राकेश आणि रिया यांचं लग्न अगदी दणक्यात झालं, राकेश चे वडील गंगाधरराव आणि आई सुमतीबाई यांना फार फार आनंद झाला,राकेश हा त्यांचा एकुलताएक मुलगा होता त्यामुळे मुलीची हौस त्यांची पुरी झाली नव्हती आता लक्ष्मीच्या पावलाने आलेली रिया म्हणजे आपल्याला लेकच मिळाली असं त्यांना वाटलं.
रिया आणि राकेश चा संसार सुरू झाला, रिया फारच लाडात वाढलेली मुलगी होती, चटचट काम करणं तिला सुचायचं नाही,सगळं तिला हातात लागायचं. उशिरा उठल्यावर ती पाहुण्यांसारखी बसून राहायची मग नवीनच लग्न झालंय म्हणून सुमातीबाई तिला काम सांगायची नाही,बरेचदा चहा तिला बेडरूममध्ये आणून द्यायची. कधी कधी राकेश तिला चहा नाश्ता बेडरूम मधेच आणून द्यायचा, त्यामुळे मुळातच आळशी असलेली रिया आणखी आळशी झाली,ती घरच्या लोकांना उद्धटपणे बोलू लागली.
राकेश तिला सांभाळून घ्यायचा समजावून सांगायचा,तेवढ्यापुरते ती नीट वागे पण पुन्हा आपल्या मूळ पदावर ती येई. ती हळूहळू राकेशला बोलून दाखवू लागली,की तू फक्त माझा च आहे , दुसरं कोणी नको आपल्यामध्ये, तुझे नातेवाईक आईवडील मित्र असं कोणीही नको फक्त तू आणि मी असंच आपलं घर असायला हवं.
तिचे तिच्या सासू सासऱ्यांशी खटके उडू लागले,मुद्दाम ती भांडणं उकरून काढे. तुझी आई बाबा मला कसे त्रास देतात असं ती सर्वतोपरी राकेशला समजावून आणि बिंबवून सांगे, राकेश वर रियाचा एवढा पगडा होता की त्याला तीचं सगळं खरं वाटे, तो तिला थोडंही दुखवत नसे. रोज ऑफिस मधून घरी आल्यावर रियाच्या त्याच्या आईवडिलांबद्दलच्या तक्रारी ऐकून तो अस्वस्थ व्हायचा. एक दिवशी रियाने कहर केला एक तर मी ह्या घरात राहीन नाहीतर तुझे आईबाबा असं ती जोरजोरात रडून त्याला सांगू लागली.
आता ह्या वयात माझे आईवडील कुठे जातील असं त्याने विचारताच तिने एका वृद्धाश्रमाची जाहिरात असलेला कागद त्याला दाखवला, हे बघून तो विचारात पडला,असं एकदम मी त्यांना सांगू शकत नाही मला हळूहळू त्यांच्याशी ह्यासंदर्भात बोलावं लागेल असे त्याने रियाला सांगितले. त्यांचं हे सगळं संभाषण सुमती बाईंनी ऐकलं आणि त्या गंगाधर रावांना म्हणाल्या, शेवटी ज्याची भीती होती तेच झालं.
आपल्याला आता फायनल डिसीजन म्हणजेच अखेरचा निर्णय घ्यावा लागेल असं म्हणून त्यांच्या दोघात काही बोलणं झालं.
काही दिवसांनी राकेश नि त्याच्या आईवडिलांजवळ वृद्धाश्रमाचा विषय काढला,तेव्हा गंगाधर राव आणि सुमती बाई यांनी त्याला शांत पणे सांगितले , "हे बघ राकेश हे घर तुझ्या बाबांच्या नावावर आहे त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने आम्ही ह्या घराचे मालक आहोत,जर ह्या घराबाहेर कोणाला जायचंच असेल तर ते तुम्ही दोघे आहात, तू आणि रिया खुशाल हे घर सोडून जाऊ शकता",
सुमती बाई म्हणाल्या
सुमती बाईंचं असं स्पष्ट बोलणं ऐकून राकेश ला आश्चर्याचा धक्का बसला आणि रिया तर हबकलीच,लगेच रिया तावातावाने म्हणू लागली, "अहो राकेश तुमचा एकुलताएक मुलगा आहे तुम्ही त्याला असं घराबाहेर काढू शकत नाही,तुमच्या दुखण्या खुपण्यात आम्हीच तुम्हाला उपयोगी पडणार. वृद्धाश्रमात जरी तुम्ही राहिले तरी आम्ही मधून मधून तुमच्याकडे लक्ष देणारच आहोत,पण ह्या घरातून आम्ही गेलो तर मात्र तुमच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला जमणार नाही"
"आम्ही आमचं बघून घेऊ सुनबाई, तू आमची काळजी नको करू, अनेक लोकांना मुलबाळ नसते ते ऍडजस्ट करतातच न तसे आम्ही करून घेऊ ऍडजस्ट",गंगाधर राव म्हणाले.
आता मात्र रिया बिथरली, ती म्हणाली," आम्हाला आमचा इस्टेटीतला वाटा द्या आम्ही निघून जातो"
"कोणती इस्टेट सुनबाई? ही सगळी मालमत्ता मी स्वतः कमवली आहे वारस्याने मला मिळालेली नाही,त्यामुळे ती कोणाला द्यायची हा हक्क मला आहे,ती जेव्हा ज्याला द्यायची असेल तेव्हा मी ती देईन, तू त्याचा मोह ठेवू नको. तुझा नवरा नोकरी करतो त्याचे त्याला पैसे मिळतात ते त्याला आणि तुला तुमच्या संसाराला उपयोगी पडतील",गंगाधर राव म्हणाले.
त्यांचा अखेरचा निर्णय ऐकल्यावर रिया ची दातखीळ बसली,नाईलाजाने त्यांना घराच्या बाहेर पडावे लागले,महागाईच्या काळात नवीन घराच्या भाड्यात राकेश चा अर्धा पगार संपून जायचा. मोलकरणीशी रियाचे भांडण व्हायचे त्यामुळे मोलकरीण टिकत नसे,मोलकरीण नसल्याने रियाला सगळे कामे घरी करावे लागत होते, मुळात आळशी असल्याने तिला कुठे नोकरी पण मिळेना,आता रिया चांगली रडकुंडीला आली होती.
एकदा संध्याकाळी राकेश घरी आल्यावर त्याला घर अंधारात दिसलं, त्याने लाईट लावले तर त्याला सोफ्यावर रिया रडत असलेली दिसली, त्याने लगेच तिच्याजवळ जाऊन त्याचे कारण विचारले तर तिला रडणं अनावर झाल्याने काहीच बोलता येत नव्हतं,
"रिया काय झालं आता! सगळं तुझ्या मनासारखं झालं न! आता मी फक्त तुझा च झालोय, इथे फक्त तू आणि मीच आहोत, न माझे आईवडील,न नातेवाईक आता का रडतेय? पण राकेश च्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं.
***********