Sumantanchya Vaadyaat - 8 in Marathi Detective stories by Dilip Bhide books and stories PDF | सुमंतांच्या वाड्यात - भाग ८

Featured Books
  • అరె ఏమైందీ? - 16

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 2

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 15

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 1

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ -వీర - 5

    వీర ఒక్కసారిగా వెనక్కి తిరిగి చూస్తాడు, చూసి "వీడా, వీడికి ఎ...

Categories
Share

सुमंतांच्या वाड्यात - भाग ८

सुमंतांच्या वाड्यात

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची  बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          दिनेशची मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा.  

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

प्रभावतीबाई                  विदिशाची आई.

राधास्वामी                   मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस.

निशांत                      शोधकर्ता (डिटेक्टिव)

भाग  ८

भाग ७ वरुन  पुढे  वाचा .......

“खरंच इतकं तातडीने जाण्याची आवश्यकता आहे का? रविवारी गेलं तर चालणार नाही का?” – विशाल. आता यावर निशांत काही बोलणार त्यांच्या अगोदर विदिशाच बोलली. ”विशाल अरे असं काय करतो? जितक्या लवकर याचा निकाल लागेल तितकं बरं नाही का? काही नाही, उद्या निघा तुम्ही. पण रात्री  तुम्ही इथे पाहिजे. मुक्काम करायचा  नाही.”

सकाळी सकाळी विशालला आलेला पाहून काकांना फारच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, “अरे विशाल तू? एवढ्या सकाळी सकाळी? काही विशेष?”

“हो काका, जरा विशेषच गोष्ट आहे. आधी मी ओळख करून देतो. हे निशांत, हे शोधकर्ता आहेत. आम्ही त्यांना एका विशेष कामासाठी बोलावलं आहे. त्यांना काही

माहिती हवी आहे, त्याच साठी आम्ही आलो आहोत.” – विशाल.

“काय माहिती हवी आहे? आणि शोधकर्ता म्हणजे डिटेक्टिव ना? आता, तुम्हाला काय जरूर पडली यांची? काही चोरी बीरी झाली आहे का?” - काका.

“सांगतो काका आधी सर्व सविस्तर सांगतो. घटनाच अशा घडत गेल्या की यांचा प्रवेश आवश्यक ठरला.” – विशाल.

“प्रवास करून आले आहात, आधी फ्रेश व्हा. आपण नाश्ता करतांना बोलू.” – काका.

नाश्ता करतांना विशालने सर्व हकीकत सविस्तर सांगितली. काकांचा चेहरा आता गंभीर झाला होता. “इतकं सारं घडलं आणि आम्हाला पुसटशी कल्पना पण नाही. तू आम्हाला सांगायला हवं होतं. आम्ही आलो असतो बार्शीला.” काका आता थोडे नाराज झाले होते.

“काका तुमच्या या वयात तुम्ही कशाला त्रास करून घेता? आम्ही आहोत ना. आणि मुख्य म्हणजे हे निशांत त्याच कारणा करता आले आहेत.” – विशाल.

“ठीक आहे निशांत, विचार तुला काय माहिती पाहिजे आहे?” – काका.

“मला तमच्या दोन्ही घराबद्दल माहिती हवी आहे. जितकी तुम्हाला आठवते ती सगळी.” – निशांत.

“बाबा आणि काकांच्या बोलण्या वरून जेवढं कळलं तेवढं सांगतो. प्लॉटच असे घेतले की ज्यांची समोरची बाजू वेगवेगळ्या गल्ल्यामधे उघडतील. त्याचं कारण असं की स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर, बरेच क्रांतिकारक आमच्या घरात आसरा घ्यायचे. हा सगळा गुप्त कारभार असायचा. जर कधी पोलिसांना कळलंच, तर ही लपलेली मंडळी लपत छपत, या घरातून त्या घरात जायची आणि पलीकडच्या  गल्लीतून पसार व्हायची. स्वातंत्र्य मिळाल्यावर हा प्रकार थांबला. माझा १९५० साली जन्मच त्या घरात झाला आहे. मग बरीच वर्ष आम्ही तिथे राहत होतो, पण वरुणला पुण्याला नोकरी लागली, मग आम्ही ते घर विकून टाकलं आणि इथे आलो.” - काका.

“बस, एवढंच? पसार होतांना लपलेली मंडळी कधी पोलिसांना दिसली नाही?”- निशांत

“नाही बुवा, बाबांच्या बोलण्यात कधी आलं नाही. मुळात या विषयावर फारशी कधी चर्चा झालीच नाही.” – काका.

“काका एक गोष्ट अजून विचारायची आहे. दोन्ही बेडरूमच्या मधे एका वाघाची शिकार करतांना दिनेशच्या आजोबांचं चित्र आहे. ते कसं काय?” – निशांत.

