रहस्य विषाचे भाग एक
ही त्यावेळेस ची गोष्ट आहे जेव्हा मी विदर्भातील एका शहरात कॉलेज मध्ये संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होतो.
अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आमच्या महाविद्यालयात भरती (recruitment) साठी येत होत्या.
तेव्हा मी कॉलेज च्या हॉस्टेल मध्ये राहत होतो. कॉलेज प्रमाणेच हॉस्टेल ही प्रशस्त होते. हॉस्टेल तीन मजली होते ,प्रत्येक मजल्यावर वीस खोल्या आणि प्रत्येक खोली मध्ये चार विद्यार्थी अशी व्यवस्था होती. माझ्या खोलीत मी,माझा बालमित्र विघ्नेश आणि कॉलेज च्या प्रथमवर्षीच ओळख झालेले प्रणव व रत्नेश असे आम्ही राहत होतो.
त्या दिवशी आमच्या कॉलेज मध्ये टेक्नोसॉफ्ट नावाच्या नामांकित I.T. कंपनी चा इंटरव्यू होता. आम्ही सगळे विद्यार्थी हॉल मध्ये बसलो होतो. साधारण २० विद्यार्थी होतो. त्यात मी व माझे इतर तीन रूममेट्स पण होते. नावाच्या अद्याक्षराच्या क्रमानुसार मुलाखती सुरु होत्या. आम्हाला वेळ असल्यामुळे मी,विघ्नेश,प्रणव व रत्नेश लायब्ररीत बसलो होतो. आमच्या वर्गात रत्नेश खूप हुशार होता तो आधीच्या दोन्ही कंपनीं मध्ये सिलेक्ट झाला होता. पण आजचा इंटरव्यू सगळ्यांसाठी जास्त महत्वाचा होता. कारण या कंपनीत सिलेक्ट झाल्यावर पॅकेज ही चांगलं मिळणार होतं आणि करिअर डेव्हलपमेंट ला ही बराच वाव होता.
एकेक जण होता होता प्रणव चा नंबर आला त्यानंतर काही जणांचे इंटरव्यू झाल्यानंतर माझा इंटरव्यू झाला. प्रणव चा व माझा इंटरव्यू चांगला झाला. माझ्यानंतर ४ विद्यार्थी झाल्यानंतर रत्नेश नंबर होता. आणि सगळ्यात ढांग नंबर होता विघ्नेश चा. आमचे इंटरव्यू झाल्यामुळे रिलॅक्स व्हायला मी व प्रणव चहा पिण्यासाठी कॅन्टीन मध्ये गेलो.
तुला कोणते प्रश्न विचारले,मला कोणते प्रश्न विचारले अशा गप्पा करत आम्ही चहा पितच होतो की तेवढ्यात विघ्नेश चा फोन आला,कोल्ड्रिंक व इनहेलर आण म्हणून. विघ्नेश च डोकं गरगरत होतं. डोकं गरगरणार नाही तर काय,इंटरव्यू च्या तयारी साठी तो काल रात्री १ पर्यंत जागला होता आणि सकाळी चार ला उठला होता.
इनहेलर नक्की रत्नेश साठीच मागवलं असणार कारण त्याला ऍलर्जिक सर्दी असल्यामुळे त्याला बरेचदा लागतं,असा विचार करून मी व प्रणव कोल्ड्रिंक आणि इनहेलर घेऊन लायब्ररीत पोहोचलो. माझा अंदाज खरा होता रत्नेश लायब्ररी समोरच्या पॅसेज मध्ये शिंकत उभा होता. त्याला मी लगेच इन्हेलर दिलं आणि लायब्ररीत जाऊन विघ्नेश ला कोल्ड्रिंक दिलं .
कोल्ड्रिंक पिल्यावर विघ्नेश ला जरा बरं वाटलं.
मी विघ्नेश ला विचारलं ," का रे ,रत्नेश का शिंकतोय एवढा,त्याचा इंटरव्यू झाला का ?"
