बोलतांना शब्द जपून वापरावा
आपण बोलतो. बोलतांना आपले शब्द बेवारस सुटतात. त्यातच कोणी म्हणतात की जिभेला हाड नाही, म्हणूनच तसा बोलला. तेही बरोबरच. परंतु कधी कधी असं काहीही बोलणं अंगाशी अंगलट येतं.
असं आपलं वायफळ बोलणं. याबाबतीत एक घडलेला प्रसंग सांगतो. एक कॉंग्रेसी नेता विचारपीठावरुन भाषण देत बोलत होता. त्याचं भाषण प्रक्षोभक होतं. सर्व लोकं टाळ्या वाजवीत होते. अशातच त्याची जीभ पटरीवरुन घसरली व तो म्हणाला, 'हमे यह दिन देखने को मिल रहे है, वे इसलिए मिल रहे है ताँकीं इस सरकारने सत्तर साल में कुछ नही किया' त्याचा इशारा जनता पार्टीवर होता. परंतु तो तसं बोलताच सर्व लोकांमध्ये हशा पिकला. जरी ते सर्वजण त्याच्याच पक्षाचे होते तरी. त्याचं कारण होतं की सत्तर वर्षापर्यंत त्यांचीच पार्टी सत्तेवर होती व तो आपल्याच पार्टीवर दोषारोपन करीत होता. म्हणूनच लोकं हसत होते व मनातल्या मनात म्हणत होते, हा माणूस वेडा झाला की काय?
ते वाचाळ बोलणं. कधी कधी राहूल गांधीचे फेक व्हिडीओ येतात की त्यावर हशा पिकतो. असाच एक व्हिडीओ आला व त्यानं त्या व्हिडीओत म्हटलं होतं की कारखान्यात आलूचं जास्त उत्पादन घ्यावं. त्यानंतर तो व्हिडीओ फारच व्हायरल झाला व लोकांना तो व्हिडीओ खरा वाटायला लागला. त्यानंतर त्याला पप्पू नाव देण्यात आलं.
शब्द.......एक एक शब्द असा की तो शब्द माणसाला चार माणसात बसवतो व एक एक शब्द असा असतो की तो चार माणसातून उठवतो. शब्द असा असतो की त्याला जपूनच वापरायला हवं.
पुर्वी शब्दाला अतिशय महत्त्व होतं. जो शब्द बाहेर पडला. तो शब्द सत्य व्हायचा. असाच एक प्रसंग. द्रोणाचार्यला मारण्यासाठी पांडवांनी बेत रचला. त्यातच सर्वांनी खोटं बोलायचं ठरवलं. परंतु युधिष्ठिर हा सत्यवचनी होता. त्याला खोटं बोलणं आवडत नव्हतं. ती जाणीव द्रोणाचार्यलाही होती. तसा तो आपल्या पात्रावर अतिशय प्रेम करीत होता. अशातच त्यानं ऐकलं. अश्वत्थामा मारल्या गेला.
अश्वत्थामा हा द्रोणाचार्यचा पुत्र. तसं अश्वत्थामा एका हत्तीचेही नाव होते. भीमानं अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारलं आणि अफवा उडवली की मी अश्वत्थामाल मारलं. तो प्रसंग. परंतु त्यावर कोणत्याही स्वरुपाची शहानिशा न करता तो सत्यवचनी असलेल्या युधिष्ठिरला विचारु लागला. 'खरंच मरण पडलेला व्यक्ती माझाच अश्वत्थामा आहे काय?'
ते द्रोणाचार्यचं विचारणं. त्यावर युधिष्ठिर म्हणाला, 'नरो वा कुंजरवा.'
याचा अर्थ असा की अश्वत्थामा नावाचा कोणीतरी मरण पावला. आता तो प्राणी आहे की मानव आहे हे मला माहीत नाही. त्यातच त्या द्रोणाचार्यनं आपला मुलगा समजून आपली शस्त्र टाकून दिली व तो जमीनीवर आला. त्याचं संधीचा फायदा पांडवांनी घेतला व त्याला ठार केलं.
शब्दांचं एवढं महत्त्व. ते महत्व एवढं की त्यात कोणाचा जीवही जावू शकतो. जसा द्रोणाचार्यचा गेला. वर्तमानकाळाचा विचार केला तर आज अशाच शब्दावरून भांडण होतं व ते भांडण एवढं विकोपाला जातं की त्यात उभयतांची हत्याही होते. यात द्रोणाचार्यचं चुकलंच. त्यानं विचार करायला पाहिजे होता की शत्रुपक्ष आपला नाही. मग युधिष्ठिर का असेना. त्यानं शहानिशा करण्यासाठी प्रत्यक्ष आपल्या गोटातील व्यक्तीसमुदायाला विचारायला पाहिजे होतं की नेमका अश्वत्थामा कोण? वा प्रत्यक्ष स्थळी जावून नेमका अश्वत्थामा कोण? हे पडताळून पाहायला पाहिजे होतं.