“खरं चित्र आहे ते. आमचे काका हे चांगले शिकारी होते, कोणी वाघ नरभक्षी झाल्याचं कळलं की, सरकार काकांना पाठवायचे. अशाच एका शिकारीचं चित्र आहे ते. आणि दोन्ही घरात आहे ते.” – काका. काकांना एवढीच माहिती होती, मग जेवण करून विशाल आणि निशांत निघाले. प्रवासात निशांत विचार करत होता. पुण्याची चक्कर मारून पदरात काहीच पडलं नव्हतं. काकांनी काही विशेष असं सांगीतलं नव्हतं.

“मग काय निशांत? काय म्हणतोस?” विशालने निशांतला डिवचलं

“काकांनी काही विशेष माहिती दिली नाही, पण मी त्यांनी सांगितलेल्या एका गोष्टीवर विचार करतो आहे, त्यांनी अर्धवटच  माहिती दिली, अर्थात त्यांनाही माहीत नसेल कदाचित” – निशांत.

“कोणची गोष्ट?” – विशाल

“ते म्हणाले, पोलिस आल्यावर क्रांतिकारक लपत छपत दुसऱ्या घरात जायचे आणि तिथून दुसऱ्या गल्लीतून पसार व्हायचे.” – निशांत.

“यात विचार करण्या सारखं  काय आहे?” – विशाल.

“विशाल, माझा पेशाच असा आहे, की त्यामुळे माझा सततच पोलीसांशी संबंध येतो. त्यामुळे त्यांच्या कार्य पद्धतीची बरीचशी माहिती मला आहे. आता हे बघ, पोलिस जेंव्हा कोणाला पकडण्यासाठी येतात, तेंव्हा एकटे दुकटे येत नाही. त्यांची टीम असते. आधी ते घराला वेढा घालतात. इथे तर क्रांतिकारक आणि इंग्रजांचे पोलिस अशी झटापट होती. मग हे पलायन त्यांच्या नजरेतून सुटणं कसं शक्य होतं? आणि दुसरं म्हणजे घरांच्या मधे असलेल्या मोकळ्या जागेतून लपत छपत जाणं कसं शक्य आहे? त्याच्या साठी आडोसा लागतो, तो इथे दोन्ही घरां मधल्या जागेत नाहीये. जागा एकदम मोकळी आहे. तूच विचार कर. ” – निशांत.

“तुझा मुद्दा कळला, पण यांचा आपल्या प्रॉब्लेमशी कसा संबंध जुळतो?” – विशाल.

“माहीत नाही. कदाचित संबंध नसेलही, मी त्याचाच विचार करतो आहे, उत्तर सापडलं की नक्की तुला सांगेन.” – निशांत.

थोडा वेळ जरा शांततेत गेला. मग निशांतच बोलला. “विशाल, ज्या काही घटना घडताहेत, त्या रात्री तुम्ही तुमच्या बेडरूम मधे गाढ झोपेत असतांना होतात. जेंव्हा तुझे सासू सासरे आले होते तेंव्हा काहीच झालं नाही. जे काही होतं आहे ते सगळं हॉल मधे होते आहे. आता हॉल मधे गोविंदराव झोपत होते तेंव्हा काहीच विपरीत घडलं नाही. आता सध्या मी झोपतो आहे. काहीच होत नाहीये. आपण एक प्रयोग करून बघू. निशांतने त्याला नेमकं काय करायचं याची पूर्ण कल्पना दिली. विशालला पण त्यात तथ्य दिसलं. त्याने होकार दिला. घरी गेल्यावर जेवणी वगैरे आटोपल्यावर सर्व हॉल मधे बसले. दिनेशने विचारलं

“निशांत, आता तुम्ही पुण्याला जाऊन काकांना पण भेटून आलात, तर काय प्रगती आहे? मला नीट  सांग. यशाची किती टक्के खात्री आहे? उगाच आम्ही तुझ्या भरवशावर विसंबून राहू, आणि पदरात काहीच पडणार नाही, पुन्हा आपलं ये रे माझ्या मागल्या.” दिनेशने आता निर्वाणीचा इशारा दिला असं दाखवलं. आवाजात जरा जरब होती. निशांतने सुद्धा त्याला दिनेशच्या बोलण्याचा राग आल्या सारखं दाखवून जरा नाराजी प्रकट करूनच त्याच भाषेत उत्तर दिलं.

“हे बघ दिनेश शोध कार्य म्हणजे पी हळद, हो गोरी, असं नसतं या कामात बराच वेळ लागू शकतो. अजून तरी, मला काहीच सापडलं नाही, हा मंत्रशक्तीचाच प्रभाव आहे अशी माझी खात्री पटत चालली आहे. त्यामुळे मी झटपट काही करू शकेन असं मला वाटत नाही. तुमचीच जर थांबण्याची तयारी नसेल, तर उगाच इथे दिवस वाया घालवण्यात मलाही काडीचा इंटरेस्ट नाहीये. भरपूर कामं नागपूरला माझी वाट पाहत आहेत. त्यामुळे, मी उद्याच सकाळी नागपूरला जातो आहे.” – निशांत.

