणाम होणे अगदी सहज शक्य होते,परंतु सतत पुस्तकांच्या संगतीत असल्यामूळे अशा बिघडण्यापासून वाचलो!
शाळेत असताना दारू,गांजा अशी चौफेर व्यसने असलेली,नकळत्या वयात नको ती लफडीकुलंगडी करणारी अनेक मुले आजूबाजूला होती.पुढे कॉलेजला असताना किंबहुना नोकरीला लागल्यानंतरही काही वर्षे पुण्यातल्या येरवडा भागात,झोपडपट्टीत राहिलो.अनेक मित्राना विविध व्यसने होती,पण झालेल्या वाचनसंस्कारामुळे त्या वाईट सवयीं आत्मसात करायचा मोह कधीच झाला नाही!
चांगले संस्कार करायला जवळ कुणी वडीलधारे नव्हते,पण जीवनातली ही कसर पुस्तकांनी भरून काढली.वाचनाच्या नादात बऱ्याचदा स्वयंपाकच करायचा राहून जायचा(हाताने भाजी भाकरी बनवून खायचो) आणि मग उपाशीच रहायला लागायचं,वाचनाने मी अक्षरशः झपाटलेला होतो!
त्या झोपडपट्टीत हौस म्हणून मी एका गणेशोत्सव मंडळातर्फे जुन्या पुस्तकांची लायब्ररी सुट्टीच्या दिवशी मी सुरू केली होती.मंडळाच्या पैशातून अप्पा बळवंत चौकात फुटपाथवर जुनी पुस्तके खरेदी करून मी लोकांना ती वाचायला द्यायचो.ही लायब्ररीही मी बरेच दिवस चालवली.
पुढे टेलिफोन खात्यात नोकरीला लागल्यावर ऑफिसमध्ये असलेल्या रिक्रिएशन क्लबच्या लायब्ररीमधल्या पुस्तकांचा खजिना हाती आला आणि माझ्या वाचनाचा झपाटा अजूनच वाढला.
दरवर्षी नवी पुस्तके खरेदी करताना क्लबचे लोक मला पुस्तके निवडायला नेवू लागले त्यामुळे त्या काळी गाजत असलेल्या लेखकांची एकूणएक पुस्तके निवडून मी वाचून काढली…
नोकरीत स्थिरसावर होईपर्यंत पुस्तके विकत घेणे अथवा खाजगी लायब्ररी लावणे परवडणारे नव्हते,पण नंतर नियमित लायब्ररी लावली.वीसेक वर्षे माझ्याकडे घरपोच लायब्ररी होती.आठवड्याला माझ्या आवडीची चार पुस्तके/मासिके त्या लायब्ररीतून मिळायची.ऑफिसच्या लायब्ररीतली पुस्तकेही असायची.
हल्ली काहीवर्षा पासून मात्र नियमितपणे आवडलेली पुस्तके विकत घेवून वाचतो.
घरी दोनशेच्यावर पुस्तकांचा संग्रह तयार झाला आहे.
कुणाच्याही वाढदिवसाला गिफ्ट म्हणून इत्तर काही देण्याऐवजी योग्य असे पुस्तक द्यायला मला आवडते.तशी तर सगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात,पण त्यातल्या त्यात मोठ्या लोकांची आत्मचरित्रे तसेच मानसशास्रावर आधारीत लेख, कथा, कादंबऱ्या व वैचारिक लेखन वाचायला विशेष आवडते.
अशिक्षित अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला मी अत्यंत प्रतिकूल वातावरणात राहून स्वत:ची वैचारिक अध्यात्मिक आर्थिक व सामाजिक प्रगती साधू शकलो ते केवळ सकस वाचनाच्या जोरावर!
ग्रंथ हेच माझे खरे गुरू होते आणि आहेत!
मराठी साहित्याच्या प्रचंड ज्ञानसागरातले माझ्या हाताला जेव्हढे लागले तेव्हढेच मी वाचले असेल, वाचन ही एक अखंड साधना आहे आणि ती चालू रहायला हवी याची जाणीव आहे.
एवढे मात्र निश्चीतपणे सांगतो की भरपूर वाचले म्हणून अनेक प्रसंगी मी वाचलो!
पुस्तकांमुळेच झाला .....कायापालट -
अक्षरशत्रू समाजात
दोन घास मिळण्याची जेथे भ्रांत
गावंढ्या आडवळणी गावात
शिकून कुणाच भलं झाल्याची
गंधवार्ताही नसलेल्या माणसांत
जन्म घेतलेला मी .....
दारिद्र्याचा कलंक कपाळी
वर्षानुवर्षे अश्वथाम्याच्या जखमेसारखा!
पण हे सगळे .....
तुला भेटण्याच्याआधी.....
अपघातानेच झाली अक्षरओळख.....
त्यानंतर तू भेटलास ...
भेटत राहीलास ...
तुझ्या सहवासाची चटकच लागली
तहानभूक विसरून तुझ्यात रमू लागलो
तुझ्यामुळेच ज्ञानभांडार झाले खुले
एकामागोमाग एक ....
......तुला वाचत राहीलो
......लालसा ज्ञानाची भागवत राहीलो
तुझ्यामुळेच प्रगतीचा रस्ता दिसला
चालत राहीलो तुझ्या साथीने
आयुष्यात एक एक पायरी चढत राहीलो
हे असच चालत राहील ...
अविरतपणे!
............ प्रल्हाद दुधाळ.
(९४२३०१२०२०)