खाडीच्या मध्यावर छोटस् बेट होते. साधारण मैलभर व्यासाचे ते बेट एका मगरीच्या आकाराचे होते.प्रवासी
त्या बेटाला नक्रद्विप म्हणत.या बेटामुळे खाडीचा प्रवाह दुभंगला होता. बेटाला वळसा घालून पाणी पुन्हा एकत्र येत समुद्राला मिळत होते.वर्षभर हिरव्या वनराईने शोभून दिसणारे ते बेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.समुद्रावरून येणारा खारा वारा वृक्षांत घुसला की सारे बेट सैरभैर होत असे.अवखळ वारा वेळूंच्या बनांतून जात असताना मंजूळ असा आवाज येत असे.अनेक वृक्ष- वेली फळ व फुलांनी बहरलेल्या असल्याने सारा परीसर गंधित व रंगीत दिसत होता.जमीनीवर गालीच्या सारखा हिरवा चारा पसरला होता.पिवळी, जांभळी, नारिंगी,निळी, पांढर्या व लाल रंगाची फुले त्या हिरव्या गालिच्याची शोभा वाढवत होती.
अनेक प्रकारचे पक्षी आपल्या सुस्वर आवाजाने सारा परीसर भारुन टाकत असत.मोर,माणिककंठ,कोकीळ,कोतवाल ,बुलबुल,खंड्या असे असंख्य पक्षी आसमंतात उडताना दिसत.हरीण,सांबर काळवीट,कोल्हे,लांडगे.,अस्वल असे प्राणी कधी-कधी नजरेला पडत. या बेटावरील सकाळ प्रसन्न व सायंकाळ रंगीत वाटे.या बेटावर फक्त एक कुटुंब राहत होत. या कुटुंबात सध्या तीनच माणसे राहत होती.साठ वर्षांचे प्रतापराव देसाई...त्यांची नात जानकी व नातू शाम.
प्रतापराव देसाई यांची देहयष्टी भरदार होती.सहा हात उंची,रुंद खांदे,भरलेले दंड,रुंद मनगट...भरगच्च दाढी मिशी
रुबाबदार व करारी चेहरा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
मनगटात एवढी ताकत की एका बुक्कीत नारळ फोडत.प्रतापरावांचा एक फटका म्हणजे साक्षात घणाघात!
तलवार,भाला, धनुष्य चालवण्यात ते तरबेज होते.दशक्रोशीत त्यांचा दरारा होता. त्यांनी जानकी व शामलाही तलवारबाजी... धनुष्य बाण चालविणे...मल्लयुध्द या युध्दात तरबेज केलं होते.जानकी पंधरा वर्षांची होती.चाणाक्ष , हुषार व चपळ होती.शाम तेरा वर्षांचा होता...त्यांच्या डोक्यात सतत वेगवेगळ्या कल्पना येत.तो सतत काही ना काही करत राहायचा.तो सुध्दा आपल्या आजोबां प्रमाणे उंच व चपळ होता.त्याचे दंड पिळदार होते.कसरती करणे त्याला आवडायचे.
नक्रबेटाला वळसा घालून समुद्राला जाणार्या मार्गावर उजव्या किनार्यावर कोळ्यांची वस्ती होती. हे कोळी प्रतापरावांना आपला प्रमुख मानत.मासेमारी साठी समुद्रावर जाताना ते नक्रबेटाकडे आले की हाळी देत. नक्रबेटाच्या डाव्याबाजूला असलेल्या नरेंद्र टेकडीवर दहा -बारा झोपड्या होत्या.तिथे भिल्ल राहत असत. त्यांचा प्रमुख दयाळ हा उत्तम लढवय्या व वैध्द होता.कंदमुळे, पाने व फुलांपासून तो विविध औषधे बनवायचा.हे सारे भिल्ल प्रतापराव देसाईंना मान देत.त्यांचा शब्द खाली पडू देत नसत. नक्रबेटापासून दोनकोसांवर कर्लीद्विप होते. हे बेट अगदी समुद्राच्या तोंडावर असल्याने बर्यापैकी मोठं होतं .गर्द झाडीने वेढलेल्या बेटावर समुद्री डाकूंची वस्ती होती. या डाकूंचा प्रमुख खड्गसिंग
हा अत्यंत क्रूर होता. त्यांच्या क्रूरतेच्या चर्चा सर्वदूर समुद्रावर पसरल्या होत्या. हत्या केलेल्या माणसांच्या कवट्या तो किनार्यावर काठ्या लावून लटकवत असे.अश्या असंख्य कवट्या किनार्यावर लटकताना दिसत. त्याच्या भितीमुळे जहाज , होड्या ,गलबते या कर्ली बेटाच्या परीसरात फिरकत नसत.चाच्यांमुळे बेटाच्या अंतर्गत भागाविषयी कोणालाही फारसी माहिती नव्हती. या चाच्यांच्या नजरेत नक्रबेट खुपत होत .त्यांना हे मोक्याच्या ठिकाणी असलेले नक्रबेट आपल्या ताब्यात हवं होतं.खाडीतून होणार्या सर्व प्रवासावर नजर ठेवून खंडणी वसूल करता आली असती असा खड्गसिंगाचा इरादा होता.