“आणि मग आम्ही काय करायचं? गोविंदरावांनी मोठ्या अपेक्षेने तुला इथे आणलं आणि तू म्हणतो आहेस की तुला जमणार नाही म्हणून” – विशाल.

“मला सुद्धा वाईट वाटतंय, ही माझी पहिलीच केस आहे की जी मी सोडून चाललो आहे.” – निशांत.

“ठीक आहे, मंत्र शक्तीचाच प्रभाव असेल तर आम्हालाच उपाय शोधावा लागेल. कारण घर सोडून जाणे शक्य नाहीये.” – दिनेश.

दुसऱ्या दिवशी निशांत बॅग घेऊन निघून गेला. फाटकापाशी दिनेश आणि विशाल आले होते. त्यांना तो म्हणाला, “ठरल्याप्रमाणे मी रात्री येतो आहे. पण घरात माझ्याशी कोणीही बोलणार नाही. तुम्हाला, जर माझ्याशी बोलायचंच असेल, तर तशी खूण करायची, मग आपण कोणाच्या तरी बेडरूम मधे दरवाजा लावून बोलू.” दिनेश आणि विशालने मान डोलावली.

निशांत रोज पहाटे घराबाहेर पडायचा, सोलापूरला हॉटेल मधे दिवसभर आराम करायचा आणि रात्री उशिरा घरी परतायचा. असे ५-६ दिवस गेले. काहीच घडलं नाही पण सातव्या दिवशी रात्री घटना घडायला लागल्या. निशांत दिवसभर झोपायचा आणि रात्रभर जागायचा. त्या रात्री सुद्धा तो झोपेचं सोंग घेऊन पडला होता. आणि मध्य रात्र झाल्यावर काही तरी हालचाल त्याला जाणवली. किलकिल्या डोळ्यांनी  तो बघत होता. बाहेरच्या स्ट्रीट लाइट चा अंधुक प्रकाश घरात झिरपत होता. त्या प्रकाशात त्याला दिसलं की दोघं माणसं घरात शिरली होती. ती कुठून आली हे मात्र निशांतला समजलं नाही. तो बघत होता. ती दोन माणसं दिनेश आणि विशालच्या खोल्यांमधे गेली, त्यांच्या हातात पर्फ्यूम स्प्रे च्या बाटल्या होत्या. निशांत एकदम सावध झाला. त्याला माहीत होतं की त्या बाटल्यांमधे वेगळाच स्प्रे असणार होता, ज्यामुळे दिनेश आणि विशाल अगदी गाढ झोपणार होते. निशांत हळूच उठून त्या दोघांच्या मागे मागे एखाद्या छाये प्रमाणे गेला. निशांत विशाल च्या बेडरूमच्या दारात उभा राहिला आणि दिवा लावला. त्या माणसाने याची अपेक्षाच केली नव्हती, तो चमकून मागे वळला त्या बरोबर निशांतने त्याच्या पायावर हातातल्या काठीने जोरदार प्रहार केला. वेदना सहन न झाल्याने, तो माणूस जोरात ओरडला आणि खाली पडला. त्यांच्या ओरडण्याने विशाल उठला क्षणभर त्याला काहीच बोध होत नव्हता. निशांत ओरडला, विशाल धर त्याला. तेवढ्यात दिनेशच्या खोलीतला माणूस बाहेर आला आणि त्याने निशांतच्या अंगावर झेप घेतली. पण निशांत सावध होता, तो विजेच्या गतीने मागे वळला आणि त्या दुसऱ्या माणसाच्या पायावर सुद्धा काठीने दोन प्रहार केले. आरडा ओरडा ऐकून दिनेश सुद्धा बाहेर आला. मग तिघांनी मिळून त्या दोघा गुंडांना दोरीने बांधले.

“हा सगळा काय प्रकार आहे निशांत?” दिनेश ने विचारले.

“काय प्रकार आहे ते हेच लोक सांगतील.” निशांत म्हणाला.

“काय रे चोरी करायला आला होता का तुम्ही? आणि घरात कसे शिरला?” – दिनेश.

काहीही उत्तर नाही. दोघंही काहीच बोलेनात, मग दिनेशने चिडून त्याच्या कानफाटात मारली. “अरे बोलतोस का देऊ ठेऊन अजून एक ?” – दिनेश.

तरीही उत्तर नाही. दिनेशने निशांतकडे पाहीलं आता काय करायचं, असा आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.

“तू थांब. मला सवय आहे, अश्या लोकांशी गप्पा मारण्याची. तू एक काम कर किचन मधून अर्धा चमचा तिखट घे, आणि अर्धा चमचा पाणी घाल आणि घेऊन ये. यांचे डोळे खराब झाले आहेत, अंजन घातल्यावर ठीक होईल.” – निशांत.

क्रमश.....

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.