शब्द........शब्द धारदार असतात तर कधी विश्वासघातकी. एक एक शब्द अहिल्याला शिळा बनायला बाध्य करते. तर एक एक शब्द रामाला चौदा वर्ष वनवासालाही पाठवते. आजही शब्दाचेच वाद आहेत. आज तर असं घडतं की बोलण्यातून वाद होतात आणि ते न्यायालयात जातात. मग न्यायालयात तरी खरा न्याय मिळतो काय? तिथं दोन्ही पार्ट्यांना वकील करावा लागतो. तो वकील फैरीवर फैरी झाडत असतो व दोन्ही पार्ट्यांकडून पै पै पैसा लुटत असतो. शेवटी न्याय मिळतं. न्यायात प्रत्यक्ष शहानिशा केली जात नाही. प्रत्यक्ष स्थळावर न्यायाधीश जात नाही. प्रत्यक्ष तो पाहणी करीत नाही. पोलिस पाठवली जातात शहानिशा करायला. मग ते पैसे घेवून योग्य चौकशी न करता दस्तावेज तयार करतात. खोटीच चौकशी अन् खोटंच सर्वकाही. जसा खोटा अश्वत्थामा पांडवांनी उभा केला होता तसा. मग मारला कोण जाणार? निरपराध द्रोणाचार्य नाही का? तोही अक्कलहुशारीनं. इथंही तेच घडतं. पक्षकार हा भीम असतो. आरोपी द्रोण असतो. साक्षीदार युधिष्ठिर असतो. त्याला माहीत असतं सगळं सत्य. परंतु तो सत्य वदतच नाही. तो नको वा कुंजरवा म्हणतो अर्थात हत्ती आहे की मानव ते मला माहीत नाही. परंतु अश्वत्थामा मरण पावलाय आणि इथंच राजकारण फसतं. त्याच युधिष्ठिरसारख्या साक्षीदारावर विश्वास ठेवून आजच्या न्यायालयात अशा कित्येक द्रोणाचार्यांना शिक्षा दिली जाते वा कित्येक द्रोणाचार्यांना फाशी अन् जन्मठेप. आजही असे प्रसंग न्यायालयात वारंवार घडत आहेत. संन्यासाला फाशी होत आहे आणि डाकू मस्त मजेत मोकाट फिरत आहेत.
महत्वाचं सांगायचं म्हणजे अलिकडील काळात बोलतांना शब्द जपून वापरण्याची गरज आहे. कारण आज कलियुग आहे तोही सत्ययुगासारखाच. सत्ययुगात शब्द बाहेर पडला की खरा व्हायचा. तो सुशब्द असायचा. या काळातही तसंच आहे. शब्द बाहेर पडला की सत्य. परंतु या काळात सुशब्दाला किंमत नाही. तो खरा वाटतच नाही. परंतु कुशब्द अर्थात शिव्या देणे, वात्रट बोलणे, बनवाबनवी करुन बोलणे या गोष्टी खऱ्या वाटतात. सत्य बाहेर येतं. नाही येत असं नाही. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जसा द्रोणाचार्य मेल्यानंतर अश्वत्थामा कळला की नेमका कोण मरण पावला. परंतु ते नंतर कळून काय उपयोग? द्रोणाचार्य तर मरण पावला होता ना. तसंच आजही घडतं. त्यानंतर पश्चातापाची वेळ येते. परंतु नंतर पश्चाताप करुन काय उपयोग? त्यापेक्षा तशी वेळ येण्याच्या आधीच योग्य शहानिशा झाली असती तर. यासाठीच न्यायालयात न्यायदान करतांना वेळ लागतो. एवढा वेळ लागतो की साक्षीदार मरण पावतात. फिर्यादी मरण पावतात आणि आरोपीही मरण पावतात. मग न्याय मिळतो. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
महत्वपुर्ण गोष्ट ही की असं भांडण करण्यापेक्षा तोच युधिष्ठिराला साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यापेक्षा बोलतांना शब्द जपून वापरले तर काय बिघडते. परंतु आज लोकं ऐकतच नाही. पुढील व्यक्ती सापासारखा शांत जरी असला तरी जाणूनबुजून त्याच्या शेपटीवर पाय ठेवणारच. शेवटी असं होतं की ज्याच्या शेपटीवर पाय पडला, त्याला वेदना होते व तो चावा घेतो. तेव्हा डोळे उघडतात. मग पश्चातापाची वेळ येते. परंतु अशी पश्चातापाची वेळ येवू देण्यापेक्षा ती वेळ येणारच नाही यासाठी कोणीही असा शेपटीवर पाय देवू नये की पुढील व्यक्तीला वेदना होतील व तो चावा घेईल. जेणेकरुन आपल्याला त्या चाव्यावर उपचार करावा लागू नये. असंच आपलं बोलणं असावं. बोलतांना शब्द जपून वापरावे म्हणजे पावलं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०