कृष्णा सारखं घरातून आत-बाहेर येरझाऱ्या घालत होती, मधून मधून अंगणात येऊन बघत होती.
‘अरे केशव अजून आला कसा नाही ? एव्हाना यायला पाहिजे होता’. असा ती विचार करतच होती तेवढ्यात केशव त्याच्या बाईक वरून येताना दिसला.
आज रक्षाबंधन असल्यामुळे केशव कृष्णाकडे राखी बांधून घ्यायला आला होता.
‘माऊली’ बालकाश्रमात असल्यापासूनच कृष्णा-केशवने पक्क ठरवून टाकलं होतं की आपल्यामधील बहीण-भावाचं नातं कधीच विसरायचं नाही,अगदी बालकाश्रमातून बाहेर पडल्यावरही हे बंधन तुटू द्यायचं नाही.
कृष्णाचा आठवा वाढदिवस होता तेव्हा श्री व सौ पाध्येंनी तिला रीतसर दत्तक घेतलं होतं.
बालकाश्रमाचा शेवटचा निरोप घेत असताना कृष्णा केशव ला शोधत होती,तेवढ्यात आश्रमाच्या अंगणातून केशव धावत तिच्याकडे आला. कृष्णाला डोळे बंद व हात पुढे करायला लावून केशवने तिच्या हातात एक छोटं भेटकार्ड ठेवलं. त्यावर ‘रक्षाबंधनाच्या शुभेच्छा’ असं रंगीत पेनाने लिहिलेलं वाक्य चमकत होतं.
कृष्णा सुद्धा बहीण म्हणून कमी पडणार नव्हती,तिने सुद्धा केशवला त्याचा उजवा हात पुढे करण्यास सांगितला व त्यावर रंगीत कागदाने आणि फुलाने तयार केलेली राखी बांधली. तो रखीपोर्णिमेचा दिवस होता. दोघांनीही यापुढेही दरवर्षी ह्याच दिवशी भेटण्याचं वचन दिलं.
कृष्णा शहरातल्या एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेऊ लागली. विद्यालयीन शिक्षण पूर्ण करून, महाविद्यालयात गेली. मुळातच तल्लख बुद्धी असल्यामुळे शिक्षणात ती उत्तरोत्तर प्रगती करू लागली. बघताबघता कृष्णाने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. स्वतः च क्लिनिक सुरू केलं.
केशव ने आयटीआय चा कोर्स करून स्वतः च ऑटोमोबाईल गॅरेज सुरू केलं.
एवढ्या वर्षात एकही रक्षाबंधन असं गेलं नाही की जेव्हा कृष्णा-केशव भेटले नाहीत.
केशव बाईकवरून उतरला व श्री व सौ यांच्या ‘श्रीविलास’ बंगल्यात त्याने पाय ठेवला. कृष्णा समोरच दारात उभी होती. केशव घरात आला.
"घे बाई! आला तुझा भाऊ,क्षणभरही चैन पडत नव्हती तुला,तू बोल केशवशी तोपर्यंत मी औक्षणाची तयारी करते",असं म्हणून सौ पाध्ये लगबगीने आत गेल्या.
कृष्णाने केशवला ओवाळले,राखी बांधली. केशवने कृष्णाला एक सुरेख सोन्याचं ब्रेसलेट ओवाळणीत दिलं.
कृष्णा आग्रह करकरून केशवला वाढत होती.
"गुलाबजाम फारच मस्त झाले हं", केशव म्हणाला.
"तुझ्या बहिणाबाईंनी केलेत बरं का",सौ पाध्ये कृष्णाकडे कौतुकाने बघत म्हणाल्या.
"अहो काकू बस्स! पुरे बासुंदी,माझं पोट तुडुंब भरलंय",केशव म्हणाला.
कृष्णा-केशवने भरपूर गप्पा मारल्या,श्री व सौ पाध्ये सुद्धा त्यात सहभागी झाले.
केशव तृप्त मनाने,पोटाने कृष्णाचा निरोप घेऊन गेला परत याच दिवशी भेटण्यासाठी.
कृष्णाचा कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढतच होता, शहरातील निष्णात डॉक्टरांमध्ये तिची वर्णी लागत होती. स्वतः च्या दवाखान्या व्यतिरिक्त ती आणखी दोन इस्पितळात रुग्ण तपासायला जात असे.
अनेक क्लिष्ट हार्ट सर्जरीज तिने लीलया यशस्वी केल्या होत्या.
श्री व सौ पाध्ये तिला लग्नाबद्दल सुचवत होते पण कामाच्या व्यापात तिला तिकडे लक्ष देणे जमत नव्हते.