"नाही झाला इंटरव्यू मधेत टी ब्रेक झाला न त्यामुळे लांबला, तो चैतन्य आहे न आपल्या वर्गातला त्याने इथल्या वरच्या रॅक मधलं DBMS चं पुस्तक वाचायला घेतलं आणि त्यावर धूळ होती म्हणून झटकलं, आम्ही जवळच बसलो होतो आणि तुला तर माहितीच आहे रवीला धुळीची ऍलर्जी आहे.",विघ्नेश
"का रे ,चैत्याचा तर इंटरव्यू कधीचाच झाला मग हॉस्टेल वर जाण्याऐवजी लायब्ररीत कशाला बसला,पुस्तकी किडा ?",मी
"हो नं आणि कुठून आणलं ते धुळकट पुस्तक काय माहित, त्यामुळेच बहुतेक मला गरगरायला लागलं होतं. ",विघ्नेश
"अरे इतका धांदरट आहे तो चैत्या,येता-येता धडकला राघवला. आणि त्याचे हातमोजे बघितले का ? जरी हिवाळा असला तरी दुपारी इतकी कुठे थंडी वाजते का ",प्रणव
शिंकायचा आवाज थांबल्यामुळे प्रणव रत्नेश ला बोलवायला पॅसेज मध्ये गेला आणि मोठ्याने ओरडला ,ते ऐकून मी व विघ्नेश तिथे गेलो आणि बघतो तर काय तिथे रत्नेश बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या तोंडातून फेस येत होता. तेवढ्यात कॉलेज चा चपराशी इंटरव्यूसाठी रत्नेश ला बोलवायला आला. तो ते दृश्य पाहून घाबरला. मी त्याला व प्रणवला प्रिन्सिपॉल ना सांगायला पाठवले व तातडीने डॉक्टरांना बोलवायला सांगितले.
लगेच डॉक्टर आले त्यांनी रत्नेश ला तपासले आणि तातडीने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून घेतले मग पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी रत्नेश ची बॅग व वस्तू जप्त करून त्या पुढील तपासणीसाठी पाठवल्या. हॉस्पिटल मध्ये रत्नेश वर शर्थीचे उपचार सुरु होते त्याला विषबाधा झाली होती हे डॉक्टरांकडून कळलं. एव्हाना त्याच्या घरीही झालेला प्रकार कळवला होता.
पोलिसांनी सगळ्यांना आहे तिथेच थांबायला सांगितले कोणालाही कॉलेज सोडून दुसरीकडे जायची परवानगी नव्हती. आम्हा सगळ्यांचे बोटांचे ठसे घेण्यात आले. आम्ही सगळेजण लायब्ररी जवळच्या हॉल मध्ये बसलो होतो. सगळ्यांना टेन्शन आलं होतं. तेवढ्यात हवालदार आला आणि म्हणाला ,
" तुमच्यापैकी राघव कल्याणी कोण आहे ?"
"मी आहे",मी म्हणालो.
"चल तुला इन्स्पेक्टर नाईकांनी बोलावलंय. ",हवालदार
इन्स्पेक्टर आमच्या लायब्ररीत बसले होते,मी तिथे गेलो तर ते मला म्हणाले ,"ये बेटा, तूच का राघव ?"
मी आश्चर्यचकित झालो एवढ्या प्रेमाने बोलणारे इन्स्पेक्टर मी कधी सिनेमात सुद्धा बघितले नाही.
"हो सर, मीच राघव कल्याणी",मी
"बस इथे" असे म्हणून ते पुढे म्हणाले, "तुझ्या वर्गमित्राला विषबाधा झालीय आणि ती त्याच्या जवळ असलेल्या इनहेलर मुळे आणि त्या इनहेलर वर तुझ्या बोटांचे ठसे मॅच झाले आहेत. यावर तुझं काय म्हणणं आहे?” इन्स्पेक्टर
मला एकदम धक्काच बसला इनहेलर मुळे विषबाधा कसं काय शक्य आहे. मीच तर त्याला ते आणून दिलं होतं.
मी इंस्पेक्टरांना म्हंटल, "विश्वास बसत नाही सर ,इनहेलर मध्ये विष कसं काय येईल मीच तर त्याला काही तासांपूर्वी आणून दिलं होतं आमच्या कॅन्टीन जवळच्या मेडिकल मधून आणि म्हणून माझ्या बोटांचे ठसे असतील त्यावर. "
मग थोडा विचार करून मी म्हणालो,"पण सर माझ्या बोटांचे ठसे त्यावर आहेत मग मेडिकल मध्ये मला ज्याने हे इनहेलर दिलं त्याचेही ठसे यावर असायला हवेत ,नाही का ?"
"बरोब्बर,फारच हुशार आहे बुआ तू ,पण या इनहेलर वर तर रत्नेश चे आणि तुझेच बोटांचे ठसे आहेत ",इन्स्पेक्टर
"सर मी खरं सांगतोय मी आजच दुपारी १ च्या सुमारास ते मेडिकल मधून आणलं होतं माझ्यासोबत माझा दुसरा वर्गमित्र प्रणव पण होता तुम्ही त्याला विचारा हवं तर आणि मेडिकल मध्ये पण तुम्ही चौकशी करू शकता. फक्त इनहेलर च घेतलं असल्यामुळे मी त्याची पावती घेतली नाही ही मात्र माझी चूकच झाली.",मी
क्रमशः