-------*--------*------*-----*------*---------*---
सायंकाळच्या त्या रम्य समयी किनार्यावर जानकी व शाम वाळूत किल्ला बांधत होते.सोनेरी सूर्यकिरणांमुळे समुद्राच पाणी लखलखत होत.अचानक जानकी भाला घेवून धावतच लाटांमध्ये शिरली.हातातला भाला तिने नेम धरत फेकला व धावतच पुढे गेली .गदागदा हलणारा भाला तिने वर उचलला .भाल्याच रुंद पात हातभर लांब व वितभर रुंद माश्यात घुसल होत. फडफड करणारा तो मासा तिने शिताफीने पकडला.
" ताई, आज रात्रीच्या कालवणा्ची छान तयारी झाली. पण अजून आजोबा का नाही आलेत.? आणि आजोबा असे कधी कधी एकटेच होडी घेऊन कुठे जातात?"
" हे बघ, ते मलाही माहित नाही. आपण लहान आहोत .किधीतरी ते आपल्याला सांगितलच."
"बरं उद्या त्या दक्षिणेकडच्या खुपर्या डोहातल्या मगरींना मासे खायला घालायला जायचयं त्यासाठी अजून काही मासे पकडावे लागतील."
" होय , त्यासाठी जाळ लावून ठेवलंय."
" ताई...ताई ती बघ होडी कशी डुचमळतेय... अरेच्या ही तर आजोबांची होडी आहे.पण होडी अशी का होतेय? आजोबा होडी घ्या काठावरून हात दाखवत आहेत."
" शाम , चल लवकर आजोबा संकटात आहेत."
दोघांनीही झपाझप पाण्यात उड्या मारल्या.किनार्याकडे
येणार्या लाटांशी झुंजत दोघं वेगाने होडी कडे जाऊ लागले.
त्यांच बालपण या पाण्याच्या पाळण्यावर खेळण्यात पोसलं होत. काही काळातच ती दोघ होडी जवळ पोहचली.
" आजोबा काय झालं? " जानकीने विचारले.
प्रतापराव कसेबसे होडीत उभे राहिले. त्यांच्या उजव्या मांडीतून रक्ताची धार उडत होती.त्यांचा पाय रक्तबंबाळ झाला होता.
" फारसं काही नाही बाळांनू, मांडीत बाण धुसला होता."
" बाण? मांडीत ? कोणी हे साहस केलं?" जानकी ने चिडून विचारले.
" ताई, प्रथम आजोबांना घरी नेऊया." शाम म्हणाला.
दोघांनी होडी स्थिर केली व खेचतच बेटाच्या किनार्याला आणली. प्रतापराव कौतुकाने आपल्या नातवंडांची धावपळ बघत होते.आपल्या खांद्याचा आधार देत त्यांनी प्रतापरावांना होडीतून उतरवल.वाळूतून त्यांना चालवत ती दोघ त्यांना घेऊन जिथे चांद घोडा चरत होता तिथे आली. प्रतापरावांना चालताना वेदना होत होत्या.पण चेहर्यावर वेदना न दाखवता ते सहज चालल्या सारखे चालत होते. त्यांना बघून चांद घोडा धावतच तिथे आला.आपल्या मालकाची अशी अवस्था बघून ते मुके जनावर कळवळून खिंकाळले. जानकी व शामने आधार देत आजोबांना घोड्यावर चडवले.
" लवकरात लवकर, दयाळाला घरी आणव लागेल. बाणाला विष लावलेले असण्याची शक्यता आहे." प्रतापराव म्हणाले.
" आजोबा मी त्वरीत जाते." जानकी म्हणाली.
" मी पण येतो." शाम म्हणाला.
" पण, आजोबांकडे कोण थांबणार?"
" तुम्ही माझी काळजी करु नका, प्रथम आपला वाडा गाठूया. चला बसा घोड्यावर. घरी काही लेप आहेत ते पायाला लावून मी घरी थांबतो तुम्ही नंतर दोन घोडे घेवून जा."
तिघेही घोड्यावर बसले.घोडा विजेच्या वेगाने दौडत वाड्याकडे दौडू लागला.
जानकी व शामच्या चेहर्यावर काळजी दिसत होती.
---*-------*-------*-------*------*-------*------*-----
पहिला भाग समाप्त
.