केशवने मात्र त्याच्या वर्गमैत्रिणीशी ‘रमा’ शी लग्न केलं होतं,साधं रजिस्टर पद्धतीनेच केलं होतं, कृष्णा व सौ पाध्येच तर केशवच्या बाजूने साक्षीदार म्हणून गेल्या होत्या.
एके दिवशी हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली होती, त्यासाठी त्वरित पोचणं आवश्यक होतं , ड्रायवर आजारी असल्याने कृष्णा स्वतः च कार चालवत हॉस्पिटल च्या दिशेने निघाली. तिला लवकरात लवकर पोचायचं होतं. ‘आज सिग्नल्स ही जरा जास्तच लागतायेत’ असं तिला वाटून गेलं.
एकदाचं सिग्नल सुटलं,कृष्णाने ब्रेक वरचा पाय काढला न काढला तोच विरुद्ध दिशेकडून एक दुचाकीस्वार सिग्नल तोडून आला,कृष्णाने करकचून ब्रेक दाबला,दुचाकीस्वार तर घाबरून पळून गेला पण कृष्णाच्या कार ला मात्र जोरदार अपघात झाला,कृष्णाच्या डोक्याला मार लागला ती बेशुध्द पडली.
पेशंट वर उपचार करायला निघालेली कृष्णा स्वतः च हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत होती.
केशव दुरुस्त केलेल्या कार ची ट्रायल घेण्यासाठी त्याच दिशेने जात होता, त्याला कृष्णा अपघातावस्थेत दिसताच त्याने तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
बरंच रक्त वाहून गेलं होतं. पुढील उपचारांसाठी रक्ताची नितांत गरज होती. कृष्णाचा रक्तगट ओ निगेटिव्ह अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे रक्त मिळणं अवघड जात होतं.
श्री व सौ पाध्येंचा रक्तगट ही जुळत नव्हता.
डॉक्टर, श्री व सौ पाध्ये फारच चिंतीत होते,तेवढ्यात केशव डॉक्टरांजवळ आला.
"डॉक्टर माझा एकदा रक्तगट तपासून बघा,जुळला तर देवच पावला",केशव
खरंच देव पावला होता कारण केशवचा रक्तगट ओ निगेटिव्ह च होता, सगळ्यांना हायसं वाटलं.
"कितीही बाटल्या रक्त घ्या डॉक्टर पण माझी बहिण वाचली पाहिजे",केशव म्हणाला.
डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर थोपटले.
केशवने रक्त दिल्यामुळे त्याला ग्लानी आली,पण कृष्णावर योग्य ते उपचार होऊ शकले.
कृष्णा शुद्धीवर आली, थोड्यावेळाने केशवलाही हुशारी वाटू लागली.
शुद्धीवर आल्यावर कृष्णाने आधी प्रश्न केला ",त्या हार्ट पेशंट च काय झालं?झाली का त्याची सर्जरी?"
"तो अगदी व्यवस्थित आहे,दुसऱ्या डॉक्टरांनी सर्जरी केली ती यशस्वी झाली. तुम्ही आराम करा, जास्त काळजी करू नका", डॉक्टर
तेवढ्यात कृष्णाचं लक्ष बाजूच्या कॉटकडे गेलं,तिथे केशव झोपलेला होता.
दोघांची नजरानजर झाली,कृष्णाच्या डोळ्यांत कृतज्ञता दाटून आली होती तर केशवच्या डोळ्यांत निश्चिन्ततेचा आनंद झळकत होता.
कृष्णाचं लक्ष समोर टांगलेल्या कॅलेंडर कडे गेलं,बरोब्बर पुढच्या आठवड्यात रक्षाबंधन होतं,तेवढ्यात श्री व सौ पाध्ये केशवची विचारपूस करून कृष्णाजवळ येऊन बसले.
"आई,बाबा मला इथून कधी डिस्चार्ज मिळणार आहे? कृष्णा श्री व सौ पाध्येंना म्हणाली.
"काळजी करू नको चार दिवसात तुला सुट्टी मिळेल,आणि येणारा रक्षाबंधन तू,केशव आणि आम्ही आपण आनंदाने साजरा करू आणि हो,रमालाही आवर्जून बोलवू ", सौ पाध्ये कृष्णा आणि केशव कडे आळीपाळीने बघत म्हणाल्या.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.
आत्तापर्यंत मनाने बहीण-भाऊ असलेले कृष्णा-केशव आता रक्ताने सुद्धा बहीण-भावाच्या पवित्र नातेबंधनात बांधले गेले होते.
केशवने बहिणीचं रक्षण करण्याचं बंधन पुरेपूर पाळलं होतं.
**************