Use of mobile in education? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | मोबाईलचा शिक्षणात वापर?

Featured Books
Categories
Share

मोबाईलचा शिक्षणात वापर?

शैक्षणिक साधन म्हणून मोबाईलचा वापर?

अलिकडे मोबाईलचा वापर लोकं करीत असलेले दिसतात. त्यातच शाळेतील शिक्षकही सुटलेले नाहीत व विद्यार्थीही सुटलेले नाहीत.
मोबाईलचा जसा शोध लागला. तशी क्रांती झाली. कारण मोबाईलचा शोध म्हणजे एक चमत्कारच. एका मानवानं दगडाला वाचा फोडण्यासारखा चमत्कार. आज याच मोबाईलच्या प्रकारातून स्मार्टफोन आला व आज हा स्मार्टफोन एवढा लोकप्रिय झाला की जो तो हा स्मार्टफोन आज वापरायला लागला आहे.
मोबाईलच्या या वापरातून पुर्वी शिक्षकांवर बंदी घालण्यात आली होती. त्याचं कारणही तसंच होतं. हा स्मार्टफोन नवीन नवीन निघाल्यानं शाळेतील शिक्षकवर्ग शाळेतच विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी सारखा मोबाईल पाहात राहायचे. ते जेव्हा निदर्शनास आलं. त्यानंतर मोबाईल वापरावर शिक्षकांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु ती बंदी काही जास्त दिवस राहिली नाही. लवकरच कोरोना आल्या व शाळा बंद झाल्या. त्यानंतर परत मोबाईलची गरज पाहता ती बंदी उठविण्यात आली व आताही ती कायम आहे. आजही काही काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन ते मोबाईलद्वारे संचालीत होणाऱ्या व्हाट्सअपवरील व फेसबुकवरील मेसेज सारखे पाहात असतात. तसंच इंन्ट्राग्राम व मेसेंजर पाहात असतात.
मोबाईल खरं तर चांगलं साधन आहे. एका क्लीकवर सर्व माहिती मिळते. गुगल त्याचं नियंत्रण करीत असतं. तसं पाहता तो शिक्षकाच्या फारच उपयोगाचा आहे. त्याचं कारण आहे शिक्षकाला विद्यार्थी शिकवीत असतांना येत असलेला अडथळा. काही शिक्षक अपवाद सोडता जे हाडाचे शिक्षक आहेत. ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना अभ्यास करुन जातात. तसे आधीही जायचे. परंतु वर्गात शिकवीत असतांना विद्यार्थी असे काही प्रश्न करायचे वा पाठ्यपुस्तक शिकवीत असतांना असे काही प्रश्न उत्पन्न व्हायचे की ज्याची उत्तरं शिक्षकांजवळ नसायची व तो आपल्या विद्यार्थ्यांना उद्याला सांगेन असे म्हणून वेळ मारुन न्यायचा. त्यातच तो त्या प्रश्नाचं टिपण लिहून घ्यायचा. त्यानंतर त्या प्रश्नाबाबत त्याला घरी आठवण आली तर ठीक. नाहीतर दुसऱ्या दिवशी तो वर्गात जेव्हा जायचा. तेव्हा त्याला आठवण यायची आणि पश्चाताप वाटायचं की आपण हे विसरलोच. त्यातच विद्यार्थ्यांनी आठवण करुन दिलीच तर आज विसरलो म्हणून वेळ मारुन न्यायची पद्धत होती आणि विद्यार्थ्यांनी आठवणच दिली नाही तर तो प्रश्नही सपाट व्हायचा अर्थात ना त्याचा अर्थ डोक्यात राहायचा ना प्रश्न. परंतु आज तसं नाही. आज मोबाईल शिक्षकांजवळ असल्यानं तसे प्रश्न उपस्थीत झाल्यास असा शिक्षक पटकन त्याचं उत्तर मोबाईलद्वारे शोधतो व आपल्या कार्याला लागतो.
मोबाईलच्या शिक्षकाला कोणत्याही भाषेतील शब्द व त्याचे अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगता येते. तसंच एखाद्या स्थळाची भौगोलिक माहिती त्याला एका क्लीकवर उघडून सांगता येते. त्यासाठी आता पुस्तकाची पानं उलटविण्याची गरज नाही. तसंच मोबाईलद्वारे पुरातन काळातील ऐतिहासिक पुराव्याचाही अभ्यास करता येतो. संदर्भ साधने त्वरीत उघडता येतात. तशीच शिक्षकाला एखादा पाठ व्यवस्थीत समजावून सांगत असतांना वेगवेगळ्या पुस्तकात एका क्लीकवर उघडता येतात व त्याचा वापर संदर्भ साधनं म्हणून करता येतो. तशीच अलिकडच्या काळात दृश्य साधन हे ज्ञानार्जनाचे महत्वाचे साधन असल्यानं त्या संदर्भातील व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवता येतात. तसःच मोबाईलद्वारे वेगवेगळे खेळंही विद्यार्थ्यांना शिकवतात येतात. तशीच आजच्या काळात अतिशय उपयोगाची गोष्ट म्हणजे उद्योगधंदे. त्याचीही माहिती विद्यार्थ्यांना देता येते एका क्लीकवरच.
खरं तर मोबाईल चांगला आहे. उपयोगाचा आहे. शैक्षणिक साधन म्हणून तो शिक्षकांना वापरता येतो. परंतु काही काही शिक्षक असेही आहेत की जे आज मोबाईल तर वापरतात. परंतु तो विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नाही तर तो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी. ते विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे खेळ शिकवीत नाहीत. ते स्वतः खेळ खेळतात आणि दुसऱ्यांचाही खेळ करतात. सतत व्हाट्सअप व फेसबुकच्या आहारी गेलेला हा शिक्षक तो वर्गात शिकवणं सोडतो. स्वतःचे सेल्फी काढत बसतो व ते सेल्फी व्हिडीओ स्वरुपात गाणे टाकून अपलोड करतो व मला लाईक द्या असे म्हणत सुटतो. त्यातच त्याला विविध लोकांनी पसंती दिली तर त्यांना फार आनंद वाटतो. असं वाटायला लागतं की आकाशच कवेत आलं. परंतु या त्यांच्या कृतीनं वर्गातील शेकडो विद्यार्थ्यांचं नुकसान होते. ते कोणीही जाणत नाही. ती नुकसानभरपाई कोण पुरी करणार? हा प्रश्न आहे.
महत्वाचं सांगायचं म्हणजे मोबाईल चांगला आहे. महत्वपुर्ण साधन आहे. परंतु मोबाईलचा वापर आपण कसा करतो. ते आपल्यावरच अवलंबून आहे. आपण त्याचा वापर वर्गात चांगला कसा करणार हे आपले आपल्यालाच कळत असते. तेव्हा तो वापर आपल्या वर्गात अतिशय योग्य पद्धतीनं करावा. जेणेकरुन मोबाईलद्वारे साऱ्या वर्गखोल्यातून ज्ञानाचे दिवे लावतात येतील. शैक्षणिक क्रांती करता येईल व देश विकासाच्या पातळीवर नेता येईल वा देशाला महाशक्ती बनवता येईल.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०